भाजीपाला काढणीदरम्यान व काढणीपश्‍चात व्यवस्थापन

डिजिटल बळीराजा    27-Jun-2018
 
 
रोजच्या आहारातील भाजीपाल्याचा समावेश हा आपल्या शरीरास आवश्यक असणार्‍या पोषण तत्त्वांसाठी महत्त्वाचा आणि प्रमुख स्रोत आहे. भारतातील सद्य:स्थितीनुसार भाजीपाल्याची उपलब्धता आवश्यकतेपेक्षा खूपच कमी आहे; परंतु वाढती लोकसंख्या, बदलती जीवनशैली आणि आहारपद्धतीमुळे भाजीपाल्याची मागणी सतत वाढत आहे.
त्याचबरोबर भाजीपाल्यात मुबलक प्रमाणात खनिजे व जीवनसत्त्वे आढळतात. आहारतज्ज्ञांच्या मते एका व्यक्तीने दररोज 300 ग्रॅम भाजीपाल्याचे सेवन करावे; परंतु भारतीयांच्या रोजच्या आहारात फक्त 130-175 ग्रॅम भाजीपाल्याचा समावेश असतो. 
 
भारतातील सद्य:स्थितीनुसार भाजीपाल्याची उपलब्धता आवश्यकतेपेक्षा खूपच कमी आहे; परंतु वाढती लोकसंख्या, बदलती जीवनशैली आणि आहारपद्धतीमुळे भाजीपाल्याची मागणी सतत वाढत आहे. ही वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील शेतकर्‍यांनी वैयक्तिक स्तरावरील प्रयत्नांतून तसेच शासनाच्या वेगवेगळ्या योजना उपक्रमांतून, प्रकल्पांतून भाजीपाला पिकांच्या लागवडीखालील क्षेत्रात कमालीची वाढ केली आहे. तथापि, आजची बहुतांश शेतकरी भाजीपाल्याची काढणीत्तोर कामे पारंपरिक पद्धतीने करताना दिसतात. साधारणत: भाजीपाला पिकाच्या काढणीपश्‍चात अयोग्य हाताळणीमुळे दरवर्षी एकूण भाजीपाला उत्पादनात सरासरी 30-50 टक्के शेतमालाची नासाडी होत असल्याचे दिसते. हे नुकसान टाळता आले तर वाया जाणारा भाजीपाला आपल्या दररोजच्या आहारात वापरता येईल व नासाडीपासून होणारे आर्थिक नुकसान कमी करता येईल. भाजीपाल्याच्या काढणीनंतरची नासाडी आपल्याला पूर्णपणे टाळता आली तर बरेचसे फायदे होऊ शकतात.
 
उदा.
- भाजीपाला उत्पादनासाठी आणि विक्रीसाठी लागणार्‍या वेळेचा आणि साधनांचा नाश टाळता येईल. 
- काढणीनंतरची नासाडी टाळली तर भाजीपाला लागवडीखालील क्षेत्र अधिक न आणता आणि त्यासाठी लागणारे बी-बियाणे, खते, औषधे यांवर खर्च न करता भाजीपाल्याचा अधिक पुरवठा करता येईल. 
- नासाडी झालेल्या भाजीपाल्याचे व्यवस्थापन व त्यामुळे होणारे प्रदूषण या समस्यांवर मात करता येईल. 
- ग्राहकाला भाजीपाल्याचा अतिरिक्त पुरवठा करता येईल. 
- नासाडीमुळे होणारे आर्थिक नुकसान टाळता येईल. 
 
भाजीपाल्यातील काढणीपश्‍चात नुकसान : भाजीपाला नासाडीची प्रमुख कारणे बर्‍याच आहेत. उदा. वाहतुकीदरम्यान भाज्या चिरडणे, फुटणे, दबणे, काढणीनंतर भाज्यांमध्ये जैविक आणि रासायनिक बदल होणे, भाज्यांमध्ये जिवाणू (बॅक्टेरिया), बुरशी (फंगस) आणि इतर सूक्ष्म जंतूंचा प्रादुर्भाव होणे इत्यादी. तसेच कोणताही भाजीपाला काढल्यानंतर त्याची बाष्पीभवनाची, श्‍वसनाची व पिकण्याची क्रिया अखंडपणे चालू असते. या क्रिया आपणास थांबविता येत नाहीत. त्यामुळेही भाजीपाल्याचे आयुष्य संपुष्टात येते आणि भाज्यांमधील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यास भाजीपाला सुकला जातो आणि भाजीपाल्याच्या वजनात घट येऊन त्याचा तजेलदारपणा नाहीसा होतो. 
 
भाजीपाल्याची काढणीदरम्यान घ्यावयाची काळजी : भाजीपाल्याचे उत्पादन होताना काढणी ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. काढणीनंतरची गुणवत्ता आणि आयुष्य या गोष्टी मुख्यत्वेकरून भाजीपाल्याच्या परिपक्वतेवर अवलंबून असतात. त्यासाठी भाजीपाला योग्य वेळी काढला तरच त्याची प्रत चांगली राहते. भाजीपाल्याची काढणी दिवसाच्या थंड वेळी म्हणजे शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी करावी. स्थानिक बाजारपेठेत भाजीपाला पाठविण्यासाठी सकाळी लवकर काढणी करावी, तर दुसर्‍या बाजारपेठेस भाजीपाला पाठवायचा झाल्यास सायंकाळी काढणी करावी. काढणीच्या वेळी शक्यतो भाजीपाला एकमेकांवर घासला जाणार नाही याची काळजी घ्यावी. भाजीपाल्याच्या काढणीमध्ये संपूर्ण माल तयार होईपर्यंत न थांबता काढणीलायक माल ताबडतोब वरच्यावर आणि नियमितपणे काढणे आवश्यक आहे. यामुळे भाज्यांची प्रत चांगली राहते आणि माल चांगल्या प्रकारे टिकून राहतो. त्याचप्रमाणे झाडावर राहिलेल्या इतर फळांना पोषण मिळाल्यामुळे तीदेखील लवकर तयार होऊन काढणीस येतात. 
 
भाजीपाल्याची हाताळणी : भाजीपाल्याच्या काढणीनंतर तो एकत्र जमा करताना ओढला किंवा आपटला जाणार नाही याची काळजी घ्यावी, त्यामधून जंतूंचा शिरकाव होऊन भाजी खराब होण्याची प्रक्रिया लवकर सुरू होते. शेतातील वाहतूक सुरक्षित व्हावी यासाठी शक्यतो प्लास्टिक क्रेट अथवा बांबूच्या टोपल्यांचा वापर करावा. बांबूच्या टोपल्यांमध्ये कागद किंवा पाने अंथरावीत व नंतरच त्यावर भाजी ठेवावी. बाजारपेठेत भाजीपाला पाठविण्यासाठी बांबूपासून बनविलेली करंडी, प्लास्टिक क्रेट्स, छिद्रे पाडलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या इत्यादी पॅकिंग साहित्याचा वापर करावा. भाजीपाला वाहनात भरताना, वाहतुकीदरम्यान आणि उतवरताना ओढला जाणार नाही किंवा आपटला जाणार नाही याचीदेखील काळजी घ्यावी. वाहतुकीदरम्यान विक्री करताना आवश्यक वाटल्यास पाणी फवारणे, सुती कापड ओले करून मालावर टाकणे इत्यादी उपाययोजना तापमान आणि आर्द्रता नियंत्रणासाठी कराव्यात. फळभाज्यांपेक्षा पालेभाज्या नाजूक आणि लुसलुशीत असल्याने काढणीदरम्यान थोडाफार हलगर्जीपणादेखील पालेभाज्यांची प्रत बिघडवण्यास कारणीभूत होतो. पालेभाज्या काढणीनंतर त्यांची मुळाशी चिकटलेली किडलेली, पिवळी पडलेली किंवा रोगट पाने बाजूला काढावीत. पालेभाज्यांच्या एकसमान आकाराच्या जुड्या बांधाव्यात. भाजीच्या जुडीमध्ये अतिरिक्त पाणी असल्यास भाजी काळी पडून कुजण्याची क्रिया सुरू होते. त्याकरिता बांधणीपूर्वी भाज्या कोरड्या करणे आवश्यक आहे. अशा जुड्या बांधलेल्या भाज्या विक्रीसाठी गोणपाटात किंवा प्लास्टिक क्रेट, करंड्यांत भरून त्वरित बाजारात पाठविण्याची व्यवस्था करावी. 
 
भाजीपाल्याचे काढणीनंतरचे व्यवस्थापन : काढणीनंतरच्या व्यवस्थापनामध्ये भाज्यांची काढणी, हाताळणी, प्रतवारी, पॅकिंग, वाहतूक, साठवण, भाजीपाल्यांवरील विविध प्रक्रिया आणि निर्यात यांचा समावेश होतो. 
 
भाज्यांची पॅकिंग आणि प्रतवारी : काढणीनंतर दबलेल्या, चिरडलेल्या व किडलेल्या भाज्या बाजूला काढाव्यात व नंतर वजन व आकारमानानुसार प्रतवारी करावी. प्रथम दर्जाच्या, आकर्षक, मोठ्या आकाराच्या फळभाज्या दुसर्‍या बाजारपेठांसाठी पाठवाव्यात, तर लवकर नाश पावणार्‍या पालेभाज्यांवर त्वरित प्रक्रिया करून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करावेत अथवा स्थानिक बाजारात विक्रीस पाठवावे. काढणीनंतरचे पॅकिंग फार महत्त्वाचे आहे. पॅकिंगमुळे वाहतूक, साठवण आणि विक्रीदरम्यान होणारी इजा कमी होऊन त्यांना एक प्रकारचे संरक्षण मिळते. पॅकिंगमुळे भाज्यांच्या श्‍वसनाची, बाष्पीभवनाची, पिकण्याची क्रिया मंदावते व रोगजंतूंशी येणारा संसर्ग टाळला जाऊन रोगापासून होणारे नुकसान टाळता येते. याशिवाय पॅकिंगमुळे ग्राहक मालाकडे आकर्षिला जातो व मालाची विक्री वाढते. पॅकिंगसाठी जाळीदार प्लास्टिक पोती, लाकडी खोकी, बांबूपासून बनविलेल्या टोपल्या तसेच कोरोगेटेड पेट्या आणि प्लास्टिकच्या पिशव्या इत्यादींचा वापर करावा. पॅकिंग करताना काही गोष्टी लक्षात घेणे जरुरी आहे उदा. पॅकिंग दणकट आणि मजबूत असावे. पॅकिंगला कुठलेही रसायन लावलेले नसावे. हाताळणी व विक्रीव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून पॅकिंग परिपूर्ण असावे. शीतगृहात ठेवल्यानंतर पॅकिंग थंड झाले तर खराब होणारे नसावे. बंद किंवा उघडण्याच्या दृष्टीने फायदेशीर असावे आणि ट्रक किंवा टेम्पोमध्ये लोडिंग व अनलोडिंग करण्यासाठी सोयीस्कर असावे. 
 
भाजीपाल्याची वाहतूक : भाजीपाल्याच्या काढणीनंतर वाहतूक मात्र विनाविलंब झाली पाहिजे. विक्रीव्यवस्थेदरम्यान भाज्यांची प्रत आणि आयुष्य उत्तम टिकविण्यासाठी कमीत कमी नुकसान होणारी, जलद आणि स्वस्त वाहतूक असावी. भारतातील रस्त्याने होणारी वाहतूक ही रेल्वेने होणार्‍या वाहतुकीपेक्षा 3-4 पटीने महागडी आहे. वाहतुकीदरम्यान विविध भाज्यांसाठी योग्य तापमान आणि आर्द्रता राखली गेली पाहिजे, तसेच पुरेशी हवा खेळती राहण्याची व्यवस्था असली पाहिजे. 
 
भाजीपाल्याची साठवण : भाजीपाल्याच्या काढणीनंतरच्या व्यवस्थापनामध्ये भाज्यांची साठवण हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. भाज्यांचे आयुष्य वाढविणे हा साठवणीचा मुख्य उद्देश आहे. साठवणीच्या सोयीअभावी उत्पादनानंतर भाज्या प्रचंड प्रमाणात नाश पावतात. काढणीनंतरही भाज्यांमधील जैवरासायनिक क्रिया चालूच असते. साठवणीमुळे या क्रियांचा वेग मंद करता येतो. त्यासाठी योग्य त्या तापमानाची आणि आर्द्रतेची आवश्यकता असते. उदा. बटाटा -2 - 2 ते 3 -3 अंश सें. तापमानाला आणि 75 ते 80 आर्द्रतेला साठविल्यास खोलीच्या तापमानातील आयुष्यापेक्षा ते दुपटी-तिपटीने वाढते. याशिवाय साठवणीसाठी अनेक प्रकारच्या रसायनांचाही भाज्यांचे आयुष्य वाढविण्यासाठी वापर करता येतो. भाज्यांच्या साठवणीसाठी कमीत कमी खर्चाचा सहज बांधता येणारा शीतकक्ष शीतगृहापेक्षा जास्त उपयुक्त आहे. 
 
भाजीपाल्यावरील प्रक्रिया : भारतामध्ये एकूण भाज्यांच्या उत्पादनाच्या 1% मालावर प्रक्रिया केली जाते, तर या प्रक्रिया उद्योगांची आपल्या देशातील कार्यक्षमता फक्त 35% इतकी आहे. म्हणून दरवर्षी वाया जाणार्‍या 20-30% भाज्यांवर प्रक्रिया करून त्यापासून निरनिराळे प्रक्रियायुक्त तयार करून देशांतर्गत आणि परदेशी बाजारपेठा काबीज करता येतील. तसेच, प्रक्रिया उद्योगाची कार्यक्षमता वाढविण्यासाठी मोठा वाव आहे. 
 
निर्यात : भारतातून निर्यात होणार्‍या भाज्यांमध्ये बटाटा, टोमॅटो, लसूण, कांदा, काकडी, मुळा, भोपळा, भेंडी, कोबी आणि फ्लॉवर यांचा समावेश होतो, तर भाज्या आयात करणार्‍या देशांमध्ये युरोपातील देश, सौदी अरेबिया, कुवेत, इराक आणि इतर आखाती देशांचा समावेश होतो. भारतातून निर्यात होणार्‍या भाज्यांमध्ये भेंडी 60%, दुधी भोपळा 20%, मिरची 10% आणि इतर भाज्या 10% आहेत. इतके असूनही भारताचा परदेशी बाजारातील भाजीपाल्याचा हिस्सा कमी असून, निर्यातीसाठी आपल्याला खूप मोठा वाव आहे. तसेच, ताज्या भाज्या आणि त्यापासून प्रक्रिया केलेल्या पदार्थांच्या निर्यातीस केंद्र सरकारच्या अनेक सवलतीदेखील आहेत. 
 
भाजीपाला पिकाच्या काढणीदरम्यान व काढणीपश्‍चात व्यवस्थापन व्यवस्थित केले तर भाज्यांचे होणारे नुकसान बर्‍याच प्रमाणात टाळता येऊ शकते तसेच निर्यातीसाठी आपल्या मालाला चांगला वाव मिळू शकतो. त्या दृष्टिकोनातून भारतातील तसेच महाराष्ट्रातील अनेक शेतकरी गेल्या दशकापासून जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहेत. तसेच काही सहकारी संस्था, खासगी व्यापारी किंवा खासगी उद्योगसमूहानेही या क्षेत्रात पुढाकार घेतला आहे. त्यामुळे भविष्यकाळात निर्यातीसाठी मोठी संधी आहे. भारतीय वंशाचे लोक ज्या देशात जास्त आहेत त्या ठिकाणी ही निर्यात मोठ्या प्रमाणात होऊ शकते. त्यासाठी आपण उत्पादन व त्यांची काढणीदरम्यान व काढणीपश्‍चात हाताळणी यांचा दर्जा सुधारून इतर देशांत आपला माल निर्यात करण्यासाठी प्रयत्नशील असणे गरजेचे आहे.
-सौ. अरुणा खरवडे, विषय विशेषज्ञ (गृहविज्ञान)
डॉ. प्रशांत भोसले, कार्यक्रम समन्वयक,
कृषिविज्ञान केंद्र, परभणी