भारतीय गोवंशाचे शास्त्रीय संवर्धन करा

डिजिटल बळीराजा    08-Feb-2018
 
 
भारतीय गोवंशाचे शास्त्रीय संवर्धन कशा प्रकारे करावे आणि ते कसे फायदेशीर आहे, ह्या विषयी विस्तृत माहिती या लेखात वाचावयास मिळणार आहे.
 
 
माझा गेली पन्नास वर्षे शास्त्रीय पशुसंगोपन प्रचारक, पशुशल्यचिकित्सक, पशुपोषण, पशुप्रजनन, पशुआरोग्य, रोगप्रतिबंधन (प्रिव्हेन्शन) तज्ज्ञ या विविध पातळ्यांवर जवळजवळ सर्व भारतभर कार्य करताना (अजूनही त्याच जोमाने हे सर्व कार्य हातावेगळे होत आहे.) शहरी/ग्रामीण भागातील सर्व वर्गांच्या पशुपालकांच्या मनाचा ठावठिकाणा, तसेच पशुपालनाविषयीची मानसिकता, व्यावहारिकता, त्यातील राजकारण, समाजकारण, अर्थकारण, पशुपालनशास्त्र जाणून घेण्याची त्यांची नीती वगैरे कंगोर्यांचा अगदी जवळून अभ्यास झाला.
 
तसेच, हे करत असताना ज्या कै. डॉ. मणिभाई देसाई यांनी जवळजवळ 24 ते 25 वर्षे ‘गीर’ (भारतीय शुद्ध देशी गायीची दुधाळ जात) गायींचा मोठा कळप उरुळी कांचन येते सांभाळला- त्यांंच्या सोबत पुढे 30 वर्षे गायीवरच काम करण्याची संधी मिळाली. शेकडो खेडेगावांत काम केले. या सर्व अनुभवावर ‘भारतीय गोवंशाचे शास्त्रीय संवर्धन’याविषयी प्रकाश टाकणार आहे. 
इतिहास काय सांगतो?
 
आपल्या भारत देशात ‘हिंदु’धर्मीय लोकसंख्या इतर कोणत्याही देशापेक्षा (सध्या पृथ्वीवर 214 देश आहेत) फारच अधिक आहे; पण या लोकसंख्येमध्ये गेल्या तीन दशकांचा आढावा घेतल्यास इतर धर्मीयांच्या मानाने ही वाढ कमी झाली आहे. याचे कारण म्हणजे ‘हिंदू’ संस्कृती मुळातच सहिष्णू आहे. तसेच दुसर्या धर्मातील प्रजेला जबरदस्तीने धर्मांतर करून घेण्याची वृत्ती/प्रवृत्ती/ संस्कार अजिबातच नसल्याने लोकसंख्यावाढीवर हिंदू जनतेने कायमच ताबा ठेवला आहे.
 
‘गाय’हा प्राणी म्हटला म्हणजे त्याचा संबंध हिंदुधर्मीयांशीच जोडला जातो. हिंदू व गाय याचे नाते अजोड आहे. गायीची नाळ हिंदुधर्मीयांशी जोडला गेली आहे. हिंदू धर्माचे रक्षण करणे म्हणजे गोवंशाचे संरक्षण हे समीकरण आहेच.
 
अनादिकालापासून गायीला अनेकविध भूषणे लावली आहेत. तिच्या पोटात म्हणजे शरीरात 33 कोटी देवांची वस्ती आहे, म्हणून ती इतर कोणत्याही चार पायांच्या प्राण्यापेक्षा पवित्र आहे अशी धारणा आहे. ती गेली हजारो वर्षे कायम आहे. ही हिंदू धर्माची परंपराच आहे. हिंदू धर्माव्यतिरिक्तसुद्धा गायीला वरचे स्थान आहे, पण ते ‘उपयुक्त पशू’ म्हणून आहे.
 
मध्ययुगातील (मेडिटेरियन सिव्हिलायझेशन) संस्कृतीमध्ये गायीला ‘मदर गॉडेस’ म्हणून संबोधिले आहे, तसेच तिला ‘सेक्रेड काऊ’ (पवित्र गाय) असेही म्हटले आहे. हिंदू धर्मात गायीला पवित्र मानले आहेच, पण ती त्यागाचे प्रतीक आहे याची जाणीवही पूर्वजांनी करून दिली आहे. 
 
रामायण-महाभारतामध्ये गायींबद्दल अनेक दाखले दिले जातात, ते निश्चितपणे कपोलकल्पित नाहीत, हे भारत देशातील असलेल्या गोवंशाच्या प्रचंड संख्येवरून ताडता येते.
 
साक्षात भगवान श्रीकृष्ण मुळातच ‘गवळी’ होता. त्याच्या बासरीतून निघालेल्या गोड/मधुर/ताल-स्वरबद्ध आवाजाने त्याच्याभोवती गोवंशाचे कळप जमा व्हायचे. ही गोष्ट निश्चितपणे खरी असावयास पाहिजे.
 
महाभारतातील पितामह भीष्मांनी तर गायीला ‘दायीची’ (सरोगेट मदर) उपमा दिली आहे, ती खरोखरीच अवर्णनीय आहे.
 
एकवचनी श्रीरामाच्या विवाहानंतर सीतामाईची पाठवणी करताना तिच्या पित्याने म्हणजेच जनक राजाने त्यांच्याबरोबर हजारो सुदृढ-दुभत्या गायींचे कळप इतर गोवंशासोबत बहाल केले होते. 
 
वैदिक काळात (ख्रिस्तपूर्व 1500 ते 900) गोवंशाला ‘धन’ असे म्हटले आहे. ज्याच्याकडे जास्त गोवंश तो धनिक/श्रीमंत मानला जाई. 
 
ऋग्वेदात तर गायीला देवीच मानले आहे. तिला सर्व देवांची माता ‘अदिती’ असे संबोधिले आहे. जटाधारी, विश्वपालक भगवान शंकराचे मंदिर ‘नंदी’शिवाय कधीही पूर्ण होत नाही. ‘नंदी’ हे शंकराचे वाहन मानले जाते. उत्तम ‘वळू’ गोवंश विश्वाचा मोठा आधार आहे. एकविसाव्या शतकातसुद्धा आम्ही नंदीला म्हणजे वळूला सर्व गोवंश कळपाचा ‘अर्धा’ हिस्सा असे मानतो. जागतिक स्तरावरसुद्धा वळूला फार मोठा मान आहे. उत्तम वंशावळ निर्माण होण्याकरिता, वंशावळीत सुधारणा करण्यासाठी वळूची निवडही फार कटाक्षाने केली जाते. याची प्रचिती मला कच्छच्या रणात 1974 व 75-77 या काळात आली. शेकडो ‘कांक्रेज’गायींचे कळप मालधारी, भरवाड या गवळ्याकडे पाळले जात होते. या कळपातील वळू दर तीन/साडेतीन वर्षांनी बदलला जायचा. यामागे ‘शास्त्र’ होते- पण त्याला धार्मिकतेची जोड दिली जायची.
 
याच अनुषंगाने दीपावलीच्या दुसर्या दिवशी म्हणजे ‘वसुबारसेला’ गाय-वासरू’ यांची पूजा केली जाते. 
बैलपोळ्याला बैलाला पूर्ण दिवस विश्रांती दिली जाते. त्याला सजवून, रंगवून गावागावांतून वाजत-गाजत मिरवणूक काढली जाते. त्याला खास पुरणपोळी खाऊ घालतात. याचाच अर्थ गोवंशाला ठायी ठायी परमेश्वराचे अधिष्ठान मानले जाते. 
 
पृथ्वीचे पालन- रक्षण- संवर्धन करते ब्रह्मा-विष्णू-महेश म्हणजे दत्त, यांच्या पाठीमागेही गाय म्हणजेच कामधेनू असते. अशा गोवंशाचे वेगवेगळ्या माध्यमांतून संरक्षण होणे गरजेचे आहे. या संरक्षणाला ‘शास्त्रीय’ आधार कसा द्यावयाचा ते पाहू या.
 
भारताची लोकसंख्या सध्या 122 कोटींच्या घरात आहे, तर गोवंशाची संख्या (19व्या पशुगणनेनुसार) जवळजवळ 16 कोटी आहे. याचा अर्थ दर 7 माणसांगणिक एक घटक गोवंशाचा आहे.
 
याचे संवर्धन वेगवेगळ्या माध्यमांतून म्हणजेच सरकारी, निमसरकारी, सहकारी, खासगी, पीपीपी एकाच विचाराने, एकाच पॉलिसीने केले गेले पाहिजे. ते राज्यनिहाय म्हणजेच त्या त्या राज्यातील दुधाळ जाती कोणत्या आहेत त्यावर आधारित असावयास पाहिजे. हा कार्यक्रम कमीत कमी 25 ते 30 वर्षांचा असावयास पाहिजे. त्याच्या अंमलबजावणीमध्ये सातत्य पाहिजे.
 
या कालावधीत कोणत्याही पातळीवरच्या अधिकार्यांची बदली होऊन नवीन येणार्या व्यक्तीच्या लहरीनुसार त्यात बदल होता कामा नये. त्यात 15 ते 20 टक्के लवचिकपणा असावा, पण तो मूलभूत ढाच्यामध्ये बदल करणार नाही यावर कडक बंधन ठेवणे महत्त्वाचे आहे. निरुपयोगी गोवंश विकण्यास बंदी असावी. 
 
जसा प्रशासनावर वरीलप्रमाणे अंकुश पाहिजे तसा राजकारण्यांवर (मंत्र्यांवर, अध्यक्षांवर, सभापतींवर, चेअरमनवर)सुद्धा जास्त ताबा पाहिजे. कोणत्याही पक्षाचे सरकार आले तरीही या अंमलबजावणीत फरक होता कामा नये.
 
या अंमलबजावणीच्या कार्यवाहीवर लक्ष ठेवण्यासाठी एक कमिटी असावी. या कमिटीने सर्वांगाने विचार करणे अत्यावश्यक असून दर तीन महिन्यांनी सकारात्मक आढावा घेणे गरजेचे आहे.
 
या साच्यातून तावून सुलाखून कार्य झाले तर निश्चितपणे भारतीय गोवंशाची आर्थिकदृष्ट्या परवडणारी गाय तयार होणे अशक्य नाही. उगाचच अवास्तव, स्वप्नात असल्याप्रमाणे काहीही आर्थिक चित्रे रंगवणे, खोटी आकडेवारी सादर करून लाखो रुपयांचे अनुदान लाटून त्याचा गैरवापर करणे या गोष्टी टाळल्या पाहिजेत, तरच आपल्या देशाला देशी गायींपासून काही तरी फायदा होणार आहे. जनतेला फसविणे बंद केले पाहिजे. नुकतेच एका वर्तमानपत्रात एका नवजवानाची मुलाखत वाचली (14 ते 18 जून 2017) त्यात एका गायीपून 3 ते 4 लाख रुपये (देशी गायींपासून) वर्षाला कमाई होते- असे धादांत असत्य पुढे आणणे फार धोक्याचे आहे.
 
आपल्या देशातील गोपालकांनी व सरकारी पातळीवरील ‘पॉलिसी’मेकरनी काही गोष्टी प्रथम ठरविलेल्या पाहिजेत : 1) आपल्या 125 कोटी लोकसंख्येला पुरेसे दूध/ दुधाचे पदार्थ मिळावयास पाहिजेत की भारतीय गोवंशाची बाहेरून ओळखण्याकरताच्या खुणा (फिनोटिपिक कॅरेक्टर) व त्यांचे सौंदर्य, रुबाबदारपणा ही लक्षणे पाहिजेत? की तिच्यापासून वा त्यांच्या वंशापासून (त्यात सर्व नर/मादी आले) मिळणार्या गोमय, गोमूत्र व ते मेल्यानंतर मिळणार्या हाडे, चामडी, शिंगे, खुरे इत्यादी उपपदार्थ पाहिजेत की ज्याच्यावर (गोमूत्र) अवास्तव आर्थिक लाभ सांगितले जातात? 3) त्यांच्यापासून मिळणार्या ‘नरांचे’ काय करायचे? यांत्रिकीकरणामुळे शेती/ओढ/घाणा काम फारच कमी झाले आहे. सर्वांनी एक बाब पक्की ध्यानात ठेवायला पाहिजे, की ‘परंपरागत व्यवस्थापना’ला शास्त्राचा आधार दिलाच गेला पाहिजे. हे शास्त्र म्हणजे ‘मॉडर्न मॅनेजमेंट’नाही. याबद्दलचे अनेक गैरसमज आहेत ते दूर करणे अगत्याचे आहे.
 
पशुपालनात मानवी मदत ही अत्यावश्यक आहे. नुसत्या मशिनरीने होणारे हे कार्य नाही. प्रत्येक वेळी कन्सल्टंटनी 500 ते 1000 गायींच्या कळपांची उदाहरणे देऊन भागणार नाही. आपल्या देशात 5 ते 10 गोवंश असलेले 85%च्या वर गोपालक आहेत. त्यांना आपल्या स्वत:च्या पायावर आर्थिकदृष्ट्या (सेल्फ एम्प्लॉयमेंट) उभे करायचे आहे. 
 
 

 
 
 
प्रथम काही गैरसमज व अंधश्रद्धा या बाबी पाहू या
 
1) कासेतून लालसर वा गुलाबी रंगाचे दूध निघणे.
2) व्यायल्यानंतर जार (वार) पडण्याकरिता वारेच्या टोकाला चप्पल किंवा दगड बांधणे.
3) वार/ जार गर्भाशयाच्या बाहेर पडल्याशिवाय ‘कासेतून चीक ‘न’ काढणे. ही बाब गायीला व तिच्या वासराला धोक्याची आहे. 
4) वार पडल्याशिवाय ‘वासरालाही चीक ‘न’ पाजणे.
5) पोटफुगी झाल्यास कानाच्या शिरेला भोक पाडून त्यातून रक्तस्राव होऊ देणे. 
6) त्या रक्ताचे दोन-तीन थेंब डोळ्यात घालणे
7) गाय/म्हैस खाण्याची बंद झाली/ रवंथ करणे बंद झाले, तसेच तापली आहे असे वाटल्यास (तिच्या जिभेच्या मागे एक उंचवटा असतो) जीभ बाहेर खेचून तो उंचवटा टोकदार दाभणाने फोडणे. याकरिता सुरी किंवा मोठी सुई वापरली जाते.
8) विण्याच्या अगोदर कासेेला गरम, वेदनायुक्त, फुग्यासारखी सूज आली असेल, तसेच दूध सडातून/ थानांतून/ अचळाळतून गळत असेल तर कास मोकळी न करणे/ त्यातून दूध न काढणे.
9) पशुधनाला ‘तहान लागल्यानंतर’ पिण्यास पाणी न मिळणे, त्यांच्यासमोर लगोलग पाणी पिण्याची सोय नसणे.
10) पशुखाद्य/ मिश्र चारा रात्रभर भिजत ठेवणे.
11) बर्याच वेळेला ‘ते’ चांगले शिजवून खाण्यास देणे. हे अॅसिडीकारक आहे.
12) धार काढताना 1/2 किलो पशुखाद्यात/ गोळी पेंडीमध्ये/ साध्या पेंडीमध्ये 7-8 लिटर पाणी घालून ते तिच्यासमोर ठेवणे.
13) गायी- म्हशींना ताप आला आहे असे वाटल्यास त्यांच्या शिंगांना चुना फासणे.
14) पान्हा न सोडल्यास ‘पिट्युट्रिन’ इंजेक्शनचा वारेमाप उपयोग करणे
15) घरगुती औषधांनी आजाराला उतार पडला नाही तर मिरची, लिंबू, काळी बाहुली यांची माळ गळ्यात बांधणे.
16) एखादी गाय, वासरू, बैल लंगडायला लागल्यास तिथे लोखंडी कांबीने चरचरीत डाग देऊन फुली मारणे
17) गाभण राहण्यासाठी गोर्हा/ वळू लावल्यानंतर गायीला तोंड वर करून 7-8 तास बांधून ठेवणे वा बसू न देणे.
18) लहान वासरांना 1 ते 2 महिने पिण्यास पाणी न देणे.
19) बाराही महिने नुसता हिरवा चारा असणार्या गोवंशाला वाळलेला सुका चारा (वैरण) न देणे.
20) पान्हा सोडण्यासाठी योनिमार्गात तिखट व लाल मिरचीची पूड भरणे
21) गाय आटविण्यासाठी किमान 15 ते 20 दिवस घेणे. (तेव्हा तिचे दूध जेमतेम दिवसाला अडीच ते तीन लिटर असणे.
22) ‘आहार’ खाताना त्याबरोबर लोखंडाच्या वस्तू (खिळे, तार, चुका, पैशाची नाणी इ.) पोटात जातात. त्यांचे ‘पाणी’ होण्यासाठी काही रसांचा (फळांच्या) तसेच लोहचुंबकाच्या पाण्याचा उपयोग करणे.
23) गायीची कास भरदार, मोठी दिसण्याकरिता तिच्या कासेेला जळणार्या बिब्याची धुरी देणे.
24) वासरे ढेरपोटी झाल्यास त्यांना जंताची औषधे देणे
25) साप चावला आहे असा संशय आला तर मांत्रिकाला आणून मंत्राने त्याचे विष उतरवण्याचा प्रयत्न करणे.
26) पोटफुगी झाली असल्यास गरम गरम (लाल होईपर्यंत तापविणे) लोखंडी कांबीने डाव्या वा उजव्या बाजूकडील त्रिकोणी कुशीला डाग देणे.
27) गोर्याला / वळूला कामाला जुंपायचा असेल तर त्याचे अंडाशय किंवा अंडाशयाची शीर (व्हास डेकरन्स) पाट्या- वरवंट्याने चेचून काढणे.
28) जिभेला काटे आले आहेत म्हणून तिच्यावर नवसागरची पूड चोळणे, तसेच जिभेचा उंचवटा सुईने/दाभणाने फोडणे. 
29) गायीला दृष्ट लागू नये त्यासाठी काळोख्या/हवेशीर नसलेल्या शेडमधून बाहेर न काढणे.
30) घरात घुबड व मैना न ठेवणे.
31) ज्यांच्या गोठ्यात सिमेंटने बांधलेल्या एकसंध गमाणी आहेत तेथे पाणी पिण्यासाठी त्या 8-9 तास भरून ठेवणे (यामुळे पाण्याचा अपव्यय/नाश होणे). त्यामुळे खाण्यास चारा कमी मिळणे.
32) दूध काढताना ‘दुमडलेला अंगठा’ पद्धत वापरणे. 
33) गोठ्याची उंची अवास्तव 20 ते 25 फूट ठेवणे, रुंदी 10 ते 11 फूट ठेवणे.
34) मृत गोवंशाची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्याची सोय करणे ही बाब काढली तर याची काय आवश्यकता आहे, असे म्हणून गोवंशाच्या मरणाची चर्चा का करायची, असा प्रश्न विचारणे. पण ज्यांचा जन्म झाला आहे ते मरणार (नाहीसे) आहेतच.
 
वरील सर्व गैरसमजुती तसेच अंधश्रद्धा आपल्या मनातून काढून टाकल्या पाहिजेत. आपल्या मनाची ठेवण बदलली पाहिजे. सारासार विचारही केला पाहिजे. म्हणजेच आपण गोसंवर्धनासाठी शास्त्राकडे वळता येईल.
 
गोसंवर्धनामध्ये सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडील गोवंश (कालवडी, गायी) वेळेवर ‘गाभण’ राहिल्या पाहिजेत. देशी गायी/ भारतीय दुधाळ गायींच्या जाती या विशेष लक्ष पुरविले नाही तर व्यायल्यानंतर गाभण राहण्याकरिता त्रास देतात. तसेच भारतीय गोवंशाच्या कालवडी वयात वेळेवर येत नाहीत, गाभण राहण्यास सक्षमपणा दाखवत नाहीत. याकरिता कोणत्या गोष्टी शासकीयदृष्ट्या करावयास पाहिजे ते वाचू या.
 
1) कालवडींचा जन्म झाल्यानंतर पहिल्या अर्ध्या तासातच 1 ते 1॥ लिटर चीक पाजावा. यानंतर तीन तासांनी परत एकदा 1 ते 1॥ लि. तसेच नंतरच्या 3 तासांनी परत एकदा व नंतर पुन्हा 3 तासांनी (म्हणजे जन्मल्यापासून पहिल्या 6 तासांत सर्व मिळून 3 ते 4 लिटर चीक त्यांच्या पोटात गेला की कालवड, गोपालक चिंतामुक्त होतात.
2) नंतरचा टप्पा म्हणजे दुसर्या दिवसापासून त्याच्यापुढे 1/2 लिटर पाण्याचे पाणी ठेवणे (त्यात 3/4 दाणे पोटॅशियम परमँगनेट टाकल्यास उत्तम)
3) 8 ते 10 दिवसांनी कोंबडा (सुकी वैरण) चारा देणे. 
4) 15 ते 20 दिवसांनी हिरवा चारा, मूठभर वासराचे पशुखाद्य, मोठ्या गायींचे खाद्य देऊ नये.
5) साधारण 1 महिन्याने त्याचे दूध 30 ते 35 टक्क्यांनी कमी करून चारा (सुका/ओला-एकदल/ द्विदल) 1 ते 2 किलो तसेच पशुखाद्य 200 ग्रॅमपर्यंत वाढवावे.
6) असे संगोपन करताना पहिल्या टप्प्यात 6 तास, नंतर 3 महिने तिसर्या टप्प्यात 9 महिन्यांपर्यंत शेवटच्या टप्प्यात 15 ते 18 महिन्यांपर्यंत काळजी घेतल्यास या कालवडी गाभण राहण्याकरिता 20 ते 22 महिने वयापर्यंत तयार होतील.
(वासरांची निगा/ संगोपन यावर वेगळे 25 ते 30 मुद्दे आहेत.)
7) देशी गायी व्यायल्यानंतर परत गाभण राहण्यास वेळ लागतो असा गोपालकांचा ओरडा असतो... 
गायपालन आर्थिकदृष्ट्या परवडणारे करायचे असेल तर, आपल्या गायी व्यायल्यानंतर जास्तीत जास्त 4 ते 5 महिन्यांत व कमीत कमी 30 ते 45 दिवसांच्या आत गाभण राहावयास पाहिजेत (येथे दुधाची मात्रा 1 ते 2 लिटर असल्यास त्या गाभण राहणे उचित.) 
8) याकरिता त्याच्या जन्मापासून तसेच त्या विण्यानंतर (कालवड/गोर्हा दिल्यानंतर) त्यांची योग्य काळजी घेतली पाहिजे.
9) व्यायल्यानंतर साधारणपणे गर्भाशय मूळ स्थितीत येण्याकरिता 25 ते 40 दिवस लागतात. या कालावधीत त्यांची स्वत:ची तब्येत, दूध देण्याची क्रिया व गर्भाशय पूर्वस्थितीत आणणे याकरिता आहार हा संतुलित ठेवणे महत्त्वाचे आहे. प्रत्येक जातीच्या गायींकरता परिमाण वेगळे आहे. तरीसुद्धा रोज 5 ते 7 लिटर दूध देण्याकरिता 15 ते 20 कि. हिरवा चारा (70 टक्के एकदल, 30 टक्के द्विदल), 3 ते 5 कि. कोरडी वैरण, 3 ते 4 किलो पशुखाद्य (15 ते 18 टक्के प्रथिनांचे), जास्तीचे खनिज मिश्रण 15 ते 20 ग्रॅम, अॅसिबफ पावडर 30 ग्रॅम, 3 ते 5 ग्रॅम चिलेटेड मायक्रो खनिज मिश्रण, पाणी तहान लागेल तेव्हा (रोज 35 ते 40 लिटर), पाणी सोडून वरील आहार घटक एकत्र करून द्यावेत. 
10) साधारणपणे 40 दिवसांनंतर ‘पी फोर रॅपिड’ ही ‘दूधपरीक्षा’ करून (या परीक्षेला 10 थेंब दूध लागते व ती परीक्षा 5 मिनिटांत होते. गर्भाशयाची काय अवस्था आहे, म्हणजे गर्भाशयातील मादीबीज कोषांचे (ओव्हरी) कार्य चालू झाले आहे की नाही, का गाय माजावर आहे, हे लगेच समजण्याकरिता त्याचा मोठा उपयोग होतो.
11) दर 8 ते 10 दिवसांनी सकाळ/संध्याकाळचे प्रत्येक सडाचे वेगळे दूध घेऊन (5 ते 7 मिली) जागेवरच तिच्या कासेत ‘सुप्तस्तनदाह’ (सब- क्लिनिकल मस्टायटिस) नाही ना याची खात्री करून घेणे. हा असेल तर गाय गाभण राहण्याकरिता दमविते/त्रास देते.
12) गायीच्या गर्भाशयातील ‘वार’ (जार, प्लॅसेन्टा) जर 2 ते 10 तासांत पडली असेल तर त्या गायीच्या गर्भाशयात कोणत्याही प्रकारचे औषध / रसायन /गोळ्या सोडून घेऊ नका (याला ‘पिशवी धुणे’ अशी संज्ञा आहे). जवळजवळ 95 ते 98 टक्के केसेसमध्ये ‘पोव्हिडॉन आयोडिन’ हे द्रव्य वापरले जाते. त्यामुळे गायीच्या गर्भाशयाची अंत:त्वचा (एण्डोमेट्रियम) अक्षरश: जाळून निघते. त्यामुळे ती गाय लवकर माजावर येत नाही. तिच्या बीजांडकोशाचे कार्य बिघडते व ती परत गाभण राहण्यास त्रास देते.
13) गायीच्या माजावरच्या लक्षणांकडे बारकाईने लक्ष द्या.
14) दिवसातून चार वेळा (सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्री) गोठ्यात चक्कर मारा. ही चक्कर गायीच्या पाठीमागून मारायची आहे. रात्रीच्या वेळी हातात बॅटरी किंवा गोठ्या 60/100 चा बल्ब पाहिजे.
15) तिच्या निरणातून पारदर्शक, रंगहीन, तारेसारखा एकसंध गळणारा रक्तस्राव नीटपणे पाहा.
16) आपल्याकडील गायींचा माज हा संध्याकाळी 6 नंतर सुरू होतो. त्याची लक्षणे साधारणपणे 2॥ ते 3 तासांनी दिसायला लागतात. म्हणून रात्रीची चक्कर महत्त्वाची.
17) देशी गायीमध्ये माजाचा काळ हा सामान्यत: 18 ते 20 तासांचाच असतो.
18) गायी दर 20 ते 21 दिवसांनी माज दाखवितात. त्यामुळे तिला गाभण राहण्याकरिता देण्यात येणारे कृत्रिम वा नैसर्गिक रेतन माजचक्र सुरू झाल्यापासून 10 ते 15 तासांतच करा.
19) माजावर असलेली गाय (मोकळी असेल तर) दुसर्या गायीवर किंवा जवळपास असलेल्या माणसांवर उडते. अशी गाय पुढच्या 2/3 तासांतच भरवून घ्या.
21) कधी कधी भरवलेली गाय ही 10 ते 11 दिवसांनी परत माजाची लक्षणे दाखविते. (त्या वेळी योनिमार्गातील स्रावा (सोट, वळस, डिस्चार्ज)बरोबर इतर 3-4 प्रमुख लक्षणे दाखवीत असेल तरच तिला परत भरवून घ्यावी.
22) गाय एकदा भरविल्यावर तिच्या माजाकडे दर 20-21 दिवसांनी (म्हणजे 21, 42, 63 दिवस) लक्ष द्यावे. तिला रेतन (कृत्रिम वा नैसर्गिक) केल्यावर ती नक्की गाभणच राहणार अशा भ्रमात राहू नये.
23) आधुनिक तंत्रज्ञानामध्ये अशी भरवलेली गाय 18 ते 19 दिवसांनी 100 टक्के गाभण आहे की नाही. हे ठरविण्यासाठी दूध चाचणी आहे. त्याकरिता फक्त 10 थेंब दूध लागते व ही चाचणी फक्त 5 मिनिटांत होते. त्याचा आधार घ्या.
24) देशी गायींमध्ये ‘गीर’, ‘थारपारकर’, ‘रेडसिंधी’ ‘हरियाना’ या गायींमध्ये त्या गाभण राहिल्या तरी माजावरची लक्षणे दाखवितात. अशा गायी हातांनी तपासून (गुदाशयात हात घालून) निदान करता येत नाही. त्याकरिता क्रमांक 23मध्ये सांगितलेली ‘पी 4 रॅपिड’ ही चाचणी करून घ्या.
25) नेहमीच्या पद्धतीने निरीक्षण केल्यानंतर जर 2-3 माज दाखविले नाहीत तर 45 ते 60 दिवसांनी पशू डॉक्टरांकडून गर्भाची वाढ कशी होत आहे/ गाय गाभण आहे की नाही याची तपासणी करून घ्यावी.
26) माजावरच्या लक्षणांपैकी ‘गर्भाशय स्राव/बळस/सोट हा पाण्यासारखा पातळ, तांबूस, पिवळसर आणि अतिशय दुधासारखा सफेद असेल, तर गर्भाशयात काही तरी गडबड आहे हे समजावे व योग्य प्रकारे औषधयोजना करावी.
27) हे सर्व पशुपालकाने जरी केली तरी गर्भाशयात जाणारे जे ‘स्पर्म’(शुक्राणु) आहेत, त्यांची गुणवत्ता चांगलीच असावयास पाहिजे. त्याकरिता आपल्याकडे असलेला वळू (नैसर्गिक रेतन) किंवा द्रवरूप वीर्य या सर्वांची तब्येत सांभाळणे, तसेच वीर्यमात्रांची साठवण (द्रवरूप नायट्रोजन ङछ2 ) यांची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
28) आता बहुतेक गोठविलेल्या वीर्याचाच उपयोग केला जातो. ते गोठविलेल्या स्थितीतले वीर्य द्रवरूप स्थितीत आणण्याकरिता जे पाणी वापरतात, ते पिण्याचेच असले पाहिजे व त्याचे तापमान 35 ते 37 डिग्री सेंटिग्रेडच पाहिजे. हे तापमान पाहण्याकरिता प्रयोगशाळा थर्मामीटरच (‘ताप’ बघण्याचा नाही) पाहिजे. पाण्यात ‘बोटे’ घालून तापमान पाहणे चुकीचे आहे.
 
29) सर्वांत महत्त्वाचे म्हणजे माजावर आलेल्या गायी / कालवडी गाभण राहण्याचे प्रमाण हे जेमतेम 25 ते 30 टक्के आहे. तेसुद्धा 90 दिवसांनी तपासणी केल्यावरचे आहे. याचा अर्थ 70 ते 72 टक्के गायी/कालवडी या 90 दिवसांनी गाभण नाहीत हे कळते. हे प्रमाण देशी वंशामध्ये 7-8 टक्क्यांनी जास्त आहे. हे फार मोठे नुकसान आहे. त्यामुळेच गोपालन हे घाट्यात जाते हे लक्षात ठेवा.
 
 

 
 
आता याचबरोबर उत्पादन देणारा जो दुसरा अवयव आहे तो आपल्याला बाहेरून दिसतो/ हाताळता येतो, तो म्हणजे गायीची ‘कास’. हे एक ‘जिवंत यंत्र’आहे. उत्पादने देणार्या निर्जीव यंत्रांची नियमित देखभाल केली जाते- पण ‘सजीवाची (कास) चांगल्या तर्हेने काळजी पशुमालक/नोकर वगैरे यांच्याकडून घेतली जात नाही. म्हणजेच ‘कासेेची काळजी’ हा एक स्वतंत्र विषय दुग्धव्यवसायामध्ये महत्त्वाचा आहे. 
1) नवा जीव तयार करणारे जसे गर्भाशय व अंडाशय, तसे दूध निर्माण करणारा अवयव म्हणजे ‘कास.’
2) ‘कास’ अत्यंत मऊ स्नायू, चरबी, दूध तयार करणार्या पेशी, त्यांना आधार देणार्या पेशी, तंतुमय पेशी, तसेच सबंध कास उचलून धरून आतल्या बाजूंनी कमरेच्या हाडांना व बाजूच्या दणकट स्नायूंना बांधून ठेवणारे लवचिक, ताकदवान पडदे मिळून तयार होते.
3) ‘कासेतून’ दूध बाहेर काढून घेण्याकरिता कासेच्या मुख्य अंगाला जोडणारे चार सड/ थाने हेही मऊ स्नायूंनी बनलेले असतात. त्यांची लांबी 1 ते 1॥ इंचापासून 4/4॥ इंच लांब तसेच अंगठ्याएवढी जाडी असणारे असतात- ते नळीसारखे व हाताला मऊ लागणारे असतात. सडांना बाहेरच्या टोकाशी एक छोटे छिद्र असते. त्यातून दूध बाहेर येते.
4) दूध काढण्यापूर्वी गायीला तिच्या कासेतून दूध काढून घेण्यासाठी तिला तयार करावे लागते. म्हणजेच चांगला पान्हा सोडण्याची तिची मानसिक तयार करावी लागते. चांगला पान्हा सोडण्यामुळे सड ‘ताठ’ होतात, म्हणजे सडांतून दूध काढणे सहज/सुलभ जाते.
5) गायींचा पान्हा साधारणपणे (5 ते 7 मिनिटे टिकतो.) तेवढ्याच वेळात कासेेत सांडलेली तसेच दूध काढता काढता तयार होणारे दूध काढावे लागते.
6) भारतीय गोवंशामध्ये असा पान्हा सोडण्यासाठी तसेच तो टिकण्यासाठी गायीला तिच्या वासराची गरज लागते. फारच थोड्या गायी म्हणजे 5 ते 10 टक्के वासराविना दूध काढून देतात व पान्हा सोडतात. म्हणून वासरे टिकविणे, जन्मानंतर ती मरू न देणे महत्त्वाचे असते.
7) भारतीय जातींच्या गायींमध्ये जसे वासरू लागते तसेच त्यांच्यामध्ये पान्हा चोरून धरणे, कामयचा चोरणे आणि त्यामुळे बरेच दूध कासेत शिल्लक राहणे, अशा बाबी होतात व कासेचा आजार होण्याची भीती असते.
8) कासेचा आजार, स्तनदाह, कासे सुजी, दगडी कासे, मस्टायटिस अशी अनेक नावे त्याला आहेत.
9) डोळ्यांना दिसणारा, हाताला स्पर्श होणारा, त्यासंबंधातील लक्षणे दाखविणारा आजार गाईंना होतो. त्याला क्लिनिकल मस्टायटिस असे म्हणतात.
10) वरील काहीच लक्षणे न दाखविणारे पण फक्त काही टेस्ट (परीक्षा) केल्या असता समजणारा, तसेच बाकी तब्येत चांगली असूनही दूध तयार करण्याची (सामान्य भाषेत दूध देण्याची) क्षमता 20 ते 35 टक्के कमी करणारा म्हणजे ‘सुप्त स्तनदाह’ (सब-क्लिनिकल मस्टायटिस)
11) कासेच्या आजारात दूध खराब येणे (यात दुधाचा रंग तांबूस असणे, दूध पाण्यासारखे असणे, दुधाचे दही कासेेबाहेर येणे, चीजसारखे बारीक बारीक दोरे दिसणं. कासेेला वेदनायुक्त सूज, कासेेची कातडी काळीनिळी पडणे, गाय लंगडणे, ताप येणे, शेण पातळ होणे, रवंथ कमी करणे, खाणे-पिणे कमी करणे, दुधाचे प्रमाण फारच कमी होणे, गाभण असल्यास गर्भपात होणे अशा अनेक प्रकारांनी या आजाराची लक्षणे दिसतात. अशा आजारावर पोटातून, इंजेक्शनद्वारा, कासेवर अनेक प्रकारचे बाहेरून उपचार करून हा आजार आटोक्यात आणावा लागतो.
12) कासेचे हे दोन्ही आजार मानवनिर्मित आहेत. याची कारणे म्हणजे गोठ्यातील अस्वच्छता, आहारात सूक्ष्म खनिजांची कमतरता, कासेची अस्वच्छता वगैरे.
13) म्हणून दूध काढण्यापूर्वी काय करणार? गायीची कासे संपूर्णपणे पाण्याने स्वच्छ धुऊन घेणे. म्हणजे तिची शेपटी, पायांवरील शेण वगैरे काढून घेणे त्यानंतर चांगला हाताला गरम लागेल. 
14) असे गरम पाणी (तापमान 50 डिग्री सें.ग्रेड) एक बादली (12 ते 15) घेऊन त्यात पुढे नमूद केलेल्यांपैकी एकच जंतूनाशक रसायन घालणे (पोटॅशियम परमँगनेट-चिमूटभर, पोव्हिडॉन आयोडिन -1-2 चमचा, ब्लीचिंग पावडर, पाव चमचा किंवा बेझोलकोनियम 50 टक्के - 8 ते 10 थेंब प्रत्येक आठवड्याला एक-एक रसायन वापरायचे आहे. तसेच सकाळ-संध्याकाळ या रसायनयुक्त गरम पाण्याने खरखरीत टॉवेल पाण्यात भिजवून कास शेकली / धुतली तर कासेवरचे जंतूही मरतात व पान्हाही 2-3 मिनिटे जास्त टिकून ठेवण्यास मदत होते. ते दुधामध्ये न येता स्वच्छ दूध मिळते.
15) ही झाली दूध काढण्यापूर्वीची बाब. दूध काढून झाल्यावर तेच पाणी नेहमीच्या तापमानाला येते. त्या पाण्याने कास स्वच्छ धुऊन काढा (जेवल्यानंतर आपण जसे हात स्वच्छ धुतो, म्हणजे त्यावर खरकटे राहत नाही), आणि वर्तमानपत्राच्या कागदाने स्वच्छ करा.
16) चारही सड ‘टीटडीप’ नावाच्या रसायनामध्ये बुडवा आणि गायीसमोर तिचे आवडते खाणे ठेवा, म्हणजे ती बसणार नाही.
17) लक्षात ठेवा, हाताने दूध काढल्यावर कासेेच्या सडांची छिद्रे 2-3 तास तर मशिनने दूध काढल्यावर 7-8 तास उघडी राहतात व त्यातून मस्टायटिस करणारे जंतू कासेेत जाऊन मोठे नुकसान करतात.
18) तसेच सब-क्लिनिकल (सुप्त स्तनदाह) मस्टायटिस ओळखण्याकरिता सी.एम.टी. नावाची दुधाची परीक्षा जागेवरच करायची आहे. त्यामुळे किती संप्रुक्ततेचा (+,++,+++,++++) सुप्त आजार आहे हे ओळखता येते व त्यावर उपाय करण्यास सोपे होते. कास निरोगी होते. स्वच्छ दूध निर्माण होण्यास मदत विण्याच्या अगोदर 45 ते 60 दिवस गायीचे दूध बंद करणे महत्त्वाचे असते. त्याला ‘गाय आटवणे’ म्हणतात. 
 
गाभण गायीला आटवणे ही क्रिया संवेदनशील आहे. आपल्याकडे 2-3 लिटर दुधाची गाय आटविण्याकरिता 15 ते 20 दिवस घेतले जातात. त्यामुळे पुढच्या वेतामध्ये मस्टायटिस, तसेच दूध तयार करण्याची क्षमता (30 ते 35 टक्के कमी) यांची बीजे पेरली जातात. ही क्रिया दोनच दिवसांत संपायला पाहिजे.
 
संगोपनात पुढील गोष्टीसुद्धा महत्त्वाच्या आहेत :
 
आंतरकृमी/जंत (गायीत साधारणपणे 5 ते 6 प्रकारचे जंत असतात) यांचे प्रतिबंधन व निर्मूलन वेळेवर तसेच योग्य औषधे वापरून वर्षातून चार वेळा तरी करणे जरुरीचे आहे. ही तीन वेगवेगळ्या प्रकारची औषधे आहेत. 
 
शरीरावरील बाह्यकिटक (उदा. उवा, लिखा, गोचिड्या, चावर्या माशा, तांबवा, डास) यांचेसुद्धा नियमितपणे निर्मुलन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. बर्याच वेळेला पशुपालक गायी-वासरे- बैल- वळू यांच्या शरीराकडेच लक्ष देतो, ते करत असताना गोठ्यातील, छपरावरील, आजूबाजूच्या वातावरणातील या बाह्यकिटकांचा बरोबरीने समाचार घेतला तरच पशूंकरिता वापरलेली उपाययोजना यशस्वी होते. 
 
संगोपनशास्त्रामध्ये योग्य वेळी रोगप्रतिबंधक लस टोचणी होणे गरजेचे आहे. लसटोचणी झाल्यानंतर रोगप्रतिकारकशक्ती निर्माण होण्याकरिता कमीत कमी 25 ते 30 दिवस लागतात. म्हणून त्या त्या ऋतूत येणार्या रोगांची यादी करून ती लसटोचणी करून घ्यावी. प्रत्येक जिल्यात वेगवेगळी.
 
असो सगळ्या बाबी योग्य तर्हेने शास्त्रीय पद्धतीने केल्या तरच भारतीय गोवंशाकडून अपेक्षा करता येतील.
 
गोवंशाची ‘तहान’ तुम्ही ठरवून नका. पाणी, पिण्याची ‘तहान’ लागली की त्यांना ताबडतोब पाणी मिळेल अशी व्यवस्था करा. पिण्याचे पाणी जवळच वा समोरच 24 तास उपलब्ध करा.
 
डॉ. वासुदेव ज. सिधये
BVSCAH (मुंबई), PGAI (आग्रा), SPGT(इंग्लंड/ डेन्मार्क),
ILPM(अमेरिका).
पशुचिकित्सक, पशुपोषण, पशुप्रजनन तज्ज्ञ
129 शुक्रवार पेठ, पुणे 411 002
मोबाइल : 9370145760, 7030199448