भाजीपाला पिकात मल्चिंग पेपरचा वापर

डिजिटल बळीराजा    27-Apr-2018
 
 
आच्छादनासाठी वाळलेला पालापाचोळा, गव्हाचे काड, लाकडाचा भुस्सा, भाताचे तूस, उसाच्या पाचटाचा वापर केला जातो. या बरोबरच आता पॉलिथीन कागदाचा सुद्धा वापर वाढला आहे. भाजीपाल्याच्या चांगल्या उत्पादनासाठी पॉलिथीन आच्छादनाचा वापर फारदेशीर दिसून आला आहे.
 
पाण्याचा तुटवडा, तणांच्या वाढीमुळे होणारे नुकसान या बाबींचा विचार करता भाजीपाल्यामध्ये आच्छादनाचा वापर आवश्यक  आहे. 
 
1) पॉलिथीन कागद आच्छादनासाठी वापरल्याने पिकासोबत स्पर्धा करणारेअनेक तण नियंत्रित राहतात. यामुळे पिकास दिलेली खते भाजीपाला रोपांच्या वाढीसाठी उपलब्ध होतात. 
2) पॉलिथीन कागदाच्या आच्छादनामुळे पाण्याचे बाष्पीभवन कमी होते, यामुळे कमी पाण्यातसुद्धा उन्हाळ्यात पिकांचे भरघोस उत्पादन मिळते. 
3)आच्छादन ठिबक सिंचनासोबत वापरणे जरुरीचे आहे. पॉलिथीन कागदाचे आच्छादन केल्यास ठिबक लॅटरलचे आयुष्यमान वाढते. 
4) रासारनिक खते उघड्या जमिनीत दिल्यास यातील बराच मोठा अंश वातावरणाशी संपर्क आल्याने जमिनीतून नष्ट होतो, यामुळे जमिनीत दिलेल्या खताचे अपेक्षित परिणाम पिकावर दिसत नाहीत. पॉलिथीन आच्छानामुळे अन्न द्रव्यांचा  र्‍हास कमी होतो. 
5) उन्हाळ्यामध्ये दिवसा जमिनीचे तापमान झपाट्याने वाढते. अनेकदा पिकाच्या मुळांना ते सोसत नाही. हे टाळण्यासाठी पॉलिथीन कागदाचे आच्छादन उपरोगी  ठरते. 
6) हिवाळ्यात जमिनीचे तापमान विशेषत: रात्रीच्या वेळी खूप खाली जाते. यामुळे अनेक सूक्ष्म अन्नद्रव्यांचे शोषण होत नाही. त्यामुळे पिकांच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो. 
7) पॉलिथीन कागदाच्या आच्छादनामुळे जमिनीचे तापमान नियंत्रित राहते. उन्हाळ्रात ओलावा टिकून राहतो. 
8) आच्छादनामुळे तापमान, अति आर्द्रता नियंत्रित राहिल्यामुळे पीक वाढीला फायदा होतो. 
9) आच्छादन वापरल्याने फळांचा मातीशी संपर्क न आल्याने फळांची प्रत सुधारते. फळांचा आकर्षकपणा टिकून राहून भाव चांगला मिळतो. 
10) टोमॅटोमध्ये  आच्छादन वापरल्यास  मूळकुज, खोडकुज, पानांवरील करपा या रोगांचा प्रादुर्भाव कमी दिसून आला आहे. 
11) पिकास दिलेली भर, उंच गादीवाफ्यांचा अवलंब आणि यासोबत ठिबक सिंचनाची व्यवस्था यामुळे शोषक मुळांच्या  परिसरातील जास्त झालेले पाणी शेतातून  बाहेर काढण्यास  सुलभ होते. परिणामी, रोग नियंत्रित राहतात.
12) काही किडींचे अवशेष गळून पडलेल्या फळांवाटे व पानांवाटे जमिनीत जातात. तेथे काही काळ सुप्त अवस्थेत राहून पुन्हा पिकावर प्रादुर्भाव करतात. पॉलिथीन कागदाचे आच्छादन केल्यास किडींच्या जमिनीतील वाढीस अटकाव होऊन फळांच्या विक्री योग्य उत्पादनात वाढ होते. 
13) पॉलिथीन मल्चिंग केल्यामुळे पांढरी माशी, लाल कोळी यांचाही प्रादुर्भाव कमी होतो. 
14) पॉलिथीन आच्छादनामुळे माती मोकळी, भुसभुशीत राहते, यामुळे मुळांभोवती हवेशीरपणा वाढतो. तसेच उपरुक्त सूक्ष्म जिवाणूंची वाढ मोठ्या प्रमाणावर होते. 
15) आंतर मशागत करताना पिकाची मुळे बर्‍राचदा तुटतात. पॉलिथीन मल्चिंगमुळे मुळांची वाढ कागदा खालीच होते. यामुळे आंतरमशागत करताना मुळे तुटत नाहीत. 
16) आच्छादनाचा फायदा उत्पादन वाढीमध्ये ही दिसून आला आहे.
 
 

 
 
 
भाजीपाला पिकांसाठी मल्चिंग पेपरचा वापर :
 
बाजारामध्ये अनेक प्रकारचे मल्चिंग पेपर उपलब्ध आहेत. यापैकी एक मीटर रुंदी असणारे चंदेरी रंगाचे प्लॅस्टिक पेपर निवडावेत. मल्चिंग पेपरची जाडी 25 ते 30 मायक्रॉन एवढी असावी. मल्चिंग पेपर साधारणत: 400 मीटर लांबी मध्ये उपलब्ध असतात. लागवडी अगोदर माती परीक्षण आवश्यक आहे. यानुसार लागवड पूर्व खताची मात्रा ठरवावी. 
जमिनीची नांगरट करून माती भुसभुशीत करावी. तीन फूट रुंदीचे गादी वाफे तयार करावेत. पिकाच्या दोन ओळींमध्ये पाच फूट आणि दोन रोपांमध्ये दोन ते अडीच फूट जातीनुसार लागवड अंतर ठेवले जाते. साधारणत: प्रति एकरी 400 मीटर लांबीचा एक याप्रमाणे पाच ते सहा बंडल पॉलिथीन आच्छादन कागद लागतो. पॉलिथीन कागद अंथरण्यापूर्वी गादीवाफ्यावरील मातीमध्ये शेणखत व रासारनिक खतांची मात्रा द्यावी लागते. गादीवाफा निर्जंतुक करून घ्यावा. गादीवाफ्यावर आच्छादन कागद अंथरुन दोन्ही बाजूंनी तो मातीमध्ये गाडून टाकावा. कागद अंथरण्यापूर्वी योग्य अंतरावर ड्रिपर असणारी लेंटरल अंथरणे गरजेचे असते. पॉलिथीन मल्चिंगवर दोन ते अडीच फुटांवर नऊ ते दहा सेंमी. व्यासाची छिद्रे पाडून घ्यवीत, जेणे करून ट्रेमध्ये तयार केलेली रोपे यामध्ये लावता येतील. 
 
 
मल्चिंगसाठी गादीवाफे तयार करणे :
 
उभी-आडवी नांगरट करून माती भुसभुशीत करावी. मोठी ढेकळे फोडून घ्यावीत. अणकुचीदार दगड-गोटे किंवा मागील पिकाची धसकटे वेचून बाहेर काढावीत. रोटाव्हेटर किंवा कुळवाच्या मदतीने गादीवाफे तीन ते चार फूट अंतरावर तयार करावे लागतात, जेणे करून पिकांच्या दोन ओळींमधील अंतर पाच फूट राहते. अशा गादी वाफ्यावर एकरी 10 ते 15 टन चांगले कुजलेले शेणखत पसरावे, यामध्ये 500 किलो निंबोळी पेंड आणि एस.एस.बी. अ‍ॅझेटोबॅक्टर, ट्रारकोडर्मा प्रत्येकी सहा किलो मातीत मिसळावे. माती परीक्षण करून लागवड पूर्व द्यावयाची खतमात्रा ठरवावी. खतमात्रा देऊन गादीवाफे लागवडीस तयार करावेत. 
मल्चिंग पेपर गादीवाफ्यावर पसरण्यापूर्वी ठिबकची लेंटरल अगोदर टाकून घ्यावी. यानंतर मल्चिंग पेपर पसरावा. कागदाच्या दोन्ही बाजू मातीमध्ये गाडून घ्याव्यात. धातूच्या धारदार कडा असणार्‍रा ग्लासचा उपरोग करून त्रिकोणी पद्धतीने दीड फुटावर छिद्रे तयार करावीत. गरज भासल्यास ग्लास विस्तवावर गरम करून छिद्र पाडावे. छिद्राचा व्यास तीन इंचां पर्यंत असावा. या छिद्रांमध्ये रोपांची लागवड करावी. आंतर मशागतीची कामे करताना, फळांची काढणी करताना पेपर फाटणार नाही याची काळजी घ्यावी.
-गजानन ज. तुपकर
विषय विशेषज्ञ (उद्यान विद्या)
डॉ. उमेश ठाकरे
कार्यक्रम समन्वयक
कृषि विज्ञान केंद्र, अकोला