हुमणी अळीचे एकात्मिक व्यवस्थापन

डिजिटल बळीराजा    09-Feb-2018
 
 
हुमणी ही कीड शेतकर्यांना अतिशय कठीण व ज्वलंत समस्या म्हणून सामोरी आली आहे. मागील काही वर्षापासून हुमणी अळी बुलढाणा, जालना, नांदेड, अहमदनगर, कोल्हापूर व मराठवाड्यातील विविध ठिकाणी वेगवेगळया पिकांना नुकसानकारक ठरत आहे. किडींचा प्रादुर्भाव जवळपास सर्व पिकांवर कमी-जास्त प्रमाणात दिसून येत आहे. त्यामुळे या किडीचे वेळीच व्यवस्थापन कसे करार्वें या विषयाची माहिती या लेखात वाचावयास मिळेल.
 
 
हुमणी (Holotrichia species) ही कीड महाराष्ट्रातील विविध भागांत वेगवेगळ्या नावांने ओळखली जाते उदा. भुंगेरे, उन्नी, ऋणी, उकरी, खतातील अळी, मुळे खाणारी अळी असे प्रचलित नावे आहे. हुमणी ही कीड शेतकर्यांना अतिशय कठीण व ज्वलंत समस्या म्हणून सामोरी आली आहे. मागील काही वर्षापासून हुमणी आळी बुलढाणा, जालना, नांदेड,अहमदनगर, कोल्हापूर व मराठवाड्यातील विविध ठिकाणी वेगवेगळया पिकांनानुकसानकारक ठरत आहे. किडींचा प्रादुर्भाव जवळपास सर्व पिकांवर कमी जास्त प्रमाणात दिसून येत आहे. त्यामुळे ह्या किडीचे वेळीच व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.
 
हुमणीचा प्रसार होण्याची अनेक कारणे आहेत : 
 
- एकाच स्वरुपाची पिके वर्षानुवर्षे घेणे.
- मोठ्या प्रमाणात जंगलतोड
- अनिश्चित स्वरूपाचे हवामान, 
- एकात्मिक संरक्षण उपायांचा अभाव,
- शेणखताची काळजी न घेणे, 
- शेतीची कमी आंतरमशागत. 
- हलकी जमीन तसेच कमी पाण्याच्या प्रदेशात ही कीड जास्त प्रमाणात आढळते. 
- भुंगेर्यांना लागणारे खाद्य जवळ असल्यास हुमणीचा त्रास मर्यादित क्षेत्रातच होतो; परंतु खाद्य लांब असल्यास हुमणीचा प्रसार वाढत जातो.
 
ओळख व जीवनक्रम : हुमणी ह्या किडीच्या चार अवस्था असतात. पहिल्या चांगल्या पावसानंतर मे किंवा जूनमध्ये सुप्तावस्थेतील प्रौढ भुंगेरे जमितीतून बाहेर निघून संध्याकाळी खाद्य वनस्पती बोर, बाभूळ व कडुलिंब यांच्याभोवती थोडा वेळ उडतात. नंतर झाडावर बसून रात्रभर पाने खातात. नर व मादीचे मिलन रात्रीलाच या झाडावर होते. पहाट झाल्यानंतर हे भुंगेरे जमिनीत लपतात. मिलन झाल्यानंतर मादी सकाळी ओलसर मातीमध्ये 7 ते 12 सें.मी खोलीपर्यंत अंडी घालते. अंडी जून, जुलै व ऑगस्टपर्यंत घातली जातात.
 
अंडी : अंडी पिवळसर पांढरी व आकाराने अंडाकृती असतात. पहिल्या पावसानंतर मे किंवा जूनमध्ये प्रौढ भुंगे सुप्तावस्थेतून बाहेर निघतात. संध्याकाळच्या वेळी प्रौढ भुंग्याचे मिलन बाभूळ, बोर किंवा कडुनिंबाच्या झाडावर होते. दुसर्या दिवशी सूर्योदयापूर्वी सकाळी मादी जमिनीमध्ये साधारणपणे 11 ते 12 सें.मी. खोलपर्यंत साबुदाण्याच्या आकाराची व लांबट गोल अंडी घालते त्यावर मातीचे आवरण केर्लें जाते. नुकतीच घातलेली अंडी रंगाने पांढरी असतात, जसजशी अंड्याच्या आतील जीवाची वाढ होते, तसतसा अंड्याचा रंग तांबूस होत जार्तों. अंडी 9 ते 10 दिवसांमध्ये उबतात. 
 
अळी : अंड्यातून बाहेर पडलेल्या अळीला हुमणी असे म्हणतात. अळीच्या तीन अवस्था असतात. अंड्यातून बाहेर पडलेल्या पहिल्या अवस्थेतील अळी जमिनीतील कुजलेले सेंद्रिय पदार्थ खाते. प्रथम अवस्थेतील अळी पांढरीशुभ्र, पिवळे डोके व सुमारे 8 मि.मी. लांबीची असते. दुसर्या व तिसर्या अवस्थेतील अळ्या पिकांच्या मुळाना कुरतडून त्यावर उपजीविका करतात. अळीची पूर्ण वाढ 6 ते 8 महिन्यामध्ये होते. पूर्ण विकसित अळ्या पिवळट-पांढर्या, डोक्याचा रंग बदामी व शरीराने इंग्रजीच्या सी’अक्षराप्रमाणे अर्धगोलाकार असते. पुर्ण वाढ झालेली अळी जमिनीत 20 ते 25 सें.मी. खोलीवर मातीचे कोषावरण तयार करुन त्यामध्ये कोषावस्थेत जातात.
कोष : कोष अवस्था ही सुरुवातीला मऊ व फिकट पिवळसर रंगाचा असतो व नंतर तांबूस तपकिरी रंगाचा व टणक होतो. सुमारे 20 ते 25 दिवसानंतर कोषामधून भुंगेरे बाहेर येतात, परंतु जमिनीतच तो काही काळ पडून राहतात. उन्हाळ्यात वळवाचा पाऊस झाल्यानंतर हे भुंगेरे बाहेर पडतात. 
 
प्रौढ : कोषातून नुकतेच बाहेर पडलेर्लें भुंगेरे सुरुवातीस पिवळसर पांढरट असतात. त्याचे पंख पांढरट तपकिरी असतात. कालांतराने पंख व शरीर कठीण बनतात आणि रंग तांबूस तपकिरी होतो. प्रौढ भुंगेर्यांची लांबी 1 ते 3 सें.मी व रुंदी 1 सें.मी. एवढी असते. समोरील पंख जाड व टणक असतात. त्यामुळे भुंगेरे लांबवर उडू शकत नाही. मादी ही नरापेक्षा थोडी मोठी असते. भुंगेरे निशाचर असतात व त्यांचे आयुष्य सुमारे 80 ते 90 दिवसांपर्यंत असते. हुमणीची अशा प्रकारे एका वर्षात एक पिढी पूर्ण होते. प्रामुख्याने नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये कोषामधून प्रौढ बाहेर निघतात. कोषातून निघणारे प्रौढ कीटक पहिल्या पावसापर्यंत जमिनीतच सुप्तावस्थेत राहतात. पहिल्या चांगल्या पावसानंतर मे किंवा जूनमध्ये सुप्तावस्थेतील प्रौढ भुंगेरे जमितीतून बाहेर निघतात. संध्याकाळी हे प्रौढ भुंगेरे खाद्य वनस्पतीभोवती थोडा वेळ उडतात व नंतर झाडावर बसून रात्रभर पाने खातात. नर व मादीचे मिलन रात्रीलाच या झाडावर होते. पहाट झाल्यावर हे भुंगेरे जमिनीत लपतात. मिलन झाल्यानंतर मादी सकाळी ओलसर मातीमध्ये 7 ते 12 सें.मी खोलीपर्यंत अंडी घालते. एक मादी साधारणपणे 20 ते 25 अंडी घालते. अंडी जून, जुलै व ऑगस्टपर्यंत घातली जातात.
 
खाद्य वनस्पती 
- ही बहुभक्षी कीड आहे.
- प्रौढ भुंगेरे व अळी यांच्या खाद्य वनस्पती वेगवेगळ्या आहेत.
- प्रौढ भुंगेरे : प्रौढ भुंगेरे बाभुळ, बोर व कडुनिंबाची पाने खातात.
- अळी : अळी विविध पिकांच्या मुळांना कुरतडून त्यावर उपजीविका करते, जसे सोयाबीन, तूर, ज्वारी, बाजरी, गहू, मका, ऊस, भुईमूग, सूर्यफूल, मूग, मिरची, बटाटा, चवळी, टोमॅटो, कांदा, हळद, आर्लें, भाजीपाला पिके इत्यादी.
 
नुकसानीचा प्रकार :
- हुमाणीचा उपद्रव दोन अवस्था मध्ये होतो. त्यापैकी भुंगेरे हे पहिल्या, वळवाच्या पावसानंतर कडूलिंब, बाभूळ व बोर ह्या झाडांची पाने खातात. तर अळ्या पिकाची मुळे खातात्त. अळी अवस्था पिकास अत्यंत हानिकारक आहे.
- प्रथमावस्थेतील अळ्या पिकाची तंतुमुळे खातात. ती उपलब्ध नसल्यास सेंद्रिय पदार्थ खातात. तंतुमुळांचा फडशा पाडल्यानंतर मुख्य मुळे खाण्यास सुरू करतात. परिणामी झाडाची अन्नद्रव्य व पाणी शोषण करण्याची प्रक्रिया मंदावते किंवा थांबते ज्यामुळे पिकाची शाकीय वाढ खुंटते आणि झाड वाळण्यास सुरवात होते’. एका झाडाचे मूळ कुरतडून खाल्ल्यानंतर हुमणी दुसर्या झाडाकडे वळते. प्रादुर्भावग्रस्त झाडे सहज उपटली जातात व जास्त प्रादुर्भाव झालेल्या पिंकांचा नाश होतो.
- ऊस , ज्वारी, भुईमूग, सोयाबीन, मिरची, मका, हळद व भाजीपाला या पिकांवरती प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळून येतो. नुकसान प्रामुख्याने आढळणारे महिने- ऑगस्ट-नोव्हेंबर हे आहेत.
- उसाच्या उगवणीत ही कीड 40 टक्के नुकसान करते. 
- नुकसानीची तीव्रता- 20 ते 80 टक्के असते. 
 
आर्थिक नुकसान पातळी-
- एक अळी प्रति चौरस मीटर.
- कडुलिंबाच्या किंवा बाभळीच्या झाडांवर सरासरी 20 अगर त्यापेक्षा जास्त भुंगेरे आढळल्यास.
- हुमणीग्रस्त शेतात पावसाळ्यात कडुनिंब अथवा बाभळीची पाने अर्धचंद्राकृती खाल्लेली आढळल्यास नियंत्रणाचे उपाय योजावेत.
 
एकात्मिक व्यवस्थापन :
- हुमणीच्या जीवनक्रमातील सर्व अवस्था जमिनीतच असतात. याला एकच अपवाद म्हणजे पावसाळ्याच्या सुरवातीला सुर्यास्तानंतर मिलनासाठी बाभळीच्या आणि कडूलिंबाच्या झाडावर जमा होणारे प्रौढ कीटक वास्तविक हुमणीच्या जीवनातील हा एक कच्चा दुवा असल्याने त्यावर बंदोबस्तासाठी जास्तीत जास्त भर देणे आवश्यक आहे. प्रौढ भुंगेरे व अळया यांचे खाद्य वेगवेगळी आहेत. त्यामुळे या दोन्हीचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.
 
प्रौढ भुंगेर्यांचे व्यवस्थापन :
- एप्रिल मे महिन्यात शेतामध्ये व जवळपास असलेल्या बाभूळ, बोर आणि कडूलिंबाच्या झाडावर भुंगेरे येतात, म्हणून अशा झाडाच्या मोठ्या फांद्या तोडून टाकाव्यात किंवा 2-4 लहान झाडे तशीच शेतामध्ये ठेवावीत. उंच व मोठ्या झाड्यांच्या सर्व फांद्या तोडवयाच्या नसतील तर वरच्या लहान लहान फांद्या अवश्य तोडाव्यात, म्हणजेच झाडांची उंची कमी होईल. झाडावरील भुंगेरे रात्री 8 ते 9 वाजता बांबूच्या काठीच्या साहाय्याने झाडाच्या फांदया हलवून खाली पाडावेत आणि प्रौढ भुंगेरे हाताने वेचून रॉकेलमिश्रीत पाण्यात मिसळून त्यांचा नायनाट करावा. 
- उन्हाळ्यातमध्ये जमिनीची खोल नांगरट करावी. त्यामुळे जमिनितील सुप्तावस्थेतील प्रौढ भुंगेरे पृष्ठभागावर येतात. हे भुंगेरे सूर्यप्रकाशाच्या उष्णतेमुळे मरतात किंवा पक्ष्यांनी खाल्यामुळे त्यांचा बंदोबस्त होतो. नांगरणी केल्यानंतर उघडे पडलेले सुप्तावस्थेतील प्रौढ भुंगेरे हाताने वेचून रॉकेलमिश्रित पाण्यात मिसळून त्यांचा नायनाट करावा.
- प्रकाश सापळयांचा वापर करुन देखील प्रौढ भुंगेरे जमा करता येतात. हे प्रकाश सापळे सर्व शेतकर्यांनी शेतामधील घर, झोपडी,विहीरीजवळ किंवा झाडावर लावावेत. सापळयात जमा झालेले भुंगेरे नष्ट करावेत. हे सापळे साधारणपणे संध्याकाळी 7.00 ते 8.30 या कालावधीत लावावेत.
- रासायनिक पध्दती:जमिनीतून प्रौढ भुंगेरे निघण्याच्या कालावधीत बाभूळ, कडुलिंब, इत्यादी झाडांवर सरासरी 20 अगर त्यापेक्षा जास्त भुंगेरे आढळल्यास किंवा झाडाची पाने खाल्लेलीआढळल्यास मे-जूनमध्ये क्लोरपायरीफॉस ( 20 टक्के प्रवाही) 25 ते 30 मि.लि. प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून झाडावर फवारणी करावी. 
- प्रौढ भुंगेर्याचे व्यवस्थापन अंडी घालण्याअगोदरच झाल्यामुळे अळीपासून पिकांना होणारे नुकसान टाळता येते.
 
अळीचे व्यवस्थापन :
- प्रौढ भुंगेरे पहिल्या पावसानंतर जमिनीत अंडी घालतात. अंडयातून बाहेर निघालेली अळी पिकांची मुळे कुरतडून नुकसान करते, यासाठी हुमणीच्या अळीचे व्यवस्थापन खालीलप्रमाणे करावे.
- पिककाढणीनंतर लगेच खोल नांगरट करावी. नांगरणीमुळे उघड्या पडणार्या अळ्या गोळा करून रॉकेल मिश्रित पाण्यात टाकून माराव्यात.
- पिकामध्ये शक्य असेल तोपर्यंत आंतरमशागत करावी. निंदणी आणि कोळपणी ही आंतरमशागतीची कामे केल्यास हुमणीच्या अळ्या जमिनीच्या पृष्ठभागावर येतात. या अळ्यांना पक्षी वेचून खातात किंवा सुर्यप्रकाशाच्या उष्णतेमुळे मरतात. आंतरमशागत करतेवेळी शेतातील अळ्यां हाताने वेचून नष्ट कराव्यात.
- पूर्ण कुजलेल्या शेणखताचा वापर करावा. शेणखतामध्ये हुमणीच्या अळ्या आढळून आल्यास मिथाईल पॅराथिऑन 2 टक्के हे कीटकनाशक 1 किलो प्रति एक टन शेणखत या प्रमाणात मिसळावे.
- खरिपातील पीककाढणीनंतर शेतामध्ये खोल नांगरट करावी, त्यामुळे जमिनीतील अळ्या पृष्ठभागावर आल्यानंतर पक्षी वेचून खाल्यामुळे किंवा सुर्यप्रकाशामुळे त्याचे व्यवस्थापन होण्यास मदत होईल.
- शेतामध्ये शक्य असल्यास वाहते पाणी साचू द्यावे त्यामुळे जमिनीतील अळ्या काही प्रमाणात जमिनीतून बाहेर येतील अशा अळ्या पक्षी वेचून खातात किंवा त्या हवेअभावी जमिनीतच गुदमरून मरून जातील.
- मेटारायझियम निसोप्ली या उपयुक्त बुरशीचा 10 किलो प्रति हेक्टर या प्रमाणात जमिनीतून वापर करावा. ही बुरशी हुमणीच्या अळ्यांना रोगग्रस्त करते, त्यामुळे अळ्यांचा बंदोबस्त होतो.
 
रासायनिक कीड नियंत्रण
 
कीटकनाशक मात्रा पीक
कार्बोफ्युरोन 3% दाणेदार 33 कि.ग्रॅ / हेक्टर भुईमूग.
फोरेट 10 टक्के दाणेदार . 25 किलो / हेक्टरी बाजरी, ऊस, भुईमूग ,मिरची, मका, ज्वारी
फिप्रोनील 40 % + इमिडाक्लोप्रीड 40 % डब्ल्यू जी 4 ग्रॅम /10 लिटर ऊस पिकामध्ये पाण्यात मिसळून पिकाच्या खोडाभोवती आळवणी करावी.
 
लेखक,
डॉ. समीर लांडे ( विभागप्रमुख)
प्रा. किरण बुधवत (सहाय्यक प्राध्यापक)
किटकशास्त्र विभाग 
श्री शिवाजी कृषी महाविद्यालय, अमरावती