एकात्मिक कीड व्यवस्थापनासाठी कामगंध सापळा : एक प्रभावी साधन

डिजिटल बळीराजा    01-Aug-2018
 
 
वातावरणामध्ये कीटकांना जीवन जगण्यासाठी अनेक प्रतिकूल परिस्थितींशी झगडावे लागते. म्हणूनच कीटकांमध्ये मृत्यूचे प्रमाणदेखील जास्त आहे, आणि कदाचित याच कारणामुळे निसर्गाने कीटकांना प्रजनन क्षमता जास्त दिली असून त्यांचे जीवन शाश्‍वत केले आहे. निसर्गामध्ये काही कीटक हे शेतकर्‍यांचे मित्र तर काही कीटक शत्रू (कीडसुध्दा) आहेत. शत्रुकीटकांच्या (किडींच्या) व्यवस्थापनासाठी पर्यावरणाचा समतोल राखून या किडींची संख्या आर्थिक नुकसान पातळीच्या खाली ठेवणे आणि उपलब्ध साधनांचा वापर करून कमी खर्चात कीडनियंत्रण करणे म्हणजे एकत्मिक कीड व्यवस्थापन होय.
 
कीटक आपल्या स्वजातीयांशी संबंध किंवा संपर्क आणि सुसंवाद साधण्यासाठी स्वतःच्या शरीरातून एक विशिष्ट प्रकारचा रासायनिक गंध सोडत असतात. यालाच कामगंध किंवा प्रलोभन (फेरोमोन) असे म्हणतात. हे रासायनिक गंध कीटकांमध्ये विशिष्ट प्रतिक्रिया निर्माण करून संदेशवहनाचे काम करत असतात. या गंधामुळे स्वजातीय कीटकांवर होणारे परिणाम व प्रतिक्रिया यावरून त्यांचे विविध प्रकार पडतात. त्यामध्ये ऐक्य, मार्गदर्शन, विखुरणे, लिंगविषयक प्रतिक्रिया, अंडी घालणे किंवा भीती इत्यादी प्रकार आहेत. लिंगविषयक कामगंध सापळे हा प्रकार जास्त प्रभावी असल्याचे अभ्यासाअंती दिसून आले आहे. वेगवेगळ्या किडींचा (कीटकांचा) कामगंध हा वेगवेगळा असतो. लिंगविषयक कामगंधामुळे कीटक एकमेकांकडे आकर्षित होतात व समागमासाठी योग्य उमेदवार मिळवू शकतात. काही कीटकांमध्ये मादी कीटक नराला तरी काहींमध्ये नर कीटक मादीला आकर्षित करण्यासाठी त्याच्या शरीरातून विशिष्ट कामगंध सोडतात. कीटकांच्या या सवयींचा किंवा वागणुकीचा अभ्यास करून कृत्रिम कामगंध (फेरोमोन/प्रलोभन) तयार करून त्यांचा उपयोग एकात्मिक की, व्यवस्थापनात मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. 
 
अशा प्रकारचे लैंगिक कृत्रिम रासायनिक कामगंध शास्त्रज्ञांनी शोधून काढले आहेत. आजपर्यंत शास्त्रज्ञांनी जवळपास 100 पेक्षा जास्त कीटकांचे लिंग कामगंध शोधून काढले आहेत, परंतु त्यापैकी केवळ 20 कामगंध कृत्रिमरीत्या तयार करण्यात यश आले आहे. लैंगिक कामगंधाचे हळूहळू बाष्पीभवन होऊन ते हवेत पसरतात. संबंधित नरामध्ये किंवा मादीमध्ये संदेशवहनाचे कार्य सुरू होऊन नर/मादी समागमासाठी उत्तेजित होतात आणि लैंगिक प्रलोभनाकडे आकर्षिले जातात आणि सापळ्यात अडकून मारले जातात. 
 
कीड व्यवस्थापनासाठी प्रभावी साधन : पीकनिहाय क्षेत्रामध्ये कीडनियंत्रणाची कोणती कार्यवाही कधी सुरू करावी हे कळण्यासाठी कामगंध सापळ्यांचा वापर केला जातो. कामगंध सापळ्यांचा वापर कीड सर्वेक्षणासाठी आणि पीक संरक्षणासाठी केला जातो. सर्वेक्षणासाठी एक हेक्टर क्षेत्राकरिता फक्त पाच सापळे लागतात. पीक संरक्षणाचे उपाय करण्यासाठी सापळ्यात कमीत कमी किती पतंग सापडायला पाहिजे याची संख्या ठरलेली असते. यालाच पीकनिहायसंबंधित किडीची आर्थिक नुकसानीची पातळी (ईटीएल) असे म्हणतात. या पातळीनुसार कीड व्यवस्थापनाची उपाययोजना केली जाते. 
 
जेव्हा किडींचे प्रमाण अत्यल्प असते, अशा वेळी पतंग पकडण्यासाठी कामगंध सापळ्यांचा चांगला उपयोग होऊ शकतो. यासाठी जास्त प्रमाणात कामगंध सापळे बसवल्यास मोठ्या प्रमाणात पतंग पकडले जाऊन परिणामी पुढील प्रजनन कमी करण्यास मदत होते. यामुळे कीटकांच्या मीलनास अडथळा आणणारे लिंग प्रलोभन रासायनाचे कण वातावरणात सोडल्यामुळे मीलनासाठी किडींना आपला जोडीदार शोधणे कठीण जाते. जोडीदाराचा संदेश व वातावरणातील कृत्रिम रसायनांच्या संदेशामधील फरक कळेनासा होऊन त्यांचा गोंधळ उडतो. त्यामुळे त्यांचे मीलन होत नाही आणि पुढील पिढी जन्माला येत नाही. अशा प्रकारे किडींच्या संख्येत लक्षणीय घट होते. 
 
विविध कामगंध सापळे : किडींची आर्थिक नुकसानीची पातळी ठरविण्यासाठी तसेच सर्वेक्षण आणि नियंत्रण करण्यासाठी ही प्रलोभने शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणात वापरणे गरजेचे आहे. शेतकर्‍यांनी या कामगंध सापळ्यांच्या उपलब्धतेसाठी आणि माहितीसाठी कृषी विकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी किंवा कृषी विद्यापीठे यांच्याशी संपर्क साधावा. 
 
कीडनिहाय कामगंध प्रलोभने :
किडीचे नाव फेरोमोन / ल्युर कीडग्रस्त पिके 
हेलिकॉवर्पा 
आर्मिजेरा 
अमेरिकन बोंडअळी/ घाटेअळी हेलिल्युर 
कापूस, कडधान्य, सूर्यफूल सोयाबीन, वांगी 
पेक्टिनोफोरा
गोसिपायल्ला 
शेंदरी बोंडअळी पेक्टिनोल्युर 
गोस्सिपल्युर 
कापूस 
इरियास व्हायटेला 
इरियास इन्सुलाना 
ठिपक्याची बोंडअळी इरविटल्युर 
इरविनल्युर 
कापूस, भेंडी
स्पोडोप्टेरा लीटयुरा (पाने खाणारी अळी) स्पोडोल्युर 
कापूस, सोयाबीन, मिरची, तंबाखू 
सिर्फोफ्यागा
इन्सेरटुलस
(भात खोडकिडा) सिर्फोफ्यागाल्युर 
भात 
प्लुटेल्ला 
झायलोस्टेला पेक्टिनोफोराल्युर कोबी, फुलकोबी 
ड्याकस डोर्स्यालिस (फळमाशी) मिथिल युजेनॉल फळपिके 
 
कामगंध सापळे वापरताना घ्यावयाची काळजी :
१. कीटकनिहाय सापळ्याची निवड करावी. सापळ्यात अडकलेले पतंग 2-3 दिवसांनी काढून नष्ट करावेत.
२. सर्वेक्षणासाठी प्रत्येक जातीच्या कीटकासाठी हेक्टरी 5 सापळे वापरावेत, परंतु किडीचे पतंग मोठ्या प्रमाणात पकडण्यासाठी हेक्टरी 15 ते 20 सापळे वापरावेत.
३. सापळ्यामधील लिंग प्रलोभने 15 ते 20 दिवसांनी बदलावित.
४. सापळा हा साधारणपणे पिकाच्या उंचीनुसार जमिनीपासून 2 ते 3 फुटांवर राहील याची काळजी घ्यावी.
५. सापळा वार्‍याच्या दिशेला समांतर असावा, ज्यामुळे लिंग प्रलोभन रसायनाचे सूक्ष्म कण शेतात पसरून जास्तीत जास्त पतंग सापळ्याकडे आकर्षिले जातील. 
 
डॉ. प्रमोद नागोराव मगर, सहायक प्राध्यापक, कृषी कीटकशास्त्र विभाग,
रंगनाथ महाराज कृषी महाविद्यालय, नाव्हा, ता. जि. जालना