डाळिंब कीड व्यवस्थापन

डिजिटल बळीराजा    12-Sep-2018
 
 
डाळिंब या व्यावसारिकदृष्टया महत्वाच्या फळ पिकावर येणाऱ्या प्रमुख किडी, त्यांचा नुकसानीचा प्रकार आणि त्यासाठी उपलब्ध व्यवस्थापन पद्धती जाणून घेणे गरजेचे आहे. या लेखाद्वारे याविषयी सखोल माहिती घेऊया.
 
महाराष्ट्र राज्य फलोत्पादनात भारतात आघाडीवर आहे. हमखास पैसे मिळवून देणारे पीक म्हणून फळपिके ओळखली जातात. महाराष्ट्रातील जमीन, ओलिताच्या सोयी, पर्जन्रमान व बदलते हवामान याचा विचार केला असता फळबाग लागवडीसाठी राज्यात मोठया संधी आहेत. यात महाराष्ट्र राज्याच्या फळबाग लागवड रोजनेचा मोठा वाटा आहे. विविध फळपिकांच्या विचार केला असता डाळिंब हे महाराष्ट्रातील मुख्यतः अवर्षण प्रवण भागातील शेतकर्‍रांना एक वरदानाचा ठरले आहे. डाळिंब हे फळपीक राज्यातील शेतकऱ्यांना सध्या चांगला पैसे मिळवून देत आहे. वास्तविक डाळिंब हे मुख्यतः इराण या देशातील आहे. पयंतु भारतात प्रामुख्याने महाराष्ट्रात याची लागवड अनेक वर्षांपासून होत आहे. 
 
भारतात महाराष्ट्र राज्य डाळिंब लागवडीमध्ये अग्रेसर आहे. याचे मुख्य कारण म्हणजे महात्मा फुले कृषि विद्यापीठाने विकसित केलेल्या उत्तम प्रकारच्या वाणांचा शेतकरी बांधवांनी केलेला अवलंब, महाराष्ट्रातील समशीतोष्ण हवामानामुळे डाळिंब झाडास वर्षातून केंव्हाही फुले येतात. अर्थात त्यामुळे मृग भर (जून-जुलै), हस्त बहार (सप्टेंबर-ऑक्टोबर), आंबे बहार (जानेवारी-फेब्रुवारी) यापैकी व्यापारीदृष्ट्या तसेच बाजारातील विविध फळांची उपलब्धता पाहून कोणताही बहार घेता येतो. निर्यातीसाठी उपलब्ध असलेल्या संधी व सुयोग्य काढणी पश्‍चात तंत्रज्ञानाचा वापर यामुळे डाळिंब पिकाची मागणी मोठया प्रमाणात वाढली आहे व यामुळे डाळिंबाच्या क्षेत्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे.
 
भारतात डाळिंब पिकाखाली 1,12,500 हे. क्षेत्र असून उत्पादन 7,92,000 मे. टन इतके आहे. सन 1990-91 साली राज्य शासनाची रोजगार हमी योजनेशी निगडित फलोत्पादन विकास कार्यक्यम ही योजना सुरु झाली. त्यावेळी डाळिंब फळ पिकांचे क्षेत्र 4,576 हेक्टर इतके होते. आणि याच योजनेचे फलित पाहिले तर आज महाराष्ट्र राज्यात 89930 हेक्टर क्षेत्रावर डाळिंब लागवड झालेली असून त्यातून उत्पादन 509475 मे. टन मिळते. व त्यात उत्तरोत्तर वाढ होत आहे. 
 
महाराष्ट्रात सोलापूर, नाशिक, अहमदनगर, पुणे आणि सांगली या जिल्ह्यातून डाळिंबाची मोठया प्रमाणात लागवड केली जाते. या व्यतिरिक्त धुळे, औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद, लातूर व बीड या जिल्ह्यातही डाळिंब लागवड होत आहे. याशिवाय डाळिंबाची मागणी व मिळणारे बाजारभाव पाहून विदर्भातही डाळिंब पिकाखाली क्षेत्र वाढत आहे. 
 
जसजसे या पिकाखाली क्षेत्रात वाढ होत आहे, तसतसे नवीन प्रश्‍न निर्माण होत आहेत, आणि त्यात प्रमुख म्हणजे डाळिंबावरील उपद्रवी / नुकसानकारक किडीचा वाढत प्रादुर्भाव व नियंत्रणासाठी रासायनिक कीटकनाशकांचा अनियंत्रित वापर. डाळिंबाला असलेली परदेशी बाजारपेठ टिकवून ठेवणे खूप आवश्रक आहे. त्यासाठी निर्यातक्षम फळे कीड अथवा कीटकनाशकांच्या अवशेषापासून मुक्त ठेवणे गरजेचे आहे. यासाठी कीटकनाशंकाचं कमीत कमी वापर करून एकात्मिक पद्धतीने कीड नियंत्रण केले पाहिजे. डाळिंब पिकावर आतापर्यंत 30-35 किडीची नोंद झाली असून त्यापैकी फळ थोड्या किडी जास्त नुकसानकारक असल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रमुख किडींचे एकात्मिक पद्धती वापरून व्यवस्थापन केल्यास होणारे नुकसान टाळता येते व त्याचप्रमाणे कमी खर्चात जास्त फायदा मिळतो. 
 
यासाठी डाळिंबावरील प्रमुख किडा, त्यांचा नुकसानीचा प्रकार आणि त्यासाठी उपलब्ध व्यवस्थापन पद्धती जाणून घेणे गरजेचे आहे. या लेखाद्वारे याविषरी सखोल माहिती देत आहोत. 
 
डाळिंबावरील रस शोषणार्या किडी :
 
1) फुलकिडे किंवा खरडया (थ्रीप्स) : फुलकिडरांच्या दोन प्रजाती डाळिंबावर आढळून येतात. त्या म्हणजे पिवळया रंगाचे फुलकिडे आणि काळया रंगाचे फुलकिडे. दोन्ही प्रकारचे फुलकिडे जास्त प्रमाणात आपल्याकडील डाळिंबावर निदर्शनास येतात. किडीचा आकार लहान असून लांबट निमुळते शरीर असते. या किडीला ‘खरडया’ असेही म्हणतात. या किडीचा प्रादुर्भाव ओळखण्याकरिता झाडावरील उमललेले फुल जर आपण तळहातावर झटकले तर फुलकिड्यांचे असंख्य किडे आपल्या हातावर पडतात आणि ते आपल्याला डोळयाने सहजपणे दिसतात. फुलकिड्यांची पिल्ले आणि प्रौढ किडे पानांवरील, कोवळया फांद्यावरील आणि फळांवरील पृष्ठभाग खरवडून त्यावतून स्त्रावणार्या रसावर / पेशीद्रव्यावर उपजिविका करतात. परिणामतः प्रादुर्भाव झालेली पाने वेडीवाकडी होतात. फळांवर प्रादुर्भाव झाला असेल तर फळांचा पृष्ठभाग खरवडल्यामुळे फळांचा आकर्षकपणा नाहीसा होवून अशा फळांना बाजारात किंमत मिळत नाही.
 
2) मावा : डाळिंबाचा बहार धरल्यानंतर ज्यावेळी नवीन पालवी फुटण्यास सुरूवात होते त्यावेळी कोवळया शेंडयावर तसेच फुलांवर, कोवळया फळांवर मावा किडीचा प्रादुर्भाव दिसू लागतो. प्रादुर्भाव जर जास्त प्रमाणात झाला तर शेंडे चिकट होवून त्यावर तसेच पानांवर काळया बुरशीची वाढ होते. मावा कोवळया फुटीतील, कळयातील रस शोषून घेवून त्यावर उपजिविका करतात. पर्यायाने झाडांची वाढ खुंटते, लहान कळया, फुले, फळे गळून पडतात. पाने वेडेवाकडी होवून चुरडा मुरडा झाल्यासारखी दिसतात. त्यामुळे शेंडयाची वाढ सुध्दा थांबते. थंडीच्या हंगामात डिसेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत या किडीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून येतो. ही किड आकाराने लहान असून प्रजातीनुसार मावा किडीचा रंग हिरवा, पिवळा किंवा तपकिरी काळपट असतो.
 
3) पांढरी माशी : पांढर्या माशीचे वास्तव्य पानांच्या मागील बाजूस असते. पानाच्या मागील बाजूस समुहाने या किडीचे पिल्ले आणि प्रौढ माशा राखाडी-पांढर्या रंगाच्या दिसून येतात. या किडींची पिल्ले पानातील पेशीद्रव्य शोषतात, तर प्रौढ माशी कोवळया पानातील पेशी द्रव्यावर उपजिविका करतात. या किडीची मादीमाशी अतिसुक्ष्म अंडी पानांवर घालतात आणि त्यापुढील संपूर्ण जीवनक्यम झाडांच्या पानांवरच पूर्ण होतो. पानांवर चिकट द्रव स्त्रावणाने त्यावर काळी बुरशीची वाढ होऊन पर्यायाने झाडाची वाढ स्थिरावते.
 
4) पिठया ढेकूण (मिली बग) : पिठया ढेकूण ही कीड ‘मिलिबग’ किंवा ‘पांढरा ढेकण्या’ या नावानेही ओळखली जाते. या किडीच्या निरनिराळया प्रजाती महाराष्ट्रात आढळून येतात. विविध प्रकारच्या पाच प्रजाती डाळिंबावर आढळून येतात. उष्ण आणि कोरडया हवामानात या किडींचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होतो. या किडीच्या शरीराला मऊ कापसासारखे आवरण असल्याने किटकनाशक किडीपर्यंत पोहचण्यास अडथळा येतो. म्हणून या किडीच्या बाल्यावस्थेतच जर किटकनाशकांची फवारणी केली तर या किडीचे नियंत्रण चांगल्या प्रकारे होते. पिल्ले नारंगी रंगाची असतात.
 
हे किटक झाडांवरील फळांवर देठांवर तसेच फळाच्या खालील पाकळीत कापसासारख्या आवरणाखाली पुंजक्याच्या स्वरूपात एका जागेवर राहून पेशीद्रव्ये शोषतात. या किडीच्या शरीरातून चिकट द्रव स्त्रावत असल्याने फळे चिकट होवून त्यावर काळया बुरशीची वाढ होते. फळे लहान असताना जर प्रादुर्भाव झाला तर अशी फळे गळून पडतात. मोठया फळांवर प्रादुर्भाव झाला तर अशी फळे चिकट-काळपट झाल्याने बाजारात विकण्यायोग्य रहात नाहीत. किडीचा प्रादुर्भाव जास्त असल्यास फळांची गळ होते. कळी अवस्थेत सुद्धा या किडीचा प्रादुर्भाव होतो. त्यावेळी कळया गळून पडतात. 
 
5. कोळी ( माईटस्) : डाळिंब फळझाडावर आजतागायत कोळी किंवा माईटस् या नावाने परिचीत असलेली कीड दुय्यम स्वरूपाची होती केव्हांतरी आणि कुठेतरी या किडीचा प्रादुर्भाव थोड्याफार फरकाने निदर्शनास येत असे. मात्र सद्यस्थितीत डाळिंब फहपिकावर कोळी किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर येत असल्याचे दिसून येते. या किडीचा प्रादुर्भाव पानांवर आणि फळांवर होतो. पानांच्या खालील बारकाईने निरीक्षण करणे फारच महत्त्वाचे आहे. 
 
कोळी (माईटस्) ही कीड पानांच्या खालील बाजूस येत असल्याने ती लवकर निदर्शनास न आल्याने पाने वाळून पानगळ होऊ लागते. पानांवर विटकरी रंगाचे चट्टे दिसल्यानंतर रोग समजून बर्याच शेतकरी बांधव त्याकरीता बुरशीनाशकांच्या फवारण्या घेण्यास सुरूवात करतात. कारण ही कीड उघड्या डोळ्यांनी सहजपणे दिसत नाही. पानांचे खालच्या बाजूस भिंगकाचेच्या सहाय्याने निरीक्षण केल्यावर ही कीड दिसते. तापमानात वाढ झाल्यानंतर या किडींचा प्रादुर्भाव वाढतो. 
 
कोळी हे (माईटस्) लाल आणि पिवळ्या रंगाचे असून शरीरावर काळ्या रंगाचे ठिपके असतात. लाल आणि पिवळ्या रंगाच्या दोन प्रजाती डाळिंबावर निदर्शनास येतात. ही कीट पानांच्या खालील बाजूवर शिरेजवळ किंवा कडेला असंख्य अंडी घालते. अंड्यातून पिल्ले बाहेर पडण्याच्या वेळी लाल रंगाची दिसतात. अंड्याचा रंग पांढरा शुभ्र आहे. या किडीची पिल्ले आणि प्रौढ किडे पानांच्या खालच्या भागावर राहून पानांतील रस शोषून घेतात. परिणामी पानांच्या वरील बाजूचा रंग विटकरी रंगासारखा दिसू लागतो. कालांतराने पूर्ण पाने विटकरी रंगाचे होऊन वाळू लागतात आणि नंतर गळून पडतात. कोळी (माईटस्) कीडीचा प्रादुर्भाव फळांवर सुद्धा मोठ्या प्रमाणावर फळांच्या सर्व अवस्थांमध्ये होतो. फळांच्या सालीवरील भागावर रस शोषल्यामुळे फळांचा आकर्षकपना कमी होतो आणि त्यामुळे फळांची प्रत कमी होते. 
 
6) खवले किड : या किडीचा प्रादुर्भाव क्वचितच आढळून येतो. या किडींसुध्दा झाडाच्या पानांतील कोवळया भागातील रस शोषतात. खवले किड काळसर रंगाची व तपकिरी रंगाची लंबगोलाकार-फुगीर स्वरूपातील ही किड झाडांवर विशेषतः शेंडयावर, फांद्यांवर, खोडावर आणि काही वेळा फळांवर स्थीर होऊन पेशीद्रव्य शोषतात. प्रादुर्भाव जास्त असल्यास झाडांवर चिकटपणा येवून काळया बुरशीची वाढ होते.
 
रस शोषणार्या किडीचे व्यवस्थापन :
1.बागेत स्वच्छता ठेवणे, तणांचा बंदोबस्त करावा.
2.झाडांच्या छाटणीचे नियोजन अशा पध्दतीने करावे की जेणेकरून झाडांवर फांद्याची गर्दी होणार नाही तसेच फवारणी करतेवेळी किटकनाशक किंवा बुरशीनाशकाचे द्रावण झाडाचे संपूर्ण भागात पोहोचण्यास मदत होईल.
3.किटकांचा प्रादुर्भाव अगदीच नगण्य असेल तर लगेच किटकनाशक फवारणीचा अवलंब न करता कीडग्रस्त भाग काढून नाश करावा.
4.मावा, फुलकिडे, पांढरी माशी, पिठया ढेकूण, खवले कीड, कोळी यावर उपजिवीका करणार्या परोपजीवी किडींचा खाली दिलेल्या कोष्टकानुसार अवलंब करावा.
 
 
अ.न. परोपजीवी किटकाचे नांव ज्या किडीवर उपजिविका करतात त्या किडीचे नाव बागेत सोडण्याचे प्रमाण
1क्यारसोपा कारनीरा मावा, तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी, पिठया ढेकूण, खवले किड, कोळी मोठया झाडावर 5 ते 10 अळया / झाड
2स्किमनस कॉक्सीव्होया मावा, पिठया ढेकूण प्रति एकर कमीत कमी 600 भुंगेरे
3क्रिप्टोलेमस मॉन्ट्रो झेरी मावा, पिठया ढेकूण प्रति एकर कमीत कमी 600 भुंगेरे किंवा 3-4 अळया / झाड
5.पांढर्या माशीच्या नियंत्रणाकरीता बागेत पिवळया रंगाचे कार्डशिटस् त्यावर चिकट पदार्थ किंवा एयंडेल तेल लावून अंतराअंतरावर झाडांना अडकवावेत.
6.पिठया ढेकणाच्या नियंत्रणाकरीता झाडाच्या खोडाजवळ जमिनीत किटकनाशकाची भुकटी मिसळावी. जेणेकरून झाडांच्या वरील भागावर चढणारे क्रॉवलर्स चे नियंत्रण होईल.
7.पिठया किडीच्या नियंत्रणाकरीता किटकनाशकाच्या द्रावणात ‘फिश ऑईल रोझीन’ सोप प्रति लिटर 2.5 ग्रॅम या प्रमाणात मिसळून फवारणी करावी.
8.पिठया ढेकूण, पांढरी माशी, कोळी या किडींच्या नियंत्रणाकरीता व्हर्टिसिलीरम लेकॅनी 2 ग्रॅम / लिटर या प्रमाणात परोपजीवी बुरशीची फवारणी करावी.
9.परोपजीवी कीटक बागेत सोडले तर किटकनाशकांची फवारणी करू नये.
10.किटकनाशकाच्या द्रावणात नेहमी स्टिकरचा वापर करावा
11.किटकनाशकाची फवारणी शक्यतो आवश्रकता असेल, तेव्हांच करावी. त्याकरीता खालील नमुद केलेल्या किटकनाशकांची 10 ते 15 दिवसांच्या अंतराने फवारणी करावी.
अ.न. किटकनाशक किटकनाशकाचे प्रमाण 10 लिटर पाण्याकरीता
1 डारमेथोएट 30% 15 मि.ली.
2 इमिडाक्लोप्रीड 17.8% 3 मि.ली.
3 मॅलॅथिऑन 50 % 20 मि.ली.
4 डारक्लोरव्हॉस 75 % 20 मि.ली.
5. क्लोरपाररीफॉस 20% 15 मि.ली.
6. पाण्यात मिसळणारे गंधक 20 ग्रॅम
12. कोळी किडीचा प्रादुर्भाव दिसून येताच खालीलप्रमाणे कोणत्याही एक कीटकनाशकाची आलटून-पालटून 10 दिवसांच्या अंतराने फवारणी करावी.
 
फवारणी करते वेळी फवारा पानांच्या खालच्या बाजूवर पडेल अशा प्रकारे फवारणी करावी. 
1. डारमेथोऐट 30% प्रवाही 3 मि.ली./लि.
2. डारकोफॉल 2 मि.ली./लि.
3. पाण्यात मिसळणारे गंधक 2 ग्रॅम/लि.
4. व्हर्टिसिलीरम लेकॅनी 2.5 ग्रॅम/लि.
या व्यतिरीक्त बाजारात मॅजीस्टर, व्हीटिमेक, कर्नल-एस, पेगॅसुस, कॅसकेड, ओमाईट या नावांनी विविध कोळीनाशके उपलब्ध आहेत. 
 
फळांवरील किडी :
1) फळ पोखरणारी अळी (सुरसा) : डाळिंबावरील सर्वात महत्वाची ही किड महाराष्ट्रामध्ये सर्वत्र आणि सतत कमी अधिक प्रमाणात आढळून येते विशेषतः पावसाळरात (मृग बहारात) ही किड जास्त प्रमाणात असते. या किडीच्या अळया फळे पोखरून आतील भाग खातात व त्यांची विष्ठा फळाच्या पृष्ठभागावर आलेली दिसते. फळामध्ये इतर बुरशी व जीवाणुंचा शिरकाव होवून फळे कुजतात. या किडीचा प्रादुर्भाव फुले लागण्याच्या वेळेस सुरू होतो. म्हणून या किडीचे व्यवस्थापनाच्या दुष्टीने फुलोर्याच्या अवस्थेपासून सुरूवात केली असता नियंत्रण चांगले होते.
 
नियंत्रणाकरीता उपाय :
1.शक्यतो एकच बहार घेणे चांगले, इतर अवेळी येणारी फुले / फळे तोडून नष्ट करावीत.
2.मृग बहार घेणे शक्यतो टाळावे.
3.फुले लागण्यास सुरूवात झाल्यानंतर किटकनाशकाची फवारणी 15 दिवसांच्या अंतराने करावी, त्या करिता कार्बारील 50% विद्राव्य 40 ग्रॅम किंवा डेल्टामेथ्रिन, 10 मि.ली. किंवा सारपरमेथ्रीन 10 मि.ली. प्रत 10 लिटर पाण्यात स्टिकरसह मिसळून फवारणी करावी. अंडीनाशक गुणधर्म असलेल्या किटकनाशकाचा वापर करावा
4.निंबोळी अर्क 5% फवारणी करावी.
 
2.डाळिंबावरील रस शोषणारा पतंग : हे निशाचर पतंग असून दिसारला आकर्षक असतात. त्यांच्या मोठया आकारावरून आणि रंगावरून ते सहजपणे ओळखू येतात. या किडीचा जीवनक्यम डाळिंब पीकावर होत नाही जंगली वनस्पतींवर ओढयाच्या, नाल्याच्या, नदीच्या किनार्यावर होत असतो आणि हे पतंग रात्रीच्या वेळी फळांवर हल्ला करतात. म्हणून त्यांचे नियंत्रण करणे तितकेच कठीण असते. सर्वसाधारणपणे रात्री 8 ते 11 च्या दरम्यान या पतंगाचे प्रमाण जासत प्रमाणावर दिसून येते. पतंग बागेत आल्यानंतर योग्य म्हणजे पक्व फळ शोधून त्यावर बसून ते फळांना आपल्या सोंडेने सुक्ष्म छिद्र पाडून त्यात सोंड खुपसून आतील रस शोषून त्यावर उपजिवीका करतात. छिद्र पाडलेल्या जागेवर गोलाकार चट्टा तयार होतो आणि त्या जागी फळ सडण्यास सुरूवात होते. अशी प्रादुर्भावाची फळे गळून पडतात. फळांची प्रत कमी झाल्याने अशी फळे विक्रीयोग्य राहत नाहीत, मोठया प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्यास 50 ते 60 टक्क्रांपर्यंत नुकसान झाल्याचे निदर्शनास आलेले आहे.
 
या पतंगाचा प्रादुर्भाव तुलनात्मक दृष्टया आंबे बहार आणि मृग बहारात जास्त प्रमाणात दिसून येतो. ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीत प्रादुर्भाव जास्त प्रमाणात असतो. कारण पावसाळी हवामानात या किडीचे पतंग बाहेर पडतात.
 
नियंत्रणासाठी उपाय :
1.बागेच्या सभोवती बांधावरील किंवा नदीनाल्या किनार्यावरील अळीला पुरक असणार्या जंगली वनस्पतींचा नारनाट करावा. उदा. गुळवेल, वासनवेल.
2.बागेसभोवती 0.1% डी.डी.व्ही.पी. या किटकनाशकाची फवारणी दर 3-4 दिवसांनी प्रादुर्भावित काळात करावी.
3.बागेभोवती फ्लड लाईट / फ्लॅश लाईट लावावेत
4.फळांच्या हंगामाचे नियोजन करावे.
5.पतंगाना बागेपासून परावृत्त करणेकरिता सिट्रोनेला ऑईलचा वापर करावा.
6.फळांना पेपरबॅग / कापडी पिशव्या बांधाव्यात मात्र पिठया ढेकणांचा प्रादुर्भाव ज्या भागात होत असेल तेथे या पध्दतीचा अवलंब करू नये.
7.बागेत विषारी आमिषाचा वापर करावा. त्या करिता मॅलॅथिऑन 50% 20 मि.ली. किंवा 0.2% झिंक फॉस्फॉइड किंवा अ‍ॅसिफेट किंवा मिथोमिल + गुळ 100 ग्रॅम + व्हिनेगर 6 ग्रॅम + 100 ते 150 मि.ली. फळांचा रस + 1 लिटर पाणी एकत्र मिश्रण करून 100 ते 200 मि.ली. / बाऊलमध्ये टाकून हे बाऊल्स प्रती 8 ते 10 झाडांच्या अंतरावर झाडांना बाहेरील बाजूस टांगून ठेवावेत. या विषारी आमिषात आकर्षित झालेले पतंग गोळा करून त्यांचा नाश करावा.
8.बागेतील कीडग्रस्त/गळलेल्या फळांचा गोळा करून नाश करावा.
9.रात्रीच्या वेळी 8 ते 11 या दरम्यान बागेत टेंभा घेवून फळांवर बसलेल्या पतंगांना पकडून गोळा करावेत आणि रॉकेल मिश्रीत पाण्यात टाकून नाश करावा. या पध्दतीने पतंग गोळा करून मारणे हे जास्त उपरुक्त असल्याचे दिसून आलेले आहे.
 
खोड व फांदरांवरील किडी :
1.झाडांची साल खाणारी अळी (इंडरबेला) आणि खोडकिडा (स्टेम बोरर)
विशेष करून जुन्रा तसेच दुर्लक्षित बागेत या किडींचे प्रमाण जास्त असते. साल खाणारी अळी ही खोड व फांद्याची साल खरडून खाते व फांद्यांच्या बेचक्यात छिद्र पाडून त्यात राहते. अळीची विष्ठा तसेच चघळलेला लाकडाचा भुसा जाळीच्या स्वरूपात प्रादुर्भाव झालेल्या भागावर लटकलेला दिसून येतो. अळी काळपट रंगाची असून पूर्ण वाढलेली अळी 4 सें.मी. लांब असते. खोड किडरांची अळी मात्र पांढरी, जाड व तिचा डोक्याकडील भाग रूंद असतो. ती खोड व फांद्यांचा आतील भाग पोखरून खाते. या किडीची तिव्यता जास्त असल्यास प्रथम फांद्या वाळतात व नंतर संपूर्ण झाड वाळते. खोडकिडीमुळे संपूर्ण झाड सुद्धा मरते.
 
नियंत्रणाकरीता उपाय :
1.बागेत स्वच्छता राखावी, झाडांची दाटी होणार नाही याची काळजी घ्यावी.
2.खोडावर किंवा फांद्यांवर जाळी दिसून आल्यास किंवा भुसा दिसल्यास साफ करावे आणि छिद्रांत तारेच्या सहाय्याने अळीचा नाश करावा.
3.प्रादुर्भाव झालेल्या झाडावरील छिद्रांमध्ये डारक्लोरव्हॉस 75% 10 मिलि /लि. किंवा फेलव्हलरेट 5 मिलि/लि. या प्रमाणे किंवा रॉकेल किंवा पेट्रोल 5 मि.ली. छिद्रात इंजेक्शनच्या सहाय्याने सोडून छिद्रे सिलबंद करावीत.
4.कार्बारिल 50 टक्के विद्राव्य 40 ग्रॅम किंवा डारक्लोरव्हास 75% 25 मि.ली. प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून प्रादुर्भाव झालेल्या झाडांवर फवारावे.
5.खोडावरील साल खाणार्या अळीच्या व्यवस्थापनाकरिता (जैविक पद्धतीने) बिव्हेरिया बॅसिआना या परोपजीवी बुरशीची 10 ग्रॅम / लि. या प्रमाणे फवारणी करावी.
 
2. खोडाला लहान छिद्रे पाडणारे भुंगेरे (शॉट होल बोरर) : शेतकरी बांधव या किडीला ‘पिन होल बोरर’ म्हणून संबोधतात. ज्या बागेत झाडांची जास्त दाटी झालेली असेल आणि बागेत तसेच अवती भोवती सतत ओलावा व हवेत दमटपणा असतो. अशा बागेत या किडींचा प्रादुर्भाव होण्याची फार शक्यता असते. या किडींचे भुंगेरे काळपट रंगाचे असून आकाराने अत्रंत लहान म्हणजे 2 ते 3 मि.मि. लांबीचे असतात. या किडींच्या अंडी, अळी, कोष व भुंगेया या सर्व अवस्था खोडातच आढळून येतात. भुंगेरे खोडाला सुक्ष्म छिद्रे पाडून आतील भाग पोखरतात. अळी सुध्दा आतील भाग पोखरते. प्रादुर्भाव केलेल्या, जागी ‘अ‍ॅम्ब्रोशिया’ बुरशीची वाढ होते व त्या बुरशीवर हे भुंगेरे उपजिवीका करतात म्हणून रांना ‘अ‍ॅम्ब्रोशिया बीटलस्’ असेही नाव आहे. पोखरलेले झाड पिवळे पडून वाळण्यास सुरूवात होते. या किडींचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात असेल तर वरील लहान फांद्यांवर सुध्दा दिसून येतो. प्रादुर्भाव झालेल्या जागी लहान छिद्रांमध्ाून भुसा बाहेर आलेला दिसतो. ही किड जमिनीलगतच्या मुळांवर, खोडावर तसेच फांद्यांवर दिसून येते.
 
नियंत्रणाकरीता उपाय :
1.बाग स्वच्छ ठेवावी, झाडांची दाटी होणार नाही याची काळजी घ्यावी.
2.बागेसभोवती अथवा जवळपास शक्यतो एयंडी लागवड करू नये.
या किडीच्या नियंत्रणाकरीता फवारणी, ड्रेंचिग आणि पेस्टिंग इ. बाबी करणे अत्रंत गरजेचे आहे. वर्षातून दोन वेळेस तरी याचा अवलंब करावा.
 
फवारणी :
3.लिंडेन 20% प्रवाही 25 मि.ली. किंवा क्लोरपाररीफॉस 20%, प्रवाही 25 मि.ली. किंवा कार्बारिल 50%, विद्राव्य 20 ग्रॅम किंवा क्विनॉलफॉस 25% प्रवाही, 20 मि.ली. यापैकी एका किटकनाशकाची प्रति, 10 लिटर पाण्यात मिसळून खोडावर फांद्यांवर फवारणी करावी.
 
ड्रेंचिंग (खोडाजवळ द्रावण ओतणे) :
4.खोडाजवळ क्लोरपाररीफॉस 20% प्रवाही, 5 मि.ली. + डारक्लोरव्हॉस 75% प्रवाही, 2.0 मि.ली. प्रति लिटर किंवा लिंडेन 20% प्रवाही 5 मि.ली. प्रती लिटर पाण्यात मिसळून 5 ते 10 लिटर द्रावण प्रति झाड ओतावे, जेणे करून मुळांवरील किडींचे नियंत्रण होईल.
 
पेस्टिंग (खोडाला मुलामा लावणे) :
5.साधारणपणे वर्षातून दोन वेळा जून-जुलै महिन्रात आणि त्यानंतर बहाराचे वेळी खोडाला पेस्ट (मुलामा) लावणे.
 
पेस्ट तयार करण्याकरिता : चार किलो गेरू 10 लिटर पाण्यात रात्रभर भिजत घालून दुसर्या दिवशी त्यात लिंडेन 20% प्रवाही 25 मि.ली. किंवा क्लोरपाररीफॉस 20% प्रवाही 50 मि.ली. अधिक 25 ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराईड एकत्र मिसळून तयार झालेली पेस्ट खोडावर 3 ते 4 फुटापर्यंत ब्रशच्या सहाय्याने लावावी.
 
6.खोडांवरील छिद्रांमध्ये इंजेक्शनच्या सहाय्याने द्रावण सोडणे : कमी प्रमाणात प्रादुर्भाव असेल तेव्हा छिद्रांमध्ये डारक्लोरव्हॉस 75% प्रवाही 10 मि.ली. प्रति लिटर पाण्यात मिसळून इंजेक्शनच्या सहाय्याने छिद्रात सोडावे आणि छिद्रे चिखलाने सीलबंद करावीत.
 
मुळांवर गाठी करणारी सुत्रकृमी (रूट नॉट निमॅटोड) :
ही सुत्रकृमी अतिसुक्ष्म असून मादी चंबुच्या आकाराची असते व ती डाळिंबाच्या लहान मुळांच्या आंतरभागात राहून मुळांतील अन्नरस शोषून घेते. त्यामुळे मुळांवर गाठी निर्माण होतात आणि मुळांच्या पाणी आणि अन्न शोषणाच्या क्रियेवर परिणाम होतो. झाडांची वाढ खुंटते व पाने पिवळी पडतात. शिवार सुत्रकृमीने इजा केल्यामुळे अन्र बुरशीजन्र रोगांचा प्रादुर्भाव वाढण्यास मदत होते व परिणामी झाडे वाळतात.
 
नियंत्रणाकरीता उपाय :
1.दाणेदार फोरेट 10% (40 किलो/हेक्टरी) किंवा दाणेदार कार्बोफ्रुरॉन 3% (135 किलो/ हेक्टरी) झाडाच्या खोडा भोवती जमिनीत खोलवर मिसळावे.
2.निंबोळी पेंड प्रति झाड 2 ते 3 किलो या प्रमाणे खोडाभोवती जमिनीत खोलवर मिसळावी.
3.झाडाच्या खोडाजवळ सर्व बाजुंनी लहान झेंडूची लागवड करावी
4.शेणखताबरोबर ट्रारकोडर्मा प्लस जमिनीतून दरावे.
 
डॉ. संतोष कुलकर्णी, कृषी कीटकशास्त्र विभाग, मफुकृवि, राहुरी.