टोमॅटोवरील किडींची ओळख व नियंत्रण

डिजिटल बळीराजा    28-Sep-2018
 
किडींचे निदान केल्याशिवाय त्यावर कोणतेही उपाय करू नयेत. टोमॅटो पिकावर पडणार्‍या किडींचे व्यवस्थापन करण्यासाठी त्यावरील किडींबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. टोमॅटोवर पडणार्‍या किडींचा जीवनक्रम, नुकसानीचा प्रकार, जैविक नियंत्रणाचे उपाय याबद्दल थोडक्यात माहिती या लेखात करून घेऊ.
 
प्राचीन काळापासून भारतीय जीवनात भाजीपाला पिकास विशेष महत्व आहे. विसाव्या शतकातही भाजीपाल्याचे महत्व अत्यंत वाढत असल्याचे दिसून येते. भाजीपाला पिकाचे उत्पादन करणार्‍या प्रत्येक शेतकर्‍याला वाटते की मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याचे उत्पादन घ्यावे. परंतु हे स्वप्न साकार करण्यासाठी अनेक अडथळ्यावर मात करूनच अधिक उत्पादन घेणे शक्य होणार आहे. मोठ्या प्रमाणावर कीड प्रसार हा भाजीपाला पिकावर होताना दिसून येतो. किटक पानातील अन्नरस शोषून पानांची जाळी तयार करतात. त्यामुळे झाडांची वाढ होत नाही.फळ पोखरणारी अळी फळे पोखरून टाकते त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पिकाचे नुकसान होते. खोडकिडा खोड कुरतडतो. या सर्वांमुळे पिकाची हानी होऊन मोठ्या प्रमाणात पीक उत्पादनात घट होते. आपल्या देशात किडींमुळे होणारे पिकांचे नुकसान हे साधारणपणे एक हजार कोटीपेक्षा अधिक आहे आणि हे नुकसान थांबवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कीड नियंत्रण करावयाच्या विविध कीटकनाशकांची माहिती असेल तर योग्य वेळी योग्य प्रमाणात कीटकनाशकांची फवारणी करून किडींपासून पिकाचे रक्षण करणे शक्य होणार आहे. त्यासाठी पिकांवर येणारी कीड ओळखता येणे महत्वाचे आहे म्हणजे योग्य त्या पद्धतीने किडींचा नाश करणे सहज शक्य होते.
 
टोमॅटो पिकावरील येणारी कीड यांची माहिती खालीलप्रमाणे आहे.
 
1.फळ पोखरणारी अळी : टोमॅटो पिकातील ही कीड अतिशय उपद्रवी असते. या किडींमुळे टोमॅटो पिकाचे 30 टक्कयापर्यंत नुकसान होते. ही कीड वर्षभर आढळणारी आहे. ही कीड टोमॅटो पिकाशिवाय हरभरा पिकात असल्यास तिला घाटेअळी म्हणतात. ही अळी कापूस पिकात बोंडाचे नुकसान करते. या अळीचा उद्रेक पाने, फुले, फळे इ. पिकाच्या भागावर होतो. ही कीड उष्ण उपोष्ण आणि सम हवामानातही आढळते.
 
किडींचा जीवनक्रम : या किडींच्या अळीचा रंग हिरवट असून बाजूला तुटक करड्या रंगाच्या रेषा असतात. या किडीची पतंग मादी झाडाच्या पानांवर, खोडावर अंडी घालते. अंडी पिवळसर व आकाराने गोल 0.5 मिमी व्यासाची असतात. अंडी उबण्यापुर्वी अंड्याचा रंग फिक्कट लाल होतो आणि अड्यांतून अळी बाहेर पडते. सुरुवातीला अळ्या समूहाने असतात व टोमॅटो कोवळी पाने किंवा रोपाचा पडशा पाडतात. अळ्या सहावेळा कात टाकतात. हा कालावधी 18 ते 25 दिवसांचा असतो. या अळींची पूर्ण वाढ झाल्यावर टोमॅटो फळे पोखरतात. एका नंतर अनेक फळे पोखरत असतात.
 
एक अळी आठ ते दहा टोमॅटो फळांना पोखरते. ही अळी टोमॅटो झाडाच्या खोडाजवळ कोषात जात कोषावस्था आठ ते एकवीस दिवस असते. कोषाचा रंग पांढूरका चकचकीत असतो. प्रोढ अवस्थेतील अळीची लांबी 35 ते 45 मिमीपर्यंत असते. रंग हिरवा व बाजूने काळसर तुटक रेषा असतात. डोके मजबूत व काटक असते. कोषातून बाहेर पडणारा पतंग काटक शरीराचा असतो. मादी पतंग गर्द तपकिरी रंगाचा असतो तर नर पतंगाच्या पंखाच्या कडा करड्या रंगाच्या असतात व पंखाची लांबी 40 मिमी पर्यंत असते. या किडींची पतंग अवस्था 10 ते 20 दिवसांची असते. या किडीचा जीवनक्रम अंदाजे 28 दिवसांचा असतो. भारतात या किडीचा उद्रेक 96 प्रकारच्या पिकांवर आणि 61 प्रकारच्या तण व वन्य झाडावर आढळतो.
 
नुकसानीचे प्रकार : टोमॅटो पिकात अळी अवस्थेतील कीड शेंड्याची किंवा रोपांची पाने खते. नंतर टोमॅटो अपरिपक्व अथवा पक्व किंवा लहान फळांना बीळ पाडते. टोमॅटो फळात विष्टा टाकतात त्यामुळे टोमॅटो फळे खराब होतात सडतात व त्यावर बुरशीजन्य रोगाची वाढ होऊन पिकात लागण होते.
 
नियंत्रण : टोमॅटो पिकात नुकसान पातळी पर्यंत प्रादुर्भाव असल्यावर मॅलॅथिऑन 35 टक्के प्रवाही 400 मिमी किंवा प्रोफेनोफॉस 50 टक्के प्रवाही 350 मिली एकरी फवारावे. तसेच कोषावस्था जमिनीत असल्यामुळे जमीन निर्जंतुक करण्यासाठी निर्जंतुक करके किंवा फोरेट एकरी 5 किग्र जमीनीत टाकावे.
 
जैविक नियंत्रण : पर्यावरण प्रदूषण या बाबींचा विचार अति महत्वाचा आहे. यामुळे किडीची पातळी नुकसान पातळीखाली जाते व निसर्गावर विपरीत परिणामही होत नाही. याकरिता जैविक कीड नियंत्रण प्रभावी ठरते. त्या नियंत्रणामध्ये परोपजीवी किटक , भक्षक सूक्ष्म जीवाणू, विषाणू आणि बुरशी आदींचा समावेश होतो. निसर्गात व अभिकारकाची विपुलत असल्याने कीड नियंत्रणास बराच वाव आहे, परंतु त्याकडे दुर्लक्ष केले जाते. या उपयुक्ततेची अनुभूती आली आहे.
 
ट्रायकोग्रामा : ही कीड परोपजीवी असून मादी पोखरणार्‍या अळीच्या अंड्यात घालते आणि त्यात आपली उपजीविका करते. त्यामुळे फळ पोखरणार्‍या अळीची अंडी उबवली जात नाहीत व फळ पोखरणार्‍या अळीच्या उत्पतीस अडथळे येतात. ट्रायकोग्रामा सुप्तावस्थेतील ट्रायकोग्रामा बाजारात मिळतात. एकराच्या प्रक्षेत्राकरीता 40 हजार ट्रायकोग्रामा शेतात सोडावे. ट्रायकोकार्डवरील पट्या लहान आकारात कापाव्यात व झाडाच्या पानाच्या जमिनीकडील बाजूस टाचणीने पिन मारून बांधाव्यात टाचणीने किंवा पिन मारून बांधाव्यात. ट्रायकोकार्डची सुप्तावस्था तुटते व अळ्या बाहेर पाडतात आणि फळे पोखरणार्‍या अळीच्या अंड्यात ते आपली अंडी घालतात व अळीचे नियंत्रण करीत असतात.
 
क्रायसोपा : हे भक्षक कीटक असून हिरव्या रंगाचे पतंग असतात. या किडीची अंडी निळसर पांढर्‍या रंगाची असतात. ही अळी फळ पोखाणार्‍या अळीवर जगते. क्रायसोपा एक अळी आपल्या आयुष्यात 700 ते 800 लहान अळ्या व अंडी खाते. एकरी 40 हजार क्रायसोपाची अंडी 25 आणि 40 दिवसाच्या अंतराने झाडाच्या पानावर टाचावीत. 
 
क्रायसोपा वेगवेगळ्या अळ्यांचे नियंत्रण करते. अळ्या शोधण्याची आणि किडींचा पडशा पाडण्याची उपजतच शक्ती असल्यामुळे योग्यरीतीने नियंत्रण करते. क्रायसोपा काटक असल्यामुळे योग्यरीतीने नियंत्रण होते. क्रायसोपाचा पतंग शेतात रुळतो व अंडी घालून पुढची पिढी वाढते.
 
हेलीकोव्हार्पा न्युक्लीअर पॉलिहेड्रॉस व्हायरस ( एचएनपीव्ही ) : टोमॅटो फळ पोखरणारी अळी एचएनपीव्ही विषाणूमुळे रोगग्रस्त होऊन मरते. याचे वैशिष्टे म्हणजे किटकांशिवाय इतर प्राणीमात्रास हानिकारक नाही. याचा पर्यावरणावर दुष्परिणाम होत नाही. टोमॅटो फळे पोखरणार्‍या अळीला मोठ्या प्रमाणात विषाणूंची लागण होऊन कीड नुकसानदर्शक पातळीच्या खाली राहत असते या विषाणू कार्यक्षमता शीतपेटीत अनियमित काळाकरिता टिकवता येते. प्रकाशातील अतिनील प्रकाश किरणांमुळे ही क्षमता कमी होते. त्यामुळे ही नियंत्रण फवारणी संध्याकाळी किंवा ढगाळ वातावरणात करावी. 
 
टोमॅटो पिकात फळ पोखरणारी अळी शेतात दिसताच लगेच फवारणी करावी. दुसरी फवारणी पहिल्या फवारणीनंतर 10 दिवसाच्या अंतराने फवारावे. इतर कीटकनाशक किंवा रोग नियंत्रकाची फवारणी गरजेची असल्यास एचएनपीव्हीचा सोबत करता येते. 
 
बॅसिलीस थुरिनजिनीसीसी जीवाणू : यालाच बी. टी. सामान्य नावाने ओळखतात. टोमॅटो फळ पोखरणारी अळीच्या नियंत्रणाकरिता या जीवाणूचा एकीकृत कीड नियंत्रणात महत्वाचे स्थान आहे. या जिवाणूमुळे जमिनीत राहणार्‍या अळ्यांना मारण्याची शक्ती आहे. हे जीवाणू किडी व्यतिरिक्त इतर प्राण्यास नुकसानकारक नाही. या जीवाणूची पूर्ण वाढ झाल्यावर बॅक्टेरिया अतिसूक्ष्म बीज व स्फटिक तयार करते. हे स्फटिक अन्न खाणे बंद होते व अळ्या आकसून मरतात. या किटकनाशक जीवाणूंची फवारणी पाण्यातून करीत असतात. बी. टी. जीवाणूंच्या एकरी फवारणी करिता 300 ते 400 रुपये एका फवारणीकरिता खर्च येतो.
 
पाने खाणारी अळी : टोमॅटो पिकातील ही कीड आंतरराष्ट्रीय आहे. या किडीचा उद्रेक भाजीपाला पिकाशिवाय मादक वनस्पतीवर आढळतो. ही कीड भारतात टोमॅटो, कोबी,वांगी,वाटणा, तंबाखू या पिकावर प्रादुर्भाव आढळतो.
 
जीवनक्रम : या किडीचा पतंग बळकट, मध्यम आकाराची असते. अंदाजे तिची लांबी 22 मिमी असते. पंखाचा रंग फिक्कट करडा व त्यावर नागमोडी, पांढर्‍या रेषा असतात व विस्तार 40 मिमी असते या किडीची अळी गुळगुळीत शरीराची, हिरव्या किंवा पिवळ्या रंगाची असून काळ्या खुणा असतात व छातीवर पट्टा असतात. प्रोढ अळींची लांबी 40 मिमी असते. रोपावस्थेतील पिकावर या किडीचा प्रादुर्भाव झाल्यास फार मोठे नुकसान करत असतात. या किडींची सुरुवातीची अवस्था समूहाने रात्री अधाशासारखी पिकांवर हल्ला चाध्विते व संपूर्ण पानांचा पडशा पाडत. या किडींची मादी टोमॅटो कोवळ्या पानाच्या खालच्या बाजूवर पुंजक्यानी अंडी घालते. पूर्णहीन झाडावर, झाडांच्या कोवळ्या भागावर अंडी घालते व तिच्या तपकिरी केसांनी झाकून ठेवते. एक मादी अंदाजे 400 अंडी रंगानी पांढरी व वर्तुळाकार असतात. अंडी उबण्याची क्रिया 5 दिवसांनी होते. अंड्यातून लहान आकाराच्या काळसर रंगाच्या अळ्या बाहेर पाडतात. अंड्यातून बाहेर पडलेल्या लहान अळ्या लागण केलेल्या कोवळे रोपे खाऊन नष्ट करतात. वाढ होत असताना अळ्या एकट्या जमिनीत पालापाचोळा व भेगात लपून बसतात, रात्र होताच परत झाडाची पाने खावयास सुरुवात करतात. प्रोढ अळ्यांचा रंग फिक्कट हिरवा व काळ्या खुणा असतात व शरीर गुळगुळीत असते. अळी अवस्था 21 दिवसांची असते नंतर जमिनीत कोषावस्थेत जाते. कोष लाल रंगाचे असून 14 दिवसात पतंग बाहेर येतो. त्यानंतर 4 दिवसात नर व मादीचा संयोग होऊन अंडी घालायला सुरुवात करतात. या किडीचा जीवनक्रम 40 दिवसांचा असतो. कीड वर्षभर सक्रिय असते.
 
नियंत्रण : टोमॅटो पिकात अळीच्या सुरुवातीला कमी उपद्रव असताना बीटी डेल्फिन जीवाणूंची फवारणी करावी, जैविक नियंत्रणास एनपीव्हीचा वापर करावा. अळ्या गोळा करून त्यांचा नाश करावा. अंड्यांचे पुंजके असलेल्या पाने इ. झाडापासून वेगळे करून अंड्यांचा नाश करावा. फोरेट10 टक्के एकरी 5 किलोग्रॅम पेरून ओलिताचे पाणी द्यावे. पीक काढणीनंतर लगेच जमिनीची खोल नांगरट करून घ्यावी त्यामुळे कोष उघडे पडतात व उन्हामुळे मरतात तसेच पक्षी ते वेचून खातात. कीडीचा उपद्रव अधिक असल्यास पॉलिस्ट्रीन सी 300 मिली एकरी फवारावे. बी टी जैंविक कीड नियंत्रणासोबत डायमेथोएट30 इसी 10 मिली पाण्यातून फवारणीने किडीचे प्रभावी नियंत्रण झाल्याचे आढळले आहे.
 
2.टोमॅटो पाने पोखरणारी अळी : टोमॅटो पिकावरील कीड इतर पिकांवरसुद्धा आढळत ही आंतरराष्ट्रीय कीड आहे. भारतात ही कीड टोमॅटो, नवलकोल, फुलकोबी, पानकोबी, तंबाखू, कांदा, मुला, करडई, भोपळा आणि मेथी पिकांवर आढळते. ही कीड फार बारीक आकाराची असते. पंखाचे लांबी 3 मिमी असून पारदर्शक व हिरव्या रंगाची झाक असते. मात्र शरीराचा रंग काळा असतो.
 
जीवनक्रम : या किडीची माशी पानाच्या आत अंडी घालते अंडी उबायला 6 दिवसांपर्यंत कालावधी लागतो. अंड्यातून बाहेर पडलेली अळी पानांच्या आतील भाग पोखरण्यास सुरुवात करते. या अळीच्या अवस्थेचा काळ 9 दिवसांपर्यंत असतो. या प्रोढ अवस्थेतील अळीची लांबी 6 मिमी व रुंदी 1 मिमी असून अळींचा रंग पांढुरका राखी असतो, ही अळी काळसर रंगाच्या जमिनीत कोषावस्थेत जाते. 24 दिवसांत या किडींचा जीवनक्रम पूर्ण होतो.
 
नियंत्रण : टोमॅटो पिकात या किडीची रोगग्रस्त पाने गोळा करून नष्ट करावी, टोमॅटो पिकाला गरजेप्रमाणे भरपूर पाणी दिल्यास कोष उघडे पाडतात व त्याचा नाश करता येतो. मॅलॅथिऑन 35 टक्के प्रवाही 500 मिली एकरी फवारावे अथवा प्रोफेनोफॉस 50 टक्के प्रवाही 350 मिली एकरी फवारावे. याशिवाय जैविक नियंत्रणात क्रायसोपा किंवा बी.टी. चा वापर करून योग्य नियंत्रण करता येते.
 
4.टोमॅटो वरील मावा : टोमॅटो पिकात मावा किडीचा प्रादुर्भाव फारच कमी प्रमाणात आढळतो. मावा कीटकांचा काही प्रजाती विषाणू रोगाचा प्रसार करतात. मावा किटकाचे शरीर मऊ व लांबोळा फुगीर आकारासारख्या असतो. त्याला दोन अंटेना व दोन संयुक्त डोळे असतात बिना पंखाचे मावा आढळतात. मावा किदिमध्ये बिनापंख्याचा मावा किडीची संख्या पंखाच्या मावापेक्षा अधिक असते. एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी स्थलांतरीत होताना बिनापंख्याच्या मावाकडील पंख फुटतात. 
 
मावा किडीला दोन उभे पंख असतात व बाजूला चिकट द्रव टाकण्याकरिता दोन नळ्या असतात. यामुळे मावा स्वत:चे शत्रू कीटकांपासून सरंक्षण करीत असते. मावा कीड न पचविलेला गोड द्रव्य गुदद्वारातून बाहेर टाकते. ते खाण्यासाठी मुंगळे जमा होतात. यामुळे मुंगळे मावा किडींच्या ठिकाणी आढळतात. मावा किडींची उत्पत्ती नर मादीच्या समागमविना किंवा समागमानंतर होते. मावा पिल्लांची अवस्था 9 दिवस असते. एक मादी दररोज 22 पिल्लांना जन्म देते. मावा किडीची लांबी 1 ते 2 मिमी असते. डोळे लाल रंगाचे असतात. बीन पंखाची मादी वर्तुळाकार आकाराने मोठी फिक्कट रंगाची असते. पिल्लांचा रंग हिरवट किंवा करडा असतो. प्रोढ मावा 21 दिवस जगतो.
 
नियंत्रण : मावा किडीच्या नियंत्रणासाठी मिथाईल डिमेटॉन 350 मिली ची एकरी फवारणी करावी. डायमेथोएट400 मिली एकरी फवारावे.
 
5.टोमॅटोवरील पांढरी माशी : ही कीड टोमॅटो, मिरची, वांगी, कोबी, शोभेच्या व फळ पिकांवर आढळते. या किडीचा आकार 0.5 मिमी पेक्षा कमी असतो. रंग भुरकट पांढरा व डोळ्याचा रंग लाल असतो. या किडीच्या पंख्यावर पांढरी भुकटी असते. कोष व किडीचा आकार फुगीर, गोलाकार असतो. पिल्ले व प्रोढ शरीरावर केस असतात. ही कीड या दोन्ही अवस्थेत पानांतील रस शोषण करते. त्यामुळे पानाचा रंग पिवळसर होतो. या किडीच्या जास्त उद्रेकामुळे फुलगळ होते व फलधारणा होत नाही. ही कीड शरीरातून चिकट गोड द्रव बाहेर टाकते. त्यावर काळ्या बुरशीची वाढ होते त्यामुळे पाने, काळी पडून प्रकाशसंश्‍लेषणाची आणि ऊर्ध्वपातनाची क्रिया मंदावते. टोमॅटो पिकात या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो.
 
जीवनक्रम : पांढरी माशी किडीची मादी पानाच्या खालच्या बाजूला 20 पर्यंत अंडी घालते. 10 दिवसात अंडी उबवून त्यातून पिल्ले बाहेर पडतात. ही पिल्ले योग्य वास्तव्य शोधण्यासाठी झाडावर भटकतात. वास्तव्य निश्‍चित झाल्यावर इ. झाडाच्या पेशीजालात आपली सोंड खुपसून त्यातील रस शोषण करतात. या किडीची पूर्ण वाढ70 ते 75 दिवसात होते. वाढ झालेली कीड कोषावस्थेत जाते. ही अवस्था 160 दिवस असते. त्यातून नंतर पांढरी माशी बाहेर पडते.
 
नियंत्रण : या किडींच्या नियंत्रणाकरिता मिथाईल पॅरेथिऑन 0.04 टक्के, मिथाईल डिमोटॅन 0.1 टक्के, मॅलॅथिऑन 0.1 %, मॅलॅथिऑन 0.15 %डायमेथोएट यापैकी एकावेळी एकाच कीटकनाशकांची फवारणी करावी.
 
6.पिठ्या ढेकुण ( मिलीबग ) : ही कीड टोमॅटो पिकाशिवाय वांगी, बटाटा, द्राक्ष, भेंडी आणि फुलझाडावर आढळते.
किडीचे वर्णन : पांढरे ढेकुन लांबीने 2.5 मिमी असते. यातील काही प्रजाती लांभोळ्या तर काही गोलसर आकाराच्या असतात. त्याचा रंग तांबडा असतो. मादीचा आकार चपटा असून शरीरावर पांढरा चिवट पदार्थ असतो. मादी किडीला पंख असतात पण काहीतर पंखाशिवाय असतात. नराचे पंख काळसर रंगाचे असतात. ही कीड एका जागी स्थिर राहून टोमॅटो झाडातील रसशोषण करते व शरीरातून चिकट द्रव बाहेर टाकते. या चिकट पदार्थास खाण्यासाठी मुंगळे व मुंग्या त्या ठिकाणी दिसतात. यामुळे या किडीचा वास्तव्य असल्याचे कळते. 
 
जीवनक्रम : या किडीचा प्रजोत्पती समागमानंतर अथवा शिवाय होते. मादी अंडी चिकट द्रव्याने चिटकवून झाडाच्या खोडावर देते. या अंड्याची उबवण हवेतील आर्द्रता आणि तापमानावर अवलंबून असते. अंड्यातून बाहेर पडणारी पिल्ले वास्तव्य शोधण्यासाठी झाडावर भटकत असतात. योग्य वास्तव्य मिळाल्यानंतर स्थिर होऊन झाडातील रस शोषण करतात. दोन ते तीन वेळा कात टाकल्यानंतर प्रोढ अवस्थेत प्रदार्पण करतात.
 
नियंत्रण : या किडीच्या नियंत्रणाकरिता डायमेथोएट0.1 % फवारणी करावी किंवा क्रायसोपा परजीवी किडीद्वारे जैविक नियंत्रण करावे.
फुलकिडे : टोमॅटो पिकात फुलकिडे प्रादुर्भावामुळे पाने पिवळी पडतात व वाढ खुंटते. नवीन फुट अनियमित आकारात येते. या किडीचा आकार 0.5 ते 1 मिमी असते. या किडीमुळे बुरशी आणि विषाणूच्या बिजानुचा प्रसार होतो. या किडीत काही वेळा नराची मात्रा फारच कमी असते. त्यामुळे या किडीचे प्रजनन समागम सहित व विरहीत या दोन्ही प्रकारे होत असते. ही कीडी वार्याच्या झोतासोबत प्रसारित होते. या किडीचे अस्तित्व झाडाच्या कोवळ्या रसरशीत भागात असते. टोमॅटो पिकात पानाच्या फुटीच्या कळीत असते. या किडीचा उद्रेक टोमॅटो, तंबाखू, कापूस, कांदा आदी पिकावर होतो.
 
किडीचे वर्णन : ही कीड नाजूक व आकाराने लहान असते. या किडीचा रंग पिवळसर असून पिल्ले बिन्पान्खी असतात. टोमॅटो पानावर ओरखडे काढून त्यातून स्त्रवणार्‍या रसावर जगते. कालंतराने ओरखड्याचा भाग पांढरा व नंतर तपकिरी होतो. या किडीच्या प्रादुर्भावामुळे पाने आकसतात आणि टोमॅटो झाडाची वाढ खुंटते.
 
जीवनक्रम : या किडीची मादी समागनंतर किंवा समागमशिवाय अंडी घालतात.अंड्याचा रंग पिवळसर असतो. मादी अंडी टोमॅटोच्या पानाच्या ग्रंथित खुपसून ठेवते. साधारणत: अंडी पानाच्या खालच्या अंगावर जास्त असतात. ही अंडी 5 दिवसात उबून त्यातून बाहेर पडणारी पिल्ले 4 वेळा कात टाकतात. कात टाकण्याच्या क्रियेला 5 दिवस लागतात. त्यानंतर प्रोढवस्थेत पोहचतात. या प्रोढ किडीची कालमर्यादा 15 दिवस असते. या काळात एक मादी 35 अंडी घालते. महाराष्ट्रात या किडीचा जास्त प्रादुर्भाव सप्टेंबर ते जानेवारीपर्यंत आढळतो.
 
नियंत्रण : या किडीच्या नियंत्रणाकरिता मिथिल डिमेटॉन 0.02 टक्के वापरावे, 1.5 ते 2 मिली प्रतिलीटर वापरावे. परिणाम आढळते.
 
7.तुडतुडे : ही टोमॅटो पिकात कमी सक्रिय पण महत्वाची कीड आहे. या किडीचा उद्रेक सध्या जातीपेक्षा संकरीत जातीत जास्त दिसून येतो. ही कीड टोमॅटो, बटाटा, वांगी, भेंडी, कापूस पिकावर आढळतो. ही कीड पाचरीच्या आकाराची हिरवट रंगाची शेवटच्या पंखावर काळा ठिपका असलेली कीड आहे. अशा शरीररचनेमुळे चटकन ओळखता येतात. पिल्ले व प्रोढ तुडतुडे टोमॅटो पिकातील रस शोषूण घेतात. पिल्लांना पंख नसतात. प्रोढ तिरपे चालतात. चटकन व जलद उडी मरतात. किडींची लांबी 2 मिमी असते. याचे वास्तव्य टोमॅटो पणाच्या खालच्या समूहाने असतात. तुडतुडे कोवळ्या, रसरशीत भागातील रस शोषण करतात त्यामुळे तो भाग निस्तेज व पांढुरक्या रंगाचा होतो. या किडीचा अतिक्रमणामुळे झाड निस्तेज होऊन वाळते आणि शेवटी मरते. याशिवाय रस शोषून क्रियेतून झाडाच्या पेशीत घातक लास टोचतात त्यामुळे टोमॅटो पिकात हॉपरबर्न हा रोग होतो. या रोगामुळे टोमॅटो झाडाच्या पानाची कडा भाजल्यासारखी होते. या किडीच्या उपद्रवामुळे पानाचा आकार वक्र व चुरडल्यासारखा होतो. टोमॅटो झाडाची वाढ खुंटते.
 
जीवनक्रम : या किडीत मादी पानांच्या शिरांमध्ये किंवा पेशीत 30 पर्यंत अंडी घालते. या अंड्यांचा रंग पिवळसर हिरवा असतो. त्यातून 11 दिवसात हिरव्या रंगाचे तुडतुडे बाहेर निघतात. नंतर 5 वेळा कात टाकतात, त्यानंतर या तुडतुड्यांना पंख फुटतात व प्रोढ अवस्थेत प्रवेश करतात. आर्द्रता व उष्णता मानात असताना या किडीला पोषक आहे. त्यामुळे पावसाळी हंगामात ही किडी मोठ्या प्रमाणात आढळते. या किडीचा रंग हा वातावरणावर अवलंबून असतो. जीवनक्रम 28 दिवसांचे आहे.
 
नियंत्रण : या किडीच्या प्रभावी नियंत्रणाकरिता मिथिल डिमिटॉन 0.02 टक्के वापरावे, 1.5 ते 2 मिली व प्रोफेनोफॉस 0.02 टक्के प्रती लिटर दोन मिली प्रमाणे फवारणी करावी. जैविक नियंत्रणाकरिता क्रय्सोपाची सुप्त अवस्था झाडावर सोडावी.
 
लाल कोळी : रानटी झाडावर आढळणारी ही कीड आता मोठ्या प्रमाणात टोमॅटो पिकावर उद्रेक करते. ही कीड लिंबूवर्गीय पिके, आंबा, चहा आदी पिकांचे कोळी नुकसान करतो.
 
किडींचे वर्णन : प्रोढ कोळी ही कीड आठ पायांची असून रव्याच्या कनांच्या आकारापासून ते 100 मायक्रोनपेक्षाही लहान असते. डोके आणि छाती मिळून शरीराचा पहिला खंड असतो. दुसरा खंड म्हणजे पोट होय. याचा रंग लाल असतो. या किडीला अन्न पकडण्यासाठी एक ग्रहिका जोडी आणि अन्न चावण्यासाठी दुसरी पादस्पर्शक जोडी अशा उपांगाच्या दोन जोड्या असतात. कोळी किडी त्याला असणार्‍या कातग्रंथीतून सूक्ष्म धागे काढून बारीक जाळे विणत असतो. 
 
प्राध्यापक राठोड आर.आर.(8806156871),उद्यानविद्या विभाग 
प्राध्यापक डोंगरजाळ आर. पी.(9423080240)
कीटकशास्त्र विभाग,कृषी महाविद्यालय, कांचनवाडी, औरंगाबाद.