एकात्मिक कीडनियंत्रणाचे घटक

डिजिटल बळीराजा    24-Aug-2018
 
गांडूळ, सापाला जसे शेतकर्‍यांचे मित्र म्हणतात त्याप्रमाणे कामगंध सापळा, चिकट सापळा, प्रकाश सापळा आणि तसेच ट्रायकोडर्मा, व्हर्टिरायझीयम आणि अ‍ॅसिटोफॅगस हे परोपजीवी कीटक शेतकर्‍यांना किडींचा बंदोबस्त करण्यासाठी मदत करतात, याबद्दल सविस्तर माहिती या लेखात वाचायला मिळेल.
 
एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये वातावरणाशी समन्वय साधून किडींची संख्या आर्थिक नुकसान पातळीखाली ठेवली जाते. या व्यवस्थापन तंत्रामध्ये तांत्रिक, भौतिक, रासायनिक, जैविक, आनुवंशिक, पर्यावरण पद्धतींचा वापर केला जातो. 
 
गेल्या काही वर्षांत कीटकनाशकांच्या अनियंत्रित वापरामुळे कीटकनाशकांचे अंश फळे, भाजीपाला, अन्नधान्यांमध्ये दिसू लागले आहेत. त्याचा परिणाम मानवी आणि जनावरांच्या आरोग्यावर होऊ लागला आहे. दुसर्‍या बाजूला किडींची प्रतिकारशक्तीही वाढली आहे. मित्रकीटक, परागीभवन करणार्‍या कीटकांची संख्या कमी होत आहे. दुय्यम किडी मुख्य किडी बनल्या आहेत. शेतमाल निर्यातीतही अडचणी आल्या आहेत. हे लक्षात घेऊन प्रत्येकाने एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करायला पाहिजे. 
 
किडींची ओळख : 
- हानिकारक आणि उपयुक्त (मित्र) कीटकांची ओळख महत्त्वाची. 
- पीकनिहाय किडींच्या जीवनक्रमाची माहिती. 
- किडीच्या संवेदनक्षम अवस्थांची माहिती. 
 
किडींचे सर्वेक्षण : अलीकडील काळात उद्भवलेल्या कीड रोगाच्या उद्रेकामुळे कपाशीचे अतोनात नुकसान होते. या उद्रेकाचे कारण शोधल्यास असे दिसते, की किडींचा प्रादुर्भाव शेतकर्‍यांच्या वेळीच लक्षात आला तर कीडनियंत्रणसुद्धा वेळीच करता येऊ शकते. पीक संरक्षणामध्ये किडींच्या आर्थिक नुकसानीच्या पातळीला फार महत्त्व आहे. किडींच्या प्रादुर्भावाची आर्थिक मर्यादा पातळी ठरविण्यासाठी सर्वेक्षण करावे. 
 
उदा. 
- कपाशीवरील मावा : 10 मावा / पान 
- तुडतुडे : 2 पिल्ले / पान 
- फुलकिडे : 10 / पान 
- पांढरी माशी : 5 प्रौढ / पान 
 
टीप : किडींचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान मर्यादा पातळीपेक्षा जास्त होताच कीड व्यवस्थापनाचे उपाय योजावेत. 
 
कामगंध, चिकट सापळ्यांचा वापर : 
- घाटे अळी (हेलिकार्व्हा आर्मिजेरा) आणि पाने खाणारी अळी (स्पोडोप्टेरा लिट्युरा) या किडीच्या नर पतंगाला आकर्षित करणासाठी कामगंध सापळ्याचा वापर करावा. 
 
- पांढरी माशी, मावा या किडींचे सर्वेक्षण आणि नियंत्रणासाठी पिवळ्या रंगाच्या चिकट सापळ्यांचा वापर करावा. 
-फुलकिड्यांच्या नियंत्रणासाठी निळ्या रंगाच्या चिकट सापळ्यांचा वापर करावा. 
 
सापळा पिकांचा वापर : 
- किडींना आकर्षित करून घेणार्‍या पिकांची लागवड मुख्य पिकात करावी. उदा. कपाशीमध्ये मूग, चवळी, मका, झेंडू यांसारखी पिके घेतल्यास नैसर्गिकरीत्या मित्रकीटकांचे प्रमाण वाढण्यास मदत होते व मुख्य किडींचा प्रादुर्भाव कमी करणे शक्य होते. 
 
प्रकाश सापळा : 
- ज्या किडी खोड पोखरतात, अंधारात जास्त राहतात त्या प्रकाशाकडे आकर्षित होतात. त्यांना प्रकाश सापळा वापरल्यास त्यांचे नियंत्रण करणे शक्य होते. उदा. खोडकीड, बोंड अळीचे पतंग, हुमणीचे प्रौढ. 
 
पेरणीची योग्य वेळ : 
- पेरणी करताना योग्य वेळ साधल्यास पीक किडींच्या प्रादुर्भावापासून वाचविणे शक्य असते. 
- उदा. ज्वारीची पेरणी जूनच्या शेवटचा आठवडा ते जुलैच्या पहिल्या आठवड्यात केल्यास खोडमाशीचा प्रादुर्भाव कमी होतो. 
 
उपयुक्त बुरशींचा वापर :
सूत्रकृमीच्या नियंत्रणासाठी जमिनीमध्ये ट्रायकोडर्मा, पॅसिलोमायसिस यांचा वापर. 
 
शिफारशीनुसारच रासायनिक खतांचा वापर : 
पिकास नत्रयुक्त रासायनिक खतांचा वापर शिफारशीप्रमाणेच करावा. 
शिफारशीपेक्षा जास्त प्रमाणात नत्रयुक्त खतांचा वापर केल्यास रसशोषण करणार्‍या किडींचा प्रादुर्भाव वाढतो. 
 
मशागतीय पद्धतीचा वापर : 
पीक उत्पादन घेत असताना विविध मशागतींच्या पद्धतीचा योग्य प्रकारे आणि योग्य वेळी वापर केल्यास किडींचे प्रभावी नियंत्रण होते. 
-पेरणी करताना शुद्ध, दर्जेदार बियाणे वापरावे. 
- कीडप्रतिकारक जातींची निवड करावी. 
- चांगले कुजलेले शेणखत वापरावे. कारण अर्धवट कुजलेल्या शेणखतामुळे हुमणीचा प्रादुर्भाव वाढू शकतो. 
 
पिकांची फेरपालट : 
-एकाच प्रकारातील किंवा कुळातील पिकांची लागवड करू नये. कारण किडीस सतत अन्नपुरवठा होतो. किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. 
- उदा. कपास पिकाचा फेरपालट ज्वारी, बाजरी, मका यासारख्या पिकांसोबत केल्यास कपाशीवर पांढर्‍या माशीचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते. 

विभागवार पेरणी पद्धत : 
विशिष्ट क्षेत्रात एकाच वेळी म्हणजे कमीत कमी कालावधीत पेरणी केल्यास किडीच्या कमीत कमी जीवनसाखळ्या तयार होतात. यालाच ‘झोनल सिस्टिम ऑफ प्लान्टिंग’ असे म्हणतात. 
 
बीजप्रक्रिया : 
-पीकनिहाय शिफारशीनुसार कीडनाशकाची बीजप्रक्रिया केल्यास कीड, रोगांपासून संरक्षण होते. 
 
जैविक नियंत्रण :
-एकात्मिक कीड नियंत्रणामध्ये जैविक नियंत्रण अतिशय महत्त्वाचे आहे. 
-यामध्ये परोपजीवी कीटक, भक्षक कीटक, सूक्ष्म जिवाणू, विषाणू आणि बुरशीचा वापर केला जातो. 
- उदा. उसावरील खोडकिडीच्या नियंत्रणासाठी ट्रायकोग्रामा चिलोनिस या परोपजीवी कीटकाचा वापर महत्त्वाचा आहे. हेक्टरी सहा ट्रायकोकार्डचा वापर केल्यास उसावरील खोडकिडीचे नियंत्रण होते. 
- करडईवरील माव्याच्या नियंत्रणासाठी मेटॅरायझियम अ‍ॅनिसोप्ली पाच ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. 
- रसशोषणार्‍या किडींच्या नियंत्रणासाठी व्हर्टिरायझियम अ‍ॅनिसोप्ली पाच ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. 
- उसावरील लोकरी माव्याच्या नियंत्रणासाठी परभक्षी कीटक डिफा अ‍ॅफिडिव्होरा मायक्रोमस इगरोटस यांचा वापर करावा. 
- पपईवरील पिठ्या ढेकणाच्या नियंत्रणासाठी अ‍ॅसिटोफॅगस पपया या परोपजीवी कीटकाचे प्रसारण करावे. 
- घाटे अळी विषाणू (एचएनपीव्ही) व स्पोडोप्टेरा विषाणू (एसएलएनपीव्ही) यांचा उपयोग घाटे अळी व सोयाबीनवरील पाने खाणार्‍या अळीच्या प्रभावी नियंत्रणासाठी करावा. 
 
पाण्याची मात्र : 
-संशोधनातून असे दिसून आले आहे, की अधिक पाण्यामुळे काही किडींचा प्रादुर्भाव वाढतो, तसेच अति कमी पाण्यामुळेदेखील काही किडींचा उपद्रव दिसतो. 
- हे टाळण्यासाठी पिकांना गरजेपुरते आणि पिकांच्या संवेदनशील अवस्थेमध्ये पाणी देणे गरजेचे आहे. 
 
रासायनिक कीडनाशकांचा वापर : जगभरातील ग्राहकांची गरज लक्षात घेता अन्न पिकवण्यासाठी आदर्श शेतीपद्धतीचा वापर ही काळाची गरज झाली आहे. बदलते हवामान, पीकपद्धतीनुसार किडीच्या प्रादुर्भाव बदलत आहे. अशा वेळी कीडनाशकांचा वापर काटेकोर, समंजसपणे करायला हवा. तेव्हाच आपल्या लोकांसाठी आरोग्यदायी अन्न पिकवणे आपल्याला शक्य होईल. 
- ज्या वेळी इतर कीडनियंत्रणाचे उपाय उपयुक्त ठरत नाहीत. किडींचा प्रादुर्भाव नियंत्रणाच्या पुढे जातो. अशा वेळी शिफारशीनुसार रासायनिक कीडनाशकांचा उपयोग करावा. 
 
- कीडनाशकांचा वापर विशिष्ट दिवसानंतर न करता गरजेप्रमाणे किडींचा प्रकार, किडीची अवस्था व त्यांची संख्या (ईटीएल) यांचा आधार घेऊन करावा. 
 
- कीडनाशकांचा वापर करीत असताना नवीन प्रकारातील आणि कमी मात्रा लागत असलेल्या कीडनाशकांचा शिफारशीनुसार वापर करावा. 
 
- ज्या कीटकनाशकांच्या उत्पादनावर लाल त्रिकोण आहे अशांचा वापर कमी ठेवावा. निळ्या किंवा हिरव्या रंगाचे त्रिकोण असलेल्या कीडनाशकांवर अधिक भर द्यावा.

डॉ. साताप्पा खरबडे (प्राध्यापक), डॉ. नजीर तांबोळी (वरिष्ठ संशोधन सहायक कृषी कीटकशास्त्र विभाग) कृषी महाविद्यालय, पुणे.