गुलाब पिकाचे रोग व्यवस्थापन

डिजिटल बळीराजा    14-Sep-2018
 
गुलाब पिकावर शेंडे मर, पानांवरील ठिपके, भुरी व पानावरील काळे ठिपके हे प्रमुख रोग असून गुलाब पिकाचे या रोगांच्या प्रादुर्भावामुळे अतोनात नुकसान होते. रोगांचे नियंत्रण करून नुकसानी टाळण्यासाठी रोगाच्या लागणीचा काळ, हवामानातील घटकांची अनुकूलता, रोगांची लक्षणे आणि रोगनियंत्रणासाठीचे उपाय या गोष्टींची माहिती या लेखात वाचायला मिळेल.
 
फुलांचा राजा गुलाब असून गुलाब फुले बहुतश: सर्व रंगात उपलब्ध होतात. भारतातच नव्हे, तर जगामध्ये लागवडीखालील क्षेत्रामध्ये फुलपिकांत गुलाबाचा पहिला नंबर लागतो. एवढेच नव्हे तर सर्व फुलांमध्ये गुलाब फुलाला लोकांची पसंती अधिक आहे. बाजारपेठेच्या दृष्टीने विचार केल्यास बाजारात दर्जेदार फुलांना अधिक मागणी आणि किंमत मिळते. त्यामुळे दर्जेदार व भरपूर उत्पादनासाठी पीक व्यवस्थापनेस महत्व प्राप्त होते. त्यामध्ये जातीची निवड, लागवडीचे अंतर, मशागत, पाणी व खत व्यवस्थापन, तणनियंत्रण या सर्व बाबींबरोबर रोग व कीड व्यवस्थापनास अनन्य साधारण महत्व आहे. कारण पिकाच्या वाढीच्या कोणत्याही अवस्थेत रोग किडीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे फुलांची प्रत खराब होऊन अंतिम उत्पादनाचे बाजार मुख्य कमी होते. एवढेच नव्हे तर नष्ट सुद्धा होऊ शकते. पिकांवर पडणार्‍या रोगांची तीव्रता ही प्रामुख्याने लागवडीसाठी वापरलेल्या जातीची रोगप्रतिकारक क्षमता, वातावरण व रोगकारक सूक्ष्म जीवजंतूंची तीव्रता यावर अवलंबून असते. म्हणून या घटकांचे नियंत्रण करून रोगांची तीव्रता कमी करून गुणवत्तावर्धक दर्जेदार उत्पादन घेता येते. गुलाब पिकावर शेंडे मर, पानांवरील ठिपके, भुरी व पानावरील काळे ठिपके हे प्रमुख रोग असून गुलाब पिकाचे या रोगांच्या प्रादुर्भावामुळे अतोनात नुकसान होते. रोगांचे नियंत्रण करून नुकसानी टाळण्यासाठी रोगाच्या लागणीचा काळ, हवामानातील घटकांची अनुकूलता, रोगांची लक्षणे आणि रोगनियंत्रणासाठीचे उपाय या गोष्टींची माहिती आवश्यक असते.
 
1.गुलाबावरील शेंडे मर : गुलाबावरील हा प्रमुख व अत्यंत नुकसान करणारा रोग. रोगाचे नावच रोगाची तीव्रता समजण्यास पुरेसे आहे. या रोगामुळे संपूर्ण झाडच शेंड्यापासून खाली मुळापर्यंत मरत जाते. हा रोग डिप्लोडिया रोझॅरम, बोट्रायरस स्पेसीज कोलीटोट्रिकम स्पेसीज या बुरशीमुळे उद्भवतो. पाण्याचा जमिनीतून योग्य निचरा न होणे, खत - पाणी व्यवस्थापनेत चुका, खोड पोखरणारी अळी, कोळी व खवले किडींचा सतत होणारा प्रादुर्भाव या गोष्टीने सुद्धा रोगाच्या वाढीस चालना मिळते. या रोगाची प्रमुख लक्षणे म्हणजे फुले काढल्यानंतर छाटलेल्या अथवा कापलेल्या भागापासून फांद्या खाली जमिनीकडे वाळत जातात. कापलेल्या भागातून रोग पसरवणारी बुरशी प्रवेश करते. सुरुवातीस हा कापलेला भाग पिवळा व नंतर काळा पडू लागतो. रोगाचा प्रसार कापलेल्या भागापासून खाली होत राहतो. या रोगाचे प्रमाण जुन्या व कमकुवत झाडांमध्ये जास्त आढळते. रोगाची तीव्रता जास्त असल्यास संपूर्ण झाड मरते.
 
गुलाबामध्ये हा रोग होऊ नये म्हणून पीक व्यवस्थापनेला महत्व द्यावे. शक्यतो पिकाचे आरोग्य चांगले निरोगी राहण्यासाठी खत व पाणी व्यवस्थापन वेळेवर करावे. रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी बागेमधील रोगट फांद्या व पालापाचोळा जाळून टाकावा. शक्यतो छाटणीसाठी धारदार सिकॉटर्सचा वापर करावा. छाटणी करताना किंवा फुले काढताना फांदीस तिरका कप द्यावा म्हणजे छांटलेल्या भागावर पाणी साठणार नाही. काप सरळ दिल्यास छांटलेल्या भागावर पाणी साठून त्यामध्ये रोगकारक बुरशीची उत्पत्ती होते. फुले काढताना फांदी चेंबू देऊ नये. काढणी करताना निर्जंतुक केलेली कात्री वापरावी, तसेच प्रत्येक झाडावरची फुले काढताना कात्री निर्जंतुक करून घ्यावी. त्यासाठी एका झाडाची छाटणी अथवा काढणी पूर्ण झाल्यानंतर कात्रीचा धारदार भाग स्पिरिटमध्ये बुडवावा. तसेच छाटलेल्या भागावर ताबडतोब 10 टक्के बोर्डो पेस्ट लावावी. रोगट फांदी कापावयाची असल्यास फांदीच्या काळ्या पडलेल्या भागापासून खालील 4-5 सेमी.हिरवी फांदी कापावी. तसेच छाटणीनंतर लगेच कॅप्टन 0.2 % किंवा मॅन्कोझेब 0.2 % अथवा कार्बेनडॅझिम 0.1 % यांपैकी बुरशीनाशकाची फवारणी दर 10 दिवसांच्या अंतराने तीन फवारण्या कराव्यात. 
 
पानावरील काळे ठिपके : गुलाबावर पडणारे काळे ठिपके हा बुरशीजन्य रोग असून तो डीप्लोकारपॉन रोझेसी या बुरशीमुळे होतो. या रोगाचे पावसाळ्यातील दमट हवामानात प्रमाण वाढते. तसेच वातावरणात धुके व जास्त आर्द्रता असल्यास या रोगचा प्रादुर्भाव होतो. या रोगाची लक्षणे पानावर आढळतात. पानावर गडद तपकिरी ते काळसर रंगाचे गोलाकार ठिपके पडतात. हे ठिपके पानाच्या खालील व वरील अशा दोन्ही बाजूस दिसून येतात. या रोगाची सुरुवात झाडाच्या खालील बाजूस असलेल्या जुन्या पानापासून होतो. जुन्या पानापासून हा रोग वरील पानावर पसरतो. पावसाळ्याच्या सुरूवातीस म्हणजे जून-जुलै महिन्यात हा रोग उद्भवतो. पुढे सप्टेंबर-ऑक्टोंबरमध्ये त्याची तीव्रता वाढते. रोगाची तीव्रता वाढल्यास पानावरील गोलाकार काळे ठिपके मोठे होतात. त्यांची संख्या वाढते. परिणामी, हे ठिपके पानाचा सर्व पृष्ठभाग व्यापतात. अशी पाने पिवळी पडून गळून जातात. रोगाची योग्य वेळी दाखल घेतली नाही तर संपूर्ण झाडावरील पाने गळून पडतात. झाड कमकुवत होते. परिणामी, फुलाच्या प्रतीवर त्याचा अनिष्ट परिणाम होतो. जमिनीमधून पाण्याचा योग्य निचरा झाला नाही आणि आर्द्रता वाढली की या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो. म्हणून गुलाब लागवडीसाठी पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडावी, किंबहुना पाणी साठून राहणार नाही याची खबरदारी घ्यावी. रोगाची लक्षणे दिसताच रोगाची लागण झालेली पाने काढून जाळून टाकावीत. खबरदारीचा उपाय म्हणून मॅन्कोझेब 0.2 % किंवा प्रोपीकोबॅझोब 0.1 % ही बुरशीनाशके 0.1% स्टीकर मिसळून 10 दिवसांच्या अंतराने फवारावी. 
 
भुरी : गुलाब पिकाची हानी करणारा भुरी हा रोग असून तो स्पॉरोथीका पॅनोसा या बुरशीमुळे होतो. या रोगाची लागण जेव्हा दिवसाचे तापमान जास्त आणि रात्रीचे कमी असते (म्हणजे दिवसा उष्ण व रात्री थंड तापमान) तेव्हा होते. रोगाच्या बुरशीची वाढ दिवसा 12-4 दरम्यान जलदगतीने होते. हरितगृहात कमी-अधिक प्रमाणात हा रोग वर्षभर आढळतो परंतु ऑक्टोंबर ते फेब्रुवारीदरम्यान या रोगासाठी उष्ण व थंड वातावरण पोषक असल्याने या काळात भुरी रोगाची तीव्रता अधिक असते. हा रोग गुलाब झाडाच्या सर्व अवयवांवर म्हणजे पाने, फांद्या व फुले यांच्यावर या रोगाच्या बुरशीची वाढ होते. कोवळी पाने व कळीच्या देठावर पांढर्‍या रंगाच्या बुरशीची समान वाढ होते. पांढर्‍या पावडरीसारख्या बुरशीची वाढ दिसताच भुरी रोगची लक्षणे लक्षात येतात. रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यास कोवळी पाने व कळ्या करपतात. शक्यतो पानाच्या खालच्या पृष्ठभागावर बुरशी वाढते. ही वाढ हळूहळू सर्व झाडांवर पसरते. भुरीची तीव्रता वाढल्यास कळ्या उमलत नाहीत तसेच त्यांना मोठी इजा होते.
 
 
 
रोगामुळे होणारे नुकसान मोठे असल्यामुळे रोग येऊ नये म्हणून घेतलेले प्रतिबंधात्मक उपाय फायदेशीर ठरतात. प्रामुख्याने फुलांची काढणी केल्यांनतर अथवा छाटणी केल्यानंतर येणार्‍या नवीन फुटीवर व कळ्यांवर हा रोग प्रामुख्याने आढळतो. त्यामुळे फुलांच्या दर्जावर थेटपरिणाम होऊन मोठे नुकसान या रोगामुळे होते. त्यामुळे गुलाबाची छाटणी केल्यानंतर 0.05 % डायपेन्कोनॉझोल किंवा डीनोकॅप 0.05 % या औषधाची 10 दिवसांच्या अंतराने आलटून - पालटून फवारणी करावी.
 
पानावरील ठिपके : पावसाळी हवामानात उद्भवणारा हा रोग प्रामुख्याने अल्टरनेरिया अल्टरनारा, सिप्टोरिया रोझी व कोलिटोट्रिकम स्पेसीज या बुरशीमुळे हा रोग होतो. या रोगाच्या लागणीमुळे पानावर तपकिरी रंगाचे ठिपके पडतात. वेळीच काळाजी घेतली गेली नाही तर रोगाचा प्रादुर्भाव वाढून पाने गळून पडतात. त्यामुळे झाड कमकुवत होते, फुलांची प्रत खराब होते. परिणामी, हा नुकसानकारक ठरतो. या रोगाची लक्षणे दिसून येताच झाडांवर मॅन्कोझेब 0.2 % किंवा कॉपर ऑक्सीक्लोराइड 0.2 % ही औषधे 0.1 % स्टीकरमध्ये मिसळून 10 दिवसांच्या अंतराने आलटून पालटून फवारावी.