सोयाबीन पि‍कातील तण नियंत्रण

डिजिटल बळीराजा    25-Jul-2018
 
 
मागील अंकामध्ये आपण जून-जुलै महिन्यात सोयाबीन पिकासाठी आवश्यक पूर्व मशागत, पेरणी, खते, वाणांची निवड इ. महत्त्वाच्या बाबींची माहिती घेतली. परंतू, या घटकांबरोबरच सोयाबीनचे चांगले उत्पादन घेण्यासाठी पि‍काव्यतिरिक्त उगवणार्‍या तणांचे शास्त्रोक्त पद्धतीने नियंत्रण करणे आवश्यक असते. या भागामध्ये आपण सोयाबीन पि‍कामधील तण व्यवस्थापनाची माहिती घेणार आहोत. 
 
तण व्यवस्थापन : सोयाबीन पीक खरीप हंगामामध्ये घेतले जाणारे पावसाळी पीक आहे, त्यामुळे शेतामध्ये पीक उभे असताना सोयाबीनच्या झाडांसोबतच आवश्यक नसणारे इतर पिके (मागील हंगामातील) व तणांची मोठ्या प्रमाणावर उगवण होते व झपाट्याने वाढ होते. सोयाबीनची उगवण झाल्यापासून पिकाची कापणी होईपर्यंत तण पिकाला अपायकारक असते. पिकामध्ये वाढणारे तण सोयाबीनशी पोषण अन्नद्रव्ये, पाणी, वाढीसाठी आवश्यक जागा, सूर्य प्रकाश इत्यादींसाठी स्पर्धा करते, त्याचा परिणाम कमी उत्पादन येण्यात होतो. तणांमुळे सोयाबीन पिकामध्ये किडी व रोगांचे प्रमाण वाढून त्यांचे नियंत्रण व मशागतीच्या कामांमध्ये अडथळा निर्माण होऊन तण नियंत्रणासाठी करावयाच्या उपाययोजनांमुळे उत्पादन खर्च वाढतो. काढणीच्या वेळी वाढलेल्या तणांमुळे अडथळा निर्माण होतो तसेच त्यांचे बी पिकाच्या बियांसोबत मिसळले जाते त्यामुळे सोयाबीनच्या बियाण्याची गुणवत्ता कमी होते. सोयाबीन पिकामध्ये येणार्‍या तणांचे योग्य वेळी नियंत्रण न केल्यास उत्पादनात सरासरी ३० ते ४० टक्के पर्यंत घट येऊ शकते. त्यामुळे सोयाबीनची पेरणी करून यशस्वी उगवण झाल्यानंतर सुरुवातीच्या २०-४५ दिवसांच्या कालावधीमध्ये तणांचे योग्य नियंत्रण फार महत्वाचे असते. सोयाबीन पिकामध्ये- हरळी, लव्हाळा, चिकटा, चिमणचारा, केणा आणि पिवळी तिळवण इ. एकदल वर्गीय तर गाजरगवत, हजारदाणी, एकदांडी, रेशीमकाटा, तांदुळजा, पाथरी, दुधी इ. द्विदल वर्गीय तणे आढळतात.
 
सोयाबीन मधील तण नियंत्रणासाठी खालील उपाय योजनांचा अवलंब केल्यास फायदेशीर ठरते: 
 
१) मनुष्य बळ वापरून खुरपणी किंवा कोळपणी करणे: सोयाबीन पीक रोप आवस्थेमध्ये असताना त्याची वाढ सावकाश होत असते या वेळी तणांचा प्रादुर्भाव झाल्यास रोपांची वाढ खुंटते व पीक अपेक्षेप्रमाणे निरोगी व सुदृढ येत नाही. पीक फुलोर्‍यापर्यंत तणविरहित ठेवणे उत्पादनाच्या दृष्टीने महत्त्वाचे असते. त्यासाठी पहिली खुरपणी पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांनी आणि दुसरी खुरपणी पेरणीनंतर ४० ते ४५ दिवसांनी करावी किंवा पिकातील तण उपटून त्याचे पिकामध्येच आच्छादन करावे. किंवा खुरपणीसाठी मजूरांची कमतरता असल्यास तणांचा प्रादुर्भाव पाहून ४० ते ४५ दिवसांपर्यंत कुळवाच्या दोन पाळ्या बैल किंवा सायकल कोळप्याच्या सहाय्याने घालाव्यात.
 
२) रासायनिक तणनाशक वापरून: पडणार्‍या पावसामुळे किंवा मजुरांअभावी खुरपणी किंवा कोळपणी करणे शक्य होत नाही. अशा परिस्थितीत तण नाशके वापरुन वेळीच तणांचा बंदोबस्त करता येतो. पेरणीपूर्वी, तण उगवण्यापूर्वी व उगवल्यानंतर वापरायची तण नाशके वेगवेगळी असतात. त्यामुळे तण नाशक वापराचे नियोजन पेरणी पूर्वी करणे गरजेचे असते. खाली दिल्याप्रमाणे सोयाबीनमधील तण नियंत्रणासाठी एका तण नाशकाचा वापर करावा. 
 
अ) पेरणीपूर्वी तण नाशक वापरुन:
 
अ.नं. तण नाशकाचे सामान्य नाव व्यापारी नाव मात्रा व्यापारी घटक (प्रती हे.) फवारणी
 
१. फ्लुक्लोरॅलिन ४५ ईसी बासालीन २.०० ली. दिलेली मात्रा ७०० ते ८०० ली./हे पाण्यामध्ये मिसळून जमिनीवर फवारावी व कुळवाची एक पाळी देऊन जमिनीत चांगली मिसळावी व नंतर पेरणी करावी.
आ) बी उगवण्यापूर्वी तण नाशक वापरुन:
 
अ.नं. तण नाशकाचे सामान्य नाव व्यापारी नाव मात्रा व्यापारी घटक (प्रती हे.) फवारणी
१. पेंडिमेथिलीन ३० ईसी स्टॉम्प ३.३ ली. यांपैकी एका तण नाशकाची दिलेली मात्रा ७०० ते ८०० ली./हे पाण्यामध्ये मिसळून पेरणीनंतर ताबडतोब परंतू ४८ तासांच्या आत जमिनीवर फवारावी.
२. डिक्लोसुलाम ८४% ड्ब्लुडीजी स्ट्रॉंगार्म ३२ ग्रॅम 
इ) बी उगवल्यानंतर तण नाशक वापरून:
अ.नं. तण नाशकाचे सामान्य नाव व्यापारी नाव मात्रा व्यापारी घटक (प्रती हे.) फवारणी
 
१. इमॅझेथ्यापिर १० टक्के एसएल परस्यूट १ ली. यांपैकी एका तण नाशकाची दिलेली मात्रा ५०० ते ७०० ली./हे पाण्यामध्ये मिसळून पेरणीनंतर १५ ते २० दिवसांनी तणांना २-४ पाने असताना तणांवर फवारावी. 
 
२. क्विझ्यालोफॉप इथिल ५ टक्के इसी टर्गा सुपर १ ली. 
३) एकात्मिक तण व्यवस्थापन: सोयाबीन पिकातील एकात्मिक तण व्यवस्थापन करण्यासाठी बी उगवण्यापूर्वी वापरवायचे कोणतेही एक तण नाशक फवारावे आणि ३० ते ३५ दिवसांनी खुरपणी किंवा कोळपणी करावी. 
 
शिफारस केल्याप्रमाणे दोन ओळींतील अंतर ४५ सें.मी. व दोन झाडांमधील अंतर ५-७ सें.मी राहील अशी पेरणी केल्यास हेक्टरी ४ ते ४.५ लाख एवढी झाडांची संख्या राखली जाते. त्यामुळे जर पीक उगवण्यापूर्वी किंवा पिकाच्या सुरुवातीच्या कालावधीस तण नाशक वापरले तर तण उगवून येत नाही. ३०-३५ दिवसांनी एक कोळपणी केल्यानंतर पिकातील सर्व रिकामी जागा सोयाबीनच्या झाडांनी व्यापली जाते. त्यामुळे नंतर पीकाच्या कालावधीत तणांचा उपद्रव आपोआप कमी होतो. अशा प्रकारे सोयाबीन पिकातील तण नियंत्रण केल्यास उत्पादन वाढण्यास मदत होते.
 
सं. आ. जायभाय (कृषि विद्यावेत्ता) व फिलिप्स वर्गीस (सोयाबीन पैदासकार)
आघारकर संशोधन संस्था, पुणे