मधमाश्या पालनाची मूलभूत गरज, उपयुक्त वनस्पती संवर्धन

डिजिटल बळीराजा    18-Sep-2018
 
शेती क्षेत्रात मधमाश्यांच्या परागकणांसाठीच्या मध्यस्थीमुळे पिकांची व फळांची काही पटींनी वाढ होते, हा दुय्यम वाटणारा परंतु जास्त महत्त्वाचा फायदा आहे. मध म्हणजे कार्बोहायड्रेट (कर्बयुक्त) अन्नघटकाचे रूप, तर परागकण म्हणजे प्रथिनांचा समृद्ध स्रोत होय. मोहोळातील मधमाश्यांच्या, राणी, नर व कामकरी माशांच्या संगोपनासाठी या दोन्ही अन्नघटकांची गरज खूप महत्त्वाची ठरते. त्यामुळे त्यांना उपयोगी पडणार्‍या वनस्पतींची लागवड व संवर्धन अत्यावश्यक आहे. वनस्पतींचे नाव, फुलण्याचा काळ, पुष्परस व परागकणांसाठीची उपयुक्तता, वृक्ष लागवडीचा हंगाम, उपलब्धतेचे भौगोलिक क्षेत्र, अशी सर्वांगीण माहिती या लेखात वाचायला मिळेल.
 
मधमाश्या पूर्ण शाकाहारी आहेत. फुलातून स्रवणारा पुष्परस आणि मिळणारे परागकण हेच त्यांचे प्रमुख अन्न. यासाठी त्या वनस्पतींवर पूर्णपणे अवलंबून असतातच, परंतु मोहोळांच्या निवार्‍यासाठीही वृक्षांचा उपयोग होतो. याशिवाय आधुनिक तंत्राने मधमाश्यापालन करण्यासाठी विशिष्ट रचनेच्या लाकडी पेट्यांचा वापर करावा लागतो. म्हणूनही झाडांचे महत्त्व. पुष्परसावर पोटातील पाचक रसांची प्रक्रिया करून त्याचे मधात रूपांतर करण्याचे काम मधमाश्या करतात. मध म्हणजे कार्बोहायड्रेट (कर्बयुक्त) अन्नघटकाचे रूप, तर परागकण म्हणजे प्रथिनांचा समृद्ध स्रोत होय. मोहोळातील मधमाश्यांच्या, राणी, नर व कामकरी माशांच्या संगोपनासाठी या दोन्ही अन्नघटकांची गरज खूप महत्त्वाची ठरते. त्यामुळे त्यांना उपयोगी पडणार्‍या वनस्पतींची लागवड व संवर्धन अत्यावश्यक आहे. मोहोळांच्या पेट्या ठेवण्यासाठी मधुबनाची जागा निवडताना अशा वनस्पतींची उपलब्धता लक्षात घ्यावी लागते. मधसंकलक कामकरी मधमाश्यांची उड्डाणकक्षा साधारणपणे तीन किलोमीटरची असते. मधुबनाच्या या कक्षेतील परिसराचं सर्वेक्षण मधपालाला करावे लागते. त्याचप्रमाणे या परिसरात उपलब्ध असलेल्या वनस्पतींचा फुलोर्‍याचा हंगाम, फुलण्याची वेळ व कालावधी यांचीही माहिती असावी लागते. मधुबनाची स्थापना करताना जवळपास शेती बागायती असेल आणि जवळच नैसर्गिक जंगल असेल तर अशा जागेची निवड मधोत्पादनासाठी, मोहोळांच्या व्यवस्थापनासाठी व संवर्धनासाठी उपयुक्त ठरते. जंगलांनी व्याप्त डोंगर, दर्‍या, जवळच शेतीक्षेत्र अशी स्थानिक उपलब्धता आदर्श असली, तरी सर्व ठिकाणी हे शक्य होत नाही. केवळ शेती किंवा केवळ जंगल क्षेत्र असेल तर केवळ उपयुक्त फुलोरा वर्षभर सातत्याने मिळणार नाही. मध व परागकणाच्या नैसर्गिक पुरवठ्यात काही काळ खंड पडू शकतो. हा खंड भरून काढण्यासाठी काही व्यवस्थापकीय तंत्रे वापरावी लागतात. त्यातील एक म्हणजे या अभावाच्या काळात साखरेचा पाक देणे आणि परागकणांचा पुरवठा करणे आवश्यक ठरते. काही वेळा मधमाशांच्या मोहोळांचं स्थलांतर फुलोरा असलेल्या अशा ठिकाणी करणं फायद्याचं ठरते. म्हणजे घाटमाथ्यावरील उन्हाळ्यात मधोत्पादनासाठी ठेवलेली मोहोळं पावसाळ्यात सपाटीच्या कृषिपट्ट्यात हलवावी लागतात. यावर खर्च करावा लागला तरी शेवटी आर्थिक फायदाच होतो. शेतीक्षेत्रात मधमाश्यांच्या परागकणांसाठीच्या मध्यस्थीमुळे पिकांची व फळांची काही पटींनी वाढ होते, हा दुय्यम वाटणारा परंतु जास्त महत्त्वाचा फायदा आहे. 
 
आजच्या नागरीकरण वाढण्याच्या परिस्थितीत अशी आदर्श व्यवस्थाही तोकडी पडू शकते. कारण वनांचा संहार आणि आकसते शेतीक्षेत्र या भेडसावणार्‍या समस्या त्यातून निर्माण होतात. अशा वेळी मधमाश्यांना उपयोगी पडणार्‍या निवडक पिकांची, फळझाडांची लागवड शेतकर्‍यांनी नियोजनपूर्वक करायला हवी. वनखात्यानेही आपल्या वनसंवर्धन प्रकल्पांमध्ये या निवडपद्धतीचा वापर आवर्जून केला पाहिजे. त्याचप्रमाणे वनशेतीसाठी शेतकर्‍यांना उपयुक्त वनस्पतींची रोपे योग्य वेळी व पुरेशा संख्येत उपलब्ध करून दिली पाहिजेत. अशा परस्पर सहकार्याने मधमाश्यापालन यशस्वी करता येईल व ग्रामीण आर्थिक गरज भागवता येईल.
 
मधमाश्यांना उपयुक्त वनस्पतींसाठी पुण्यातील केंद्रीय मधमाश्या संशोधन व प्रशिक्षण संस्थेने संपूर्ण भारताचे सर्वेक्षण केले व विविध जातींच्या पुष्परस व परागकण या दोन्ही अथवा त्यांच्यापैकी एकेका घटकाच्या स्रोत वनस्पतींची व्यापक यादी तयार केली व प्रसिद्ध केली. वनस्पतींचे नाव, फुलण्याचा काळ, पुष्परस व परागकणांसाठीची उपयुक्तता, वृक्ष लागवडीचा हंगाम, उपलब्धतेचे भौगोलिक क्षेत्र, अशी सर्वांगीण माहिती त्यांच्या तक्त्यातून दिली आहे. 
 
वनस्पतींच्या नावांमध्ये शास्त्रीय नाव व स्थानिक भारतीय नाव, त्याचप्रमाणे झाडांचे इतर उपयोग यांचा उल्लेख केला आहे.
 
ही यादी खादी ग्रामोद्योग आयोगाच्या डायरेक्टोरेट ऑफ फॉरेस्ट बेस्ड इंडस्ट्री या विभागाच्या ‘टेक्निकल बुलेटिन्स’ या प्रकाशनात समाविष्ट केली आहे. हे पुस्तक ‘निदेशक, डायरेक्टोरेट ऑफ फॉरेस्ट बेस्ड इंडस्ट्री, खादी ग्रामोद्योग आयोग, ग्रामोदय, 3 इर्ला रोड, विलेपार्ले (पश्‍चिम), मुंबई 400050’या पत्त्यावर पत्रव्यवहार करून मिळू शकेल. याच पुस्तकात मधमाश्यापालन तंत्राची सविस्तर माहिती विविध प्रकरणांतून इंग्रजीतून दिलेली आहे. मधपालांनी त्याचा उपयोग करून घ्यावा.
 
अशीच अत्यंत उपयुक्त यादी व माहिती डॉ. र. पु. फडके, निवृत्ती डायरेक्टर, केंद्रीय मधमाश्या संशोधन संस्था यांच्या भारतीय मधमाश्या आणि मधमाश्यापालन या पुस्तकातही समाविष्ट केलेली आहे. 
 
मधमाश्यांना उपयुक्त झाडांची संक्षिप्त यादी
नाव 
1) अकेशिया ऑरिक्युलीफॉर्मिस ऑस्ट्रेलियन बाभूळ
2) अकेशिया सेनेगल खैर
3) अकेशिया कॅटेच्यू काताचा खैर
4) अकेशिया सायन्युटा शिकेकाई
5) अ‍ॅक्टिनोट्रॅफनी ऑगुस्टीफोलिया पिसा
6) अ‍ॅडेनान्थेय पॅव्होनिस गुंज
7) अ‍ॅडानसोनिया डिजीटाटा गोरख चिंच
8) इगल मार्मेलॉस बेल
9) अ‍ॅतिथस एक्सेल्सा महारुख
10) अ‍ॅसिस्टॅसिस व्हायोलोका आस्त्रा
11) अव्हेरोहा करंबोला कामरूख
12) अ‍ॅझाडिराक्टा इंडिका कडुलिंब
13) बॅसिआ लॅटिफोलिया महुवा, मोह
14) बोसवेलिया सराटा सराटा
15) ब्रासिका (तेलबिया) मोहरीकुलीन बिया
16) बुकाम्निया लॅझम चारोळी
17) सेबिआ पेंटान्ड्रा पांढरी सावर
18) सिनेमोम झायल्यानिकम दालचिनी
19) कॉसमॉस बायपिनॅटम कॉसमॉस
20) डेलॉनिकस रेजिया गुलमोहोर
21) डायोस्पोरस कुकी टेंभुर्णी (पारसीमन)
22) इलॅग्नस कान्फेर्टा आंबुलकी
23) इलिओकॅटस रुद्राक्ष
24) इम्बिलिका ऑफिसिनॅलिस आवळा 
25) युकॅलिप्टस इंटरटेक्स्ट्रा निलगिरी
26) एरिथ्रिना पांगारा
27) युफोरडिया सेजहूर
28) फ्लोआक्युट्रिया मौटाना अटक
29) गरूगा पिनाटा किकर
30) ग्रॅव्हेलिया अरबोरिया घमार (शिवण)
31) ग्रोव्हिलिया
32) मेलिया अझाडिराक्टा बकाणा लिंब
33) टर्मिनिलिया बेलेरिका बेहेडा
34) टेरोकार्पस मार्सुपीझम बिब्बा
35) सॅपिन्डस रिठा
36) हेविआ ब्रासिलिओन्सेस रबर
37) बॉम्बॅकस सिबा लाल सावर
38) डाल्खरजिया शिसवी
39) मोरिंगा शेवगा
40) गे्रव्हेलिया रोबस्टा सिल्व्हर ओक
41) अल्बिझ्झिया शिरीष 
42) मॅमिआ सुरिंगा सुरंगी
43) सेस्बानिया ग्रँडिफ्लोरा हादगा
44) टर्मिनालिया चेबुल्डा हिरडा
45) मुराय्या पॅनिकुलाटा कुंती
46) कॅलिस्टेमन लिनिआरिस बॉटलब्रश
47) सिसालपिनिया बाँड्युसेला सागरगोटा
48) कॅलिस्टेफस चायनेन्सिस अ‍ॅस्टर
49) पॉलिअँथस ट्युबरोजा गुलछडी
50) सॉलिडॅगी कॅनज्योन्सिस गोल्डन रॉड
51) टार्गेट्स इरेक्टा झेंडू
अधिक कृषिपिके, फळझाडे व जंगली झाडे यांची यादी
केंद्रीय मधमाश्या संशोधन संस्था, पुणे यांनी प्रसिद्ध केली आहे ती पाहावी. 
 
डॉ. क. कृ. क्षीरसागर 1294, शुक्रवार पेठ, 7 वा रस्ता, सुभाष नगर, पुणे 411002