उन्हाळ्यात यशस्वी पशुसंगोपनाची त्रिसूत्री

डिजिटल बळीराजा    18-May-2018
 
उन्हाळ्यामुळे जनावरे चारा कमी खातात आणि अधिक पाणी पित असल्यामुळे रवंथ कमी होऊन अपचन होते. घामावाटे सोडियम आणि पोटॅशियम यांसारख्या क्षारांचे प्रमाण जनावरांच्या शरीरातून कमी होते. त्याचा परिणाम एकूणच शरीरप्रक्रियेवर होतो. तापमान वाढून गर्भपात होतात. म्हणूनच उन्हाळ्यामध्ये जनावरांना व्यवस्थित निवारा, योग्य पोषण आणि शुद्ध पाणी देणे महत्त्वाचे आहे. 
 
जमिनीतून मिळणार्‍या पिकांच्या अवशेषांवर मोठ्या प्रमाणात पशुपालन व्यवसाय चालतो, तर पशुपालनातून उपलब्ध होणारे शेणखत हे भूमातेचे पौष्टिक खाद्य आहे. गोमाता आपल्या भूमातेला सुपीक करत असताना आपल्या भूमिपुत्राला पैसा मिळवून देते. अशा पशुधनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन फार व्यापक असला पाहिजे. आजही देशाचा किंवा राज्याचा विचार केल्यास शेतीक्षेत्रातून मिळणार्‍या एकूण उत्पादनापैकी 20 ते 25 टक्के उत्पादन हे पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसायातून मिळते. 80 टक्के अल्प व अत्यल्प भूधारक, तसेच जिरायती भागांतील शेतकर्‍यांचा प्रपंच या व्यवसायावर अवलंबून आहे. देशामध्ये 2010-11 मध्ये 3.40 लाख कोटी रुपयांचे उत्पादन पशुसंवर्धनातून मिळाले, तर 2015-16 वर्षापर्यंत हा आकडा पाच लाख कोटी रुपयांपर्यंत जाईल. देशातील 12.05 कोटी शेतकरी कुटुंबांपैकी 10 कोटी कुटुंबांकडे 18.74 कोटी गाई, 966 कोटी म्हशी, 20.19 कोटी शेळ्या-मेंढ्या व इतर जनावरे अशी मिळून एकूण 45 कोटी पशुधन आहे. जगाच्या एकूण पशुधनापैकी 15 टक्के पशुधन भारतामध्ये आहे. 
 
मोठ्या संख्येने उपलब्ध असलेल्या पशुधनासाठी आज आपण फक्त एकूण लागवड क्षेत्राच्या दोन टक्केच जमीन चारा निर्माण करण्यासाठी उपलब्ध करून दिलेली आहे. आजही या पशुधनाला आवश्यक असलेल्या अन्नघटकांपैकी 50 ते 60 टक्के ओला चारा 20 ते 25 टक्के कोरड्या चार्‍याची कमतरता आहे. दुष्काळी परिस्थितीमध्ये शेतकर्‍यांचे पीक वाया गेले किंवा उत्पादन मिळाले नाही, तर हमखास उत्पादन मिळून त्यांचा प्रपंच चालविणार्‍या पशुधनाला शेतकर्‍यांची कवचकुंडलेच म्हटले तरी चालेल. देशामध्ये राष्ट्रीय कृषी विकास प्रकल्प राबवत असताना कमीत कमी 25 टक्के निधी पशुसंवर्धनासाठी खर्च करावा, अशा मार्गदर्शक सूचना आहेत. मात्र 12 ते 15 टक्क्यांपर्यंतचही खर्च या व्यवसायवृद्धीसाठी केला जात नाही. ऐनवेळी उपलब्ध असलेल्या शेतातील कोणत्याही पिकांचे आवशेष गवत, उसाचे वाढे यांसारख्या बाबींवर दुग्धव्यवसाय चालतो. बागायती क्षेत्रावर कारखाना चालू असताना वाढ्यावर नंतर उसावर जनावरे जगविली जातात. जनावरांना कोणत्या प्रकारच्या खाद्यपदार्थांची आवश्यकता असते, याचा विचार होतच नाही.
 
दुष्काळी परिस्थितीमध्ये जनावरांना हिरवा चारा आणि पिण्यासाठी शुद्ध पाणी या दोन बाबींचा तुटवडा जाणवतो. अन्नाचा तुटवडा होऊन माणसांना भूकबळीला सामोरे जाण्याची वेळ येऊ नये, यासाठी गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात अन्नधान्य साठविण्यासाठी उपाययोजना केल्या जातात, परंतु त्याप्रमाणे जनावरांसाठी हिरवा चारा साठवून ठेवण्याची पद्धत आपल्या देशात प्रचलित नाही. यावर मोठ्या प्रमाणात उपाययोजना करणे महत्त्वाचे आहे. हिरवा चारा नसताना वाळलेल्या कसदार चार्‍याचा वापर होत नाही. पिकांचे धान्य काढल्यानंतर राहिलेले अवशेष जनावरांचा चारा म्हणून वापरले जाते. या चार्‍यांमध्ये पौष्टिक घटक कमी असतात, परंतु जनावरांच्या आहारात 20 ते 25 टक्के वाळलेला चारा चांगला, परंतु उन्हाळा आणि दुष्काळ असेल, तर हाच मुख्य चारा होतो. 
 
उन्हाळ्यामध्ये तापमानामुळे जनावरांची भूक मंदावते. त्यांना कमी परंतु जास्त पौष्टिक विशेषतः प्रथिनेयुक्त खुराक, चारा देणे गरजेचे असताना याचवेळी कमी पौष्टिक आणि कमी प्रथिनयुक्त चार्‍यावर पशुपालन केले जाते. याचा परिणाम जनावरांच्या एकूणच आरोग्यावर होतो. जनावरांचे उत्पादन, तसेच प्रजननक्षमता कमी होते. आजही देशातील 18 टक्क्यांपर्यंत पशुधन दरवर्षी वेगवगळ्या कारणांनी बळी पडते. ही गांभीर्याने विचार करण्यासारखी बाब आहे. उन्हाळ्यात जनावरे चारा कमी आणि जास्त पाणी पीत असल्यामुळे रवंथ कमी होऊन अपचन होते. आम्लाचे प्रमाण वाढते, तसेच घामावाटे सोडियम आणि पोटॉशियम यांसारख्या क्षारांचे प्रमाण कमी होते. त्याचा परिणाम एकूणच शरीरप्रक्रियेवर होतो.