पिवळ्या डेझीवरील तांबेर्‍या रोगाचे नियंत्रण

डिजिटल बळीराजा    15-Sep-2018
 
पिकावर तांबेरा या रोगाचा मोठा प्रादुर्भाव होतो. याचे मुख्य कारण म्हणजे पाण्याचा अयोग्य वापर, अयोग्य निचरा त्यामुळे होणारी बुरशीची वाढ व रोगास अनुकूल वातावरण, प्रामुख्याने सप्टेंबर- ऑक्टोंबरमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव पिकावर दिसून येतो. डेझीवरील तांबेरा रोगाच्या प्रभावी नियंत्रणासाठी एकात्मिक रोगव्यवस्थापन म्हणजे भौतिक तसेच रासायनिक पद्धतीचा एकात्मिक वापर करून रोगाचे योग्य रीतीने व्यवस्थापन करावे, याबद्दल या लेखात माहिती बघू.
 
पिवळ्या डेझीला सोनतुरा असेही म्हटले जाते. पिवळ्याधमक रंगाची खालून वर उमलत जाणारी छोटी छोटी दांड्यावरील फुले हे डेझीचे खास वैशिष्टय आहे. पिवळी डेझी प्रामुख्याने पुष्पगुच्छ, फ्लॉवरपॉट तयार करताना फिलर म्हणून उपयोगी येते. दांड्यावरील छोटी पिवळी फुले गुच्छाचे सौंदर्य वाढवतात. त्यामुळे फुलांच्या सुशोभीकरणामध्ये पिवळ्या डेझीला अनन्यसाधारण महत्व आहे. तसेच हे पीक लागवडीसाठी सोपे असून कमी खर्चात या पिकाचे व्यवस्थापन करता येते. एकदा लागवड केली की हे पीक पुढे 2-3 वर्षे वाढवता येते. शिवाय या पिकाची शाखीय पद्धतीने अभिवृद्धी करतात. त्यामुळे पिवळ्या डेझीची लागवड कमी खर्चाची असून त्याला सातत्याने बाजारात मागणी असते. या पिकाला वर्षभर चांगला बाजारभाव मिळत असल्याकारणाने मोठ- मोठ्या शहराभोवती या फुलपिकाखालील क्षेत्र सातत्याने वाढत आहे. डेझी हे पीक निसर्गत: काटक, चिवट, कीड व रोगांना कमी बळी पडणारे आहेत. मात्र, अलीकडे या पिकावर तांबेरा या रोगाचा मोठा प्रादुर्भाव होताना दिसतो. याचे प्रमुख कारण म्हणजे पाण्याचा अयोग्य वापर, अयोग्य निचरा त्यामुळे होणारी बुरशीची वाढ व रोगास अनुकूल वातावरण, प्रामुख्याने पावसाळा संपल्यानंतर म्हणजे सप्टेंबर- ऑक्टोंबरमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव पिकावर दिसून येतो. या काळात रोगाच्या वाढीसाठी वातावरण अनुकूल असते. साधारणतः वातावरणात 20-25 अंश सें. तापमान व 70-80 % आर्द्रता असते तेव्हा या रोगाच्या बुरशीची वाढ झपाट्याने होते. हा रोग कोलिओस्पोरिअम अ‍ॅस्टेरियम या बुरशीमुळे होतो. या रोगामुळे डेझीचे 60 - 70 % नुकसान होते.
 
रोगाची लक्षणे : तांबेरा हा रोग झाडाच्या प्रत्येक अवयवावर दिसतो. पाने, फांद्या व खोडावर हा रोग आढळतो. प्रथमत: पानाच्या खालच्या बाजूस तपकिरी ठिपके दिसतात. पुढे ते पिवळे दिसतात. या ठिपक्यांमध्ये असंख्य बुरशीचे बीजाणू असतात. अनुकूल वातावरणात या बुरशीची वाढ झपाट्याने होते. ती पानाच्या वरील बाजूस तसेच फुलदांड्यावरही दिसू लागते. असे असंख्य ठिपके एकत्र येऊन सर्व झाड व्यापुन परिणामी पाने करपतात. पानांची गळ होते. फुले येण्याच्या काळात या रोगाची तीव्रता वाढते. हा रोग हवेमुळे पसरला जातो. त्यामुळे वेळीच रोगनियंत्रणाची उपाययोजना करणे गरजेचे असते, अन्यथा मोठे नुकसान संभवते. 
 
रोग नियंत्रण उपाययोजना : डेझीवरील तांबेरा रोगाच्या प्रभावी नियंत्रणासाठी एकात्मिक रोगव्यवस्थापन करावे. यामध्ये भौतिक तसेच रासायनिक पद्धतीचा एकात्मिक वापर करून रोगाचे योग्य रीतीने व्यवस्थापन करावे.
 
स्वच्छता हा रोगाच्या नियंत्रणाच्या दृष्टीने महत्वाचा भाग आहे. शेताची स्वच्छता ठेवावी, म्हणजे पिकातील सर्व रोगट पालापाचोळा गोळा करून नष्ट करावा.
 
डेझीच्या लागवडीसाठी पाण्याचा योग्य निचरा होणारी जमीन निवडावी. योग्य निचरा होण्यासाठी जमिनीला आवश्यक उतार ठेवावा अथवा चर काढून पाणी काढून टाकावे.रोप लागवडीचे योग्य अंतर ठेवावे. दोन रोपातील व ओळीतील अंतर 45 सेमी. ठेवावे. लागवड सरी - वरंबा पद्धतीने करावी.
 
लागवड करताना बीजप्रक्रीया करावी. डेझीची लागवड काश्यापासून करतात. काश्या (सर्कस) कॉपर ऑक्सीक्लोराइड 3 ग्रॅम प्रती लिटर पाण्यात टाकून तयार होणार्‍या द्रावणात दहा मिनिटे बुडवून लावाव्यात. शक्य झाल्यास लागवडीअगोदर जमीन बुरशीनाशकाच्या साहाय्याने धुरळून घ्यावी.
 
जुलै महिन्यापासून मॅन्कोझेब 2.5 ग्रॅम प्रति लिटर किंवा हेक्झा कोनॅझोल एक मिली प्रति लिटर किंवा प्रोपिकोनॅझाल अर्धा मिली प्रति लिटर यातील एक बुरशीनाशक स्टीकरमध्ये मध्ये मिसळून 10 दिवसाच्या अंतराने आलटून पालटून फवारावे.
 
डॉ. डी. एस. काकडे, डॉ. एस.बी. जाधव, अखिल भारतीय समन्मवयित पुणे संशोधन प्रकल्प, गणेशखिंड, पुणे- 67.