नाचणीवरील रोगांचे व्यवस्थापन

डिजिटल बळीराजा    22-Sep-2018
 
 
नाचणी (इल्युसाइन कोरॅकोना) हे पीक धान्य व सात्त्विक पेय बनविण्यासाठी प्रामुख्याने घेतले जाते. नाचणीवर करपा, पर्णकोष करपा, पानावरील ठिपके, खोडकूज किंवा मर, रोपे कोलमडणे, काणी, बुरशीजन्य केवडा, विषाणुजन्य केवडा, विषाणुजन्य मोटल स्ट्रीक, जिवाणुजन्य पर्ण करपा, इ. रोगांची माहिती या लेखात वाचायला मिळेल.
 
1. करपा :
रोगकारक बुरशी : पायरीक्युलारिया इल्युसिनी 
नाचणी पिकावर आढळून येणार्‍या सर्व रोगांत करपा हा रोग अतिशय महत्त्वाचा असून भारतातील सर्व राज्यांत या रोगामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन नाचणीच्या उत्पन्नात घट येते. 
 
लक्षणे : रोगाची लागण रोपावस्था ते दाणे भरण्याची आवस्था या पिकाच्या अवस्थेपैकी कोणत्याही अवस्थेत होते. रोपवाटिकेत रोप उगवल्यानंतर दोन आठवड्यांनी रोगाचा प्रादुर्भाव होऊन लगेचच त्याचा प्रसार रोपवाटिका व संपूर्ण शेतात होतो. पानावर प्रथमत: लहान, गोलाकार ते लंबगोलाकार तपकिरी रंगाचे ठिपके निर्माण होतात. नंतर ते ठिपके वाढत जाऊन मोठे दंडाकृती होतात. रोपवाटिकेत रोपाची नवीन पाने पूर्णत: वाळून जातात. पुनर्लागवडीनंतर मुख्य शेतातदेखील असे दंडगोलाकार ठिपके पानांवर आढळून येतात व नंतर ते वाढत जाऊन एकमेकांत मिसळतात आणि संपूर्ण रोप वाळलेले दिसते. मानेवर आढळून येणार्‍या करपा रोगामुळे मोठ्या प्रमाणात नाचणीचे नुकसान होते. मानेचा भाग राखाडी होऊन सुरकततो. कणसांच्या पाकळ्या व दाण्यांतील शिरा यांवरदेखील या रोगाची लागण होते. रोगग्रस्त भाग तपकिरी रंगाचा होऊन लोंब्या पोचट होतात. रोगट लोंब्यांतील दाणे सुरकुतल्यासारखे दिसतात. 
 
नुकसान : रोगाची तीव्रता व लागण होण्याची वेळ यावर होणारे नुकसान अवलंबून असते. करपा रोगामुळे पिकाचे 50 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान होते. अतिशय मोठ्या प्रमाणात रोग येणार्‍या भागात रोपामुळे 80-90 टक्क्यांपर्यंत नुकसान होते. 
उपाययोजना :
अ. मशागत पद्धतीने नियंत्रण :
1. रोगविरहित बियाणे पेरणीकरिता वापरावे. 
2. फुले नाचणी, सी. ओ. आर. ए. (14), पय्यार (आर.ए.-2), जी.पी.यू.- 28, जी.पी.यू,- 45, जी.पी.यू.-48 व एल-5 यासारख्या रोगप्रतिकारक जातींची लागवड करावी. 
3. पुनर्लागवडीवेळी दोन रोपांतील अंतर योग्य ठेवावे. 
4. पेरणी लवकर करावी. 
 
ब. जैविक रोग नियंत्रण :
1. पेरणीपूर्वी बियाणास मिठाच्या पाण्याची व गायीच्या मूत्राची बीजप्रक्रिया करावी. 
2. सुडोमोनस फ्लुरोसन्स या जैविक बुरशीनाशकाची 6 ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. 
3. सुडोमोनस फ्लुरोन्स या जैविक बुरशीनाशकाच्या 2 ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात तीन फवारण्या कराव्यात. पहिली फवारणी रोगाची लक्षणे दिसून आल्यानंतर लगेच करावी आणि दुसरी व तिसरी फवारणी 15 दिवसांच्या अंतराने करावी. 
4. विलायती शमी / विलायती बबुल किंवा बेशरम यांच्या पानांच्या 10 टक्के अर्काची फवारणी करावी. 
 
3. रासायनिक रोग नियंत्रण :
1. कार्बेडॅझिम या बुरशीनाशकाची 1 ग्रॅम / किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. 
2. रोपवाटिकेत पेरणीनंतर 10-12 दिवसांनी कार्बेडॅझिम (0.1%) किंवा इप्रोबेनफॉस (0.1%) या प्रमाणात फवारावे. तसेच पुनर्लागवडीनंतर 20 ते 25 व 40 ते 45 दिवसांनी वरील फवारणी पुन्हा करून घ्यावी. 
2. पर्णकोष किंवा रोपावरील करपा 
 
रोगकारक बुरशीड्रेचस्लेरा नोड्युलोसम
करपा रोगानंतर नाचणी पिकात मोठ्या प्रमाणावर नुकसान करणारा रोग म्हणून पर्णकोष किंवा रोपावरील करपा रोगास पाहिले जाते. 
लक्षणे : जास्त पर्जन्यमान असलेल्या हंगामात / वर्षात या रोगामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. हा रोग पीकवाढीच्या सर्व अवस्थांमध्ये निदर्शनास येतो. तसेच नाचणी पिकाच्या कोणत्याही भागाला रोगाचा प्रादुर्भाव होतो. रोगकारक बुरशीचा कोवळ्या रोपांना तसेच वयस्क / जुन्या रोपांना प्रादुर्भाव होतो. कोवळ्या रोपांवर लहान, अंडाकृती, फिकट तपकिरी रंगाचे ठिपके तयार होऊन कालांतराने ते गडद तपकिरी होतात. अनेक ठिपके एकत्र येऊन पानावर मोठा ठिपका तयार होतो. अशी पानांची पाती परिपक्व होण्यापूर्वी गळून पडतात व रोपाची मर होते. मोठ्या, पूर्ण वाढलेल्या पानावर गडद आयताकृती ठिपके तयार होतात. मानेचा भाग फिकट तपकिरी ते गडद तपकिरी होऊन मानेतील पेशी ठिसूळ बनतात व लोंब्या मानेभोवती मोडून लटकलेल्या दिसतात. 
 
नुकसान : रोपवाटिकेत या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास मोठ्या प्रमाणात नुकसान होते, तर मानेवर प्रादुर्भाव झाल्यास दाणे पोचट होऊन धान्य उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येते. 
 
रोगाची लागण व प्रसार : या रोगाचा प्रथम प्रादुर्भाव रोगट बियाणामार्फत होतो. रोगाची बुरशी जमिनीमध्ये 18 महिन्यांपर्यंत जिवंत राहते, तर बुरशीचे बीज धान्यामध्ये / बियाणामध्ये वर्षभर जिवंत राहतात. या रोगाचा दुय्यम प्रसार हवेमार्फत तसेच मागील पिकाच्या अवशेषामार्फत होतो. 
 
अनुकूल हवामान : रोगाच्या प्रादुर्भावासाठी 30 ते 32 अंश सें. तापमान अतिशय अनुकूल असले तरी त्याची लागण 10 ते 37 अंश तापमानादरम्यानदेखील होऊ शकते. दाणे / लोंब्या निर्माण होताना जास्त आर्द्रता व हलका रिमझिम पाऊस असल्यास रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होऊन उत्पादनात मोठी घट येते. 
 
उपाययोजना : 
1. रोगट झाडे आढळून आल्यास ती उपटून नष्ट करावीत. 
2. कॅप्टन किंवा थायरम या बुरशीनाशकांची 4 ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. 
3. मॅकोझेव (0.25%) किंवा बोर्डो मिश्रण (1%) किंवा कॉपर ऑक्झिक्लोराइड (0.20%) किंवा डायथेन झेड-78 (0.20%) यापैकी कोणत्याही एका बुरशीनाशकाची फवारणी करावी. 
3. सरकोस्पोरा पानावरील ठिपके 
 
रोगकारक बुरशी : सरकोस्पोनरा इलीसुनी 
लक्षणे : पानावर लहान गडद अंडाकृती आकाराचे काही वेळेस आयताकृती ठिपके येतात. या ठिपक्यांचा मध्य भाग राखाडी ते फिकट तपकिरी असून त्यावर काळे बिंदू स्पष्ट दिसतात. ढगाळ वातावरणामध्ये ठिपक्यांवर बुरशीची बीजे निर्माण होतात. रोपांच्या खोडांवरदेखील हे ठिपके निदर्शनास येतात व त्यांचा आकार पानावरील ठिपक्यापेक्षा मोठा असतो. रोगाची लागण प्रथम जुन्या पानांवर होते व नंतर ती कोवळ्या पानांना होते. 
 
अनुकूल हवामान : जास्त तापमानासह जास्त सापेक्ष आर्द्रता असलेल्या हवामानात या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. लवकर पेरणी केलेल्या (जूनमध्ये) नाचणी पिकात जास्त प्रमाणात हा रोग निदर्शनास येतो. 
उपाययोजना : 
1. शेत तणविरहित व स्वच्छ ठेवावे. 
2. पिकांची फेरबदल करावी. 
3. रोगास बळी पडणार्‍या जातींची लागवड करू नये. 
4. कार्बेडॅझिम (0.05%) या बुरशीनाशकाची फवारणी करावी. 
 
4. खोडकूज किंवा मर :
रोगकारक बुरशी : स्क्लेरोशियम रोल्फसाय 
लक्षणे : रोगग्रस्त रोपे खुरटी राहतात. बुरशी रोपाच्या खोडावर जमिनीलगत प्रादुर्भाव करते व नंतर पर्णकोष व पेरांवर रोगाची लागण होते. रोगट भाग मऊ व तपकिरी रंगाचा होतो. पर्णकोष व खोड यामधील भागात ठिपके तयार होऊन त्यात बुरशीची वाढ होते. रोगट झाड मरते. खोडांवर लहान गोलाकार गडद रंगाच्या स्क्लेरोशिया निदर्शनास येतात.
 
रोगाची लागण व प्रसार : रोगाचा प्रथम प्रसार जमिनीतून होतो. स्क्लेरोशियम ही रोगकारक बुरशी अनेक पिकांवर वाढत असून सर्व प्रकारच्या जमिनीमध्ये जिवंत राहते. तथापि, वालुकामय पोयट्याच्या व कमी ओलावा असलेल्या जमिनीत या रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होतो. उष्ण व कोरडे हवामान या रोगाच्या वाढीस अतिशय अनुकूल आहे. 
 
नुकसान : मूळकूज या रोगामुळे नाचणीचे 50 टक्क्यांपर्यंत नुकसान होऊ शकते. 
उपाय योजना : 
1. जमिनीतील अतिरिक्त पाण्याचा योग्य प्रकारे निचरा करावा व जमिनीत ओलाव्याचे प्रमाण योग्य ठेवावे. यामुळे रोपात प्रतिकारक्षमता वाढून रोपे निरोगी राहतात. 
2. शेत तणविरहित ठेवावे. 
3. पिकांचा फेरबदल करावी. 
4. रोगास बळी पडणार्‍या जातींची लागवड करू नये 
5. कार्बेडॅझिम (0.05%)ची फवारणी करावी. 
 
5. रोपे कलमडणे :
रोगकारक बुरशी : पिथियम स्पे. 
हा रोग प्रामुख्याने निचरा न होणार्‍या रोपवाटिकेत व शेतात प्रामुख्याने पावसाळ्यात निदर्शनास येतो. 
 
लक्षणे : जमिनीलगत असलेल्या पहिल्या पानाखालील भाग पिवळसर तपकिरी झाल्याचे दिसते. नंतर हा पिवळसर तपकिरीपणा खोड व मुळापर्यंत पोहोचतो. रोपवाटिकेत रोपातील रोगग्रस्त भाग पिवळसर ते तपकिरी होऊन शेवटी रोप कोलमडून मरते. अशी रोपे सहजरीत्या उपटली जातात. 
उपाययोजना : 
1. पुनर्लागवड करून लावण्यात येणार्‍या नाचणी पिकासाठी रोपे गादीवाफ्यावर तयार करावीत. 
2. जमिनीलगत कॉपर ऑक्झिक्लोराइड किंवा कॅप्टन किंवा थायरम किंवा मेटॅलॅक्सिल ड्रेंचिंग करून हलके पाणी दिल्यास रोगाचा प्रादुर्भाव कमी करता येतो. 
 
6. काणी / काजळी :
रोगकारक बुरशी : मिलॅनोप्सिचियम इल्युसिनिस 
लक्षणे : काणी रोगाचा प्रादुर्भाव पीक फुलोर्‍यात आल्यानंतर दाणे भरताना होतो. काणीग्रस्त दाणे लॉबीमध्ये विखुरलेले असतात. काणीग्रस्त दाणे गाठीमध्ये रूपांतरित होतात व नेहमीच्या दाण्यांपेक्षा आकाराने मोठे असतात. सुरुवातीच्या अवस्थेत दाणे हिरवट व फुगल्यासारखे दिसतात. नंतर हे हिरवट दाणे गुलाबी हिरवट होतात व शेवटी काळे होतात.
 
रोगाची लागण व प्रसार : रोगाचा प्रथम प्रसार वार्‍यामार्फत होत असून रोगकारक बुरशी दाण्यामध्ये व दाण्याबाहेर आढळत नाही. 
उपाययोजना : 
1. रोगप्रतिकारक जातीची लागवड करावी. 
2. व्हिटावॅक्स या बुरशीनाशकाच्या वापरामुळे रोगवाढीस प्रतिबंध होतो. 
7. बुरशीजन्य केवडा / डाउनी 
 
रोगकारक बुरशी : स्क्लेरोस्पोरा मॅक्रोस्पोरा 
लक्षणे : रोपाची लागण झाल्यानंतर पेर्‍यांतील अंतर कमी होऊन रोपे खुजी होतात. पाने जवळ-जवळ येऊन पर्णगुच्छ तयार होतो व रोपाला झुडपासारखा आकार येतो. पाने पिवळसर हिरवट रंगाची होतात. रोगट झाडाला आलेल्या लोंब्यांनादेखील रोगाचा प्रादुर्भाव होतो. यामुळे लोंबीवर गवताळ वाढ झालेली दिसते व संपूर्ण लोंबी ब्रशसारखी दिसते. 
 
रोगाची लागण व प्रसार : रोगकारक बुरशी ही मुख्यत: बियाणामध्ये अंंतर्बाह्य स्वरूपात आढळते. नाचणीप्रमाणेच हा रोग राननाचणी, मका, गहू व ओट या पिकांवरदेखील येतो. 
अनुकूल हवामान : रोग निर्मितीस 25 ते 30 सें. तापमान अतिशय अनुकूल आहे. 
उपाययोजना : 
1. पिकांचा फेरपालट योग्य प्रकारे करावा. 
2. रोगट रोपे उपटून, गोळा करून जाळून नष्ट करावीत. तसेच शेतातील जंगली गवत व तत्सम तण गोळा करून नष्ट करावे. 
3. शेत स्वच्छ ठेवावे. 
4. मेटॅलॅक्सिल 35 एस. डी. या बुरशीनाशकाची 2.5 ते 3 ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. 
5. रोगाचा प्रादुर्भाव जास्त झाल्यास डायथेन एम-45 या बुरशीनाशकाची 2 ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. 
6. सखल भागातील पाण्याचा योग्य प्रकारे निचरा करावा. 
 
8. विषाणुजन्य केवडा :
रोगकारक विषाणू : मोझेक व्हायरस 
लक्षणे : या रोगाची लागण पीकवाढीच्या सर्व अवस्थांत होते; मात्र पीक पुनर्लागवडीनंतर 4 ते 6 आठवड्यांनी मोठ्या प्रमाणात लागण होते. पानांवर प्रथम हिरवट पिवळसर पट्टे दिसतात व नंतर रोपांची वाढ मोठ्या प्रमाणात खुंटते. लोंब्यांत क्वचितच दाणे भरतात व भरलेले दाणे पोचट असतात. रोगाच्या प्रादुर्भावामुळे रोप हिरवे असतानाच वाळून जाते. शेतातील रोगट रोपे लगेच निदर्शनास येतात. 
 
नुकसान : रोपवाढीच्या अवस्थेत रोगाची लागण होण्याच्या कालावधीनुसार 100 टक्क्यांपयर्र्ंत पिकाचे नुकसान होऊ शकते. 
रोगवाहक किडे : मावा : रॅपॅलोसिफम मैदीस 
अनुकूल हवामान : पावसात जास्त काळ खंड पडल्यास व कोरडे हवामान असताना या रोगाचा जास्त प्रसार होतो. 
उपाययोजना : 
1. रोगट रोपे उपटून, गोळा करून जाळून नष्ट करणे. 
2. पिकांचा फेरपालट करणे. 
3. पिकाची जास्त प्रमाणात स्फुरदयुक्त खते दिल्यास रोगाची तीव्रता कमी करता येते. 
4. पंधरवड्यातून बुरशीनाशक व कीटकनाशकाची फवारणी घ्यावी. 
9. विषाणुजन्य मोटल स्ट्रीक 
 
रोगकारक विषाणू : 
लक्षणे : रोपांच्या पुनर्लागवडीनंतर 45 दिवसांनी या रोगाची लक्षणे निदर्शनास येतात. पानावर हिरवट पिवळे चट्टे दिसतात. रोगट रोपांची वाढ खुंटते व रोपे निस्तेज होतात. नंतर रोपांवरील चट्ट्यांचे रूपांतर मोठ्या चट्ट्यांत होते. जास्त प्रमाणात रोगाची लागण झाल्यास रोपे पिवळी पडू लागतात. रोगट रोपास मोठ्या प्रमाणावर फुटवे फुटतात. मात्र, या फुटव्यांना लोंब्या येत नाहीत. सुरुवातीच्या व नंतरच्या काळात लागण झाल्यास पिकास लोंब्या येत नाहीत. 
 
वाहक कीड : पानावरील तुडतुडे : सिकॅडुलिना बायपंक्चेला, सि. चिनाय
उपाययोजना : 
1. रोगट रोपे उपटून, गोळा करून जाळून नष्ट करणे. 
2. मिथाइल डिमॅटॉन किंवा डायमेथोएट यासारख्या आंतरप्रवाही कीटकनाशकांची 500 मिली प्रति हेक्टर या प्रमाणात दोन वेळा फवारणी करून वाहक कीड नियंत्रित ठेवावी. 
10. जिवाणुजन्य करपा 
रोगकारक जिवाणू : झांथोमोनस कॅम्पेस्ट्रीस पॅथोव्हर इल्युसिनी 
लक्षणे : पानाच्या दोन्ही बाजूंस फिकट पिवळसर ते तपकिरी ठिपके आढळणे हे या रोगाचे वैशिष्ट्यपूर्ण लक्षण आहे. हे ठिपके शिरांना समांतर पसरतात. कालांतराने हे ठिपके काळसर रंगाचे होतात. पानांची पाते शिरा मोकळ्या झाल्याने गळून पडतात. काही वेळेस हे ठिपके लोंबीवरदेखील आढळतात. 
 
उपाययोजना : 
रोगमुक्त बियाणे पेरणीकरिता वापरावे. 
 
डॉ. अनिल प. गायकवाड आणि डॉ. युवराज सो. बालगुडे
कृषी संशोधन केंद्र, लोणावळा