गांडूळ शेती समृद्धीची एक वाट

डिजिटल बळीराजा    17-Jul-2018
 
 
गांडूळ खत आणि त्याची जमिनीमधील उपस्थितीची उपयुक्तता हे निर्वावादपणे सर्वसामान्य गोष्ट आहे. गांडूळ खत तरार करणेसाठी फार कमी खर्च रेतो. पण त्यापासून मिळणारे खताचे मूल्य - अमूल्य असते.
 
 
गांडूळ जीवनक्रम : गांडुळाच्या जीवनामध्ये अंडी, बाल्यावस्था आणि पूर्णावस्था अशा तीन अवस्था असतात. या सर्व अवस्था साठी ओलसर जमीन आवश्यक असते. गांडूळांचा जीवनक्रम प्रामुख्याने त्याच्या जातीवर अवलंबून असतो. पूर्ण वाढ झालेल्या गांडूळामध्ये स्त्री आणि पुरुष जनन असे दोन्हीही अवयव असतात. गांडूळ प्रत्येक सहा ते सात दिवसांनी अंडी टाकते.या अंड्यामध्य दोन ते वीस गर्भ असतात. अंडी अवस्था हवामानाचे अनुकूलते नुसार 7 ते 20 दिवसाची असते. गांडुळांची अपूर्ण अवस्था दोन ते तीन महिन्याची असते. त्यानंतर तो जेंव्हा पूर्णावस्थेत येतो तेंव्हा तोंडाकडील 2 ते 3 सेमी अंतरावरील अर्धा सेमी आकाराचा भाग जाड होतो. हे वयात आलेल्या गांडूळाचे लक्षण होय. सर्वसाधारणपणे गांडूळाचे आयुष्य दोन तेे तीन वर्षाचे असते. इसिनीया फेटिडा या जातीच्या पूर्ण वाढ झालेल्या गांडूळाची लांबी 12 ते 15 सेमी असते. एका किलोमध्ये सर्वसाधारण पूर्ण वाढ झालेली एक हजार गांडूळे बसतात,.अशी एक हजार गांडूळे घेऊन त्यांची अनुकूल वातावरणात वाढ केल्यास एका वर्षात त्यांची संख्या आठ लक्ष त्र्याऐंशी हजार होते. पिले व प्रौढ गांडूळे एका किलो मध्ये दोन हजार बसतात, शंभर किलो प्रौढ गांडूळे महिन्याला एक टन गांढूळ खत तयार करतात.
 
गांडूळ संवर्धन आणि गांडूळ खत निर्मिती :
 
1) जागेची निवड आणि बांधणी : गांडूळ पैदास करण्याच्या जागेची निवड करताना जमीन पाण्याचा निचरा होणारी असावी. तसेच खड्ड्याच्या जवळपास मोठी झाडे असू नयेत, कारण या झाडाची मुळे गांडूळ खतातील पोषक घटक शोषून घेतात. गांडूळखत तयार करण्यासाठी सावलीची आवश्यकता असल्याने त्यासाठी खालील आकृतीमध्ये दाखविल्याप्रमाणे छप्पर तयार करून घ्यावे. ते तयार करताना रुंदी साडेपाच मीटर मधीलउ ंची 3 मीटर आणि लांबी गरजेनुसार उपलब्ध होणारे शेणखत व छप्परासाठी लागणारे साहित्य यानुसार 5 ते 25 मीटर पर्यंत असावी. छप्परामध्ये 1 मीटररुंद व 20 सेमी खोलीचे दोन समांतर चर खोदावेत. 
 
2) गांडूळ खाद्य : चराच्या तळाशी 8 ते 9 सेमी उंचीचा किंवा जाडीचा थर काडीकचरा, पालापाचोळा, वाळलेले गवत, उसाचे पाचट यांनी भरावा. त्यावर पाणी मारावे. या थरावर 8 ते 9 सेंमी जाडीचा दुसरा थर कुजलेले शेणखत, लेंडीखत, सेंद्रीयखत यांचा द्यावा. त्यावर ओले होईपर्यंत पाणी शिंपडावे. त्यानंतर या थरावर गांडूळे सोडावीत. यावर 5 ते 6 सेमी जाडीचा थर कुजलेले सेंद्रिय खत, शेणखत याचा थर द्यावा. या थरावर 20 ते 30 सेंमी उंचीपर्यंत शेणखत, लेंडीखत, सेंद्रीयखत टाकावे. यावर ओले होईपर्यंत पाणी शिंपडावे. हा गादीवाफा गोणफाटाने झाकावा. दररोज या गादी वाफ्यावर पाणी शिंपडावे म्हणजे गादीवाफ्यात ओलसरपणा टिकून राहील आणि गांडूळाची चांगली वाढ होऊन गांडूख खत तयार होईल. 
 
या पध्द्तीने 15 ते 20 दिवसात गांडूळखत तयार होते. शेणखता मध्ये गांडूळाची वाढ उत्तम होते. त्यांची संख्या जोमाने वाढून गांडूळखत उत्तम प्रतीचे तयार होते. त्याचप्रमाणे लेंडीखत घोड्याची लिद यापासून सुद्धा गांडूळखत तयार होते. गांडुळासाठी लागणारे खाद्य कमीत कमी अर्धवट कुजलेलेअसावे. शेणखत आणि सेंद्रीयखत यांचे मिश्रण अर्धे अर्धे वापरून गांडूळखत करता येते. गांडूळामध्ये शेतातील ओला पालापाचोळा, भाजीपाल्याचे अवशेष, अर्धवट कुजलेली पिकाची अवशेष साखर कारखान्यातील प्रेसमड याचा वापर होऊ शकतो. मात्र हे खाद्य गांडुळासाठी वापरताना काही प्रमाणात (एक तृतीयांश) शेणखत मिसळणे आवश्यक आहे. गांडूळखत नेहमी बारीक करून टाकावे. बायोगॅस प्लॅन्टमधून निघालेली स्लरी सूध्दा गांडूळखत म्हणून उपयोगात आणता येते. खड्ड्यामध्ये गांडूळे टाकण्याअगोदर गांडूळ खांद्यावर चार-पाच दिवस पाणी मारावे म्हणजे त्यातील गरमपणा नष्ट होईल. 
 
सूक्ष्म जिवाणूसंवर्धक (बॅक्टरीअलकल्चर) वापरून खत कुजविण्याचा प्रक्रियेस वापरावे. वरील संवर्धक प्राध्यापक वनस्पती रोगशास्त्र विभाग, कृषी महाविद्यालय, पुणे-5 यांच्याकडे उपलब्ध होऊ शकेल. या व्यतिरिक्त गांडूळ खाद्यात एक किलो युरिया व एक किलो सुपर फस्फेट प्रति टन या प्रमाणात मिसळले असता कुजण्याची क्रिया लवकर होऊन गांडूळखत लवकर तयार होईल.
 
3) गांडूळखत वेगळं करणे : गांडूळखत आणि गांडूळे वेगळे करताना उन्हामध्ये ताडपत्री अथवा गोणपाट अंथरून त्यावर या गांडूळखताचे ढिग करावेत. म्हणजे उन्हामुळे गांडूखे ढिगाच्या तळाशी जातील व गांडूळे आणि गांडूळखत वेगळे करता येईल. शक्यतो खत वेगळे करताना टिकाव, खुरपे यांचा वापर करू नये म्हणजे गांडूळांना इजा पोहचणार नाही. या व्यतिरिक्त दुसर्‍या पद्धतीप्रमाणे गादीवाफ्यावर तयार झालेला गांडूख खताचा थर हलक्या हाताने वेगळा करून घ्यावा व वाफ्यावर पुन्हा नवीन खाद्य टाकावे. या गांडूख खतामध्ये गांडुळांची अंडी, त्यांची विष्ठा आणि कुजलेले खत यांचे मिश्रणअसते. असे गांडुळांचे खत शेतामध्ये वापरता येते. निरनिराळ्या पिकासाठी हे खत हेक्टरी पाच टन प्रति वर्ष या प्रमाणात टाकावे.
 
गांडूळ खताचे फायदे :
 
1. जमिनीचा पोत सुधारतो. 
2. मातीच्या कणांच्या रचनेत योग्य असा बदल घडविला जातो. 
3. गांडूळाच्या बिळांमुळे झाडाच्या मुळांना इजा न होता उत्तम मशागत केली जाते. 
4. जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. 
5. जमिनीची धूप कमी होते. 
6. बाष्पीभवनाचे प्रमाण कमी होते. 
7. जमिनीचा सामू (पी.एच) योग्य पातळीत राखला जातो. 
8. गांडूख खालच्याथरातील माती वर आणतात व तिलाउत्तम प्रतीची बनवतात. 
9. गांडूळखतामध्ये ह्यूमसचे प्रमाण भरपूर असल्यामुळे नत्र,स्फुरद,पालाश व इतर सूक्ष्मद्रव्य झाडांना भरपूर व लगेच उपलब्ध होतात. 
10. जमिनीतील उपयुक्त जिवाणूंचा संख्येत भरमसाठ वाढ होते. 
 
गांडूळ खत वापरण्याची पध्द्त व एकरी मात्रा :
 
1. जमिनीतील सेंद्रिय पदार्थाच्या प्रमाणावर गांडूळखताची मात्रा अवलंबून असते. 
2. जमिनीत सेंद्रिय कर्बाचे प्रमाण 0. टक्केच्या वर असेल तर 2 टन गांडूळखत प्रति एकर प्रती वर्षी ही मात्रा योग्य आहे. पण सेंद्रिय कर्बाचे प्रमाण जर खुप कमी असेल तर इतर कंपोस्ट शेणखत किंवा हिरवळीचे खत पेंडी ह्यांची जोड देऊन गांडूळखत वापरावे.
 
प्रा. सुदर्शन गुंड
सहाय्यक प्राध्यापक 
मृद विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभाग
दादासाहेब पाटील कृषी महाविद्यालय, दहेगाव
ता.वैजापूर , जि.औरंगाबाद