देशी गाईचे महत्त्व

डिजिटल बळीराजा    20-Jun-2018
 
 
आत्म माता गुरौ पत्नी ब्राह्मणी राजपत्निका,
धेर्नु धात्रे तथा पृथ्वी सप्तैत मातरौ स्मतौ।
 
वैदिक ग्रंथांमध्ये मनुष्यासाठी सात आई आहेत ह्यांचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे
(1) जन्मदात्री ‘आई’,
(2) दाई- दूधआई,
(3) राजाची पत्नी,
(4) ब्राह्मणाची पत्नी,
(5) गुरूची पत्नी,
(6) पृथ्वी,
(7) गाय.
 
अलीकडच्या काळात गाई-बैलांवरील अत्याचारांचे प्रमाण वाढले आहे, कारण त्यांचे आपल्याला महत्त्व माहीत नाही.
 
देशी गाईपासून मिळणार्‍या दूध, दही, तूप, ताक, लोणी ह्यापासून अनेक अन्नपदार्थ निर्माण होतात. तसेच देशी गाईपासून मिळणार्‍या गोमूत्र, शेण, पंचगव्य यापासून निर्माण होणारे औषध मानवास आरोग्य प्रदान करू शकते. त्यामुळे खूप प्रमाणात आर्थिक बचत होऊ शकते.
 
पंचगव्याचा शेतीसाठी खूप उपयोग आहे. वृक्ष आयुर्वेद भागात याचे वर्णन आहे. आधुनिक कृषितज्ज्ञांनीही यावर खूप प्रयोग केले आहेत. गोमूत्र व कडुलिंबाच्या पानांपासून बनविलेले औषध कीटकनाशक व मच्छर प्रतिबंधक आहे.
 
1)देशी गाईचे शेण- 20 किलो, लोणी 0.125 किलो, मध 0.5 किलो व तूप पाव किलो ह्यांच्या मिश्रणास अमृतपाणी म्हणतात. बियाणे ह्यामध्ये रात्रभर भिजविले जाते. त्याने उत्पादनक्षमता वाढते. हे पाणी जमिनीवर किंवा पिकांवर फवारणी केल्यामुळे जमिनीची सुपीकता वाढवता येते.
 
मका, सूर्यफूल, मूग या पिकांसाठी पंचगव्य व बायोगॅस खत ह्यांचा वापर केला तेव्हा उत्पादन खूप वाढल्याचे आढळले.
 
देशी गाईच्या शेणाने मातीचे घर सारवण्याची पद्धत आहे. ह्यामुळे किडे, जंतू नष्ट होतात. गवर्‍या स्वयंपाकाला वापरल्या जातात. धान्याच्या कोठयांनाही शेणाचा लेप लावतात. गोशेणाचा वापर केल्यास रेडिएशनचा दुष्परिणाम टळतो, त्वचारोग बरे होतात, रक्तामधील गरमी कमी होते. वाळविलेले शेण जाळल्यास होणार्‍या धुराने डासांचे प्रमाण कमी होते. गाईचे शेण हे अनेक प्रकारचे औषध बनविण्यासाठी उपयोगी आहे. शेतकर्‍यांनाही शेणखत हे सर्वोत्तम खत आहे हे माहीत आहे.
 
गोमय साबणामध्ये गेरूची माती, मुलतानी माती, कापूर, ओव्याचे तेल इ. पदार्थांसोबत शेण वापरले जाते.
गोमय पावडर पण अशाच प्रकारे बनविली जाते. यामध्ये कडुलिंबाचा पालाही टाकण्यात येतो. ह्याचा वापर केसांतील कोंडा कमी करण्यासाठी होतो.
 
गोशेणापासून एक्झिमा साबण बनविण्यात येतो. ह्याचा वापर वेगवेगळ्या त्वचारोगांत त्वचेवर लावण्यासाठी करता येतो.
गोमय दंतमंजन करण्यासाठी देशी गाईच्या शेणाच्या गोवर्‍या वापरतात. हे दंतमंजन दातांचे विविध आजार, हिरड्यांची सूज, तोडांचे आजार, घशाचेआजार ह्यामध्येही उपयोगी आहे. (टीप- दात घासण्याऐवजी हिरड्यांची मालीश केली पाहिजे. त्यामुळे दात सशक्त राहतील.)
 
पंचगव्य घृतामध्ये गोशेणाचा रस वापरतात. हे पंचगव्य घृत फेफरे, मेंदूचा अशक्तपणा, कावीळ, मूळव्याध, विषमज्वर, स्मरणशक्तीची कमतरता इ. आजारांसाठी उपयोगी आहे.
 
2) देशी गायीचे दूध- गाईमध्ये सर्व देवतांचा वास असतो. ती कामधेनू आहे.जिथे गोमाता असेल तिथे सर्व नक्षत्रांचा वास असतो. गोमाताच एकमेव असा प्राणी आहे की जिच्या पाठीच्या हाडामध्ये सूर्यकेतूनाडी असते. म्हणून दूध, लोणी, अग्नी, तूप ह्यामध्ये सुवर्णाचा अंतर्भाव असतो. ह्याचे कारण असे, की ‘सूर्यकेतू नाडी’ सूर्याच्या किरणांद्वारे रक्तामध्ये स्वर्णक्षार तयार करते आणि तोच स्वर्णक्षार गोरसामध्ये उपलब्ध आहे.
 
म्हणून गाईचे दूध हे अमृत आहे. देशी गाईचे दूध न पिता संकरित गाईचे किंवा जास्त प्रमाणात फॅट असलेल्या म्हशीचे दूध चहासाठी वापरले जाते शरीरासाठी हानिकारक आणि जिभेचे चोचले पुरविण्यासाठीच आहे. परंतु वास्तविकता अशी आहे, की ‘जसे अन्न तसे मन’.
 
आपण पाहू शकतो, गाईचे वासरू जेव्हा जन्मते त्यावेळी ते एका तासामध्ये उभे राहते आणि काही तासांमध्येच उड्या मारण्यास सुरुवात करते व दूध प्यायला सुरुवात करते. अर्थात ते अतिशय चपळ असते व दिसण्यास खूप सुंदर असते. परंतु म्हशीचे वासरू बघा. ते दोन दिवस आपल्या जागेवरून उठतच नाही व दूध कुठे प्यायचे हे पण त्याला कळत नाही. कारण ते म्हशीचे दूध पिऊन अतिशय सुस्त होते. आणि अजून दुसरा फरक आपण प्रत्यक्ष अनुभवू शकतो.
 
गाईचे दूध पिऊन तिचे वासरू अतिशय चाणाक्ष बनते. जेव्हा केव्हा गाईंचा कळप कुरणामध्ये चरण्यास जातो, तेवढ्या गाईंच्या कळपामध्ये तिचे वासरू आपली स्वत:ची आई शोधून काढते आणि तिच्या जवळ जाते, कारण ते दररोज गाईचे दूधपीत असते. याउलटम्हशीचे दूध हे अतिशय जड असते, त्यामुळे तिचे वासरू हे सुस्त व मंद असते. त्यामुळे खरे विज्ञान हे आहे, की गाईचे दूध हे अतिशय उत्साहवर्धक आणि बुद्धिवर्धक आहे.
 
म्हणून भारतातील खेड्यामध्ये आजही लहान जन्मलेल्या बाळाला गाईच्या दूधामध्ये गुटी दिल्या जाते.
गाईचे दूध अतिशय मौल्यवान आहे. ह्या दुधापासून आपणास अतिशय उपयुक्त असे दुग्धजन्य पदार्थ मिळतात, ज्यांचा उपयोग शरीर सुदृढ व निरोगी बनविण्यास होते.
 
काही वैद्यकीय व्यवसायिक गाईच्या दुधाला हितकारक मानत नाहीत. परंतु त्यामधील सत्य असे आहे, की ज्या आधुनिक दुधाच्या डेअरी आहेत तिथे गाईंना अति जास्त प्रमाणात संप्रेरके (हार्मोन्स), प्रतिजैविके (अँटीबायोटीकस्) आणि बायो-फीड्सचा वापर करतात. आणि अशा गाईचे दूध कृत्रिमपणे त्यावर प्रक्रिया करून काढले जाते, साठविले जाते आणि वितरित केले जाते अशा अनैसर्गिक पद्धतीने मिळणारे ‘दूध’ दूध नव्हे दूधासारखा पांढरा पदार्थ. हे आरोग्यासाठी कसे काय हितकारक असेल?
 
परंतु जेव्हा गाय आपल्या वत्ससाठी अतिशय वात्सल्याने प्रेमाने दुधाचा पान्हा पूर्ण नैसर्गिक वातावरणामध्ये सोडते, असे दूध जेव्हा कोणी व्यक्ती पिते तेव्हा तीत्या दूधावर शंका घेणार नाही. अशा नैसर्गिक वातावरणातील दूध म्हणजे अमृतच होय. आणि हे सर्व वैदिक व शास्त्रसंमत आहे.
 
देशी गाईचे दूध आणि त्यापासून बनणारे पदार्थ हे आरोग्यदृष्ट्या फार महत्वपूर्ण आहेत. त्यामध्ये तीन महत्त्वाचे घटक प्रामुख्याने आढळतात:
(1) जीवनसत्व ‘ड’,(व्हिटॅमिन डी)
(2) जीवनसत्व ‘के’ (व्हिटॅमिन के) आणि
3) कॅल्शियम हे सर्व घटक आपल्या शरीराच्या वाढीकरिता आवश्यक आहेत. ते गोमातेच्या दुधामध्ये भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध आहेत.
 
ह्याशिवाय गाईच्या दुधामध्ये आयोडिन हा क्षारसुद्धा मोठ्या प्रमाणावर आढळतो. त्याचा उपयोग थॉयराईड ग्रंथीच्या कार्यासाठी शरीरास उपयोगी आहे.
 
गाईच्या दुधामध्ये जीवनसत्व बी-12 भरपूर प्रमाणामध्ये असते. हे जीवनसत्व ऊर्जाशक्ती वाढविण्यासाठी, हृदयास निरोगी ठेवण्याकरिता मदत करते.
 
आयुर्वेदानुसार देशी गाईचे दूध आणि त्यापासून बनणारे दही, ताक, लोणी, तूप इ. पदार्थ हे शरीरासाठी सर्व प्रकारची जीवनसत्त्वे पुरविणारे पदार्थ आहेत आणि ते मनुष्याचा सर्वांगीण विकास घडवितात. त्यामुळे त्याचा शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक विकास होतो.
 
देशी गाईचे दूध हे शरीरासाठी अमृत आहे, कारण :
1)देशी गाईच्या दुधाचा इतर दुधांच्या तुलनेमध्ये पौष्टिकतेत व गुणधर्मामध्ये सर्वांत वरचा क्रमांक लागतो.
2)दररोजच्या आहारामध्ये देशी गाईचे दूध घेतल्याने कफ, वात, पित्त ह्या दोषांचे संतुलन राहते. त्यांचे शमन होते.
3)देशी गाईच्या दुधाच्या सेवनाने शरीर चुस्त व उत्साही राहते.
4)ज्या व्यक्तींना पित्त, अपचन, जुलाब इ.चा त्रास होतो त्यांनी देशी गाईच्या दुधात सुंठ व हळद घालून उकळून गरम दूध प्यावे.
सारांश असा, की जर देशी गाईंपासून आपणाला इतका फायदा होत असेल तर प्रत्येक भारतीयाने किमान एक देशी गाय आपल्या घरामध्ये बाळगावी व ती वृद्ध झाली किंवा दूध देत नाही म्हणून तिची अवहेलना करू नये.