सिताफळ पीक संरक्षण

डिजिटल बळीराजा    25-Sep-2018
 
सिताफळ या पिकावर येणार्‍या महत्त्वाच्या किडी, रोग यांची ओळख उत्पादक शेतकर्‍यांना असणे गरजेचे आहे. तसेच त्यावरील उपाययोजनांची माहिती असल्यास नियंत्रणाचे उपाय वेळीच करून आर्थिक नुकसान टाळता येऊ शकते. सिताफळावर प्रामुख्याने पिठ्या ढेकूण ही कीड आणि फळसड या रोगाचा प्रादुर्भाव आढळून येतो. 
 
सिताफळ हे कोरडवाहू शेतातील किंवा बांधावरील, हलक्या ते मुरमाड जमिनीपासून सर्वच जमिनीत येणारे महत्त्वाचे फळपीक असून अत्यंत कमी पाणी, कमी खर्चात आणि अत्यल्प मशागतीत अधिक नफा मिळवून देणारे महत्त्वाचे फळपिक आहे. 
 
वातावरणातील अलीकडील बदल पाहता दिवसेंदिवस पर्जन्यमान कमी तसेच अनियमित होत आहे. अशा या वातावरणातील बदलता चांगले तग धरून राहू शकणारे फळपीक म्हणून सिताफळाकडे पाहिले जाते. राज्यशासनाच्या फळबाग लागवड योजनेमध्ये या फळपिकाचा समावेश झाल्यापासून या पिकाखालील क्षेत्रास भरघोस वाढ झालेली आहे. पिकाखालील क्षेत्रात वाढ होण्याबरोबरच या पिकामधील समस्याही वाढलेल्या आहेत. या पिकावर येणार्‍या महत्त्वाच्या किडी, रोग यांची ओळख उत्पादक शेतकर्‍यांना असणे गरजेचे आहे. तसेच त्यावरील उपाययोजनांची माहिती असल्यास नियंत्रणाचे उपाय वेळीच करून आर्थिक नुकसान टाळता येऊ शकते. 
 
सिताफळावर प्रामुख्याने पिठ्या ढेकूण ही कीड आणि फळसड या रोगाचा प्रादुर्भाव आढळून येतो. 
 
मिलीबग (पिठ्या ढेकूण) : ही कीड झाडाच्या सालीच्या खाली फांद्याच्या फटीत राहत असल्याने नियंत्रण उपाय करणे अवघड होते. तसेच ही कीड चिवट कापसासारख्या पांढर्‍या पदार्थाच्या आवरणामध्ये अंडी घालते. पूर्ण वाढलेल्या किडीच्या शरीरावरसुद्धा मेणचट पांढुरक्या रंगाचे आवरण असते. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे किटकनाशक फवारले असता, ते अंड्यापर्यंत किंवा किडीच्या शरीरापर्यंत पोहचू शकत नाही. 
 
मिलीबागच्या मादीचे शरीर अंडाकृती, सपाट आणि मऊ असते. शरीराचा रंग लालसर असतो. डोके वक्षस्थळ आणि पोट स्पष्टपणे वेगळे नसतात. या किडीच्या शरीरावर मऊ, पांढरी, मेणचट पिढी शिंपल्यासारखी दिसते. मादी सैलसर कापसासारख्या पुंजक्यात अंडी घालते, त्या पुंजक्याला अंडी थैली असे म्हणतात. अशा प्रकारच्या अंड्याच्या थैल्या वाढत्या शेंड्यावर, फळांवर, सालीच्या खाली, जमिनी लगत खोडाभोवती दिसून येतात. अंडी अंडाकृती, नारंगी रंगाची आणि उघड्या डोळ्यांनी दिसणारी असतात. 
 
या अंड्यातून संथपणे सरपटणारे नारंगी व विटकरी लाल रंगाची पिल्ले बाहेर पडतात व झाडावर पसरतात. ती फळावर व कोवळ्या फांद्यावर थांबतात. या अवस्थेत किडीवर पांढर्‍या रंगाचा मेणचट पदार्थ नसतो. त्यामुळे या अवस्थेत किटकनाशकांचा योग्य परिणाम होतो. या किडीचा प्रादुर्भाव जून ते ऑगस्ट या पावसाळी आणि नोव्हेंबर ते मार्च या पावसाळ्या नंतरच्या काळात जास्त असतो. ही कीड पाने, कोवळ्या फांद्या, कळ्या आणि कोवळी फळे यातून रस शोषण करतात. त्यामुळे पानांचा, फळांचा आकार वेडावाकडा होतो व झाडांच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो. नवीन फुटींंची व पानाची वाढ खुंटते. सर्वांत जास्त नुकसान फळांचे होते. फळांची वाढ योग्य होत नाही, आकार वेडावाकडा होतो. ही कीड आपल्या शरीरातून मधासारखा चिकट पदार्थ बाहेर टाकते व या चिकट पदार्थांवर काळी बुरशी वाढते. त्यामुळे पाने काळी पडतात. फळे, काळपट पडतात व अशा फळांना बाजारभाव योग्य मिळत नाही. 
 
फळमाशी : सिताफळाचा जर उशिरा बहार धरला तर ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात फळमाशीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. ही किड फळावर जास्त प्रमाणात आढळते. 
 
ही किड ओळखण्याची खूण म्हणजे ही कीड अंडी घालताना फळाला बारीक छिद्र करते व त्या छिद्रातून पातळ द्रव्य बाहेर येते. कीड लागल्यावर फळे सडतात व शेवटी फळे खाली गळून पडतात आणि अळ्या फळांतून बाहेर येऊन जमिनीत कोषावस्थेत जातात. त्यामुळे ही किड जरी वर्षभर आढळत असली तरी डिसेंबर ते जानेवारी महिन्यात थंडीच्या महिन्यात कोषावस्थेत जाऊन सुप्तावस्थेत राहते. अशाप्रकारे फळमाशीचा उपद्रव फळांवर झाल्याने फळामध्ये गुठळ्या व त्यामध्ये अळ्या दिसतात. फळे सडतात व खाली गळून पडून नुकसान होते. 
 
फळ पोखरणारे पतंग : या किडीच्या पतंगाचे डोके आणि खांद्याजवळचा भाग हिरवा असतो. कंठ जांभळा असतो. पंख पसरविल्यास त्याची रुंदी 24 मि.मी. पर्यंत भरते. ही कीड सुटी अंडी घालते. अंड्यातून अळ्या बाहेर पडल्यानंतर त्या फळांमध्ये घुसतात व त्या वाकडा तिकडा मार्ग तयार करतात. नंतर आतील गर खातात. त्यामुळे फळाची वाढ होत नाही आणि फळे गळून पडतात. या किडीची विष्ठा फळावरील छिद्राजवळ जमा होते यावरून कीड ओळखता येते. 
 
देवी कीड : या किडी दोन प्रकारच्या असून एक प्रकारची कीड लिंबूवर्गीय फळांवर आढळते, तर दुसर्‍या प्रकारची कीड सिताफळांच्या पानांची नासाडी करते. या किडीची मादी पानाच्या खालील बाजूस अंडी घालते. या किडीची प्रौढ आणि पिले पानातील रस शोषण करतात. त्यामुळे अशी प्रादुर्भावित पाने निस्तेज दिसतात. अशा प्रादुर्भावित झाडांचे उत्पादन घटते. या किडीच्या एका वर्षांत 3 पिढ्या तयार होतात. 
 
लाख कीड : ही कीड फांद्यातून रस शोषून घेते, त्याचवेळेस या किडीची मादी चिकट पदार्थ बाहेर टाकते व त्यामुळे झाडांवर द्रव्याच्या गाठी तयार होतात व झाडांचे नुकसान होते. अशा प्रादुर्भावित झाडांचे उत्पादन घटते. 
 
फुलकिडे : या किडीचे पुढचे पंख पिवळे किंवा करड्या रंगाचे असतात. या किडीचे प्रौढ व पिले पानातील फुलांतील रस शोषण करतात. त्यामुळे काहीवेळेस पाने गळून पडतात. या किडींचा जीवनक्रम 11 ते 14 दिवसांचा असतो. 
 
पांढरी माशी : या किडींची पिल्ले पानाच्या खालच्या भागातून अन्नरस शोषतात. त्यांच्या पोटातून ते चिकट पदार्थ पानावर टाकतात. त्यामुळे त्यावर कॅपनोडीअम नावाच्या बुरशीचा काळा थर जमतो. त्यामुळे प्रकाशसंश्‍लेषण क्रिया बाधीत होते अशा झाडांची फहे लहान राहून उत्पन्नात घट येते. 
 
सूत्रकृमी : या किडीचा प्रादुर्भाव इतर फळझाडांपेक्षा सिताफळाला फार कमी होतो. सुत्रकृमीपैकी मुळावर गाठी तयार करणारा सुत्रकृमी सिताफळाचे नुकसान करतात. मुळावर गाठी करणारी सुत्रकृमी आपल्या सुईसारख्या अवयवाने झाडाच्या अती लहानह मुळातील अन्नरस शोषून घेतात. त्यामुळे मुळावर गाठी निर्माण होऊन झाडांची वाढ खुंटते. पाने पिवळी पडतात. फुले व फळे गळतात व फळे लागली तरी लहान राहतात. त्यामुळे उत्पन्न कमी होते व सुत्रकृमींनी मुलांवर इजा केल्यामुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्यास मदत होते. 
 
प्रमुख रोग :
फळसड : हा रोग कालोटोट्रीकम ग्लिओस्पोराइडीस या बुरशीमुळे होतो. महाराष्ट्रात हा रोग आर्द्रतायुक्त दमट हवामानात अधिक दिसून येतो. मात्र कोरड्या हवामानात रोगाचे प्रमाण कमी असते. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात सासवड परिसरात हा रोग मोठ्या प्रमाणात दिसून येतो. 
 
रोगाच्या वाढीसाठी साधारणत: उष्ण हवामान 25 ते 30 अंश सें. ग्रे. तापमान आणि भरपूर आर्द्रतेची (80 टक्के पेक्षा) जास्त आवश्यक असते. तसेच बुरशीचे बीज अंकुरण्यासाठी कमीत कमी 4 ते 6 तास झाडाच्या पृष्ठभागावर पाण्याच्या थेंबाची आवश्यकता असते. अशा हवामानात रोगाचा प्रादुर्भाव होऊन पुढील वाढ फारच झपाट्याने होते म्हणून पावसाळ्यात या रोगाचे प्रमाण जास्त असते. 
 
फळसड हा रोग फळवाढीच्या कुठल्याही अवस्थेत येऊ शकतो. मात्र कळ्या आणि लहान फळे रोगास जास्त प्रमाणात बळी पडतात. या अवस्थेत रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास कळ्या व लहान फळे तसेच त्यांचे देठ काळे होऊन गळून पडतात. फळे मध्यम सुपारीची (15 ते 20 मि.मी. व्यास.) झाल्यावर प्रादुर्भाव झालेली फळे गळून न पडता लटकून राहतात. रोगाची सुरुवात काही वेळेस फळाच्या पृष्ठभागापासून होते व फळांवर काळपट चट्टे पडून ते एकमेकांत मिसळतात व संपूर्ण फळ काळे पडते. कधीकधी संपूर्ण फळ काळे न पडता काही भागच काळा पडतो. त्यामुळे रोगट फळाच्या भागाची वाढ न होता फक्त निरोगी हिरवट भागाची वाढ झाल्यामुळे फळे वेडीवाकडी होतात. रोगट फळे न पिकता वाळून जातात व कडक होतात. अशाप्रकारे या रोगामुळे जवळजवळ 60 ते 70 टक्के नुकसान होण्याची शक्यता असते. 
 
पानांवरील ठिपके : हा रोग अल्टरनॅरीया या बुरशीमुळे होतो. पानावर तपकिरी रंगाचे ठिपके पडतात. या रोगाचा प्रादुर्भाव ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत दिसून येतो. पानांची वाढ खुंटते. पाने पूर्ण वाढ होण्यापूर्वीच गळून पडतात. फळे वाढीच्या काळात रोग वाढत जाऊन फळांची वाढ कमी होते. 
 
फळे कडक होणे : हा रोग कोलेटोट्रीकम बुरशीमुळे होऊन लहान व मध्यम फळे सुरुवातीला रोगट झाल्यास ती कोरडी होऊन कडक होतात. दगडासारखी टणक दिसतात. अन्नद्रव्याचा तुटवडा भासणार्‍या फळांमध्ये ही विकृती अधिक दिसून येते. फळांची पूर्ण वाढ न होता ती आकाराने लहान राहतात व कडक होऊन रंग काळसर तपकिरी होतो. 
 
हा रोग जास्त पावसाच्या काळात किंवा बागेत जास्त पाणी साचून राहिल्यास लवकर होतो. त्यामुळे झाडांचे शेंडे काळे पडतात व नंतर वाळतात. 
एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन : पिठ्या ढेकूण कीड आणि फळसड रोगाचे एकत्रित नियंत्रण केल्यास कमी खर्चात कीड आणि रोगांचे नियंत्रण व्यवस्थित करता येते. 
 
बागेची स्वच्छता : 
1. बागेतील जमिनीची नांगरट आणि खणणी करावी व जमीन चांगली तापू द्यावी. म्हणजे जमिनीत असणार्‍या रोग आणि किडीचा नाश होईल. 
2. रोग व्यवस्थापनाच्या दृष्टीने बागेतील स्वच्छता अत्यंत महत्त्वाची आहे. छाटणी करताना झाडावर शिल्लक राहिलेली रोगट फळे, रोगट फांद्या, पाने, गर्दी होत असलेल्या फांद्या छाटून छाटणीनंतर सर्व रोगट अवशेष गोळा करून जाळून टाकावे. 
3. झाडाच्या वाफ्यामध्ये मिथील पॅरॉथिऑन 2 टक्के पावडर चांगली जमिनीत मिसळून द्यावी. 
4. बहाराचे पाणी देण्यापूर्वी किंवा पावसाळ्यापूर्वी पाणी देण्यासाठी झाडांभोवती वाफे करून सेंद्रीय व रासायनिक खताचा हप्ता द्यावा. त्यामुळे रोग किडी विरुद्ध प्रतिकारशक्ती वाढते. 
5. पावसाळ्यात रोग किडीचे प्रमाण जास्त असते. म्हणून पाणी उपलब्ध झाल्यास मार्च-एप्रिल महिन्यात पाणी देऊन बहार लवकर धरावा. जेणेकरून पावसाळ्यात फळे रोग किडीला बळी पडणार नाहीत. 
6. जून-जुलैमध्ये 15 ते 20 सेंटीमीटर रुंदीची प्लॅस्टिक पट्टीवर वरती ग्रीस लावून खोडावर बांधावी. त्यामुळे मिलीबग जमिनीवरून झाडांवर चढताना चिकटून मरतात. ग्रीस पट्टीवर लावताना झाडाच्या खोडास लागणार नाही याची दक्षता घ्यावी. 
 
बहार धरल्यानंतर :
1. झाडांवर नवीन फूट फुटण्यापूर्वी झाडांच्या खोडावर बोर्डोपेस्ट जमिनीपासून दोन फुटापर्यंत लावावी व त्यामध्ये क्लोरोपायरीफॉस 20 मिली 10 लिटर पाण्यात मिसळावे. 
2. बाग व बागेभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवावा. बागेतील तण, बांधावरील गवत आणि लहान झुडूपे उदा. ग्लिरिसिडीया, जास्वं, चिंच इ. वाढू देऊ नयेत. तसेच बागेशेजारी भेंडी आणि कपाशी ही पिके घेऊ नयेत कारण या पिकांवर पिठ्या ढेकूण कीड मोठ्या प्रमाणात वाढते. 
3. सुत्रकृमीच्या नियंत्रणासाठी झाडाच्या सभोवताली झेंडूसारखी सापळा पिके लावावीत. 
4. झाडांवर कळ्या लागल्यानंतर कार्बेन्डाझीम 0.1 टक्के (10 ग्रॅम) + मेथिल पॅरॅथिऑन 10 मिली + स्टिकर 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे. 
5. फळधारणा झाल्यानंतर बोर्डोमिश्रण 1 टक्का किंवा बेनोमिल 0.1 टक्के (10 ग्रॅम) किंवा प्रॉपिकॉनझोल 0.1 टक्के (10 मिली) किंवा (मॅन्कोझेब 0.25 टक्के + कार्बेन्डझीम 0.1 टक्के) + क्लोरोपायरीफॉल 20 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी व आवश्यकतेनुसार पुढील 3 ते 4 फवारण्या दर 15 दिवसांच्या अंतरावे कराव्यात. 
6. पावसाळ्यात बागेत पाणी साठणार नाही याची काळजी घ्यावी. साठलेले पाणी ताबडतोब बागेबाहेर काढून घ्यावे. 
7. बागेत मिलीबग या किडीचे प्रमाण जास्त असल्यास ब्युप्रोर्फेन्झीन 20 मिली + फिशऑइल रेझिनसोप 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यातून 15 दिवसांच्या अंतराने दोन वेळा फवारावे. 
8. खवले कीड, लाख कीड व पांढरी माशी यासारख्या रसशोषणार्‍या किडींच्या नियंत्रणासाठी फॉस्फामिडॉन किंवा मेलाथियॉन यासारख्या आंतरप्रवाही किटकनाशकांची फवारणी करावी. 
9. फळमाशीचा उपद्रव आढळल्यास मिथिल युजेनॉलयुक्त दहा सापळे प्रति हेक्टर बागेत लावावेत किंवा 3 ग्रॅम कर्बारील + 20 ग्रॅम गूळ 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. फळमाशीचा उपद्रव ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात उशिरा बहार धरल्यानंतर होण्याची शक्यता असते. 
 
पिठ्या ढेकूण कीड जैविक नियंत्रण :
1. मिलीबगला खाणारे परभक्षी किटक क्रिटोलिमस मोन्टोझरी प्रती एकरी 600 या प्रमाणात 15 दिवसांच्या अंतराने 3 ते 4 वेळा बागेत झाडावर सायंकाळच्या वेळेत सोडावेत. भुंगेरे सोडल्यानंतर कोणत्याही प्रकारचे किटकनाशक बागेवर फवारू नये. 
2. व्हर्ईशिलीयम लिकॅनी (फुले बगीसाइड) हे जैविक बुरशीनाशक 40 ग्रॅम + 50 ग्रॅम फिशआइल रोझीन सेप प्रती 10 लिटर पाण्यातून आर्द्रतायुक्त हवामानात फवारावे. 
3. मिलीबगला मारक पण परभक्षी किटकांना कमी हानीकारक डायक्लोरोव्हॉस किंवा क्लोरोपायरीफॉस 25 मिली. + 25 ग्रॅम ऑइलरोझीन सोप प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून भुंगेरे सोडण्यापूर्वी करावी. 
अशाप्रकारे सिताफळाचे किडी आणि रोगांचे एकात्मिक नियंत्रण करावे. मात्र सामुदायिकरित्या नियंत्रण केल्यास रोग किडींचा प्रसार थांबविण्यास मदत होऊन नियंत्रण कमीत कमी खर्चात करता येते. 
 
या कीड आणि रोगांबरोबरच सिताफळामध्ये कमी फळधारणा, फळे काळी पडणे, फळे कडक होणे अशा विकृतीही आढळून येतात त्याविषयीची थोडक्यात माहिती. 
 
सिताफळ पिकातील शारीरिक विकृती :
1. कमी फळधारणा : सिताफळास फुले लागणे व टिकून राहणे यासाठी आर्द्रतायुक्त हवामानाची गरज आहे. सिताफळास फेब्रुवारी ते ऑगस्टपर्यंत फुलांचा बहार येतो व या कालावधीत हवेतील तापमान जास्त आणि आर्द्रता कमी असते. फळांच्या फुलांमध्ये स्त्री बीजांड हे पुंकेसरापेक्षा अगोदर तयार झाल्यामुळे पुरेशा प्रमाणात परागीभवन होत नाही. फुले उमलत असताना ते टप्प्याटप्प्याने उमलतात. यामुळे परागीभवनाची क्रिया मंदावते. फळे आकाराने वेडीवाकडी होतात. ज्या भागात परागीभवन झालेले नाहीत. अशा भागातील फळांच्या पाकळ्या एकमेकांत मिसळतात. त्यामुळे उन्हाळ्यात फळधारणा कमी होते, तसेच या फुलांना वास आणि आकर्षक रंग नसल्याने परागीभवनास मदत करणारे किटक या फुलांकडे आकर्षित होत नाहीत. 
2. फळे काळी पडणे (स्टोन फ्रुट) : सिताफळाची काही फळे झाडावरच काळी पडून वाळून जातात. ही फळे पिकत नाहीत व तशीच झाडांवर लहान स्थितीत पानगळ होईपर्यंत राहतात. अशी फळे दगडासारखी टणक दिसतात. म्हणून त्यांना स्टोनफ्रुट असेही म्हणतात. फळे वाढीच्या काळात अन्नद्रव्यासाठी एकमेकांशी स्पर्धा करतात व तुटवडा भासणार्‍या फळांमध्ये ही विकृती अधिक प्रमाणात दिसून येते. फळांची पूर्ण वाढ न होता ती आकाराने लहान राहतात. कडक होऊन त्यांचा रंग काळसर तपकिरी होतो. 
3. फळे तडकणे : फळांची काढणी वेळेवर न झाल्यास तसेच फळवाढीच्या काळात पाण्याचा मोठा खंड पडल्यास किंवा मोठ्या खंडानंतर जास्त पाऊस झाल्यास फळे तडकतात. अशी फळे नीट पिकत नाहीत व अशा फळांना योग्य बाजारभाव मिळत नाही. 
4. फांद्या उकलणे : झाडाचे जे जोड कच्चे आहेत अशा जोडाच्या जागा जोरात वाहणार्‍या असे जोड उकलतात व त्या जागी झाडाला जखम तयार होते. 
5. सूर्यामुळे करपणे : जी झाडे कमकुवत असतात, ज्यांच्यामध्ये पानांची वाढ जोमदार झालेली नसते अशा झाडांच्या फांद्या उन्हाळ्यामध्ये सूर्यकिरणांच्या सान्निध्यात आल्यास अशा फांद्या करपतात. वाळलेल्या फांद्या, फांद्यावर खोलगट भाग तसेच फांद्याना तडे जाणे अशी लक्षणे दिसतात. 
6. फळे पिवळी पडणे : हलक्या जमिनीत लागवड केलेली फळझाडे, ज्यांच्यामध्ये पानांची वाढ जोमदार झालेली नसते. अन्नद्रव्याची कमतरता असणार्‍या झाडांची फळे सूर्यप्रकाशाच्या सानिध्यात आल्यावर पिवळी पडतात. अशी फळे आकाराने लहान राहतात. अशा फळांना योग्य बाजारभाव मिळत नाही. 
7. वार्‍यामुळे फळे काळी पडणे : ज्या बागेच्या भोवताली बारारोधक झाडांची लागवड केलेली नाही अशा बागेमध्ये जोरदार वाहणार्‍या वार्‍यामुळे झाडाची पाने, फांद्या फळाच्या पृष्ठभागावर घासली जातात. या घर्षणामुळे फळाचेवरील आवरण काळे पडते. आश फळांना योग्य बाजारभाव मिळत नाही. 
 
उपाययोजना : 
1. बागेस योग्य मशागत, सेंद्रिय तसेच रासायनिक खतांचा संतुलित वापर. 
2. बहार धरणेच्या काळात पाण्याचा योग्य प्रमाणात व वेळेवर वापर करावा. 
3. बागेतील ओलावा टिकण्यासाठी आच्छादनाचा वापर करणे किंवा आर्द्रता राखण्यासाठी बागेत बाजरीसारखी आंतरपिके घेणे. 
4. वार्‍यापासून संरक्षण मिळण्यासाठी बांधावर वारारोधक झाडांची लागवड करणे. 
5. उकलेल्या / मोडलेल्या फांद्या काढून त्यावर कॉपरऑक्सिक्लोराइड या बुरशीनाशकाचा लेप लावावा. 
6. परागीभवन वाढविण्यासाठी बागेत मधमाश्यांचे संगोपन करणे तसेच हाताच्या सहाय्याने परागीभवन करणे.
 
डॉ. सुनिल लोहाटे, सहायक प्राध्यापक, वनस्पती रोगशास्त्र
राष्ट्रीय कृती संशोधन प्रकल्प, गणेशखिंड, पुणे - 411 007.