फायदेशीर गुंतवणूक- कोकम लागवड

डिजिटल बळीराजा    09-Feb-2018

 
 
कोकम या फळपिकाची शास्त्रोक्त पद्धतीने लागवड करण्यासाठी सुधारित जाती; लागवड व निगा, खते व रोगांचा बंदोबस्त यासंबंधीची माहिती व अधिक उत्पादन मिळण्यासाठी काय करावे ते या लेखात सादर केले आहे.
 
 
कोकणामध्ये विविध प्रकारची फळझाडे आढळतात, त्यामध्ये कोकम हे प्रामुख्याने आढळणारे सदाहरित फळझाड आहे. गोवा, सह्याद्रीचा डोंगर उतार आणि पूर्ण कोकण किनारपट्टीमध्ये नारळ- सुपारीच्या बागा, परसबाग आणि नैसर्गिकपणे वाढणारी कोकम रोपे आढळतात. कोकमाचे फळ कच्चे असताना तसेच पिकून लाल रंगाचे झाल्यावर त्याचे विविध पदार्थ करून, साठवून वर्षभर त्यांचा विविध अन्नपदार्थांत वापर करतात.
 
कोकमास उष्ण आणि दमट हवामान मानवते. रोपांपासून वाढणारे झाड सरळ वाढते, मात्र त्यामध्ये 50 टक्के नर आणि 50 टक्के मादी झाडे निपजतात. त्यामुळे लागवड केल्यानंतर 50 टक्के झाडांपासूनच किफायतशीर उत्पादन मिळते. आंबा, काजू, नारळ, सुपारी झाडांच्या बागेसारखी कोकमाची सलग लागवड क्वचितच पाहावयास मिळते. यामुळेच कोकणात मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेल्या पडीक जमिनीवर या फळपिकाची शास्त्रोक्त पद्धतीने लागवड केल्यास खालीलप्रमाणे फायदे होतील :
 
1) लागवड योग्य पडीक जमीन लागवडीखाली येईल.
2) फळ प्रक्रिया उद्योगास चालना मिळून नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
3) कृषि उत्पन्न वाढल्याने विकासास चालना मिळेल.
 
डॉ. बाबासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने मृद्काष्ठ कलम पद्धत विकसित केली आहे. त्यामुळे खात्रीशीर अधिक उत्पन्न देणाऱ्या कोकम जातींची लागवड करणे शक्य आहे. लागवड करताना 90 टक्के मादी झाडे आणि 10 टक्के नर झाडांची कलमे घेऊन लागवड करावी.
 
सुधारित जाती :
कोकण अमृता : डॉ. बा. सा. कोकण कृषी विद्यापीठाने ही मादी प्रकारची जात विकसित केली आहे. पूर्ण वाढलेल्या झाडापासून 140 किलो फळे प्रति वर्र्षी मिळतात. फळे मध्यम आकाराची, जाड सालीची आणि आकर्षक लाल रंगाची असतात. फळे पावसाळ्यापूर्वी पिकतात त्यामुळे फळांचे नुकसान होत नाही.
 
कोकण हातीस : डॉ. बा. सा. कोकण कृषी विद्यापीठाने ही मादी प्रकारची जात विकसित केली आहे, पूर्ण वाढलेल्या झाडापासून 150 किलो फळे प्रती वर्षी मिळतात. या जातीची फळे मोठी, जाड सालीची आणि गर्द लाल रंगाची असतात. मोठ्या आकाराच्या फळांमुळे या जातीची मागणी जास्त आहे. 
 
लागवड आणि निगा : लागवडीसाठी मे महिन्यात 6 बाय 6 मीटर अंतरावर 60 बाय 60 बाय 60 सेंमी आकाराचे खड्डे काढावेत आणि पावसाळ्यापूर्वी चांगली माती, 1 घमेले कुजलेले शेणखत व एक किलो सुपर फॉस्फेट यांच्या मिश्रणाने भरून घ्यावेत. रोपांचे अथवा कलमांचे वाळवीपासून संरक्षण करण्यासाठी 50 ग्रॅम 2 टक्के फॉलिडॉल पावडर प्रत्येक खड्ड्यात टाकावी आणि पावसाच्या सुरुवातीला प्रत्येक खड्ड्यात एक वर्षाची निरोगी, जोमदार वाढणारी रोपे किंवा कलमे लावावीत.
 
विशेषत : कलमे लावल्यानंतर ताबडतोब त्यांना काठीचा आधार द्यावा. आधार देऊन सरळ वाढू दिल्याने कलम उभे सरळ वाढते, लवकर उत्पन्न देते आणि रोपांपेक्षा लवकर उत्पन्न मिळू शकते. कलमाच्या जोडाखाली पहिली दोन वर्षे वारंवार फुटवा वाढतो, तो काढून टाकावा, अन्यथा फुटवा वाढून कलम मरण्याची शक्यता असते. लागवडीच्या पहिल्या वर्षी कडक उन्हापासून संरक्षण करण्यासाठी कलमे अगर रोपांना सावली करावी. बागेमध्ये साधारणत: 10 टक्के नर झाडे लावावीत. लागवडीनंतर प्रत्येक झाडास पहिली किमान दोन वर्षे 10 लिटर प्रति दिनी ठिबक सिंचनाद्वारे पाणी द्यावे.
 
खते : कोकमापासून अधिक उत्पन्न मिळविण्यासाठी पहिल्या वर्षापासून खते देणे आवश्यक आहे. खते ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये द्यावीत. खताची मात्र पहिल्या वर्षापासून त्याच प्रमाणात 10 वर्षांपर्यंत वाढवावी आणि 10व्या वर्षी आणि पुढे तीच कायम ठेवावी.
 
खताची मात्र पुढीलप्रमाणे आहे :
 
वर्ष शेणखत नत्र स्फुरद पालाश
1ले 2 किलो 100 ग्रॅम 150 ग्रॅम 50 ग्रॅम
10 वे 20 किलो 1 किलो 1.5 किलो 500 ग्रॅम
 

 
 
 
पिंक रोग : या बुरशीजन्य रोगामुळे सुरुवातीला पांढर्या रंगाचे गोलदार ठिपके पानांवर पडतात. अनेक फांद्यांना या रोगाची लागण झाल्यास फांद्या मरतात आणि उत्पन्नावर विपरीत परिणाम होतो. फांद्यांचा लागण झालेला भाग कापून काढून त्यावर बोर्डो पेस्ट लावावी. 
 
काढणी, उत्पन्न आणि उपयोग : कोकमामध्ये फळधारणा 5व्या वर्षापासून सुरू होते. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये फुले लागतात आणि मार्च ते मेमध्ये फळे तोडणीस तयार होतात. हिरव्या रंगाची फळे फोडून वाळवतात त्यांचा उपयोग मोठ्या प्रमाणात अन्नपदार्थ साठविण्यासाठी आणि आंबटपणा आणण्यासाठी करतात. फळे पिकल्यावर गर्द लाल किंवा काळसर लाल रंगाची होतात. त्यांचा उपयोग आमसुले (वाळवलेली, रस लावलेली कोकम साल), कोकम आगळ (मिठाचा वापर करून साठवलेला रस) आणि अमृत कोकम (कोकम सरबत) इत्यादींसाठी केला जातो. कोकमाच्या बियांमध्ये घनस्वरूपात असलेले तेल असते, त्याला कोकम बटर असे म्हणतात. कोकम बटरचा उपयोग सौंदर्यप्रसाधने तसेच औषधांमध्ये, क्रीममध्ये केला जातो. पूर्ण वाढलेल्या कोकम झाडापासून 140 ते 150 किलो फळे मिळतात.
 
कोकम बागायतदार शेतकरी मित्रांस विशेष सल्ला :
1) कोकम झाडाचे वय वाढते तसे उत्पन्न वाढते- त्यामुळे त्याला नियमित खताची मात्रा द्यावी. खत दिल्यामुळे फळे नियमित मिळतात, फळांचा दर्जा चांगला राहतो.
2) कोकमाच्या झाडाला भरपूर सूर्यप्रकाश मिळेल याची काळजी द्यावी. त्याच्यावर सावली करणारी आजूबाजूची झाडे कमी केल्यास फळधारणा वाढते, फळे आकाराने मोठी होतात.
3) कोकमाच्या झाडावरील मेलेल्या फांद्या कमकुवत फांद्या कापून नष्ट कराव्यात. मात्र, कोकमामध्ये जमिनीकडे वाढणार्या (जिओट्रॉपिक) फांद्यांवर फुले आणि फळे लागतात अशा फांद्या तोडू नयेत.
4) कोकमाच्या झाडाला फळे लवकर तयार होण्यासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने शिफारस केल्याप्रमाणे फळधारणा झाल्यावर (जानेवारी-फेब्रुवारीमध्ये) 3 टक्के पोटॅशियम नायट्रेटची (13:0:45) फवारणी करावी. ही फवारणी पुन्हा 20 दिवसांनंतर करावी. या फवारणीमुळे फळे लवकर तयार होतात, फळांचा आकार वाढतो, झाडांचे उत्पादन वाढते तसेच फळांची प्रतदेखील सुधारते. 
 
डॉ. जी. आर. खांडेकर, उद्यानविद्यावेत्ता आणि डॉ. बी. आर. साळवी,
प्रमुख, उद्यानविद्या विभाग, डॉ. बा. सा. कोकण कृषी विद्यापीठ, दापोली