फायदेशीर पशुपक्षी पालनाचा आत्मा, स्वच्छ आणि पुरेसे पिण्याचे पाणी

डिजिटल बळीराजा    23-May-2018
 
 
पृथ्वीवरील सर्वांत मौल्यवान संपत्ती कोणती, असा प्रश्‍न समोर उभा ठाकला तर उत्तर एकच आहे. ते म्हणजे पाणी. पृथ्वीच्या एकूण पृष्ठभागाच्या क्षेत्रफळाचा 70 ते 75 टक्के हा भाग पाण्याने व्यापला आहे, पण हे पाणी मानवाच्या/पशुपक्षीधनाची तहान भागवू शकेल काय? परत उत्तर आहे ‘नाही.’ या उपलब्ध असलेल्या अफाट पाण्याचे वर्गीकरण केल्यास आश्‍चर्याचा मोठा धक्का बसण्यासारखे आहे. या साठ्यांपैकी 97.5% पाणी हे ‘खारट’ असून, ते वापरण्यायोग्य नाही, म्हणजे वापरण्यासाठी व पिण्यासाठी जो साठा आहे तो फक्त जेमतेम 02.5%च आहे. पुन्हा एवढे तुटपुंजे पाणी कशा अवस्थेमध्ये आहे ते पाहणे महत्त्वाचे आहे. यातील (2.5 % पैकी) जवळजवळ 70% पाणी गोठलेल्या म्हणजे बर्फाच्या अवस्थेत आहे आणि उरलेले 30% पाणी भूगर्भात (जमिनीच्या पोटात/ जमिनीखाली) आहे. 
 
पाणी हे सजीवांचे ‘जीवन’च म्हणता येईल. (मग त्यात वनस्पती, पशुपक्षीधन, सर्व प्राणिमात्र, मानव यांचा समावेश होतो. यातून जन्म घेतो एक महत्त्वाचा मुद्दा पाणी नाहीतर वनस्पती नाही, वनस्पती नाहीतर अन्न/आहार नाही, म्हणजेच गोळाबेरीज काय, अन्न/आहार नाहीतर सजीव नाहीत निसर्ग आपले काम चालू ठेवत असतो. त्यात आकाशातून पाऊस पाडून सजीवांना ‘गोडे’ पाणी उपलब्ध करून देणे- पण यातील परत 70-80 टक्के पाणी वाहून जाते व 97.5 टक्के ‘खारट’ पाण्यात मिसळते. मानवाने या पाण्याचा वेगवेगळ्या मार्गांनी त्या त्या सिझनमध्ये साठा करून ठेवणे महत्त्वाचे आहे. भूगर्भातल्या पाण्याचा सततचा उपसा चालू असल्यामुळे तो साठा कमी होत आहे. म्हणून पावसाच्या पाण्याचे अनेकविध मार्गांनी भूमातेमध्ये ‘पुनःर्जलभरण’ सातत्याने झाले पाहिजे. 
 
जशी मानवी शरीराला व वनस्पतीला तहान लागते, तशीच त्यातहून ‘जास्तीची तहान’ पशुपक्षीधनाच्या समूहाला लागते हे कटुसत्य आहे, पण भारतामधील पक्षी (पोल्ट्री) व पाळीव प्राणी सोडून बाकीच्या पशुधनाला तहान लागते, याची खंत पशुपालकांना नाही, याचे दुःख होते. तहान लागल्यावर मानवी शरीर कसेही करून पाणी उपलब्ध करून तहान भागवते, पण परावलंबी पशुधनाचे काय? अशा पशुधनापासून अनेकविध प्रकारची उत्पादने घेऊन त्यांच्यावर आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालतो, याचीही जाण पशुपालक ठेवत नाहीत. सुगीच्या दिवसात (म्हणजे ज्या वेळी पाणी, अन्न, चारा मुबलक प्रमाणात असलेल्या काळात) तर आपल्याकडे असलेल्या गाई/म्हशी/शेळ्यामेंढ्या यांंना तहान लागल्यावर पिण्याचे पाणी मिळाले पाहिजे, याचा साधा विचारही मनात येत नाही. अशावेळी त्यांच्यापासून मिळणारे उत्पादन कमी झाले, तर परत त्यांच्याच नावाने खडे फोडण्यास तयार आणि लगेच पशुवैद्यकाला बोलावून त्यांना ट्रीटमेंट करून घेणार! अशा वेळी आमचे डॉक्टरही पशुसंवर्धानासारख्या विषयाची कास न धरता/हे उत्पादन का कमी झाले आहे, त्याची या संदर्भातील कारणमीमांसा न अभ्यासता ताबडतोब ट्रीटमेंटच्या मागे लागतात! असो. 
 
पशुपक्षीपालकांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की एखादवेळेस घनपदार्थ (ड्राय मॅटर-चारा, पशुखाद्य इ.) पोटात गेले नाही तरी चालतील, पण योग्य मात्रेमध्ये पाणी पोटात गेलेच पाहिजे आणि तेही तहान लागल्यावरच.
 
पशुपक्षी आहारात पाण्याला खरा पहिला क्रमांक देणे आवश्यक आहे, पण दुर्दैवाने तो दिला जात नाही, त्याकडे दुर्लक्ष होते. संतुलित पशुआहारात पोषणतत्त्वांमध्ये पाणी हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे. पशुपक्षीपालनात पाण्याचे विविध उपयोग पाहूयात, यात दोन विभाग करता येतील. शरीराच्या कातडीखालील भागाला म्हणजेच शरीरामधील असलेल्या विविध अवयवांना, तसेच दुसर्‍या भागात शरीरावरील पृष्ठभागाकरिता लागणारे पाणी
 
पहिल्या भागात- शरीराच्या एकूण वजनापैकी वासरात 79% वजन पाण्याचेच असते हेच प्रमाण मोठ्या झालेल्या पशुधनात 59% पर्यंत असते. (वनस्पतींमध्ये सुद्धा असेच प्रमाण असते हिरव्या लुसलुशीत चार्‍यात पाण्याचे प्रमाण 80 ते 85% असते) याचाच अर्थ हे प्रमाण सातत्याने टिकले गेले, तरच पशुपक्षीधन या जमिनीवर उभे राहून हालचाल करू शकेल.
‘पाणी’ हे महत्त्वाचे ‘पोषणतत्त्व’ मानले आहे (जसे प्रोटिन, कार्बोहैड्रेट, फॅट इ.)
म्हणून,
1) शरीराच्या तापमानाचे नियंत्रण करणे,
2) रासायनिक प्रक्रियेत महत्त्वाचा भाग घेणे,
3) शरीराचे आकारमान व तसेच पेशींचेही ठेवण कामय राखणे,
4) पोषणतत्त्वे यांंची शरीरभर वहन (ट्रान्सपोर्ट) करणे,
5) वेगवेगळी उत्पादने अधिकतम तयार करणे (जसे दूध, अंडी, मांस इ.) 
 
दुसर्‍या भागात वेगवेगळ्या माध्यमांची स्वच्छता करणे त्यात 
1) पशुपक्षीधनाच्या बाहेरील शरीराची स्वच्छता, 
2) पशुपक्षीधनाच्या निवार्‍याची (शेड) स्वच्छता ठेवणे, 
3) शेडमधील मलमूत्र नियोजित स्थळी वाहून नेणे, 
4) शेडमधील (निवार्‍यातील) तापमानाचेसुद्धा नियंत्रण करणे, 
5) मिश्रपशुआहार (टीएमआर) एकमेकांना बांधून ठेवणे की ज्यायोगे पशुपक्षीधनाला ते खाता येणे सोपे जावे- भुस्कट असेल तर श्‍वासोच्छ्वासावाटे नाकात/डोळ्यांत न उडणे 
6) शेडच्या/दवाखान्याच्या/घराच्या गोडाऊन आजूबाजूला मोकळी मातीची जमीन असेल तर त्यावरची धूळ/ मोकळी माती आजूबाजूला उडू नये म्हणून शिंपडण्याकरिता लागणारे पाणी, 
7) शेडमधील नोकरवर्गाच्या दैनंदिन व्यवहारासाठी लागणारे पाणी इ. 
 
हे सर्व करताना पाण्याची गुणवत्तासुद्धा फार महत्त्वाची आहे. पशुपक्ष्यांना पिण्यासाठी कोणत्या योग्यतेचे पाणी लागते त्याचे परिणाम पुढे बघूया. 
 
खालील दिलेल्या परिमाणाचे आकडे ओलांडले किंवा कमी झाल्यास पशुपक्ष्यांचे आरोग्य धोक्यात येते. उत्पादनांवर वाईट परिणाम होतो. 
 
1. पीएच (सामू) 6 ते 8
2.विरघळलेले घनपदार्थ  0.1000
अ2 एकूण विरघळलेली क्षार 
3.कठीणपणा  0.120 पीपीएम
4.लोह 0.3000 पीपीएम
5.नायट्रेट (नायट्रोजन) 0.100 पीपीएम
6.नायट्राईड (नायट्रोजन 0.10 पीपीएम
7.सल्फेट 0.500 पीपीएम
 
आकडेवारी जास्त झाल्यास वरील घटकांच्या क्रमांकानुसार 1) पाणी पिणे कमी होते, अल्कोलिसिस होणे 2) अ तात्पुरते पातळ शेण येणे/दुर्गंधी येणे, सततचा/अधूनमधून डायरिया होतो. 3) विशेष फरक पडत नाही. 4) पाण्याची चळ (टेस्ट) बदलते म्हणून पिण्यावर बंधन, 5/6 प्रजननात अडथळे (वारंवार उलटणे) गर्भपात इत्यादी 
8) एकूण जीवाणू (बॅक्टेरिया) 0.1000 / एका मिलीमध्ये 
9.इ. कोलाय जीवाणू 0.50 / 100 मिलीमध्ये 
 
जास्त झाल्यास फारच धोक्याचे 
 
पिण्याचे पाणी थंड (18 ते 20 डि. सेंग्रे.) व स्वच्छ पाहिजे वाहते असल्यास. स्वतःचे शरीर सांभाळण्यासाठी काही विशिष्ट परिमाणांत पशुपक्षीधनाला पाणी प्यावे लागते. त्यात हवामानाचे/शेडचे तापमान काय आहे तसेच त्यांचे वजन काय आहे, त्यावर अवलंबून असते. महाराष्ट्रातील हवेचे तापमान बघितले तर हिवाळ्यात 18 ते 20 डि. से.गे्र., तर उन्हाळ्यात ते 35 ते 40 डि.सें.ग्रे.पर्यंत पोचते. मोठ्या गायी/म्हशीला हे पाणी 30 लिटर ते 50 लिटर रोज लागते, तसेच शेळ्यांना/मेंढ्यांना 4 ते 6 लिटर रोज लागते. वरील पाणी वेळेवर/तहान लागली की मिळाल्यास उत्तम. वरील परिमाणात गाय 5 लिटर, तर म्हैस 3 लिटरपर्यंत दूध तयार करते (पारंपरिक भाषेत ‘दूध देते’) नंतरच्या प्रत्येक लिटर दुधामागे व एक महिना गाभणपणाचेमागे- गायीला 4 ते 5 लिटर, तर म्हशीला 6 ते 7 लिटर पाणी प्यावे लागते, तर शेळी/मेंढीला हे परिमाण 2 ते 2॥ लिटर आहे. 
 
वासरांना/करडांना/रेडकांना जन्म झाल्याच्या दुसर्‍याच दिवसापासून पिण्याचे पाणी त्यांच्या पिंजर्‍यात / शेडमध्ये ठेवावे. आपल्या येथे असे पिण्याचे पाणी 15/20 ते 60/65 दिवसांनी ठेवले जाते. (पशुपालकहो, हा त्यांच्यावर अन्याय आहे) हे परिमाण 1 ते 2 लिटरपर्यंत असावे- पुढे 8/8 दिवसांनी वाढवत जावे
 
तसेच तहान लागल्यावर पाणी समोरच मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. शारिरीक/आरोग्यदृष्ट्या आवश्यक आहे. आपल्या येथील पशुपालनांत पशुपालकानेच स्वतः त्यांना देण्यात येणार्‍या पिण्याच्या पाण्याची वेळ ठरविली आहे. अशावेळी गायी/म्हशी 3/3-4/4 बादल्या पाणी एकदम पिऊन घेतात. यामुळे पोटाची हालचाल मंदावते, रवंथ करणे 90% पर्यंत कमी होते, अ‍ॅसिडीटी वाढते. त्यामुळे गायी/म्हशींना थकवा येतो. त्या आडव्या पसरतात, बसतात-डाब्या बाजूने पोट फुगते. याचा वाईट परिणाम दूध तयार करणार्‍या सजीव यंत्रावर म्हणजे कासेवर होतो. दूध कमी एसएनएफ कमी फॅटचे तयार होते. गाय-म्हैस, शेळी गाभण राहायला दमविते. रवंथ करणे पुढे 3/4 तास फारच मंदावते (पोटातील पाणी पुढे आतड्यात वा रक्तात गेल्याशिवाय ते रिकामे होत नाही) कोठीपोटातील खाल्लेले अन्न तेथेच साठून राहते व त्यात वेगळ्या प्रकारचे वायू तयार होतात. ते रक्ताने शोषले जाऊन लिव्हरमध्ये (यकृत) ‘युरिया’ तयार होतो. पुढे ती सर्व अवयवांना पसरून विशिष्ट प्रकारची विषबाधा होते. या बाबींची कल्पना कोणालाच नाही. संबंधित दिवसात जेवढ्या मात्रेत शुष्क पदार्थ (ड्राय मॅटर) पोटात जायला पाहिजेत तेवढे जात नाही. पाणी वर दिलेल्या गुणवत्तेचे नसेल तर फारच कठीण परिस्थिती निर्माण होते. बर्‍याच ठिकाणी संध्या 6 ते 7 ते पहाटे दूध काढेेपर्यंत म्हणजे (5 ते 6 वाजेपर्यंत) गवातीत पाणी ठेवले जाते. हे चुकीचे आहे. त्यामुळे जेवढे घनपदार्थ पोटात जायला पाहिजेत तेवढे जात नाहीत व त्याचा परिणाम वेगवेगळ्या उत्पादनांवर होतो.
 
अ‍ॅसिडीटीमुळे गायी/म्हशी / कामाचे बैल लंगडायला लागतात. त्यांना लॉमिनायटिस हा आजार होतो. महाराष्ट्रातील पश्‍चिम भाग, तसेच काही इतर थोडे जिल्हे सोडले तर मराठवाडा, कोकण, विदर्भ या भागातील लाखोंच्या संख्येत हे पशुधन सरकारी जमिनीवर संबंध दिवस भटकत असते (काही वेळा पडीक खासगी मालकीच्या जमिनीवर, वनखात्याच्या जमिनीवर, रानावनात इ) अशा जमिनीच्या आजूबाजूला साचलेले पाणी असते (यात धरणांचे बॅक वाटर, कॅनॅलचे टेल टँक, इतर तलाव, कॅनॉलच्या चार्‍या इत्यादींत पाणी असते ते पिण्याकरिता हे पशू तेथे जातात. अशा पाणथळ जागी हिरव्या/करड्या / काळ्या/निळसर रंगाच्या गोगलगायी असतात. या पाण्यात चिखल असतो, हिरव्या/काळ्या/पांढर्‍या रंगांची अल्गी/बुरशी शेवाळे असते, ती या पशुधनाच्या पोटात जाते. त्यामुळे अनुक्रमे पर्णाकृती जंत (लिव्हर फ्ल्युक) होतात, अफ्लाटॉक्झीनचा प्रदुर्भाव होतो. बर्‍याच वेळेला फ्लॉस्ट्रिडियम (9 भावंडे) जीवाणूंंचा प्रादुर्भाव फार धोक्याचा ठरतो. त्या जागी हे पशुधनाचे मलमूत्र गर्भायशतात स्त्राव, नाकातोंडातील शेंबूड त्यामुळे ती जागा, तेथील पाणी, खुरटे गवत दूषित होते. त्यातून अनेक रोग उद्भवतात. पोटात जाणारी विविध विषे व त्यांचे परिणाम म्हणजे खुंटलेली वाढ, निस्तेज कातडी, अशक्तपणा, काळवंडलेपणा, हाडाचा नुसता सापळा दिसणे वगैरे.
 
तहान लागल्यावर पाणी पिण्यास मिळाल्यास त्याचे फायदे वाचा
1) दूध उत्पादनांमध्ये 15 ते 28% पर्यंत निश्‍चित वाढ,
2) दुधाच्या फॅट व एसएनमध्ये 4 ते 7 पॉइंट परसेंटने वाढ
3) 8 ते 10 पशूंच्या गोठ्यातील कामाचे 5 ते 7 तास बचत
4) शेळाची ‘पवटी’ (देवळाच्या शिखरासारखी) येणे,
5) त्यामुळे शेण हाताने/फावड्याने उचलणे सोपे
6) पशूचा मागचा भाग (कासेसह) पातळ शेणाने भरणे बंद
7) त्यामुळे मस्टयटीस (स्तनदाह) रोगाला प्रतिबंध
8) लेबरमध्ये बचत इ. तहान लागल्यावर पाणी ही सोय अत्यंत अल्प खर्चात कोणतीही ऊर्जेशिवाय (इलेक्ट्रीसिटी, डिझेल, पेट्रोल, रॉकेल, पवन, सौर, जल) व्यवस्थित होते.
त्याकरिता पशुपालकाची इच्छाशक्ती पाहिजे. 
 
कोरड्या दुष्काळात पशुधनाचे म्हणून हालहाल होतात. जेथे मनुष्यवस्तीलाच प्यायला पाणी नाही, तर पशुधनाचे काय घेऊन बसलात् असो.
 
 
डॉ. वासुदेव सिधये पशुव्यवस्थापन, पशुपोषण, पशुप्रजनन तज्ज्ञ