काकडीवर्गीय पिकांचे कीड व्यवस्थापन

डिजिटल बळीराजा    15-Sep-2018
 
 
काकडीवर्गीय पिकांवर मावा, तुडतुडे आणि पांढरी माशी या रस शोषणार्‍या किडी, तसेच फळमाशी, पान खाणारे लाल भुंगेरे, ठिपक्यांचे भुंगेरे, ब्रिस्टल बीटल आणि लाल कोळी या प्रमुख किडींचा प्रादुर्भाव होताना दिसून येतो व त्यामुळे फळांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. म्हणून काकडी पिकाचे उत्पादन घेताना शेतकर्‍यांनी आपल्या शेतीचे सर्वेक्षण करूनच व्यवस्थापन करावे.
 
रस शोषणार्‍या किडी :
1)पानावरील तुडतुडे : ही कीड लहान आणि पाचरीच्या आकाराची असून पूर्ण वाढलेला तुडतुडा 3 मि.मी. लांब आणि 1 मि.मी. रुंद असतो. तुडतुड्यांची पिल्ले तसेच प्रौढ पानाच्या पेशीमधील रस शोषून घेतात. त्यामुळे पाने पिवळी पडतात, सुकतात त्याचप्रमाणे वेलींची वाढ खुंटते. या किडीच्या व्यवस्थापनासाठी इमिडॅक्लोप्रीड 70 टक्के डब्ल्यू.जी.0.7 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
 
2)मावा : ही कीड काकडीवर्गीय पिकांवर नेहमीच आढळून येते. पूर्ण वाढ झालेला मावा आकाराने लांबट असून त्याचा रंग फिक्कट तपकिरी असतो. या किडीची पिल्ले तसेच प्रौढ कोवळी पाने तसेच कोवळ्या भागाच्या ग्रंथींत आपली सोंड खुपसून अन्नरस शोषून घेतात. परिणामी, पाने आकसतात आणि पिवळी पडतात. या किडीच्या पाठीवरील शिंगासारख्या दोन नलिकांमधून गोड मधासारखा पदार्थ बाहेर येतो. त्यामुळे पानावर कॅपनोडियम नावाच्या काळ्या बुरशीची वाढ होऊन पाने काळी पडतात. या किडीच्या व्यवस्थापनासाठी शेतात लेडीबर्ड बीटल तसेच क्रायसोपा हे मित्र कीटक अतिशय मोलाचे ठरतात. त्यामुळे हे भक्षक मित्र कीटक शेतात सक्षम प्रमाणात कार्यक्षम असल्यास रासायनिक कीटकनाशकांचा वापर टाळावा. फारच आवश्यकता भासल्यास इमिडॅक्लोप्रीड 70 टक्के डब्ल्यू. जी. 0.7 ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यातून फवारावे. 
 
3)पांढरी माशी : ही कीड अतिशय लहान म्हणजे अर्धा मि.मी. लांब असते. या किडीचे प्रौढ भुरकट पांढर्‍या रंगाचे असून आकाराने अत्यंत लहान असतात. या किडीची पिल्ले तसेच प्रौढ पानातील रसशोषण करतात. त्यामुळे पाने लहान आकार घेऊन चुरडली जातात. तसेच पांढर्‍या माशीमुळे विषाणूरोगाचा प्रसारही होतो. या किडीची मादी पानाच्या खालच्या भागात अंडी घालते. अंडी दहा दिवसांत उबतात. या किडीच्या व्यवस्थापनासाठी चार टक्के निंबोळीअर्काची फवारणी करावी. आवश्यकता भासल्यास दुसरी फवारणी थायामिथोक्झाम 4 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यातून फवारावे.
 
4)फळमाशी : ही काकडीवर्गीय पिकावरील प्रमुख कीड आहे. फळमाशी लालसर रंगाची असून तिचे धड पिवळसर असते आणि समोरील पंखावर तपकिरी रंगाचे पट्टे आणि समोरील पंखाच्या टोकावर करड्या रंगाचे ठिपके असतात. मागील पंखाची वाढ फार कमी असते. या किडीची मादी भुंगेरे आपल्या निमुळत्या जननेंद्रियाचा भाग फळाच्या आतमध्ये अंडी घालण्यासाठी टोचत असल्यामुळे फळाच्या वरच्या भागावर झालेली जखम भरून येत असल्यामुळे किडीचा प्रादुर्भाव सहसा ओळखता येत नाही. परंतु अळ्या फळाचा आतील भाग खात असल्यामुळे तसेच जिवाणूंचा शिरकाव होत असल्यामुळे फळे सडतात आणि खाली पडतात. उन्हाळ्यात तसेच पावसाळ्यामध्ये या किडीचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणात होतो. या किडीची मादी निमुळत्या जननेंद्रियाच्या साहाय्याने फळाच्या आतमध्ये अंडी स्वतंत्र अगर 5 ते 12च्या समूहात घालते. अंडी दंडगोलाकार असतात. मादी अंडी घालण्यासाठी केलेली जखम आपल्या शरीरातील चिकट पदार्थाने भरून काढते. एक मादी 80 ते 90 अंडी तिच्या 13 ते 54 दिवसांच्या कालावधीत घालते. अंडी 3 ते 9 दिवसांत उबतात. अंड्यांतून निघालेल्या अळ्या फळातील आतील भाग पोखरून भुयार करतात. अळीची वाढ उन्हाळ्यात तीन दिवसांत पूर्ण होते, तर हिवाळ्यात तीन आठवड्यांपर्यंत कालावधी लागतो. पूर्ण वाढ झालेली तसेच पाय नसलेली अळी फळातून बाहेर येते आणि जमिनीवर उडी टाकते आणि जमिनीच्या आत 2 ते 8 सें.मी. खोलीवर कोषावस्थेत जाते. कोष डब्याच्या आकाराचे फिक्कट तपकिरी रंगाचे असून 6 ते 9 दिवसांत पावसाळ्यात तर 3 ते 4 आठवड्यांत हिवाळ्यात त्याचे प्रौढात रूपांतर होते. वर्षाकाठी या किडीच्या अनेक पिढ्या तयार होतात.
 
या किडीच्या व्यवस्थापनेसाठी प्रथम प्रादुर्भावग्रस्त फळे जमा करून त्यांचा अळ्यांसहित नाश करावा. झाडाखालील जमीन उकरून काढावी, जेणेकरून मातीखालील कोष मारले जातील किंवा पक्षी वेचून खातील. बाजारात उपलब्ध असलेले ‘क्युल्युर’चा वापर केलेले गंधसापळे एकरी 5 या प्रमाणात शेतात लावल्यास किडींचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्याचे संशोधनात दिसून आले आहे. तसेच आवश्यकतेनुसार मेलॅथिऑन 50 टक्के प्रवाही 20 मि.ली. 10 पाण्यात मिसळून फवारणी करावी.
 
5)पान खाणारे लाल भुंगेरे : ही कीडदेखील काकडीवर्गीय पिकावरील महत्त्वाची नुकसान करणारी कीड आहे. मोठ्या वेलींपेक्षा ती लहान रोपट्यांचे जास्त नुकसान करते. कारली पीक वगळता ती इतर काकडीवर्गीय पिकावर आक्रमण करते. या किडीचे नारंगी तसेच गर्द निळ्या रंगाचे भुंगेरे असतात. त्यांचा आकार साधारण लांबट पण चौकोनी असतो. शरीराचा मागचा भाग थोडा निमुळता असतो. लांबी 5 ते 8 मि.मी. असते. हिवाळा संपल्यावर जेव्हा वेलीची नवीन लागवड करतात तेव्हा हे भुंगेरे आपल्या सुप्तावस्थेतून जागे होऊन पिकांवर आक्रमण करतात आणि अधाशासारखे पाने कुरतडून खावयास सुरू करतात. त्यामुळे पिकाचे फार नुकसान होते. किडीच्या अळ्या रोपट्याच्या मुळांचेही नुकसान करतात. तसेच जमिनीच्या सान्निध्यात असलेले दांडे, पाने आणि फळे यांचेही नुकसान करतात. अंड्यातून निघालेली अळी पिवळसर पांढरी असते. अळी ताबडतोब मुळ्यांचा अंदाज घेऊन पोखरायला सुरुवात करते. भुंगेरे पानांवर छिद्रे करतात तसेच फळे कुरतडतात. जुन्या वेलींच्याखालील कचर्‍यात किंवा जुन्या वेलींच्या ढिगार्‍यात या किडीच्या अवस्था राहतात. किडीच्या अळ्या कात टाकण्यासाठी प्रत्येक वेळी जमिनीत जातात. जमिनीतील ओलाव्यावर या किडीच्या अंड्याचे भवितव्य अवलंबून असते. विशिष्ट परिस्थितीत अंडी घालण्यात येतात आणि उबतात. फार कोरडे वातावरण अंड्यासाठी उपयोगी नाही. रोपांच्या बुडाजवळ ही कीड जमिनीत अंडी घालते. यासाठी जमिनीचा पृष्ठभाग ओलसर हवा असतो. एक मादी 300 पर्यंत अंडी घालू शकते. अंडी वेगवेगळी किंवा जवळ-जवळ घातली जातात. प्रत्येक अंडे पिवळसर आणि लांबट असते. अंडी 6 ते 15 दिवसांत उबतात. त्यातून निघालेली अळी पिवळसर पांढरी असते. अळी अवस्था 2 ते 3 आठवडे असते. पूर्ण वाढलेली अळी 1.25 सें.मी.पर्यंत खोल जाऊ शकते. तिथे ती स्वत:भोवती मातीचा कोष करून आत शंखी अवस्थेत रूपांतरित होते. ही अवस्था 1 ते 3 आठवडे असते. अळी अवस्था 2 ते 3 आठवडे असते. एका जीवनक्रमाला 4 ते 8 आठवडे लागतात. प्रतिवर्षी 3 ते 5 पिढ्या होतात. या किडीच्या अळ्या जमिनीत राहत असल्यामुळे नियंत्रण कठीण होते. ही कीड सकाळी संथ असते, तेव्हा पसरट भांड्यात रॉकेलमिश्रित पाणी घेऊन त्यात प्रौढ भुंगेरे टाकावेत. परसबागेसाठी हा उत्तम पर्याय आहे. जुन्या वेली जाळून टाकाव्यात, तसेच आवश्यकता भासल्यास डायक्लोराव्हास 76 टक्के प्रवाही, 15 मि.ली. अथवा कार्बारिल 50 टक्के पाण्यात मिसळणारी भुकटी 40 गॅ्रम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
 
6) ब्रिस्टल बीटल (भुंगेरे) : या किडीच्या प्रौढ वेलीवरील फुलांच्या पाकळ्या आणि पुंकेसर खातात. त्यामुळे फळधारणेवर विपरित परिणाम होतो. प्रौढ भुंगेरे 22 ते 26 मि.मी.किंवा त्यापेक्षा जास्त लांबीचे असतात. त्यांच्यासमोरील खांबावर काळ्या रंगाचे पट्टे असतात आणि दोन पट्ट्यांमध्ये पिवळसर रंगाचे पट्टे असतात आणि प्रत्येक दोन पट्ट्यांमध्ये एक पिवळसर नारंगी असते. तीन आडवे पट्टे असतात. या किडीचे वैशिष्ट्य म्हणजे किडीस स्पर्श करताच ती कीड आपल्या शरीरातून विषारी द्रव्य बाहेर टाकते. त्यामुळे मनुष्याच्या अंगावरील कातडीवर फोड तयार होतो. ही कीड जमिनीत अंडी घालते. अंडी 13 ते 15 दिवसांत उबतात. ही कीड शीघ्रपणे इकडून तिकडे फिरणारी असल्यामुळे तिचे व्यवस्थापन करणे कठीण असते. तरीसुद्धा हे भुंगेरे हातमोजे वापरून हाताने जमा करून त्यांचा नाश केल्यास या किडींची संख्या कमी होऊ शकते. याकरिता अगदी सकाळच्या वेळेस हे भुंगेरे अकार्यक्षम असल्यामुळे त्या काळात ते जमा करणे सोयीस्कर होते. या किडीच्या व्यवस्थापनासाठी ट्रायक्लोरफॉन 50 टक्के प्रवाही 10 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
 
7) नागअळी (लिफमायनर) : या किडीच्या अळ्या पानांच्या पापुद्य्रात अंडी घालतात. तिथेच अंड्यापासून अळी तयार होते. अळ्या पानांच्या पापुद्य्रात शिरून मधील हिरवा भाग पोखरून खातात, त्यामुळे पाने पांढरी पडतात. परिणामी, पानांच्या अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेवर अनिष्ट परिणाम होतो. यासाठी प्रादुर्भाव दिसून येताच 4 टक्के निंबोळी अर्काच्या 2 ते 3 फवारण्या कराव्यात. पिकावर या अळीचे प्रमाण वाढल्यास अ‍ॅबामेक्टिन या औषधाच्या 4 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून 1 ते 2 फवारण्या कराव्यात.
 
8) लाल कोळी : कोळी लाल किंवा पिवळसर असतो. पानावर ते सैरावैरा धावत असतात. त्यांची लांबी 1.1 मि.मी. असल्यामुळे ते डोळ्यांना सहज दिसत नाहीत. ही कीड पानाच्या मागच्या बाजूस राहून पेशींतील रसशोषण करतात. त्यामुळे पाने चुरडू लागतात. 
 
प्रादुर्भावग्रस्त पानाच्या कडा खालच्या बाजूस कुजल्या जातात. प्रादुर्भावग्रस्त झाडांची वाढ खुंटते. फुले मोठ्या प्रमाणात गळून पडतात. फळांचा आकार लहान आणि विद्रूप होतो आणि उत्पन्नात घट होते. मादी साधारणत: 40 ते 50 अंडी घालते. त्यातून एक आठवड्यात पिल्ले बाहेर पडतात. मादीप्रमाणे ते झाडाचे शोषण करतात. साधारणत: 2 ते 3 आठवड्यांत त्यांचे रूपांतर प्रौढ कोळ्यात होते.
 
या किडीच्या व्यवस्थापनासाठी प्रथम कोळी कीडग्रस्त पाने वेलीपासून अलग करून नष्ट करावीत, तसेच डायकोफॉल हे कोळीनाशक 20 मि.लि. 10 लि. पाण्यातून फवारावे. 
 
डॉ. बाबासाहेब ए. बडे, डॉ. श्रीमती मंगल बी. कदम, डॉ. विनय एस. सुपे
राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प, गणेशखिंड, पुणे 67.