डाळिंबावरील तेल्या (बॅक्टेरियल ब्लाइट) रोगाचा प्रादुर्भाव, लक्षणे व उपाय

डिजिटल बळीराजा    02-May-2018
 
 
 
भारतात या रोगाचा प्रादुर्भाव प्रथम 1952 साली कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि राजस्थान या राज्यातील डाळिंबावर आढळून आला. त्यानंतर 1959 साली सखोल संशोधना अंती हा रोग ‘झान्थोमोनास पुनिकी’ या अणुजीवामुळे होत असल्याचे डॉ. हिंगोरानी आणि सिंग यांनी सिद्ध केले. रुबी जातीच्या डाळिंबावर सर्वप्रथम या रोगाचा प्रादुर्भाव आढळून आला. 
 
 
प्रादुर्भावाचा विकास व क्षेत्र :
भारतामध्ये डाळिंब हे 1986 पर्यंत दुर्लक्षित व कमी उत्पन्न देणारे पीक म्हणून ओळखले जायचे; परंतु कालांतराने औषधी व अँटिऑक्सिडेंट गुणधर्मामुळे याचे महत्त्व वाढीस लागून सन 2007-08 पर्यंत डाळिंबाखालील क्षेत्र 126.6 हजार हेक्टर, तर उत्पादन 884.1 हजार मेट्रिक टनांपर्यंत पोहोचले. यानंतरच्या काळात बॅक्टेरियल ब्लाइट या रोगाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव व नुकसान झाल्याने डाळिंब बागा काढून टाकण्यात आल्या. परिणामी, सन 2008-09 मध्ये डाळिंब लागवडीखालील क्षेत्र 109.21 हजार हेक्टर व उत्पादन 807.17 हजार मेट्रिक टनांपर्यंत खाली घसरले. (राष्ट्रीय फलोत्पादन बोर्ड 2013-14)
 
 
महाराष्ट्र राज्य डाळिंब उत्पादनात अग्रेसर आहे. महाराष्ट्रातील बहुतेक भाग आवर्षण प्रवण असल्याने डाळिंब या फळ बागेखालील क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे. कारण डाळिंब या फळझाडाची वाढ हलक्या ते मध्यम जमिनीत चांगली होत असून, समशीतोष्ण व कोरडे हवामान अनुकूल ठरत असल्याने दुष्काळी भागातील शेतकर्‍यांना हे फळपीक वरदान ठरत आहे.
 
 
मात्र, अशा परिस्थितीत अलीकडे एक नवीन समस्या ताणतणाव आणत आहे, ती म्हणजे तेल्या रोग. याला काही भागांत ‘बिब्या’ किंवा ‘तेलकट डाग’ असेही संबोधले जाते. भारतात या रोगाचा प्रादुर्भाव प्रथम 1952 साली कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि राजस्थान या राज्यातील डाळिंबावर आढळून आला. त्यानंतर 1959 साली सखोल संशोधना अंती हा रोग ‘झान्थोमोनास पुनिकी’ या अणुजीवामुळे होत असल्याचे डॉ. हिंगोरानी आणि सिंग यांनी सिद्ध केले. रुबी जातीच्या डाळिंबावर सर्वप्रथम या रोगाचा प्रादुर्भाव आढळून आला. 
 
महाराष्ट्रात कर्नाटक राज्यातून 2000 साली रुबी जातीची तेलकट डाग रोगग्रस्त कलमे आणली गेली आणि तेव्हापासून या रोगाचा प्रादुर्भाव महाराष्ट्रातील डाळिंब बागांवर सुरू झाला. महाराष्ट्रात 2003 साली सोलापूर जिल्ह्यातील चिकमहूद (सांगोला) येथील डाळिंब बागेत सर्वप्रथम तेल्या रोगाचा प्रादुर्भाव आढळून आला. त्यानंतर सोलापूर, सांगली जिल्ह्यातील डाळिंबावर या रोगाचा प्रादुर्भाव झपाट्याने झाला. यापाठोपाठ सध्या पुणे, अहमदनगर तसेच नाशिक जिल्ह्यातील ‘कसमादे’ पट्ट्यात (कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा) याचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. 
  

 
 
लक्षणे :
हा जिवाणूजन्य रोग पाने, फुले, फांद्या, खोड आणि फळांवर होतो. त्याची लक्षणे पुढीलप्रमाणे असतात.
 
1) पानावरील रोगाची लक्षणे : रोगाची प्रथम सुरुवात ही पानांवर होते. अनुक्रमे कोवळ्या फुटी, फुले आणि फळे यावर रोग येतो. सुरुवातीला रोगग्रस्त पानावर लहान आकाराचे लंबगोलाकार ते आकारहीन पाणथळ तेलकट डाग येतात. अनुकूल हवामानात हे डाग एकत्र येऊन ते 1 ते 2 सेंमी आकाराचे होतात. नंतर हे ठिपके काळपट रंगाचे होतात. ठिपक्यांच्या कडेला पिवळसर वलय दिसते. यावरून हा रोग ओळखणे सोपे जाते. डाग उन्हात बघितले की तेलासारखे चमकतात. डाग मोठे झाल्यावर पाने पिवळी पडून वाळतात. हळूहळू रोगग्रस्त पाने पिवळी पडून मोठ्या प्रमाणावर पानगळ होते. फूल व कळीवरील रोगांची लक्षणे पानाप्रमाणे असतात.
 
 
2) फुलांवरील रोगाची लक्षणे : फुलांवर व कळ्यांवर काळपट डाग पडतात व ते फुलकळी सोबत वाढू लागतात. फुले व कळ्यांची गळ होते.
 
 
3) फांदीवरील रोगाची लक्षणे : पानाप्रमाणे कोवळ्या फुटीवर रोगाचे ठिपके साधारणत : फांदीच्या पेर्‍यावर, फुटेच्या बेचक्यात दिसून येतात. ठिपक्याचे लांबगोलाकार चट्ट्यात रूपांतर होऊन ते गर्द तपकिरी व काळपट रंगाचे आणि थोडेसे खोलगट होतात. काही वेळेस ठिपक्यांच्या ठिकाणी सालीस तडे जातात आणि रोगग्रस्त भागातून पुढील फांदी सुकून वाळून जाते.
 
 
4) खोडावरील रोगाची लक्षणे : खोडावर सुरुवातीला पाणथळ तेलकट डाग दिसतात. कालांतराने हे डाग तपकिरी होऊन डागांभोवती पिवळी वलये दिसतात. खोडावर या डागांचे गर्डलिंग किंवा खाच तयार होते व तेथून झाड मोडते. 
 
5) फळावरील रोगाची लक्षणे : फळावर पानांप्रमाणे पाणथळ-तेलकट डाग पडतात. हे ठिपके हळूहळू वाढत जाऊन ते एकमेकांत मिसळतात. रोगग्रस्त भाग तपकिरी ते काळसर-तेलकट होतो. फळांना या डागांमुळे इंग्रजी ‘एल’ किंवा ‘वाय’ अक्षरांसारखे आडवे-उभे तडे जातात. फळांची प्रत पूर्णपणे खराब होते. तडे मोठे झाल्यावर फळे सडून गळून पडतात.
 
 
6) मुळावरील लक्षणे : खुल्या मुळावर काळे ठिपके दिसतात.
 
रोगाची प्रथमावस्था : रोगाचे प्रथमावस्थेत आढळणारे तेलकट डाग अनियमित, लंब गोलाकार आकाराचे तसेच एकमेकांत मिसळत असलेले मध्यभागी काळसर पडलेले असतात.
 
रोगाची वाढ : नंतरच्या काळात फळाला रोगग्रस्त भागावर आडवे-उभे तडे जातात व फळे सुकतात. फळावर थोडा जरी रोग आला तरी त्यांची प्रत पूर्णपणे खराब होते आणि फळांना बाजारभाव मिळत नाही. 
 
नुकसानीची तीव्रता : या रोगामुळे 40 ते 50% नुकसान होते, परंतु वाढीस पोषक वातावरण असताना अतिरोगग्रस्त बागेत 70 ते 100% नुकसान होऊ शकते.
 
उपाय-व्यवस्थापन-रोगाचे कारण :
तेलकट डाग हा रोग झान्थोमोनास ऑक्झानोपोडिस पीव्ही (पुनिकी) या अणुजीव यामुळे होतो असे आढळून आले आहे.
रोगाच्या प्रसाराचे मार्ग
 
प्राथमिक प्रादुर्भाव :
रोगग्रस्त भागातून आणलेल्या गुटी कलमाचा वापर केल्यास बागेत प्रथम रोगाची लागण होते.
बागेशेजारी रोगग्रस्त फळे आणि झाडाचे रोगग्रस्त अवशेष टाकल्यास त्यापासून बागेत रोगाचा प्रसार होता. 
बागेशेजारी रोगग्रस्त फळे आणि झाडाचे रोगग्रस्त अवशेष टाकल्यास त्यापासून बागेत रोगाचा प्रसार होतो. 
बाग स्वच्छ न ठेवल्यास, त्याचबरोबर झाडांच्या दाटीमुळे हवा खेळती न राहिल्यास व सूर्यप्रकाशाचा अभाव असल्यास रोगाचा प्रसार आणि वाढ झपाट्याने होते.
 
दुय्यम प्रादुर्भाव :
रोगाचा प्राथमिक प्रादुर्भाव झाल्यानंतर त्याचा बागेत दुय्यम प्रसार हा पावसाच्या पाण्याबरोबर वाहून आलेली रोगग्रस्त पाने, वादळी पाऊस, औजारे, मातीचे कण, आंतरमशागत करताना तसेच मजूरांच्या हाताळणीमुळे, जमिनीवर वाहणारे पाणी, इ.मुळे होतो.
 
पाने पोखरणारी अळी, फुलपाखरे, माशा हेसुद्धा रोगप्रसारास सहायक ठरतात. 
हवेमार्फत रोगाचा प्रसार फारच कमी होतो. 
 
 
रोगास अनुकूल परिस्थिती :
पावसाळी हवामानात रोगाचा प्रादुर्भाव आणि वाढ अतिशय झपाट्याने होते. रोगाच्या वाढीसाठी साधारणत: उष्ण तापमान ( 28 ते 38 अंश. से.), मध्यम ते भरपूर आर्द्रता (50 ते 90%), अधूनमधून हलका पाऊस आणि ढगाळ हवामान अशा वातावरणात रोगाचा प्रादुर्भाव वाढतो. तसेच रोगकारक जिवाणू हे 50 अंश सें. तापमानापर्यंत जिवंत राहू शकतात. हंगामाच्या सुरुवातीला नवीन बहार फुटल्यानंतर जोराचा मॉन्सूनपूर्व पाऊस झाल्यास रोगाचा प्रादुर्भाव हमखास होतो.
 
 
अणुजीवी जिवाणू रोगग्रस्त अवशेष मिश्रित जमिनीत टिकून राहण्याचा कालावधी : 
तेलकट डागग्रस्त बागेतून रोगग्रस्त अवशेषमिश्रित मातीचा प्रयोगशाळेत अभ्यास केला असता मातीमध्ये या रोगाचे अणुजीवी जिवाणू 9 महिन्यांपर्यंत जिवंत राहू शकतात, असे आढळून आले आहे.
 
रोग व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब :
सांस्कृतिक पद्धती 
हलक्या ते मध्यम (45 सेंमी.पेक्षा कमी खोली) जमिनीत डाळिंबाची लागवड करावी.
डाळिंबाची लागवड शिफारसीनुसारच 4.5 ते 3.0 मीटर अंतरावर करावी.
रोगग्रस्त भागात शक्यतो हस्त बहार घ्यावा.
लागवडीसाठी रोग नसलेल्या क्षेत्रातून / रोपवाटिकेतून निरोगी कलमे/ रोपे आणावीत.
‘पीसीआर’तंत्रज्ञानाने रोगट रोपे रोपवाटिकेत वगळावी.
स्टेम कटिंग आणि उति संवर्धन हे तंत्रज्ञान फायदेशीर ठरू शकते. या तंत्रज्ञानाने रोपे बनविता येतात. सध्या त्याच्या यशस्वी होण्याचे प्रमाण साठ टक्क्यांपर्यंत आहे.
बागेस ठिबक सिंचनाद्वारे पाणी द्यावे. त्याप्रमाणे बागेत पाणी साठणार नाही याची काळजी घ्यावी.
रोगग्रस्त पाने, फुले, फळे आणि फांद्या गोळा करून जाळून टाकाव्यात. 
प्रत्येक झाडास तीन ते चार खोड ठेवावेत, तसेच जमिनीपासून दोन फुटांपर्यंत खोडावर फांद्या ठेवू नयेत.
 
 
रासायनिक पद्धत :
सर्व खोडांना जमिनीपासून दोन फुटांपर्यंत बोर्डो पेस्टचा लेप पावसाळी वातावरण सुरू होण्यापूर्वी लावावा. 
तसेच छाटणीनंतर खोडावर व छाटलेल्या भागावर कॉपर ऑक्सिक्लोराइड 15 ग्रॅम +कार्बारिल 6 ग्रॅम+डी.डी.व्ही. पी. 2 मिली+1 मिली स्टिकर पाण्यात मिसळून तयार झालेल्या द्रावणाचा मुलामा द्यावा. 
छाटणीची व इतर औजारे निर्जंतुक करून वापरावीत. त्यासाठी 1.5% सोडियम हायपोक्लोराइडच्या द्रावणात सर्व साहित्य 10 ते 15 मिनिटे बुडवावे. नंतरच या औजारांचा वापर करावा.
छाटणीनंतर लगेच 1% बोर्डो मिश्रणाची पहिली फवारणी करावी.
ब्लीचिंग पावडर अथवा कॉपर डस्ट (4%) 10 किलो प्रति एकरप्रमाणे जमिनीवर धुरळणी करावी.
दुसर्‍या फवारणीनंतर 10 ते 15 दिवसांनी स्ट्रेप्टोसायक्लीन (250 पी.पी.एम.)+ कॉपर ऑक्सिक्लोराइड 0.25%ची फवारणी करावी. 
तिसर्‍या फवारणीसाठी 0.5% बोर्डो मिश्रण फवारावे. चौथी फवारणी याचप्रमाणे करावी.
तसेच सूक्ष्म अन्नद्रव्ये 1 ग्रॅम झिंक सल्फेट+1 ग्रॅम बोरॉन प्रति पाण्यात मिसळून फवारणी करावी.
पानांची वाढ होण्याच्या कालावधीत पानांची प्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी 00-52-34 कॅल्शियम नायट्रेट आणि 5 ग्रॅम सिलिकॉन प्रति लिटर पाण्यात मिसळून आलटून-पालटून फवारणी करावी. 
निम ऑइल 200 मिली+ब्रोमोपॉल 50 ग्रॅम+कॅप्टन 500 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करावे. झाडाच्या खोडाला याचा मुलामा द्यावा.
बहार घेण्यापूर्वी संपूर्ण पानगळ करण्यासाठी इथेफॉन 4 ते 5 मि.लि. प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, ज्याने रोगप्रतिबंध होईल. 
 
 
1) प्रा. एच.डी. पाटील (सहायक प्राध्यापक, वनस्पती रोगशास्त्र विभाग)
2) श्री. यशवंत च. राऊत (विद्याथी, चतुर्थ वर्ष बी.एस्सी. कृषी)
3) प्रा. जयश्री पापडे, (सहायक प्राध्यापक, उद्यानविद्या विभाग)
स्वा. वि. ग. इं. कृषी व उद्यानविद्या महाविद्यालय, जळगाव (जामोद), जि. बुलडाणा.