द्राक्षवेलींची पावसाळ्यातील काळजी

डिजिटल बळीराजा    30-Jun-2018
 
 
एप्रिल छाटणीनंतर 7 जूनपासून पावसाळ्याला प्रारंभ होत असतो. या कालावधीत द्राक्षवेलींची पाने वयात येऊन अन्न बनवितात आणि त्यांचा साठा द्राक्षवेलीत करीत असतात. जून ते सप्टेंबर या महिन्यांतील पावसाळ्यात द्राक्षवेलींची खालीलप्रमाणे काळजी घ्यावी.
 
द्राक्षवेलीच्या पानांचे कार्य : द्राक्षवेलींची पाने म्हणजे वेलींचे स्वयंपाकघरच आहे. चांगल्या, निकोप द्राक्षवेलीला 15 सें.मी. रुंदीच्या आकाराचे पान असावे. या पानाचे क्षेत्रफळ 1/2 चौरस फूट होईल. म्हणजेच 1 चौरस फुटाला 2 पाने असे प्रमाण होईल. तथापि, द्राक्षवेलीला नत्राचा पुरवठा अधिक प्रमाणात झाला तर हीच पाने दीडपट आकाराची होतील. पानाचा आकार मोठा होत असताना तापमान वाढेल आणि वेलीत राखीव अन्नसाठा कमी असेल तर पाने लहान आकाराची होतील. यासाठी सूर्यप्रकाशाच्या मदतीने अन्न बनविणार्‍या पानांची संख्या, पानांचा आकार पान पाहूनच ठरवावा लागेल. मात्र, वेलीवरील ही पानांची संख्या निश्‍चित करताना पानांचा इंडेक्स नंबर किंवा दर्शकांक याचाही विचार करणे आवश्यक आहे. द्राक्षाच्या पानाला 7000 फूट कँडलहून जास्त सूर्यप्रकाश गोळा करून घेता येत नाही, हे प्रयोगाने सिद्ध झालेले आहे. 
 
मांडव किंवा बावर पद्धतीत चौरस फुटाला 15 ते 20 पाने असणे गरजेचे आहे. त्यामुळे 6 फूट बाय 4 फूट अंतराच्या बागेला 360 ते 480 छोटी-मोठी पाने असली पाहिजेत. द्राक्षवेलीच्या फुटींचा शेंडा मारल्यानंतर शेंड्याकडील भागात नत्राचा जोर वाढल्यास नवीन फूट वाढते व फूट वाढत असताना पाऊस सुरू झाला तर करपा, केवडा, भुरी, बॅक्टेरिया इत्यादी रोगांचा प्रादुर्भाव पानांवर होत असतो. अशा वेळी रोगग्रस्त पाने काढून टाकून पानांची संख्या कमी करू नये, औषधाने पाने टिकविण्याचा प्रयत्न करावा. अर्धे पान चांगले असले तरी अशी पानेसुद्धा अन्न तयार करण्याचे काम करीत असतात. औषधांची फवारणी करीत असताना पानांची दाटी, तापमान, जमिनीतील ओलावा व हवामान इत्यादी बाबींचा विचार करून औषधांची मात्र ठरविणे योग्य आहे. जून पानावर 100 लि. पाण्याला 1 किलोग्रॅम मोरचूद व 2 किलो ओला चुना असे प्रमाण घेऊन 7.5 पी.एच.चा एक टक्क्याचा ढवळीचा उलटा बोर्डो तयार करून पानावर फवारला असता डाउनी, करपा, बॅक्टेरिया या रोगांवर परिणामकारक ठरतो. या बुरशीनाशकाप्रमाणेच कीटकनाशकांची फवारणी करणे आवश्यक आहे. तथापि, आंतरप्रवाही कीटकनाशक फवारणी वरच्यावर करू नये. 15 ऑगस्टच्या सुमारास पानांचे वय एप्रिल छाटणीनंतर सुमारे 125 दिवसांचे झालेले असते. या वयाच्या पानात मॅलिक अ‍ॅसिडचे प्रमाण वाढलेले असते. अशा वेळी कीटकांची वाढ, वाढणार्‍या तापमानामुळे होत असते. या हवामानात लाल कोळ्यांची (रेड माइट्सची) झपाट्याने वाढ होत असते. अशावेळी 100 लि. पाण्यात सल्फेक्स 200 ग्रॅमचा फवार, याप्रमाणे 7 दिवसांच्या अंतराने 2 फवारे द्यावेत.
 
अशाप्रकारे ऑक्टोबर छाटणीपर्यंत पाने निरोगी व जोमदार ठेवावीत. छाटणीपासून 120 दिवसांनंतर वेलींची पाने अशी निरोगी व जोमदार राहतील तेवढ्या प्रमाणात काडीवरील डोळ्यात घडाला पाकळ्या सुटण्याचे, सीझनला मालाचे वजन येण्याचे कार्य चालू असते. यासाठी द्राक्षबागेची जमीन किंवा वेलींचे बोद वाफशात असणे गरजेचे आहे. मात्र, हे बोद 9 इंच ते 1 इंचापर्यंतच उंच असावेत. जास्त उंच झाले तर जमिनीत जाणार्‍या खोडाला नवीन मुळ्या फुटतात. मात्र, या मुळ्या जाड असतात. या जाड मुळ्यांचा वेलीला फारसा उपयोग नसतो. 
 
तण देई धन : पावसाळ्यात द्राक्षबागेत शेंडाबाळीचे काम करावे लागते. पावसामुळे जमिनीत ओलही भरपूर असते. अशा वेळी जमीन तुडविली जाते. त्यामुळे ती घट्ट बनते. अशा वेळी बागेत गवत वाढविल्याने त्यापासून फायदे असल्याचे दिसून आलेले आहे. ‘तण रवाई धन’ ही जुनी म्हण मागे पडून ‘तन देई धन’ ही म्हण रुढ होऊ पाहत आहे. 
 
काळ्या खोल जमिनीत पाण्याचा निचरा कमी प्रमाणात असतो. अशा जमिनीत वाफसा राखण्यासाठी गवत वाढविले तर पावसाचे पाणी जमिनीत कमी प्रमाणात मुरते. तसेच जमिनीवर वाढणार्‍या पांढर्‍या मुळ्या पाणी भराभर शोषून घेतात व पानावाटे पाणी बाहेर टाकण्याचे काम करतात म्हणून अशा गवत वाढविलेल्या बागेतील जमिनीत वाफसा चांगला टिकवून ठेवण्याचे काम गवतामुळे आपोआप होत असते. काही हलक्या, मुरमाड जमिनीत द्राक्षबागांची लागण मोठ्या प्रमाणात आहे. अशा जमिनीतील खालील थर कठीण मुरुमाचा असल्यामुळे अशा जमिनीतील अन्न साठविणार्‍या मुळ्या खोल जात नाहीत. अशा जमिनीत गवत वाढविल्यास त्या गवताच्या मुळ्यांच्या खाली ओलसर भागात अन्न साठविणार्‍या जाड मुळ्या आडव्या पसरत असतात. अशा जाड मुळ्यात अन्नाचा राखीव साठा होत असतो. पावसाळ्यापूर्वी वळवाच्या पावसाने व हवेतील उष्ण तापमानामुळे जमिनीतील अणुजीव झपाट्याने वाढत असतात. अशा वेळी द्राक्षवेलींच्या मुळावाटे नत्र गोळा करण्याचे कार्य जोमाने चालू असते. त्यामुळे नवीन खुडा झपाट्याने वाढत असतो. त्याचा परिणाम होऊन वेलीतील राखीव अन्नसाठा संपतो. बागेत भरपूर उंच गवत आल्यास ते काढून बोदावर टाकल्यास बोदातील जमीन सुधारते. तसेच मुसळधार पावसाने बोदाची झीज होत नाही व बोदावर गवत उगवू शकत नाही. त्यामुळे ते बोदावरील गवत काळे पडून कुजल्यामुळे बोदावर एक प्रकारची चांगल्या कसाची माती तयार होत असते. 
 
बाग तणविरहित असल्यास जमीन कडक बनते. तर बागेत, गवत वाढविल्यास त्या गवताखालील जमीन भुसभुशीत बनते. त्यामुळे पांढरी मुळी वाढविण्यास मदतच होते. 
 
ओलांड्यावर मुळ्या : काळ्या खोल जमिनीत अगोदरच निचरा कमी असतो व त्यात पावसाळ्यातील मुसळधार पाऊस पडल्यानंतर जमिनीचा वाफसा जाऊन जमिनीतील पांढरी मुळे काम करीत नाहीत. अशा वेळी ही मुळी अडचणीत येते. त्यामुळे ओलांडल्यावर नवीन मुळ्या फुटतात. तसेच जमिनीतील नत्र वाहून गेल्यास बागेत टाकलेले शेणखत पूर्ण कुजलेले नसल्यास म्हणजेच कच्चे असल्यास जमिनीतील मातीचे कर्ब व नत्र (सी. एन. रेशो) गुणोत्तर वाढून इथिलिन द्रव्याची निर्मिती होते व ओलांड्यावरील मुळ्या फुटून वाढू लागतात. जमिनीत वाफसा येऊन मुळी कार्यरत राहिली तर ओलांड्यावरील मुळ्या वाळून जातात. म्हणून जमिनीत वाफसा राहील याची काळजी घ्यावी. 
 
गोडे पाणी : पावसाळ्यापूर्वी बोअर अगर विहिरीतील पाण्याची पातळी खूप खोल जाते. अशा वेळी जमिनीतील खालच्या थरातील पाणी क्षारयुक्त असण्याची शक्यता असते. द्राक्ष ही वनस्पती अत्यंत संवेदनशील असल्यामुळे द्राक्षवेलीला गोडे पाणीच लागते, क्षारयुक्त पाणी चालत नाही. नाइलाजाने क्षारयुक्त पाणी दिल्यास पानांच्या कडा करपतात, पाने वरून काळी पडतात व अकाली गळून पडतात. म्हणून द्राक्षबागेला गोड्या पाण्याचा पुरवठा करावा. 
 
तांबडी पाने : ‘शरद सीडलेस’, ‘कृष्णा सीडलेस’ ‘सरिता सीडलेस’ किसमिस चोर्नी या काळ्या रंगाच्या द्राक्षबागांत पावसाळ्यात मॅग्नेशियम कमतरतेमुळे पाने तांबडी होऊन गळून पडतात. म्हणून एप्रिल छाटणीला एकरी 50 किलो मॅग्नेशियम सल्फेट द्यावे. अशा प्रकारे पावसाळ्यात द्राक्षवेलींची काळजी घेतल्यास ऑक्टोबर छाटणीनंतर चांगले, गुणवत्ताप्राप्त उत्पादन मिळण्यास मदत होईल. 
 
द्राक्ष पिकासंबंधी अधिक माहिती हवी असल्यास खालील लिंकवर क्लिक करा :
-द्राक्षगुरू प्रा. वसंतराव शिवलिंग माळी 
ब्रह्मानंदनगर, पो. भिलवडी, ता. पलूस, जि. सांगली