एकात्मिक व्यवस्थापनाने होईल गुलाबी बोंड अळी हद्दपार

डिजिटल बळीराजा-2    01-Oct-2019
 
 
 
कपाशीवर येणार्‍या बोंड अळीच्या प्रादुर्भावाची कारणे व नियंत्रणासाठी एकात्मिक व्यवस्थापन कसे महत्त्वाचे आहे यासंबंधीची माहिती या लेखात सादर केली आहे.
 
कपाशीच्या मुख्य किडींपैकी गुलाबी बोंड अळी ही उशिरा येणारी अतिशय घातक कीड आहे. ही अळी बोंडाच्या आत राहून सरकीवर उपजीविका करते. त्यामुळे बाहेरून या किडीच्या प्रादुर्भावाची लक्षणे सहज दिसत नाहीत. कपाशीमध्ये सरकीचे प्रमाण 65%, तर रुईचे 35% असते व गुलाबी बोंड अळी ही बोंडातील सरकी खाते. त्यामुळे कापसाचे वजन भरत नाही व उत्पादनामध्ये प्रचंड घट होते. 
 
भारतामध्ये 2002 मध्ये बीजी-1 व 2006 मध्ये बीजी-2 बीटी कपाशीच्या लागवडीस मंजुरी देण्यात आली. सुरवातीला बीटी कपाशीमुळे बोंड अळ्यांचे यशस्वीरीत्या व्यवस्थापन झाले व रासायनिक कीटकनाशकांच्या फवारण्या कमी झाल्या, परंतु मागील 4-5 वर्षांपासून गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव गुजरात, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश व तेलंगणा राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात आढळला. व बीटी कपाशीचे अतिशय नुकसान झाले आहे. 2009 मध्ये गुलाबी बोंड अळीमध्ये क्राय 1 एसी या बीटी जनुकास (बीजी-1) व 2014 मध्ये बोलगार्ड-2 या बीटी जनुकास (बीजी-2) प्रतिकारशक्ती निर्माण झाल्याची नोंद झाली. 2014 ते 2016 दरम्यान बीटी कपाशीवर गुलाबी बोंड अळीचा कमी अधिक प्रमाणात प्रादुर्भाव आढळून आला, परंतु 2017-18 मध्ये कपाशीवर गुलाबी बोंड अळीचा प्रचंड प्रमाणात प्रादुर्भाव झाल्यामुळे 30-70 टक्के नुकसान झाल्याचे आढळले आहे. गुलाबी बोंड अळीपासून होणारे नुकसान टाळण्याच्या दृष्टीने या किडीच्या नुकसानीचे स्वरूप, प्रादुर्भावाची कारणे याबाबतची शास्त्रीय माहिती घेऊन गुलाबी बोंड अळीचे एकात्मिक व्यवस्थापन सामूहिकरीत्या करणे गरजेचे आहे.
 
बीटी कपाशीवरील गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावाची कारणे
 
1. बीटी जनुकास प्रतिकारशक्ती : गुलाबी बोंड अळीमध्ये क्राय 1 एसी व क्राय 2 एबी या दोन्ही बीटी जनुकास प्रतिकारशक्ती निर्माण झाल्यामुळे बीटी कपाशीवर या बोंड अळीचा प्रादुर्भाव होत आहे.
2. कपाशीच्या खोडवाखालील (फरदड) क्षेत्रात वाढ : कपाशीच्या खोडव्याखालील क्षेत्रात वाढ झाल्यामुळे शेतामध्ये वर्षभर कपाशीचे पीक राहते. गुलाबी बोंड अळी ही डिसेंबरनंतर खाद्य उपलब्ध नसल्यास सुप्तावस्थेत जाते. पण कपाशीच्या खोडव्यामुळे तिचा जीवनक्रम सुरू राहतो. तसेच पुढील हंगामात एप्रिल-मेमध्ये लागवड करण्यात येते. यामुळे किडीच्या जीवनक्रमात खंड पडत नाही.
3. संरक्षित पट्टा/रेफुजी (आश्रय) पिकाच्या ओळी न लावणे : बहुतांशी शेतकर्‍यानी कपाशीच्या कडेने रेफुजी बिगरबीटी कापसाच्या ओळी न लावल्यामुळे गुलाबी बोंड अळीमध्ये बीटी कपाशीप्रती प्रतिकारक्षमता लवकर तयार झाली.
4. जास्त कालावधीच्या संकरित वाणांची लागवड : जास्त कालावधीच्या संकरीत वाणामुळे गुलाबी बोंड अळीला अखंडित खाद्यपुरवठा उपलब्ध होतो.
5. कपाशीच्या असंख्य संकरित वाणांची विपुलता : भारतामध्ये 2014 पर्यंत 1167 बीटी संकरित वाणांना मंजुरी देण्यात आली. या वाणांचा फुले व बोंड लागण्याचा कालावधी वेगवेगळा असल्यामुळे गुलाबी बोंड अळीस सतत खाद्य उपलब्ध होत राहते. 
6. कच्च्या कापसाची जास्त कालवधीपर्यंत साठवणूक : जिनिंग मिल व बाजारात कच्चा कापूस गुलाबी बोंड अळीच्या अळी व कोषासह जास्त काळ साठवण करण्यात येते. या अळ्या/कोष पुढील हंगामाच्या कपाशीवर प्रादुर्भावाचा स्त्रोत होतात. 
7. कपाशीच्या पर्‍हाट्यांची साठवणूक : हंगाम संपल्यानंतर कपाशीच्या पर्‍हाट्या व अवशेष शेतात किंवा शेताजवळ, गावात तसेच रचून ठेवणे व वेळेवर विल्हेवाट न लावणे. 
8. कपाशीची लवकर लागवड : ठिबक सिंचनावर कपाशीची लागवड मे महिन्यात मोठ्या प्रमाणात होत आहे. मागील हंगामातील पर्‍हाट्या शेतात तशाच ठेवणे आणि लवकर लागवड यामुळे गुलाबी बोंड अळीच्या जीनक्रमात खंड पडत नाही. म्हणून जून-जुलैमध्ये या बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसून येतो.
9. बीटी विषाचे प्रकटीकरण : गुलाबी बोंड अळी पाते, फुले व बोंडावर उपजीविका करते. बीटी विषाचे प्रकटीकरण कपाशीच्या पाते, फुले व बोंडामध्ये कमी प्रमाणात असते. त्याचबरोबर कोरडवाहू बीटी कपाशीमध्येसुद्धा बीटी विषाचे प्रकटीकरण कमी असते.
10. संकरित वाणाच्या पहिल्या पिढीतील कपाशीच्या विषामधील जनुकाचे विलगीकरण : केवळ भारतामध्येच बीटी कपाशीच्या संकरित वाणाची लागवड केली जाते. या संकरित वाणाच्या पहिल्या पिढीतील झाडावरील बोंडामध्ये असलेल्या बियामध्ये जनुकाचे विलगीकरण होते. उदा. बोलगार्ड 2 कापसामध्ये क्राय 1 एसी व क्राय 2 एबी हे दोन जनुक आहेत. पहिल्या पिढीतील बोंडामध्ये असलेल्या बियामध्ये जनुकाचे 9:3:3:1 या प्रमाणात विलगीकरण होते. म्हणजेच 9 बियांमध्ये क्राय 1 एसी व क्राय 2 एबी हे दोन्ही जनुक, 3 बियांमध्ये केवळ क्राय 1 एसी, 3 बियांमध्ये केवळ क्राय 2 एबी आणि एका बियामध्ये कोणतही जनुक नाही. ही परिस्थिती प्रतिकारशक्ती निर्माण होण्यास अतिशय पोषक आहे. 
11. योग्य वेळी शेंदरी बोंड अळीचे व्यवस्थापन न करणे : गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव बाहेरुन ओळखू येत नाही. तसेच बीटीमुळे या बोंड अळीचे व्यवस्थापन होईल, अशी खात्री होती, यामुळे या किडीच्या व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष झाले. 
12. काही कीटनाशके/कीटकनाशकांची मिश्रणे यांची फवारणी : कपाशीवर मोनोक्रोटोफॉस व अ‍ॅसिफेट ही कीटकनाशके किंवा त्यांची मिश्रणे यांची फवारणी केल्यास कपाशीची कायिक वाढ होते. त्यामुळे फुले व बोंडे लागण्यामध्ये अनियमितता येते. या किडीला सतत खाद्य उपलब्ध राहते.
 
गुलाबी बोंड अळीचे एकात्मिक व्यवस्थापन
 
हंगाम संपल्यानंतरचे व्यवस्थापन
 • कपाशीचे खोडवा (फरदड) घेऊ नये. वेळेवर कपाशीची वेचणी करून डिसेंबरनंतर शेतामध्ये कपाशीचे पीक ठेवू नये. 
 • हंगाम संपल्यानंतर शेतामध्ये जनावरे किंवा शेळ्या, मेंढ्या, चरण्यासाठी सोडाव्यात.
 • शेतातील पिकांचे अवशेष वेचून नष्ट किंवा जाळून टाकावेत.
 • हंगाम संपल्यावर ताबोडतोब पहाटीचा वापर करावा किंवा बंदोबस्त करावा. शेतात किंवा शेताजवळ पहाटी रचून ठेवू नये.
 • हंगामामध्ये कामगंध सापळे आणि प्रकाश सापळे शेतामध्ये आणि हंगाम संपल्यावर जिनिंग मिलजवळ, बाजारामध्ये लावावेत.
 • पूर्वतयारी व लागवडीदरम्यानचे व्यवस्थापन : 
 • उन्हाळ्यामध्ये जमिनीची खोल नांगरट करावी.
 • पीक फेरपालट करावी. कपाशीच्या कुळातील अंबाडी, भेंडी, मुद्रिका अशी पिके कपाशीपूर्वी किंवा नंतर घेऊ नयेत, पर्यायी खाद्य वनस्पती जसे रानभेंडी इ.चा नयनाट करावा. त्यामुळे या बोंड अळीच्या जीवनक्रमात खंड पडेल.
 • आश्रय ओळी लावावे. देशी कापूस, पारंपरिक बिगरबीटी कापूस किंवा उशिरा लावलेली भेंडी हे आश्रय पीक म्हणून लावावे.
 • कमी कालावधीचे (150 दिवस) आणि एकाचवेळी जवळपास वेचणी करता येणार्‍या संकरित वाणाची लागवड करावी.
 • रसशोषण करणार्‍या किडींसाठी प्रतिबंधात्मक वाणाची निवड करावी. यामुळे या किडींच्या व्यवस्थापनासाठी फवारण्यात येणाया काही कीटकनाशकामुळे फुले लागण्यात येणारी अनियमितता टाळता येते व गुलाबी बोंड अळीच्या नैसर्गिक शत्रूंची जोपासना होईल. 
 • लागवडीनंतरचे व्यवस्थापन
 • नियमित सर्व बीटी कपाशीचे सर्वेक्षण करावे. कामगंध सापळ्याचा वापर करुन किंवा हिरवी बोंडे फोडून या बोंड अळीचे सर्वेक्षण करावे.
 • प्रादुर्भावग्रस्त गळालेली पाते व बोंडे जमा करून नष्ट करावेत. 
 • डोमकळ्या दिसल्यास त्या तोडून आतील अळ्यासह नष्ट करावे. 
 • कामगंध सापळ्याचा वापर शेंदरी बोंड अळीचे पतंग मोठ्या प्रमाणात आकर्षित करणे आणि नर-मादी मिलनामध्ये अडथळा आणणे यासाठी करता येतो. 
 • ट्रायकोग्रामाटॉयडिया बॅक्ट्री या परोपजीवी गांधीलमाशीचे कार्ड (1.5 लाख अंडी/हे.) शेतामध्ये लावावेत. 
 • आर्थिक नुकसानीची पातळी : 8-10 पतंग प्रतिसापळा सलग 3 रात्री किंवा 10 टक्के प्रादुर्भावग्रस्त हिरवी बोंडे. ही पातळी ओलांडल्यानंतर खालील रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करावी.
         कीटकनाशके प्रमाण / 10 लि. पाणी
         क्विनॉलफॉस 25 ईसी किंवा 20 मिली
         प्रोफेनोफॉस 50 ईसी किंवा 20 मिली
         थायोडीकार्ब 75 डब्ल्युपी किंवा 20 ग्रॅम
         लॅमडा साहॅलोथ्रीन 5 ईसी किंवा 10 मिली
         फेनवलरेट 20 ईसी 8 मिली
 
 • वरील प्रमाण साध्या पंपासाठी आहे. पेट्रोल पंपासाठी हे प्रमाण तीनपट वापरावे.
 • पायरेथ्रॉईड गटातील कीटकनाशकाची (लॅमडा साहॅलोथ्रीन, फेनवलरेट 20 ईसी) फवारणी नोव्हेबर महिन्याअगोदर करू नये. यामुळे पांढर्‍या माशीचा उद्रेक होतो.
 
अशा प्रकारे गुलाबी बोंड अळीचे एकात्मिक पद्धतीनेच व्यवस्थापन शक्य आहे. कारण ही बोंडातील सरकीवर उपजीविका करते, त्यामुळे प्रादुर्भाव लक्षात येत नाही व व्यवस्थापन करण्यास कठीण जाते. 
 
संपर्क : डॉ. एन. के. भुते (कापूस कीटक शास्त्रज्ञ) 7588082033
कापूस सुधार प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
 
 
डॉ. एन. के. भुते (कापूस कीटक शास्त्रज्ञ)
डॉ. आर. एस. वाघ (कापूस पैदासकार)