कीडनाशकांचे अवशेष व त्यांचे व्यवस्थापन

डिजिटल बळीराजा    18-Sep-2018
 
आपल्या देशात कीडनाशकांचा वापर इतर विकसित देशांच्या तुलनेत अगदीच कमी असला तरी त्यांच्या अवेळी व अवाजवी वापराने कीडनाशकांचे अनेक दुष्परिणाम दिसून येत आहेत. भारतातील नागरिकही आता अन्नातील रासायनिक कीडनाशकांच्या अवशेषांबाबत गांभीर्याने विचार करू लागले आहेत,तेव्हा शेतकर्‍यांनी या गोष्टींचा विचार करून आपल्या शेतीपद्धतीत बदल करणे आवश्यक आहे.
 
पिकांवरील कीड व रोगांचे वेळीच नियंत्रण करणे अत्यंत आवश्यक असते. अन्नधान्य उत्पादनात, विशेषत: निरनिराळ्या किडींपासून पिकांचे संरक्षण करण्यात कीडनाशकांची भूमिका महत्त्वपूर्ण अशी राहिलेली आहे. सर्वसाधारणपणे आपल्या शेती उत्पादनाच्या तीस टक्के उत्पन्न हे कीड व रोगामुळे नुकसान होते; परंतु हे प्रमाण काही वेळेस 70 ते 80 टक्क्यांपर्यंत जाऊ शकते आणि आपल्या अन्नधान्य उत्पादनात लक्षणीय घट होऊ शकते.
 
रासायनिक कीडनाशके वापरून पिकावरील किडी व रोगांचे नियंत्रण जलद आणि खात्रीशीर होत असल्याने शेतकरी त्यांचा सर्रास वापर करतात. रासायनिक कीडनाशके वापरण्यासाठी सोपी व आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असतात, परंतु शेतकरी रासायनिक कीडनाशकांचा वापर अनिर्बंधपणे करीत असतात.कीडनाशकांमध्ये कीटकनाशके, बुरशीनाशके, तणनाशके, सूत्रकृमिनाशके, मूषकनाशके, संजीवके इत्यादींचा समावेश होतो. सन 2012-13 या वर्षी आपल्या देशात अंदाजे 45390 मेट्रिक टन (क्रियाशील घटक) कीडनाशकांचा वापर कीडनियंत्रणासाठी केला गेला. भारतामध्ये कीडनाशकांचा प्रति हेक्टरी सरासरी वापर 600 ग्रॅम असून अमेरिका व चीनमध्ये साधारणपणे 6 ते 17 किलोग्रॅम एवढा आहे. आपल्या देशात कीडनाशकांचा वापर इतर विकसित देशांच्या तुलनेत अगदीच कमी असला तरी त्यांच्या अवेळी व अवाजवी वापराने कीडनाशकांचे अनेक दुष्परिणाम दिसून येत आहेत.
 
विकसित देशांमध्ये (युरोपियन देश व अमेरिका) कीडनाशक वापरासंबंधीचे नियम अत्यंत कडक आहेत. कीडनाशकांच्या कमाल अवशेष मर्यादांबाबत हे देश अत्यंत जागरूक असतात. 
 
भारतातील नागरिकही आता अन्नातील रासायनिक कीडनाशकांच्या अवशेषांबाबत गांभीर्याने विचार करू लागले आहेत. युरोप गॅपप्रमाणेच इंडिया गॅपची शक्यता नजीकच्या काळात नाकारता येणार नाही. द्राक्षातील क्लोरमेक्वाट क्लोराइड या संजीवकाच्या एमआरएलवरून जी मोठी समस्या घडली ते उदाहरण आपल्याकडे ताजे आहे. तेव्हा शेतकर्‍यांनी या गोष्टींचा विचार करून आपल्या शेतीपद्धतीत बदल करणे आवश्यक आहे.
 
आपल्या देशात कीडनाशक अवशेष संशोधन प्रकल्पांची सुरुवात भारतीय कृषी अनुसंधान परिषदेने 1985 साली केली. या योजनेंतर्गत आपल्या देशात निरनिराळ्या राज्यांत संशोधन केंद्रे अस्तित्वात आली. या संशोधन केंद्रांमध्ये आदर्श शेतीसुधार पद्धतीनुसार कीडनाशकाची पिकांवर फवारणी करून त्यांच्या र्‍हासाचा अभ्यास करण्यात येतो. या केंद्राच्या माध्यमातून कीडनाशकांचा विभिन्न नैसर्गिक परिस्थितींमध्ये विघटन व र्‍हासांचा अभ्यास केला जातो. या अभ्यासाच्या निष्कर्षांच्या आधारे पिकांवर ‘कमाल अवशेष मर्यादा’ निश्‍चित केल्या जातात. कीडनाशक अवशेष अहवाल हा नंतर (सीआयबी अँड आरसी) केंद्रीय कीडनाशक मंडळ, कृषी मंत्रालय भारत सरकार यांच्याकडे सोपविला जातो व त्यांच्या मान्यतेनंतर हा अहवाल स्वास्थ्य मंत्रालय, भारत सरकार यांच्या अंतर्गत भारतीय अन्न व सुरक्षा प्रमाणके संस्थेच्या वैज्ञानिक समितीकडे सोपविला जातो. ही संस्था आंतरराष्ट्रीय नियमावलीनुसार (सीएसी) विशिष्ट पिकांमध्ये किडनाशकांची ‘कमाल अवशेष मर्यादा’ व ‘सुरक्षा कालावधी’ निश्‍चित करते व त्यानंतरच कीडनाशके बाजारात शेतकर्‍यांसाठी उपलब्ध होतात.
 
भारतीय कृषी अनुसंधान परिषद, कृषी मंत्रालय, भारत सरकारतर्फे 2006 साली देशभरातील सुमारे 25 प्रयोगशाळांमधून ‘कीडनाशक अंश संनियंत्रण योजनेची सुरुवात झाली. या योजनेद्वारे निरनिराळ्या शेती उत्पन्न बाजार समित्यांमधून भाजीपाला, फळे, कडधान्ये, तसेच दूध, पाणी व मसालावर्गीय पिकांचे नमुने शास्त्रोक्त पद्धतीने नियमितपणे गोळा करण्यात येतात व प्रयोगशाळेमध्ये शास्त्रीय पद्धतीने अद्ययावत उपकरणाच्या आधारे कीडनाशके अवशेषांची तपासणी करण्यात येते.
 
नुकत्याच उपलब्ध अहवालानुसार जवळजवळ 15 टक्के शेतमाल नमुन्यामध्ये कीडनाशकांचे अवशेष दिसून आले आहेत. तसेच 2-3 टक्के नमुन्यांमध्ये कीडनाशकांचे अवशेष हे कमाल अवशेष मर्यादेपेक्षा जास्त आढळून आले आहेत. इतर विकसित देशांची (चीन व अमेरिका) तुलना केल्यास (5 ते 6 टक्के) ही संख्या समपातळीत व किंबहुना कमीच आहे. 
 
कीडनाशक अवशेष (पेस्टिसाइड रेसिड्यू) : कीडनियंत्रणासाठी कीडनाशकांची फवारणी केल्यानंतर शेतमालावर किंवा खाद्यान्नावर आढळणारा कीडनाशकांचा शेष अंश म्हणजेच कीडनाशक अवशेष होय. यामध्ये कीडनाशकांच्या विघटनानंतर झालेल्या रूपांतरित घटकांचाही समावेश होतो. या अवशेषांचे मापन एक भाग प्रति दशलक्ष भाग या प्रमाणात (पार्ट्स पर मिलियन, पीपीएम) करतात.
 
कीडनाशकांच्या वापरानंतर लगेचच पिकांवर आढळणारे कीडनाशकांचे प्रारंभिक अवशेष (इनिशियल रेसिड्यू) वनस्पतीच्या वेगवेगळ्या भागांवर कमी-अधिक प्रमाणात असतात. उदाहरणार्थ, फळे आणि भाजीपाला यांवर प्रत्यक्ष फवारणी होत असल्याने त्यांवर कीडनाशकांचे अवशेष जास्त प्रमाणात असतात; मात्र, जमिनीखाली येणार्‍या अन्नघटकांमध्ये (बटाटा, कांदा, बीट, रताळे, भुईमूग इ.) ते कमी असतात. टोमॅटो, वांगी, सफरचंद यांसारख्या मऊ व चकचकीत पृष्ठभाग असलेल्या फळांवर भेंडी, कोबी, फुलकोबी, पेरू यांच्या तुलनेत कमी अवशेष आढळतात. 
 
कीडनाशक फवारणीनंतर प्रारंभी जास्त प्रमाणात आढळणारे अवशेष हवामानातील विविध घटकांमुळे (तापमान, आर्द्रता, सूर्यप्रकाश आणि जैविक घटक) हळहळू कमी होत जाऊन नाश पावतात किंवा त्यांचे दुसर्‍या घटकांमध्ये रूपांतर होते. थंड हवामानापेक्षा उन्हाळ्यात कीडनाशक अवशेषांचा र्‍हास जलदगतीने होतो, तसेच हरितगृहातील फळे व भाजीपाल्याच्या तुलनेत शेतातील पिकावरील अवशेषांचा र्‍हास लवकर होतो. कीडनाशकांचे अंतिम अवशेषांचे प्रमाण हे पिकावरील प्रारंभिक अवशेष व त्यांचा र्‍हासाचा वेग (डिसिपॅटिशन रेट) यावर अवलंबून असते.
 
कीडनाशक अवशेषयुक्त (कमाल अवशेष मर्यादेपेक्षा जास्त) अन्न दीर्घकाळ सेवन केल्याने त्यांचा मानवी शरीरावर अनिष्ट परिणाम होऊन गंभीर विषजन्य आजार होऊ शकतात. उदाहरणार्थ, कर्करोग, मज्जासंस्था व मेंदूचे विकार, अस्थिक्षय, प्रजननक्षमतेचा र्‍हास, दृष्टिदोष आणि जन्मजात व्यंग इत्यादी. यामुळे अन्नधान्य व खाद्यान्नातील अवशेषांचे हे घातक प्रमाण एक ज्वलंत समस्या बनून संपूर्ण जगाला भेडसावत आहे. अवशेषरहित अन्नधान्य पिकविणे कठीण आहे हे जरी खरे असले, तरी त्यांचे प्रमाण दक्षतापूर्वक नियंत्रण किंवा एकात्मिक कीड व्यवस्थापन व इतर नियंत्रण पद्धतींचा अवलंब करून विहित उच्चतम मर्यादेपेक्षा कमी राखणे शक्य आहे. 
 
कमाल अवशेष मर्यादा (मॅक्सिमम रेसिड्यू लिमिट, एमआरएल) : एखाद्या पिकात विशिष्ट कीडनाशकाचा वापर शेतकर्‍याने शिफारस केल्याप्रमाणे व आदर्श शेतीपद्धतीप्रमाणे (जीएपी) केला असला तरी त्याचे काही प्रमाणात तरी अवशेष त्या शेतीमालात राहतात. मात्र, हे अवशेष किती प्रमाणात राहावेत याची एक मर्यादा ठरविली जाते. यालाच कमाल अवशेष मर्यादा म्हणतात.
 
एकाच कीडनाशकाची निरनिराळ्या पिकांवर भिन्न कमाल अवशेष मर्यादा असू शकते. हल्ली अनेक देशांनी ताजी फळे आणि भाजीपाला यांतील अवशेषांचे प्रमाण निश्‍चित करण्याच्या हेतूने उत्पादन, पॅकिंग, साठवणूक व वाहतूक याबाबत मानके निश्‍चित केली आहेत. उदा. युरेगॅप या मानकांचा उद्देश नागरिकांसाठी सुरक्षित अन्न व पर्यावरण संरक्षण हे आहेत.
 
उत्तम कृषी पद्धती (गुड अ‍ॅग्रील, प्रॅक्टिस) : उत्तम कृषी पद्धतीमध्ये आर्थिक, पर्यावरणविषयक व सामाजिक बाबींना महत्त्व देऊन शाश्‍वत शेती करणे आणि मानवी आरोग्यास सुरक्षित असे अन्नधान्य उत्पादन करणे यावर भर देण्यात आला आहे.
 
काढणीपूर्वी प्रतीक्षा कालावधी (प्री हार्वेस्ट इंटरव्हल, पीएचआय) : पीककाढणी करण्यापूर्वी फवारणी केव्हा थांबवावी, जेणेकरून कीडनाशक अवशेष कमाल अवशेष मर्यादेपेक्षा जास्त राहणार नाहीत, तो कालावधी म्हणजेच काढणीपूर्व प्रतीक्षा कालावधी. हा दिवसांमध्ये नमूद केलेला असतो. कमाल अवशेष मर्यादा व इतर पूरक माहिती यांच्या आधारे कीडनाशकांची (अंतिम) फवारणी ते पीककाढणी अथवा कापणी यातील काढणीपूर्व प्रतीक्षा कालावधी फळे आणि भाजीपाला काढणीच्या पूर्वी काटेकोरपणे पाळणे अत्यंत गरजेचे असते.
 
अनेक देश अन्नधान्य व खाद्यान्न यांची आयात करताना आयात माल अवशेषरहित आणि सुरक्षित आहे की नाही याची खात्री करतात. युरोपीय समुदाय व अनेक प्रगत देशांनी याबाबत विविध निकष ठरवून समर्पक मापदंड व कायदे करून अमलात आणले आहेत. हे कायदे त्या त्या देशातील शेतमाल उत्पादकांना तर बंधनकारक आहेतच, परंतु आयात-निर्यातीसाठीही त्यांची काटेकोरपणे अंमलबजावणी होते. कीडनाशक अवशेषांचे प्रमाण आयात मालामध्ये किती असावे याबाबतचे निकष ठरवून आयात केलेल्या मालाची कडक तपासणी करून त्यामध्ये त्या निकषापेक्षा अधिक अवशेष आढळले तर तो माल नाकारला जातो. काही देश पूर्णत: कीडनाशकाविना सेंद्रिय शेतीद्वारे पिकवलेला मालच स्वीकारतात आणि अशा प्रकारे उत्पादित केलेल्या मालाला विशेष दर्जा देऊन, जास्त किंमत मोजून तो माल खरेदी करतात.
 
कीडनाशकांचे शेतीमालातील अवशेष हे निर्यातीमधील एक प्रमुख अडसर असल्याने निर्यातीसाठी पिकवलेल्या शेतीमालातील अवशेषविहित मर्यादेपेक्षा जास्त असू नयेत यासाठी शासकीय स्तरावर विविध योजनांची अंमलबजावणी केली जात आहे. आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये कीडनाशक अवशेषरहित कृषी उत्पादनांना विशेष महत्त्व लाभले आहे. यासाठी शेतकर्‍यांनी कीडनाशक अवशेषांचे योग्य व्यवस्थापन केले पाहिजे आणि कीडनाशक अवशेष व्यवस्थापनाच्या दृष्टीने खाली नमूद केलेल्या मार्गदर्शक सूचनांचा व उपाययोजनांचा अवलंब केला पाहिजे.
 
कीडनाशक अवशेषांचे व्यवस्थापन :
1)पीक उत्पादनासाठी जमिनीची निवड, बियाणे, बीजप्रक्रिया यापासून ते काढणी, साठवणूक पॅकिंग इत्यादीपर्यंतच्या सर्व गोष्टींच्या सविस्तर व तपशीलवार नोंदी ठेवाव्यात त्यासाठी ‘युरेाप गॅप’मध्ये दिलेल्या सूचना उपयुक्त ठरतील.
 
2)केंद्रीय कीटकनाशक मंडळाने परवाना दिलेली सर्व कीडनाशक औषधे बाजारात उपलब्ध असतात. औषधांसोबत जे माहितीपत्रक असते त्यावर औषध कोणत्या पिकावर (लेबल क्लेम) केव्हा, कशासाठी व किती प्रमाणात वापरावे, वापरताना व वापरल्यानंतर काय सावधानता बाळगावी याची माहिती वाचून तिचे अवश्य काटेकोर पालन केले पाहिजे.
 
3)कीडनाशकांच्या मात्रा व दोन फवारणींतील अंतर प्रमाणित शिफारशीनुसार ठेवले तर अवशेष मर्यादा योग्य राखता येतील.
 
4)फवारणी करताना किडींची संख्या/आर्थिक नुकसान पातळी विचारात घेऊन गरज असेल तेव्हाच शिफारस केलेल्या रासायनिक कीडनाशकांचा वापर करावा. रासायनिक कीडनाशकांचा वापर पिकाच्या सुरुवातीच्या काळात करावा. फलधारणा आणि काढणीच्या काळामध्ये गरज पडल्यास वनस्पतिजन्य व जैविक कीडनाशके, उदा. निंबोळी अर्क, बी.टी., एच. ए. एन.पी.व्ही. व्हर्टिसिलियम, पॅसिलोमायसिस, ट्रायकोडर्मा व इतर जिवाणूंवर आधारित कीडनाशकांचा आणि परोपजीवी मित्र कीटक, फेरोमोन सापळे इ.चा वापर करावा. 
 
5)फळे आणि भाजीपाला पक्व व काढणीयोग्य झाल्यानंतर फवारणी करू नये; परंतु फवारणी करणे अटळ झाल्यास पर्याप्त काढणीपूर्व कालावधी उलटल्यानंतरच फळांची तोडणी करावी. ज्या कीडनाशकांचा काढणीपूर्व प्रतीक्षा कालावधी कमी दिवसांचा आहे त्यांची फवारणी जरुरीप्रमाणे उशिरा करण्यास हरकत नाही, परंतु ज्यांचा काढणीपूर्व प्रतीक्षा कालावधी जास्त आहे अशी औषधे पिकाच्या सुरुवातीच्या वाढीच्या काळातच फवारावीत.
 
6)कीडनाशकांची निवड करताना शिफारस केलेली, मानवी आरोग्यास व पर्यावरणास कमी हानिकारक असलेली कीडनाशके निवडावीत. उदा. एंडोसल्फान, मेलॅथिऑन, परमेथ्रीन, फेनव्हलरेट, गंधक, कॅप्टन, कार्बनडॅझिम, ताम्रयुक्त बुरशीनाशके आणि इतर जैविक कीडनाशके. कीडनाशके ही युरोप आणि इतर देशांत कृषी उत्पादनांची निर्यात व विक्री करण्यासाठी शिफारस केलेल्या कीडनाशकांपैकी असावीत.
 
7)देश-विदेशात वापरावर बंदी असलेली कीडनाशके फवारणीसाठी वापरू नयेत.
 
8)एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये पीक संरक्षणाच्या सर्व उपलब्ध पद्धतींचा सुयोग्य ताळमेळ घालून रासायनिक कीडनाशकांचा नियंत्रित व माफक वापर करण्याची शिफारस असते. त्यामुळे शेतकर्‍यांनी एकात्मिक कीड व्यवस्थापन तंत्र अवगत करणे लाभदायक ठरते.
 
9)द्राक्षाच्या बाबतीत एप्रिल छाटणी ते ऑक्टोबर छाटणीपर्यंतचा काळ हा उत्पादनदृष्ट्या महत्त्वाचा नसल्याने बहुतेकदा शेतकरी एप्रिल छाटणीनंतर द्राक्षबागेकडे दुर्लक्ष करतात. एप्रिल छ ाटणीनंतर कीडनियंत्रणाकडे व्यवस्थित लक्ष दिले तर कीड व रोग आटोक्यात राहतात आणि ऑक्टोबर छाटणीनंतर कीड व रोगांचा प्रादुर्भाव आटोक्यात आणणे फारसे कठीण जात नाही. तरी शेतकर्‍यांनी द्राक्षबागेतील कीडनियंत्रणाकडे नियमित व वर्षभर लक्ष द्यावे.
 
10)द्राक्षांवर डाग दिसू नयेत यासाठी ई.सी. किंवा एस. एल.सारख्या द्रवरूप स्वरूपाची कीडनाशके फवारावीत. याउलट, पाण्यात मिसळणारी भुकटी या प्रकारातील औषधे फवारली तर मण्यावर डाग दिसण्याची शक्यता असते. त्यामुळे पाण्यात मिसळणारी भुकटी स्वरूपातील कीडनाशकाचा नंतरच्या काळात कमी वापर करावा.
 
11.पीक काढणीयोग्य झाल्यावर एखाद्या कीड/रोगाचा अकस्मात प्रादुर्भाव झाल्यास शेतकर्‍यांनी गोंधळून न जाता त्या किडीचे/रोगाचे निरीक्षण करावे व सतर्क राहावे. उदाहरणार्थ, द्राक्षकाढणीच्या वेळी पिठ्या ढेकणाचा (मिलीबग्जचा) प्रादुर्भाव झाल्यास किती वेलींवर हा प्रादुर्भाव झालेला आहे, बागेच्या कोणत्या भागात व किती प्रमाणात झाला आहे याचे निरीक्षण करून संपूर्ण बागेवर करता प्रादुर्भाव झालेल्या वेलीपुरतीच किंवा तेवढ्याच भागावर फवारणी करावी. (स्पॉट अ‍ॅप्लिकेशन) फवारणी न फवारणी केलेल्या द्राक्षांचा नमुना अवशेष तपासणीकरता घेऊ नये किंवा त्या द्राक्षांची निर्यात करू नये. तसेच पिठ्या ढेकणाच्या (मिलीबग्ज) एकात्मिक व्यवस्थापन तंत्राचा वापर करून कीडीचे प्रभावीरीत्या नियंत्रण करणे शक्य आहे. पिठ्या ढेकणाच्या नियंत्रणासाठी ऑस्ट्रेलियन लेडी बर्ड (क्रिप्टोलिमस मॅन्ट्रोझायरी) भुंगेरे शिफारस केलेल्या प्रमाणात बागेत सोडावेत. शिवाय, नुकताच प्रादुर्भाव झालेल्या भागावर व्हर्टिसिलियम लेकेनी या जैविक कीटकनाशकाची फवारणी करावी. त्याचप्रमाणे बर्‍याच बागेत सूत्रकृमींचा प्रादुर्भाव होण्याचा धोका असतो. सूत्रकृमी नियंत्रणासाठी ऑक्टोबर छाटणीनंतर कोणत्याही आंतरप्रवाही रासायनिक कीटकनाशकाचा (फोेरेट,कार्बाफ्युरॉन) वापर करू नये. त्याऐवजी निंबोळी पेंड, पॅसिलोमायसिस लिल्यासिनस + ट्रायकोडर्मा हर्जियानम या जैविक सूत्रकृमी/ रोगनाशकांचा वेळीच वापर करावा.
 
12.सल्फर व कॉपर ऑक्झिक्लोराइड यांच्या कमाल अवशेष मर्यादा जास्त असल्याने त्यांचा वापर सुरक्षित समजला जातो. बोर्डोमिश्रण, गंधक व ताम्रयुक्त बुरशीनाशके यांचा द्राक्षांवर योग्य वेळी योग्य प्रमाणात वापर करावा.
 
13.शेवटी सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सर्व कीडनाशक औषधविक्रेत्यांनी मानवी आरोग्य व नैतिक मूल्यांचा विचार करून दर्जेदार, पिकानुसार शिफारस केलेल्या व फक्त प्रमाणित कीडनाशकांच्या विक्रीस प्राधान्य द्यावे.
 
शेतकर्‍यांनी आदर्श शेती पद्धतीचा (जीएपी- गॅप) अवलंब केल्यास फळे व भाजीपाल्यांतील कीडनाशक अवशेषांचे व्यवस्थापन करता येईल. त्यामुळे मानवी आरोग्याचे संरक्षण होईल व पर्यावरणाचे प्रदूषण टाळता येईल.
 
युरोपीय देशांनी इतर सर्व देशांतील फळे व भाजीपाल्यांचे व्यावसायिक उत्पादन व निर्यात करू इच्छिणार्‍या शेतकर्‍यांसाठी कृषी उत्पादनतंत्राबाबत आवश्यक व महत्त्वपूर्ण घटक असलेली ‘युरेगॅप’ ही नियमावली प्रसारित केलेली आहे. यामध्ये व्यावसायिक कृषी उत्पादन करण्यासाठी ‘एकात्मिक कीड व्यवस्थापन’ आणि ‘एकात्मिक पीक व्यवस्थापन’ तंत्राचा समावेश केलेला आहे. याशिवाय इतर अनेक नियम व उपाय यांची या ‘युरेप गॅप’ मार्गदर्शक तत्त्वांमध्ये माहिती दिलेली आहे. 
 
डॉ. चिदानंद पाटील
कीडनाशक अंश विश्‍लेषक, अखिल भारतीय समन्वित कीडनाशक अवशेष संशोधन प्रकल्प,
कीटकशास्त्र विभाग, मफुकृवि, राहुरी.