संपादकीय - ऑक्टोबर २०१८

डिजिटल बळीराजा    13-Oct-2018
 
ऑक्टोबर हा अत्यंत महत्वाचा महिना. खरीप पिके सोयाबीन, बाजरी, मूग, उडीद, ज्वारी, सूर्यफूल अशी पावसाच्या पाण्यावर येणारी पिके काढणीला येतात. सप्टेंबर महिन्यातील पावसाचा मोठा विश्राम अखेरच्या टप्प्यातील पिकांना त्रासदायक ठरतोय तरी सुद्धा पश्‍चिम महाराष्ट्रातील सर्व धरणे ओसंडून वाहताहेत. जलस्वराज्य मुळे हजारो गावात पाणी साठविले गेले आहे. त्यामुळे जरी पावसाचे प्रमाण कमी असले तरी पाण्याची उपलब्धता चांगली आहे. 
 
केंद्र शासनाच्या इथेनॉल खरेदीच्या निर्णयाने भारतातील साखर उद्योगाला संजीवनी मिळेल. नाही तर आई जेवू घालेना व बाप भीक मागू देईना अशी अवस्था उसावर अवलंबून असणार्‍या साखर उद्योगांची होती. एफ.आर.पी. ची केंद्र शासनाने जाहीर करायची व त्याचे पैसे कारखान्यांना देता येऊ नयेत अशी परिस्थिती निर्माण करायची हा खेळ गेली काही वर्षे सुरु आहे. 
 
यंदा राजस्थान, मध्यप्रदेश व छत्तीसगढ या राज्यात निवडणुका होणार आहेत. शिवाय एप्रिल - मे 2019 मध्ये नरेंद्र मोदी आणि भा. ज. पा. पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीला सामोरे जाणार आहे. 2022 पर्यंत शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करू, स्वामिनाथन आयोगाने केलेल्या शिफारसींची अमंलबजावणी करू अशी निवडणुकीसाठी दिलेली आश्‍वासने आता 4 वर्षे 5 महिने झाल्यावरही पूर्णतेकडे वाटचाल करताना दिसत नाहीत. 
 
यामुळे कोणत्याही राजकीय पक्षाच्या आश्‍वासनांना बळी पडून शेतकर्‍यांची परिस्थिती सुधारणार नही यापुढे आपला मार्ग आपणच शोधायला हवा. सुशिक्षित तरुणांनी आता शेतीकडे लक्ष देणे सुरु करायला हवे. कितीही राखीव जागा मिळाल्या तरी आपल्याला कोणी नोकर्‍या देणार नाहीत. नवीन पिकांचा अभ्यास करून शेतीपूरक व्यवसायाचंही कास धरायला हवी. देशी कोंबडी पालन, शेळी पालन, रेशीम उद्योग, मधमाशापालन अशा विविध पर्यायांचा विचार अवश्य करा. ऊस शेतीतून 100 टन उत्पन्न कसे काढता येईल. शेतीतील खर्च कसे कमी करता येतील यावर विचार मंथन करा. टपरीवर उभा राहून राजकारण चघळत बसण्यापेक्षा आपली शेती अधिकाधिक फायद्याची कशी करता येईल यावर गुगल व इंटनेटच्या साहाय्याने इतर माहितीची मदत घ्या. नुसतेच आचरट व्हिडिओ न पाहता नवीन कृषी तंत्राचे व्हिडिओ बघा. बाजारपेठेचा कानोसा घ्या. आपली आर्थिक व सामाजिक परिस्थिती आपणच बदलू शकतो तेव्हा तरुणांनी (वय वर्षे 18 ते वय वर्षे 50) नवा विचार, नवी तंत्रे, नवे ज्ञान मिळविणे गरजेचे आहे. सध्या इंटरनेटच्या मदतीने आपल्याला आपल्या गावातील हवामान कळू शकते. 
 
ऑक्टोबर अंकात उसाची पूर्व हंगामी लागवड, द्राक्ष ऑक्टोबर छाटणी, सेंद्रिय शेती, करडई, कांदा , हरभरा, गहू अशी रब्बी पिके यांची माहिती दिली आहे. या शतकातील असामान्य इंजिनीअर भारतरत्न विश्‍वेश्‍वरय्या यांच्या पुस्तकाचे परीक्षण बळीराज्याचे संस्थापक प्र. बा. भोसले यांनी लिहिले आहे. सर्व तरुण मुलामुलींनी हे पुस्तक मिळवून अवश्य वाचावे. 
शेती धंदा सोपा नाही पण यापुढे मजुरांसारखे पाट्या टाकण्याची शेती न करता, विज्ञान, नवे तंत्र व डोक्याने शेती करण्याचा संकल्प करू या. 
 
आपला,
रवींद्र भोसले 
संपादक व प्रकाशक