आंब्याची निर्यात : काढणीपश्चात हाताळणी आणि व्यवस्थापन

डिजिटल बळीराजा    05-Feb-2018
 

 

 

 

भारतातून आंब्यांची निर्यात वाढविण्यासाठी व काही उपयुक्त धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक आहे. यासाठी आंब्याची उत्पादकता वाढविणे, काढणी पूर्व काळजी, ळांची तोडणी, प्रतवारी, पकिंग, वाहतूक संबंधी माहिती घेणे गरजेचे असून निर्यातीच्या यशासाठी हत्वाच्या बाबी कोणत्या आहे या बद्दलची माहिती या लेखात वाचावयास मिळणार आहे.

 

आंबा हे एक पौष्टिक फळ असून या फळाला भारताचे राष्ट्रीय फळ मानण्यात येते. जगामध्ये एकूण 111 देशांत हे फळ घेण्यात येते. या फळाच्या सुमारे 1000 पेक्षा जास्त जाती आहेत.

आंबा हे आपले राष्ट्रीय फळ आहे. भारतात जगाच्या 70 टक्के उत्पादन आंबा उत्पादन होते. मात्र, आंबा निर्यातीमध्ये भारताचा 4 था ते 5 वा क‘मांक लागतो. भारतातून दरवर्षी सुमारे 30,000 टन आंबा फळांची निर्यात होते. त्यापैकी 85 टक्क्यांपेक्षा जास्त वाटा हापूस आंब्याचा आहे. अन्य आंबच्या निर्यात होणार्‍या जाती म्हणजे केसर, बदाम, लालबाग, तोतापुरी, दशहरी, लंगडा, चौसा, नीलम आणि रुमानी निर्यातीमध्ये त्यांचा वाटा 15 टक्के आहे.

 

आंबा निर्यातीची दिशा : योग्य प्रकारे नियोजन केल्यास नजीकच्या भविष्यकाळात भारतातून दरवर्षी 50000 टन आंबा निर्यात करता येईल. आंब्याची निर्यात विमानाने तसेच समुद्रमागे (बोटीने) करता येईल. 50000 टन आंब्यापैकी 25 टक्के आंबा विमानाने तर 75 टक्के आंबा समुद्रमार्गे (बोटीने) निर्यात करता येईल.

 

आंब्याची निर्यात वाढवण्यासाठी करावयाच्या आवश्यक गोष्टी : भारतातून आंब्याची निर्यात वाढविण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करणे आणि काही उपयुक्त धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक आहे. निर्यातयुक्त आंब्याचे उत्पादन वाढविले पाहिजे. शिवाय निर्यातीसाठी आंब्याची शास्त्रीय पद्धतीने हाताळणी करणे आवश्यक आहे.

 

त्यासाठी खालील गोष्टी कराव्या लागतील :

1) आंब्याची उत्पादकता वाढविणे : निर्यातीच्या दृष्टीने हापूस ही सर्वांत महत्त्वाची जात आहे, परंतु तची उत्पादकता फारच कमी म्हणजे 2.5 ते 3 टनांच्या आसपास आहे. इस्रायल आणि ऑस्ट्रेलियासारख्या देशांत हेक्टरी 25 टन आंब्याचे उत्पादन घेतले जाते. भारतात आंब्याचे उत्पादन वाढविण्यासाठी सधन पद्धतीने लागवड, पाण्याचा व खताचा जरुरीप्रमाणे योग्य पुरवठा, आवश्यक त्या वेळी कलमांची छाटणी, कल्टार (पॅक्लोब्युट्रॅझोल)सार‘या वाढनिरोधकांचा शास्त्रीय पद्धतीने शिफारशीनुसार वापर, रोग आणि किडींच्या नियंत्रणासाठी शिफारस केलेल्या तंत्राचा अवलंब, या सुधारित तंत्रांचा जोपर्यंत आपण मोठ्या प्रमाणात अवलंब करून आंब्याची उत्पादकता दर हेक्टरी 12 ते 15 टनापर्यंत वाढवत नाही तोपर्यंत आंबा निर्यातीत विशेष प्रगती करता येणार नाही. त्यामुळे आंब्याची प्रतिहेक्टरी उत्पादकता वाढविणे हे आंबा बागायतदाराचे पहिले उद्दिष्ट असले पाहिजे.

 

2) आंबे काढण्यापूर्वीची काळजी : आंबे झाडावर असताना त्यांच्यावर बुरशीजन्य रोगांच्या प्रादुर्भावामुळे काळे डाग पडण्याची शक्यता असते. अशा रोगांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आंबे काढण्यापूर्वी 10 ते 15 दिवस अगोदर 0.1 टक्के कार्बेन्डेझिमची फवारणी करावी.


 

 
 

3) आंबा फळांची तोडणी : फळांच्या निर्यातीमध्ये तोडणी किंवा काढणीला विशेष महत्त्व आहे. आंबा तोडणीसाठी खालील बाबींचा अवलंब करावा -

) फळधारणा झाल्यावर आंबे तयार होण्यास 110 ते 125 दिवसांचा कालावधी लागतो. कलमांना मोहोर येण्याची प्रक्रिया दीड ते दोन महिने चालू राहते. त्यामुळे आंबा फळांची एकाच वेळी तोडणी न करता 3 ते 4 वेळा ते जसजसे तयार होतील तशी करावी. निर्यातीसाठी 14 आणे (85 टक्के) तयार झालेले आंबे काढावेत. योग्य त्या तयारीचे आंबे काढण्यास अनुभवी माणसे लावावीत.

) आंबा फळांची तोडणी देठासहित म्हणजेच 4 ते 5 सेंटिमीटर लांबीचा देठ ठेवून करावी. आंबे देठासहित तोडण्यासाठी कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या नूतन झेल्याचा वापर करावा.

) आंबे काढताना प्रत्येक आंबा स्वतंत्रपणे काढावा. तो काढतेवेळी किंवा टोपलीत ठेवतेवेळी हळुवारपणे हाताळावा. फळावर ओरखाडे पडणार नाहीत याची काळजी घ्यावी. काढलेली फळे ओबडधोबड पृष्ठभाग असलेल्या टोपलीत न ठेवता सारवलेल्या किंवा किंतानाचे अस्तर असलेल्या टोपलीत ठेवावीत. सध्या उपलब्ध असलेल प्लॅस्टिक टोपल्यांचा वापर केल्यास अधिक उपयुक्त होईल.

) फळे काढल्यानंतर अजिबात उन्हात ठेवू नयेत. आंबे काढल्यानंतर 10 मिनिटे जरी उन्हात राहिले तरी पिकल्यावर त्यात साका अधिक दिसून येतो.

 

4) आंब्याची प्रतवारी : निर्यातीसाठी आंब्याची काटेकोरपणे प्रतवारी करणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रथम ‘डागी’ (विविध प्रकारचे डाग असलेली फळे) आणि ‘बिनडागी’ अशी आंब्याची प्रतवारी करावी. निर्यातीसाठी ‘बिनडागी’ आंबे असणे आवश्यक आहे. काढलेल्या आंब्यांतून कोवळे आंबे वेगळे करण्यासाठी सर्व बिनडागी आंबे साध्या पाण्यात टाकावेत. जे आंबे वर तरंगतील ते कोवळे असतात. ते निर्यातीसाठी वापरू नयेत. पाण्यात बुडणारे आंबे काढून ते 2.5 टक्के मिठाच्या पाण्यात (द्रावणात) टाकावेत. या द्रावणात जे आंबे तरंगतील तेच निर्यातीसाठी घ्यावेत. जे आंबे या मिठाच्या द्रावणात बुडतील ते अतिजून असतात आणि पिकल्यावर त्यात साका अधिक निघण्याची शक्यता असते. म्हणून तेही निर्यातीसाठी वापरू नयेत.

निर्यातीसाठी निवडलेल्या आंब्यांची पुन्हा वजनानुसार प्रतवारी करणे आवश्यक आहे. त्यासाठी 200 ते 250 ग्रॅम , 251 ते 300 ग्रॅम आणि 301 आणि 350 ग्रॅम अशा ग्रेडमध्ये  काटेकोर ग्रेडिंग करावे. त्यासाठी स्वयंचलित प्रतवारी करणारी यंत्रणा असणे आवश्यक आहे.

 

5) रोगप्रतिबंधक मात्रा देणे : निर्यातीसाठी वेगळी केलेली सर्व आंबा फळे प्रथम 500 पी. पी. एम. कार्बेन्डेझिमच्या (500 मिलिग्रॅम कार्बेन्डेझिम 1 लिटर पाण्यात) द्रावणात 5 मिनिटे बुडवून ठेवावीत. आंबे कुजण्याचे प्रमाण कमी व्हावे म्हणून 55 अंश सें. तापमानाच्या पाण्यात आंबे पाच मिनिटे बुडवून नंतर हवेत सुकविले गेल्यास अधिक फायदा होतो. 

 

6) पॅकिंग : निर्यातीसाठी वर्गवारी केलेले आंबे आवश्यकतेनुसार एक किंवा दोन डझन क्षमतेच्या आकर्षक अशा पुठ्ठ्याच्या (कोरोगेटेड फायबर बोर्ड बॉक्समध्ये) पॅक करावेत. अशा खोक्यांना वुविजनासाठी 1 सें.मी. व्यासाची 2-2 छिद्रे पाडावीत आणि आवश्यकतेनुसार वायुवीजनासाठी छिद्रे असलेले पुठ्ठ्याचे विभाजक वापरावेत. भाताचा पेंढा किंवा इतर कोणतेही पॅकिंग साहित्य वापरू नये.

व्यवस्थितपणे भरलेली खोकी टेपने बंद करावीत. खोक्यावर आंबा जातीचे नाव, फळांची सं‘या, वजन, बॉक्स भरल्याची तारीख आणि उघडण्याची तारीख लिहावी. आंबा भरलेली खोकी उन्हात राहू देऊ नयेत.

 

7) साठवण व वाहतूक : हापूस आंबा भरलेली वायुविजनयुक्त पुठ्ठ्याची खोकी पॅलेटाझिंग करून 12 अंश सें. तापमानास आणि 85 ते 90 टक्के आर्द्रतेमध्ये सुमारे 28 दिवसांपर्यंत साठविता येतात. त्यानंतर फळे रूटेंपरेचरला म्हणजे सुमारे 30 ते 35 अंश सें. तापमानात चांगली पिकवतात. साठवणुकीत तापमानात आणि आर्द्रतेत फरक पडल्यास त्याचा आंब्यावर अनिष्ट परिणाम होतो.

आंबे शीत कोठारात (12 अंश. सें. तापमान आणि 85 ते 90 टक्के आर्द्रता) ठेवायचे असल्यास किंवा त्यांची रीफरकन्टेनरमधून 12 अंश तापमानाला आणि 85 ते 90 टक्के आर्द्रतेमध्ये निर्यात करावयाची असल्यास आंबा फळांचे शीतिकरण यंत्राचा वापर करून थंड हवेद्वारे पूर्वशीतीकरण (प्री-कूलिंग) करावे. त्यासाठी आंबा फळे भरलेले खोके या तंत्रात अडीच ते तीन तास थंड करण्यास ठेवावे. याचा आंब्याच्या साठवणुकीवर चांगला परिणाम दिसून येतो.

 

8) आवेष्टन गृहांची संकल्पना : स्थानिक बाजारपेठा आणि निर्यातीसाठी फळांची हाताळणी जलद आणि शास्त्रोक्त पद्धतीने व्हावी म्हणून ‘आवेष्ठन गृह संकल्पने’चा (पॅकिंग हाऊस) अवलंब होणे जरुरीचे आहे. त्यामध्ये प्री-कूलिंग (पूर्वशीतीकरण) फळे धुणे, फळांवर बुरशीनाशकाची किंवा गरम पाण्याची प्रकि‘या, फळांची वर्गवारी, प्रतवारी, पॅकिंग आणि शीतगृहात साठवणूक इ. बाबींचा समावेश होतो. जपान आणि अमेरिकेमध्ये फळे निर्यात करण्यासाठी पाण्याच्या वाफेच्या उष्णतेची प्रकि‘या तसेच योग्य मात्रेचे विक्रीकरण करणे अनिवार्य आहे. इस्रायलसारख्या देशामध्ये सर्व प्रकारच्या फळांसाठी सर्व उत्पादक शेतकरी आवेष्ठन गृह सुविधेचा वापर करतात. त्यामुळे विक्रीसाठी / निर्यातीसाठी फळांचा दर्जा नक्की होतो. वरील सर्व कामे स्वयंचलित यंत्राद्वारे होतील अशी मोठी आणि छोटी संयंत्रे वापरून फळांची हाताळणी आंतरराष्ट्रीय बाजारपेठांसाठी मान्य अशा पद्धतीने करण्याशिवाय गत्यंतर नाही. काही मोठे बागायतदार किंवा सहकारी तत्त्वावर अशी ‘आवेष्ठन गृह सुविधा’ निर्माण होण्यावरच आपले आंबा फळ निर्यातीचे यश अवलंबून आहे.

 

आंबा निर्यातीच्या यशासाठी महत्त्वाच्या बाबी 

1) आंब्याची उत्पादकता 2.5 ते 3 टनांपासून 12 ते 15 टनांपर्यंत वाढविणे.

2) आंबातोडणीनंतर हाताळणीसाठी ‘आवेष्ठन गृह’ संकल्पनेचा अवलंब करणे.

3) निर्यातीसाठी 14 आणे (85 टक्के) तयार (1.00 ते 1.02 विशिष्ट गुरुत्व) असलेले आंबे असावेत.

4) आंबे बिनडागी असावेत.

5) झाडावरून आंबे काढणपूर्वी 10 ते 15 दिवस अगोदर 0.1 टक्के कार्बेन्डेझिमची फवारणी करावी. आंबा फळांची आयात करणार्‍या देशांच्या अटीनुसार फवारणीसाठी सौम्य बुरशीनाशकांची निवड करावी.

6) फळे झाडावरून काढताना हळुवारपणे देठांसहित काढावीत.

7) वजनानुसार फळांची काटेकोरपणे प्रतवारी करावी.

8) आंबे पिकताना कुजू नयेत म्हणून 500 पी. पी. एम. कार्बेन्डेझिममध्ये 5 मिनिटे बुडवून काढावीत आणि सावलीत फळांवरील पाणी निघून जाण्यासाठी ठेवावीत.

9) प्रतवारी केलेले आंबे आवश्यकतेनुसार छिद्रे असलेल्या आणि विभाजक असलेल्या आकर्षक अशा पुठ्ठ्याच्या खोक्यात (कोरोगेटेड फायबर बोर्डच्या खोक्यात) भरावेत.

10) खोक्यावर जातीचे नाव, फळांचे वजन, नग, भरण्याची तारीख इत्यादी तपशील लिहावा.

11) भरलेली खोकी उन्हात राहू देऊ नयेत.

12) आंबा भरलेली खोकी पेलेटायझिंग करून 12 अंश सें. तापमानात आणि 85 ते 90 टक्के आर्द्रतेमध्ये सुमारे 28 दिवस साठविता येतात.

13) आंब्याची निर्यात बोटीने करावयाची असल्यास फळे रिफर कंटेनरमधून 12 अंश सें. तापमानास आणि 85 ते 90 टक्के आर्द्रतेमध्ये करावी. तत्पूर्वी फळांचे 12 अंश सें. तापमानास यंत्राद्वारे पूर्वशीतीकरण करावे.

14) परदेशात फळे पोहोचल्यानंतर ठराविक वातावरण असलेल्या पिकविण्याच्या कक्षात पिकवावीत. आंबा फळे सुमारे 30 ते 35 अंश से. तापमानात चांगली पिकतात.

अशा प्रकारे आंब्याचे प्रति हेक्टरी उत्पादन वाढवून त्यांची शास्त्रीय पद्धतीने काटेकोरपणे हाताळणी केल्यास भारतातून होणारी आंब्याची निर्यात वाढू शकेल.

-डॉ. गोविंद दिनकर जोशी

9421136166

भूतपूर्व प्रमुख, उद्यान विद्या विभाग,

आणि शिक्षण संचालक, डॉ. बा. सा. कोकण कृषी विद्यापीठ, दापोली