भेंडीवरील किडी आणि विषाणुजन्य हळद्यारोगचे व्यवस्थापन

डिजिटल बळीराजा    07-Feb-2018
 
 
 
 महाराष्ट्रामध्ये भेंडी या पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जात असून बाजारात या पिकास मागणी जास्त असल्यामुळे चांगले आर्थिक उत्पन्न ही मिळते. भेंडीच्या उत्पादनामध्ये विविध कारणापैकी कीडी व रोगाचा प्रादुर्भाव हे महत्वाचे कारण असून त्याचे व्यवस्थापन कसे करावे, याविषयाची माहिती या लेखात वाचावयास मिळणार आहे.

 

महाराष्ट्रामध्ये खरीप हंगामात भेंडी या पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. या पिकास बाजारात मागणीही जास्त असल्यामुळे शेतकरीवर्गासही या पिकापासून चांगले आर्थिक उत्पन्न मिळते. भेंडीच्या उत्पादनामध्ये घट येण्याच्या विविध कारणांपैकी किडींचा प्रादुर्भाव हे महत्त्वाचे कारण आहे. तेव्हा भेंडी पिकावरील महत्त्वाच्या किडी ओळखायच्या कशा आणि त्यांचे व्यवस्थापन करायचे कसे याबाबत माहिती घेऊ.

 

महत्त्वाच्या किडी व त्यांचे व्यवस्थापन :

1) तुडतुडे : या किडीची अंडी निमुळत्या आकाराची आणि फिक्कट पिवळसर रंगाची असतात. पिले पांढरट व फिकट हिरव्या रंगाची असून तिरपी चालतात. पूर्ण वाढ झालेले तुडतुडे पाचरीच्या आकाराचे, साधारणत: दोन मि.मी. लांबीचे तसेच हिरवट रंगाचे असतात. प्रौढ किडीच्या समोरील पंखावरील वरच्या भागात एक-एक काळा ठिपका असतो. या किडीची पिल्ले आणि प्रौढ सहसा पानाच्या खालील पृष्ठभागावर राहून पेशीमधील रसशोषण करतात. परिणामी, पाने पिवळसर आणि चुरडल्यासारखी होतात. उन्हाळ्यामध्ये या किडीचा प्रादुर्भाव जास्त होतो.

या किडीच्या व्यवस्थापनासाठी इमिडॅक्लोप्रीड 70 टक्के डब्ल्यू. एस., 0.7 मि.ली. प्रति दहा लिटर पाण्यातून अगर 4 टक्के निंबोळी अर्काची फवारणी दहा दिवसांच्या अंतराने आलटून-पालटून करावी.

 

2) मावा : ही कीड भेंडीच्या पानातून तसेच कोवळ्या भागातून रसशोषण करते. याशिवाय ही कीड आपल्या शरीरातून मधासारखा गोड आणि चिकट पदार्थ पानावर सोडत असल्यामुळे त्यावर काळ्या बुरशीची वाढ होते. परिणामी, झाडाच्या अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेवर विपरीत परिणाम होतो व झाडाची वाढ खुंटते. या किडीच्या व्यवस्थापनासाठी प्रादुर्भावग्रस्त पाने माव्याच्या समूहासह तोडून नष्ट करावीत. प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून आल्यास पिकावर डायमेथोएट 30 टक्के प्रवाही 10 मि.ली. अगर मॅलॉथिऑन 50 टक्के प्रवाही 10 मि.ली. प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. जरुरीप्रमाणे कीटकनाशकाच्या फवारण्या आलटून पालटून 10 दिवसांच्या अंतराने कराव्यात.

 

पांढरी माशीही कीड विविध भाजीपाला तसेच इतर पिकांवर आढळून येते. या किडीची पिल्ले आणि प्रौढ पानांतील रस शोषून घेतात. किडीचा प्रादुर्भाव जास्त असल्यास पाने पिवळी पडतात. याशिवाय ही कीड विषाणू रोगाचा प्रसार करते. या किडीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होऊ नये यासाठी पिकाचा फेरपालट करावा. वेळोवेळी शेतातील तण काढून शेत स्वच्छ ठेवावे. नत्रयुक्त खताचा जास्त वापर टाळावा. सिंथेटिक पायरेथ्रॉइड वर्गातील कीटकनाशकांचा वापर कमी करावा. पिकावर मित्र कीटकांचे संवर्धन होण्याच्या दृष्टीने शक्यतो रासायनिक कीटकनाशकांच्या फवारण्या टाळाव्यात. 5 टक्के निंबोळी अर्काची फवारणी पांढर्‍या माशीच्या व्यवस्थापनासाठी परिणामकारक दिसून आली आहे. फारच आवश्यकता भासल्यास डायमेथोएट 30 टक्के प्रवाही 10 मि.ली. अगर अ‍ॅसिटॅमॅप्रीड 4 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

 

3) फुलकिडे : ही कीड लहान असून या किडीचे प्रौढ लांबोळ्या आकाराचे, 1 मि.मी.पेक्षाही लहान असतात. हे कीटक उघड्या डोळ्याने इकडे-तिकडे फिरताना सहज दिसून येतात. या किडीची पिल्ले आणि प्रौढ आपल्या तोंडाने झाडाच्या कोवळ्या पेशी आणि फुले खरवडतात आणि त्यातून येणारे द्रव शोषून घेतात. परिणामी, फुले वाळून जातात आणि गळून पडतात. त्यामुळे फळधारणेवर विपरीत परिणाम होऊन उत्पादनात लक्षणीय घट येते. तसेच ही कीड पानातून रसशोषण करीत असल्यामुळे पाने फिकट तपकिरी रंगाची आणि चुरडल्यासारखी होतात. या किडीच्या व्यवस्थापनासाठी इमिडॅक्लोप्रीड 17.8 एस. एल., 2 मि.ली. 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

 

4) कोळी : अष्टपदी सूक्ष्म प्राणी असून भेंडीची नुकसानकारक कीड आहे. या किडीची पिल्ले आणि प्रौढ पानाच्या मागच्या बाजूस राहून रसशोषण करतात. त्यांच्या अंगावर बारीक रेशमी धाग्याचे जाळे असते. रसशोषण केल्यामुळे पानाच्या वरील पृष्ठभागावर असंख्य पांढरे ठिपके पडतात. प्रादुर्भावग्रस्त पाने हळूहळू चुरगाळतात, आकसतात आणि शेवटी वाळतात. परिणामी, झाडाची वाढ खुंटते आणि उत्पादनात घट येते. मादी कोळी उन्हाळ्यात सुप्त अवस्थेत जाते आणि पावसाळा सुरू होताच अंडी घालण्यास सुरुवात करते. कोळीच्या व्यवस्थापनासाठी 300 मेष सूक्ष्म गंधकाच्या भुकटीची धुरळणी अगर 80 टक्के पाण्यात मिसळणारे गंधक भुकटी 25 ते 30 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

 

5) शेंडे व फळे पोखरणारी अळी ही कीड वर्षभर कार्यक्षम असते. जास्त आर्द्रता आणि जास्त उष्णतामान या किडीस पोषक असते. उन्हाळ्यामध्ये किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असतो. सुरुवातीच्या काळात या किडीची अळी अंड्यामधून बाहेर निघाल्यानंतर कोवळ्या शेंड्याला पोखरते आणि आत भुयार तयार करते. प्रादुर्भावग्रस्त शेंडा मलूल होतो आणि नंतर वाळतो. झाडाला कळ्या येण्यास सुरुवात झाल्यानंतर हीच अळी पुढे कळ्या, फुले आणि फळे यांमध्ये शिरून त्यांतील पेशी खाते. अळ्या एका कळीवरून दुसर्‍या कळीवर आणि एका फळावरून दुसर्‍या फळावर जातात आणि त्यांचे नुकसान करतात. एक अळी अनेक कळ्या, फुले तसेच फळांचे नुकसान करू शकते. पोखरलेल्या कळ्या आणि फुले वाळतात आणि खाली पडतात. प्रादुर्भावग्रस्त फळे विकृत आकाराची होतात.

या किडीच्या व्यवस्थापनासाठी प्रथम किडलेल्या कळ्या, फुले आणि फळे गोळा करून जाळून टाकावीत. या किडीची कोषावस्था पालापाचोळ्यामध्ये असल्यामुळे तो गोळा करून जाळून टाकावा. त्याचबरोबर 5 टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. किडीची अंडी दिसून येताच ट्रायकोग्रामा चिलोनीस या परोपजीवी किटकाचे 5-6 ट्रायकोकार्ड (1 लाख /हे.) 8-10 दिवसांच्या अंतराने लावावेत. प्रादुर्भाव जास्त प्रमाणात असेल तर सायपरमेथ्रीन 25 टक्के प्रवाही 4 मि.ली. अगर लॅमडायसायहॅलोथ्रिन 4.9 टक्के सी. एस.6 मिली अगर फेनव्हलरेट 20 टक्के प्रवाही 5 मि.ली. प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. प्रत्येक फवारणीसाठी कीटकनाशक आलटून-पालटून वापरावे. तसेच पिकाचा फेरपालट करावा. रासायनिक कीटकनाशकाची फवारणी केल्यावर 5 ते 7 दिवस भेंडीची काढणी करू नये.

 

भेंडीवरील विषाणुजन्य हळद्यारोग व्यवस्थापन : 

लक्षणे पिकाच्या वाढीच्या सर्वच अवस्थांमध्ये रोगाचा प्रादुर्भाव होतो आणि लक्षणे दिसून येतात. नाव हळद्या-म्हणजे हळदीसारखी पिवळी-रंगाची लक्षणे झाडाच्या सर्व भागांवर- पाने, फुले, फळे, शेंडे यांवर दिसून येतात.

रोगग्रस्त पानांच्या शिरा अगदी गर्द पिवळ्या रंगाच्या होतात. पान सूर्यप्रकाशाच्या दिशेने पकडल्यास पानामध्ये शिरांची सर्व आळी पिवळीधमक झालेली दिसते.रोगग्रस्त झाडे उंचीने बुटकी / खुजी राहतात. पानांचा आकार लहान होतो. दोन पेर्‍यांतील अंतर कमी होते. फुले-फळे पांढरट-पिवळी होतात. फुले आकाराने छोटी होतात. मुळांची प्रतवारी आकर्षकपणा कमी होतो.

 

विषाणू या रोगकारक विषाणूचे नाव ‘ओक्रा यलो लेन मोझॅक’ असे आहे. (ओक्रा म्हणजे भेंडी, यलो- पिवळा, व्हेन- शिरा, मोझॅक : विविध रंग, आकाराच्या छटा).

या विषाणूंचा प्रसार रोगट झाडांपासून निरोगी झाडांकडे रसशोषणाच्या पांढरी माशी या किडीमुळे होतो. कोणत्याही विषाणूचे वैशिष्ट्य असे, की एकदा बाधित झालेले झाड लवकर मरतही नाही आणि त्या बाधित झाडाची निकोप वाढही होत नाही. झाड लावकर मरू देत नाही. कारण हे बाधित झाड लवकर मेले तर यामधील विषाणू मेलेल्या झाडामध्ये जगू शकत नाहीत. रोगाचा भरपूर प्रसार व्हावा यासाठी अशी झाडे खुज्या रूपात शेतात भरपूर काळ टिकतात.

 

उपाययोजना :

1) रोगाचा प्रसार थांबवणे हे महत्त्वाचे. यासाठी रोगग्रस्त झाडे सुरुवातीलाच उपटून नष्ट करावीत.

2) रोगाचा प्रसार पांढरी माशी या रस शोषणार्‍या किडीमार्फत होतो. यासाठी पांढरी माशी आंतरप्रवाही कीडनाशक फवारणीने चांगली नियंत्रित करावी. उदा. डायमिथोएट 30 टक्के प्रवाही 10 मिली किंवा इमिडाक्लोरिड 17.8 टक्के एस. एल. 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यातून आलटून पालटून फवारावे. राहिल्यास 4 टक्के निंबोळी अर्क फवारणीने ही पांढरी माशी नियंत्रित करता येते.

3) रोगप्रतिकारक जातीची लागवड : 

महात्मा फुले कृषी विद्यापीठाने 2016 साली ‘फुले विमुक्ता’ ही पूर्ण रोगप्रतिबंधक जात प्रसारित केलेली आहे. ‘फुले विमुक्ता’ या जातीवर हळद्या या विषाणुजन्य रोगाची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. या जातीस ‘हळद्या’रोगाची बाधाच होत नाही.

फुले विमुक्त जातीचे उत्पादन, फळांची प्रत इतर सर्व जातींपेक्षा सरस आहे. याशिवाय शेतकरी स्वत: या जातीचे दिसणे तयार करून वापरू शकतात.

 

डॉ. बी.ए.बडे, श्रीमती एम. बी. कदम,

डॉ. एस. एन. हसबनीस आणि डॉ. व्ही. एस. सुपे,
राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प, गणेशखिंड, पुणे 67