शेततळ्यात आधुनिक तंत्राव्दारे मत्स्यसंवर्धन

डिजिटल बळीराजा    25-Jul-2018
 
शेती सारखीच तलावाची मशागत करून मत्स्योत्पादन वाढविणे म्हणजे मत्स्यशेती योग मत्स्यबीजाची निवड करून वर्षभर पुरेसे पाणी आणि आवश्यकतेनुसार खत खाद्य पुरवठा हि मत्स्यशेतीतील कामे आहेत. तलावातील पाण्यात काही प्रमाणात मासळीचे अन्न निसर्गतः उपलब्ध असते. यावर उपजीविका करून मर्यादित प्रमाणात मासळीची वाढ होते मात्र ठराविक जातीच्या मासळीचे कमीत कमी जागेत, खते खाद्याचा वापर करून जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी सुनियोजत पद्धतीने सधन मत्स्यशेतीचे तंत्र अवलंबिणे फायदेशीर ठरते.
 
साधारणपणे मत्स्यशेती सरासरी २० हेकटर जलक्षेत्रापेक्षा कमी असणाऱ्या लहान सिंचन, पाझर, गाव तलावात, शेत तळ्यात करणे इष्ट राहते. याशिवाय पाणथळ जागा, चिबड व त्यासारख्या जमिनीत मुद्दामहून मस्त्यतळे बांधूनही मत्स्यशेती करता येतो. राज्य व स्थानिक क्षेत्रातील तलाव प्राधान्याने स्थानिक मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांना ठेक्यावर मिळतात. जेवढी तलावाची आराजी जास्त तेवढा प्रति हेक्टरी मस्त्योत्पादनाचा दर कमी येतो. त्यामुळे मोठया तलावासाठी प्रति हेक्टरी खर्चास मर्यादा ठेवावी लागते. 
 
पाणी भरपूर पण शेतीसाठी निरुपयोगी झालेल्या खोलगट, पडीक पाणथळ जागेत, चिबड जमिनीत खोदलेले तळे मत्स्यशेतीसाठी वापरता येते. वर्षभर सुमारे २ मीटर पाण्याची पातळी राहू शकेल एवढ्या प्रमाणात पाणी पुरवठयाची व्यवस्था असावी. जागेची उपयुक्तता, पाण्याची उपलब्धता, जमिनीची रचना, मातीचा प्रकार, पाणी टिकविण्याची क्षमता, पुरापासून धोका, आवागमनाची सोय, खोदकामाचे स्वरूप इत्यादी बाबतची तपासणी करून मत्स्यतळे खोदावे. सर्वसाधारण परिस्थितीत सरासरी ४० x ४० x ५ मीटर आराजीच्या मुद्दामहून बांधलेले तळे यासाठी उत्पन्न व आधुनिक तंत्राची माहिती देत आहेत.
 
आपल्याला मत्स्यशेती मध्ये भारतीय प्रमुख कार्प माशासोबतच गवत्या, चंदेऱ्या व परदेशी सायप्रिनस माशाबाबत माहिती आहे. आजपर्यंत व्यावसायिकदृष्टया या माशांची शेती आपण केली व करीत आहोत. मत्स्यशेतीमध्ये योग्य मासोळीची निवड करणे ही अतिशय महत्वाची बाब आहे. आपल्याकडे उपलब्ध पाण्याचा साठा, कालावधी, आकारमान व जमिनीची प्रत या सर्व बाबींचा विचार करूनच आपण मस्त्यशेती करिता माशांची निवड करतो. भारतात माशांच्या २००० पेक्षा अधिक जाती आढळतात. त्यामध्ये सागरी आणि गोडया पाण्यातील माशांचा समावेश आहे. गोडया पाण्यात भारतीय कार्प मासोळीच्या जातीसोबत इतर प्रजातींचे संवर्धन करणे काळाची गरज आहे. त्याकरिता गोडया पाण्यात जलद वाढणारी एक विशिष्ट जात म्हणजे पॅंगॅसियास सुची (पंगस) व परदेशी जात म्हणजे सायप्रिनस (कॉमन कार्प) संवर्धनाबाबत माहिती देत आहे. आपल्या देशात पश्चिम बंगाल व आंध्र प्रदेश या राज्यात पंगस मासोळीचे संवर्धन मोठया प्रमाणात सुरु असून याचा फायदा मत्स्य उत्पादकांना होत आहे. पंगस मासोळीचे वैशिष्टय म्हणजे मासोळी कापल्यानंतर तिचे मांस लालसर रंगाचे असते. पंगस मासोळीत काट्याचे प्रमाण कमी असल्यामुळे ग्राहकांना ही मासोळी आवडते. मात्र कटला, रोहूच्या तुलनेत पंगस कमी चवदार असते परंतु आहारात प्रथिने म्हणून याच्या मूल्यात कोणतीही कमतरता नाही. पंगस मासा वरच्या थरात राहणारा असून सायप्रिनस मासा खालच्या थरात राहणारा असल्यामुळे तलावातील खाद्याचा पुरेपूर वापर या माशांव्दारे केला जातो. सायप्रिनस माशाचे प्रमुख वैशिष्टय म्हणजे माशाच्या खवल्यांवर विविध रंग दिसतात. या माशांचे शरीर रुंद असते. टिंडा आखूड असून वरच्या व खालच्या जबड्यावर प्रत्येकी दोन आखूड व मांसल मिश्या असतात. हा मासा ६ ते ८ महिन्यांच्या कालावधीमध्ये प्रजननक्षम होऊन वर्षातून दोन वेळेस प्रजनन करतो. एका वर्षात या माशाची वाढ एक ते दीड किलोपर्यंत होते. 
 
शेततळ्यात मत्स्यशेती करावयाचे ठरविल्यास पावसाळ्यापूर्वी तळ्यात ३० किलो कळीचा चुना पसरावा. तलावात ताजे पाणी भरून घ्यावे. ३०० किलो शेणखत व ५ किलो सुपर फास्फेट मिसळून तलावभर पाण्यात पसरावे. ही व्यवस्था मत्स्यबीज सोडण्यापूर्वी एक आठवडा आधी करावी. पावसाळ्याच्या सुरुवातीला निकटच्या शासकीय मत्स्यबीज केंद्रावरून किंवा कृषिविज्ञान केंद्र, करडावरून पंगस व सायप्रिनस जातीचे मत्स्य बोटुकले खरेदीवरून तलावात सोडावेत. नमूद केलेल्या मात्रेत प्रत्येक महिन्यात रासायनिक व सेंद्रिय खतांची मात्र सहा महिन्यांपर्यंत वापरून त्यापुढील कालावधीत आवश्यकतेनुसार खताचे प्रमाण कमी केले तरी चालेल .
 
पाण्याचा रंग पारदर्शकता, बाहेरून घेण्यात येणाऱ्या पाण्याचे प्रमाण, तयार होणारे प्लवंग, सूक्ष्म प्राणी, वनस्पती, किडव मासळीची वाढ यांच्यानुसार खताचा वापर कमी - अधिक करावा लागतो. 
 
पंगस जातीच्या मासळीच्या अधिक वाढीसाठी खतासोबत मोठया प्रमाणात खाद्याचा ही वापर करणे आवश्यक आहे. या माशांकरिता विशिष्ट प्रकारचे तरंगणारे खाद्य आंध्र प्रदेश मध्ये विविध मस्त्य खाद्य निर्मिती मिलव्दारे तयार केले जाते. तसेच कृषिविज्ञान केंद्रामध्ये पॅलेटेड मस्त्य खाद्य निर्मिती मिलव्दारे उपलब्ध झालेले आहे या खाद्याचा वापर मासळीची खाद्य म्हणून करता येतो. नमूद केलेल्या प्रमाणात खाद्याचा वापर करावा. योग्य प्रमाणात खते खाद्य व पाण्याची पातळी राखता आली तर साधारणतः ८ ते १० महिन्यांत मासळीची वाढ एक किलोपर्यंत होते. 
(कृपया तक्ता पाहावा.)
 
बाब परिणाम दर / रु किंमत रु 
१) मत्स्यबोटुकली 
पंगसियास 
रु. ५०००/- संख्या :३००० हजार १५०००/-
सायप्रिनस 
संख्या : २००० रु २५००/- हजार ५०००/-
२) चुना कळीचा 
किलो : ३० १०/- किलो ३००/-
३) ताजे शेण 
किलो : २००० २/- किलो ४०००
४) सुपरफास्फेट 
किलो : ५० ४४० / बॅग ४४०/-
५) मस्त्य खाद्य 
किलो : ४०० ३०/ किलो १२००००/-
६) इतर खर्च 
- - ५२६०/-
एकूण 
१५००००/-
(२) उत्पन्न :
एकूण मासळीचे उत्पन्न : ५००० किलो
मासळीविक्रीपासून उत्पन्न (मासेमारांची मजुरी वगळून ) रु. ६० /- किलो प्रति किलोप्रमाणे ३०००००/- 
वजा खर्च रु. १५००००/- 
निव्वळ उत्पन्न रु. १५००००/-
निवड केलेल्या मासळीच्या जाती, तलावाची उत्पादकता मासेमारीची पद्धत, संवर्धनावर केलेला खर्च, व्यवस्थापन तंत्र यानुसार तलावाची मत्स्योत्पादन क्षमता कमी अधिक होऊ शकते. सदरहू माहिती सर्वसाधारण परिस्थितीत मत्स्यशेती करण्यासाठी प्राथमिक स्वरूपाची असून विशिष्ट तलाव व प्रकल्पाच्या बाबतीत आपल्या जिल्ह्यातील कृषिविज्ञान केंद्र / मत्स्यसंवर्धक विकास यंत्रणा / जिल्ह्यातील मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. 
 
डॉ. आर . एल .काळे 
विशेष विशेषज्ञ (मत्स्यशास्त्र ) 
कृ. वि . के. करडा
मो. ७३५०२०५७४६

श्री एस. के. देशमुख 
कार्यक्रम समन्वयक 
कृ. वि . के. करडा
मो. ९४२२९३८७६४