आंबे बहारासाठी मोसंबीच्या झाडाला ताण बसला हे कसे ओळखावे?

डिजिटल बळीराजा    08-Dec-2017
 
महाराष्ट्रात मोसंबी हे पीक महत्त्वाचे असून आंबे बहाराखाली घेतलेल्या मोसंबी पिकात साधारणपणे २५ टक्के पानगळ आढळून आल्यास त्या झाडाला ताण बसण्याची शक्यता आहे. यासाठी ताण कमी करण्यासाठी विलंब नियंत्रणाचा अवलंब केल्यास अधिक उत्पादनासाठी फायदेशीर ठरणार आहे.
 
मोसंबीच्या झाडाची चांगली व जोमदार वाढ झाल्यावर आणि झाडाचा सांगाडा बनल्यावर झाडावर फळे घेण्यास सुरुवात करावी. लागवडीनंतर पहिल्या तीन वर्षांत झाडाची चांगली वाढ योग्य वाटल्यास चौथ्या वर्षी माफक ताण देऊन कमी प्रमाणात फळे घ्यावीत.
 
 
ताण सुरू करण्यापूर्वी झाडावरील पूर्वीची फळे काढावीत. बागेचे पाणी हळूहळू कमी करत नंतर बंद करावे. ताण देण्याचा काळ हा जमिनीच्या प्रतीनुसार व झाडाच्या वयानुसार कमी-जास्त होऊ शकतो. ताण सुरू केल्यानंतर पानांचा मूळचा रंग कमी होऊन, फिकट व नंतर पिवळी पडतात. असे होत असताना पाने गळून पडेपर्यंत अन्न तयार करण्याची प्रक्रिया सुरूच ठेवतात. साधारणपणे पंचवीस टक्के पानगळ झाल्यास ताण बसला असे समजावे. पानांनी तयार केलेले कर्बयुक्त अन्न झाडांच्या फांद्यांत साठते. या कर्बयुक्त अन्नपदार्थांचा उपयोग झाडांना नवीन पालवी फुटण्यास, फुले येण्यास, फलधारणा होण्यास होतो. अशा प्रकारे झाडांना ताण दिल्यास एकाच वेळी फुलोरा येतो आणि व्यापारीदृष्ट्या हे फायद्याचे ठरते.
 
 
ताण जरुरीपेक्षा जास्त बसणार नाही याची काळजी घ्यावी. भारी जमिनीत व ओल धरून ठेवणार्‍या जमिनीत बागेस एक हलकी नांगरट करावी. नांगरटीमुळे मुळ्यांची थोडी छाटणी होऊन झाडांना पाणीपुरवठा कमी होतो व झाडांची वाढ थांबते. सर्वसाधारणपणे मुळांची छाटणी करणे झाडांसाठी हानीकारक असले तरी क्वचित वेळी झाडांची ताणाची परिस्थिती पाहून ते करावे लागतात.
 
 
ताण कसा सोडावा? :
 
आंबे बहारासाठी मोसंबीच्या बागेस ताण दिला असेल तर विहिरीचे पाणी हलक्या प्रमाणात देऊन ताण सोडावा. या वेळी भरखते, संपूर्ण स्फुरद, पालाश व अर्धे नत्र देऊन आंबवणी द्यावे. त्यानंतर पाच ते सात दिवसांनी दुसरे पाणी (चिंबवणी) द्यावे. तिसर्‍या पाळीला भरपूर पाणी द्यावे. ताण सोडल्यावर वीस ते पंचवीस दिवसांनी फुले येतात. त्यानंतर उरलेल्या नत्राचा (निम्मा) हप्ता एक ते दीड महिन्याने द्यावा. हलक्या जमिनीत नत्राची मात्रा तीन ते चार हप्त्यांत विभागून दिल्यास जास्त फायदेशीर ठरते. आंबे बहाराच्या मोसंबी बागेस पाणी देणे निसर्गावर अवलंबून नसल्याने हा खात्रीचा बहार ठरलेला आहे. मात्र, मृग बहाराच्या बागेस ताण सोडण्याची प्रक्रिया पावसाच्या पाण्यावर अवलंबून असल्याने बर्‍याच वेळा हा बहार खात्रीशीर ठरत नाही. मृग बहारासाठी मोसंबीच्या बागेस ताण सुरू केल्यानंतर झाडावर वाजवीपेक्षा जास्त ताण आला तर काही करता येत नाही. एक तर विहिरीला पाणी कमी असल्याने शेतकरी हा बहार घेतात आणि विहिरीला जरी पाणी असले तरी बागेस जास्त ताण बसल्यावर विहिरीचे पाणी देण्याची व्यवस्था केली तरी फायदा होत नाही. बाहेरचे तापमान खूप जास्त असल्याने पाणी देऊन बाग ताणाच्या धोक्यापासून वाचविली तरी आलेली फुले टिकत नाहीत. याशिवाय या बहारास वळवाच्या पावसामुळे धोका निर्माण होतो. मध्येच बागेची ताणाची स्थिती बिघडते आणि नुकसान होते.
 
आंबे बहाराचे नियंत्रण
 
मागील उन्हाळ्यात अत्यंत कमी पाण्यावर मोसंबीची झाडे शेतकर्‍यांनी जगवली. काही शेतकर्‍यांनी बहार न धरता जगवली. त्यांच्याकडे आज मृग बहार आहे. ज्यांच्याकडे जास्तीचे पाणी होते त्यांनी आंबे बहार धरून काही प्रमाणात झाडे जगविण्याचा प्रयत्न केला. मात्र, या वर्षीच्या वातावरणामुळे आंबे बहाराची फळगळ मोठ्या प्रमाणात होत आहे. एकूण, मोसंबी फळपिकाच्या १० टक्के बागेत आंबे बहार आहे. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये आंबे बहाराच्या फळांना चांगला भाव मिळेल अशी अपेक्षा शेतकर्‍यांमध्ये आहे. त्यासाठी आंबे बहाराची फळगळ कमी करणे किंवा नियंत्रणात आणणे गरजेचे आहे.
 
 
-डॉ. एम. बी. पाटील
प्रभारी अधिकारी
मोसंबी संशोधन केंद्र, बदनापूर, जि. जालना
(वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ)
मोबाइल नंबर : ७५८८५९८२४२