सेंद्रिय शेती- काळाची गरज

डिजिटल बळीराजा-2    19-Oct-2019
 

  
 
 
सेंद्रिय शेती ही विविध नैसर्गिक तत्त्वावर आधारित असणारी पारंपारिक व शाश्वत शेतीची पद्धती आहे. यामध्ये जमिनीची सुपीकता दीर्घकालीन टिकवून ठेवण्यासाठी पिकांचे अवशेष, पालापाचोळा, जनावरांचे मलमूत्र व जैविक संवर्धनाचा अधिकाधिक वापर यावर भर दिला जातो. त्यामुळे शेतकर्याना महागड्या, आपल्या खर्चाच्या क्षमतेबाहेरील बहुराष्ट्रीय व देशी कंपन्यांची घातक विषारी निविष्ठांची आवश्यकता भासत नाही. त्यामुळे एकप्रकारे त्यांची जोखीम कमी होण्यास मदत होते. सेंद्रिय शेती ही विविध प्रकारच्या संमिश्र पीक पद्धतीवर आधारित असणारी पद्धती असून, पर्यावरणीय परिस्थितीशी सुसंगती राखून चिरस्थायी उत्पादन देणारी पृथ्वीवरील सजीवसृष्टीचे हित जोपासून विषमुक्त, सकस, गुणवत्तापूर्ण अन्न मिळवून देणारी खात्रीशीर पद्धत आहे.
 
(रासायनिक) नत्र खते जमिनीत दिल्यावर त्यांचे नायट्रेटमध्ये रुपांतर होऊन ती शेतीमधील पिके,फळझाडे यात घेतली जातात व त्यामुळे अन्नामध्ये येतात. त्यामुळे लिव्हर व रक्तामधील हिमोग्लोबिन बनण्याच्या क्रिया बिघडतात. 45 मिली नायट्रेट मानवी शरीर पचवू शकते पण आता भारतात त्याचे प्रमाण जास्त आहे. या नायट्रेटस मुळे शरीरातील सर्व संस्थांची मोठ्या प्रमाणात हानी होत्ते. हे जादा क्षार उत्सर्जन क्षमतेवर ताण पाडून युरिनरी डिसऑर्डर निर्माण करतात. शेतीमधील रसायन वापराने पक्ष्यांची, फुलपाखरांची, मधमाश्यांची संख्या नष्ट होत चालली आहे. जमिनीमधील जीवजंतूची, गांडूळांची संख्या कमी होत चालली आहे. रासायनिक शेतीमुळे आपल्या अन्नातील, सुक्ष्म घटकांचे प्रमाण कमी होत गेले आहे व धोकादायक रसायनांचे प्रमाण वाढत आहे. 1970 सालापासून रासायनिक शेतीमुळे आपण सर्व निरनिराळ्या 5000 प्रकारच्या रसायनांचे आपल्या अन्नातून, पाण्यातून व खाण्याच्या पदार्थातून सेवन करीत आहोत.
 
सेंद्रीय शेती मध्ये पिकांची लागवड करताना कोणतेही रासायनिक खत, कीडनाशक, रोगनाशक, तणनाशक, संप्रेरके, वाढरोधके इत्यादि विषारी घटकांचा वापर होत नाही. पिकाच्या जोमदार वाढीसाठी सेंद्रीय खते, जैविक कचरा, गांडूळखत, वनस्पतीजन्य कीड व रोगनाशके व निसर्गातील परोपजीवि मित्र कीडींचा वापर केला जातो. म्हणून सेंद्रिय अन्न रसायनमुक्त व सुरक्षित असते. व्यवस्थित पिकांची फेरपालट, मिश्रपिके घेणे किंवा अनेक पिके एकाच वेळी घेणे, आंतरपिके घेणे सेंद्रिय पद्धती मध्ये पिकांची फेरपालट करून शेती करण्याला एक महत्वाचे स्थान आहे. हिरवळीचे खत वापरून शेती करणे- द्विदल पिके शेतावर वाढवून नंतर जमिनीत गाडून त्यापासून उत्तम हिरवळीचे खत तयार करणे व त्याचा वापर करून शेती करणे ही जुन्या काळापासून चालत आलेली पद्धती आहे.
 

 
 
 
वेगवेगळ्या प्रकारचे जैविक खते, जसे- नत्रयुक्त जैविक खते, रायझोबियम, अॅझोटोबॅक्टर, अझोस्पीरीलम, स्फुरदयुअक्त जैविक खते मध्ये स्फुरद विरघळणारे जिवाणू वगैरे, वेगवेगळ्या पिकांसाठी योग्य प्रकारची जैविक खते पुरेशा प्रमाणात वापरावी. त्यामुळे जमिनीतील नैसर्गिक अन्नद्रव्ये उपलब्ध व परिवर्तीत होऊन पिकांना मिळतात. शेतातील तणं नेहमी नष्ट केले जातात.परंतु ह्याच तणांचा उपयोग शेतजमिनीला झाकण्यासाठी केला तर जमिनीतील आर्द्रता व जमिनीतील सुक्ष्म जीवाणूंची कार्यशीलता अधिक काळापर्यंत टिकून ठेवण्यास मदत होते. 
 
पिकांचे फेरपालट, मिश्र पिके, रासायनिक किटकनाशके किंवा बुरशीनाशकांचा वापर न करता निंबोळी अर्क, मिरची तंबाखू अर्क, परोपकारी जीवजंतूचा. परोपकारी कीटकांचा वापर करणे हीच एक सेंद्रीय शेती पद्धतीचे गुरुकिल्ली आहे. सेंद्रीय शेती पद्धती निसर्गाशी जवळीक साधणारी आहे. ह्या पद्धतीत आजच्या गरजा भागवण्यासाठी मातीला निकृष्ट न होऊ देता मातीची सुपीकता कायम ठेवली जाते. ज्यामध्ये मातीतील फायदेशीर सूक्ष्म जीवाणूंच्या वाढीसाठी योग्य वातावरण निर्माण होत असते. सुरवातीला (परिवर्तन कालावधित) जमिनीची मशागत करून पिके अशा रितीने घेतल्या जातात, जेणेकरून जमिन जिवंत व स्वास्थ्य चांगले राखले जाते. जमिन जिवंत राखण्यासाठी शेतावरील सेंद्रीय टाकाऊ पदार्थ, पिकांचे व प्राण्यांचे उरलेले अवशेष, जैविक व सेंद्रिय खतांचा वापर केला जातो. फायदेशीर जीवाणू सेंद्रिय पदार्थांचे विघटन करतात. ह्या पद्धतीच्या अवलंबनाने कालांतराने शेत जमीन ही स्वयंपूर्ण स्वयंविकसित होत जाते.
 
अशाप्रकारे, सेंद्रीय शेतीमुळे सर्वच क्षेत्रात व समाजाच्या वेगवेगळ्या भागात सारख्या प्रमाणात विकासाची हमी मिळते. भविष्यातील पिढीसाठी आजची भौगोलिक संपत्ती राखून ठेवण्याच्या जबाबदारीची भावना विकसित होते. 
 
डॉ. वैशाली हण्बोरकर, डॉ. सुमेध रा. काशिवार आणि श्री. लोपचंद नि.डोंगरवार, डॉ. उषा डोंगरवार 
|