बीट

डिजिटल बळीराजा    10-Dec-2017
 
 
 
बीट ही द्विवर्षायू वनस्पती असून तिचे मूळ उत्पत्तीस्थान दक्षिण युरोप आणि वायव्य आशिया म्हणजेच भूमध्यसामुद्रिक प्रदेश आहे (Mediterranean region) असे मानले जाते. आज त्याची लागवड जगभरातील बहुतेक सर्व देशात कमी अधिक प्रमाणात केली जाते.
 
 
इतिहास : ग्रीक आणि रोमन लोकांना बीटची माहिती होती. ते बीटच्या पानांचा उपयोग सॅलड म्हणून करीत असत. संस्कृतमध्ये बीटला ‘रक्तगुंजन’ असे नाव आहे. त्यावरून भारतातही ते फार पूर्वीपासून माहिती होते, कदाचित वापरही होत असावा आणि लागवडही केली जात असण्याची शक्यता वाटते. हिंदीमध्ये त्याला चुकंदर म्हणतात. समुद्रकिनारी नैसर्गिकरीत्या उगवत असलेल्या बीटच्या वन्य जातीपासून (Beta Maritima) हल्लीच्या बीटची उत्क्रांती झाली असावी असे समजतात. जर्मनीमध्ये इ. स. 1560 च्या सुमारास त्याची लागवड केली जात असे. तेथून इटलीमध्ये आणि 1580च्या आसपास ते इंग्लंडमध्ये पोचले. त्याच काळात त्याची लागवड फ्रान्समध्येही सुरू झाली. सध्या मोठ्या प्रमाणावर बीटची लागवड युरोपमधील बहुतेक सर्व देश, रशिया, जपान, उत्तर चीन आणि उत्तर अमेरिका (विशेषत: युनायटेड- स्टेट्स, ण.ड.) येथे केली जाते.
 
  
वनस्पतीशास्त्रीय माहिती : बीटचा समावेश चाकवत कुळात अर्थात चेनोपोडिएसी (Chenopodia ceae) फॅमिलीमध्ये होतो. वनस्पतीशास्त्रीय नाव आहे बेटा व्हल्गॅरिस, (Beta Vulgaris). बीट ही द्विदल वनस्पती असल्यामुळे त्याचे मूळ सोटमूळ प्रकारचे असते. बी पेरल्यावर उगवून आले की जमिनीत सोटमूळ आणि त्याच्या फांद्या वाढू लागतात. खोड अगदी लहान, फक्त जमिनीलगतच असते. त्यामुळे पाने जमिनीच्या पृष्ठभागापासून एकदम मुळातूनच आल्यासारखी वाटतात. मुळाच्या वरच्या भागाचा मांसल कंद तयार होतो. खालचा भाग नेहमीच्या पाणी व क्षार करण्याचे कार्य करत राहतो. संचय उतीचे (स्टोरेज टिश्यू) वर्तुळाकार थर एकावर एक तयार झाल्यामुळे मुळाची जाडी वाढून ती विशिष्ट आकाराची, खूप जाड होतात. पाने एकांतरित, साधी, मोठी, काहीशी मांसल, लवहीन, हिरवीगार असतात. शिरविन्यास जाळीदार (Reticulate Venation) असतो. वाढीच्या काळात अनेक पाने तयार होऊन हंगामाच्या शेवटी मुळांमध्ये अन्नसंचय केला जाऊन ती जाड व मांसल होतात. त्यानंतर पाने वाळून जातात. दुसर्‍या वर्षीच्या हंगामात फुलोरे येतात आणि बिया तयार झाल्यावर झाडे मरतात. म्हणून त्याला द्विवर्षायू पीक म्हणतात. गाजर, मुळा, कांदा ही कंद प्रकारची पिके अशाच प्रकारची आहेत. बीटच्या पानांचाही उपयोग काही ठिकाणी सॅलडमध्ये करतात. पानांची भाजीही करता येते. त्याला ‘पालकबीट’ची भाजी म्हणतात. फुले लहान असून पंचभागी असतात. फळात एकच अगदी बारीक बी असते.
 
 
लागवड : बीट थंड हवेत चांगले येत असल्यामुळे आपल्याकडे त्याची लागवड रब्बी हंगामात करतात. युरोप-अमेरिकेत पेरणी वसंत ऋतूत करतात आणि उन्हाळ्याच्या शेवटी पीक तयार होते. लागवड गादीवाफ्यात बी पेरून करतात. त्यासाठी दोन झाडांमधील अंतर 20 ते 30 सें.मी. ठेवतात. आवश्यकतेप्रमाणे उगवलेल्या रोपांची विरळणी करून योग्य ते अंतर ठेवले जाते. बीटसाठी कोणत्याही प्रकारची जमीन चालते, फक्त मुळांच्या भरदार वाढीसाठी ती पुरेशी भुसभुशीत असावी लागते. वाढीच्या काळात अनेक वेळा पाणी द्यावे लागते. भरपूर पाणी आणि स्वच्छ सूर्यप्रकाश मिळण्यावर कंद मोठे होणे अवलंबून असते. कंद व्यवस्थितपणे उकरून काढतात आणि धुऊन, वाळवून विक्रीसाठी पाठवतात.
 
 
बीटच्या दोन प्रमुख जाती आहेत- पांढरे आणि तांबडे बीट. तांबडे बीट भाजी, कोशिंबीर, सॅलड आणि चटणी करण्यासाठी वापरतात. पांढरे बीट म्हणजेच शुगर बीट. त्याची साखर तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लागवड करतात. अठराव्या शतकापर्यंत साखर मुख्यत: उसापासून करीत असत. काही प्रमाणात शिंदीच्या झाडापासून गुळी साखर किंवा खांडसारी साखरही केली जात असे. 18व्या शतकात साखरटंचाईला तोंड देण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. युरोपातील हवामानात ऊस पिकत नसल्यामुळे तेथील पर्यावरणात वाढणारे, त्या काळापर्यंत फक्त भाजी व सॅलड म्हणून वापरण्यात येणारे पांढरे बीट प्रयोगासाठी निवडण्यात आले.
 
 
साखर उत्पादन : इ. स. 1799 मध्ये जर्मनीमध्ये रिचर्ड नावाच्या शास्त्रज्ञाने बीटपासून साखर सर्वप्रथम तयार केली आणि आता जगातील साखरेच्या एकूण उत्पादनापैकी 60% साखर बीटपासून तयार केली जाते! युरोपमधील जवळजवळ सर्व देशांत, उत्तर अमेरिका (यू.एस.), चीन, जपान आणि अर्जेंटिनामध्ये शुगर बीट हे एक महत्त्वाचे पीक झाले आहे.
शुगर बीटचे कंद पांढर्‍या रंगाचे, 500 ग्रॅम ते 2 किलो वजनाचे असतात. कंद स्वच्छ करून त्यांच्या पातळ चकत्या केल्या जातात. त्या वाहत्या गरम पाण्यात ठेवून विसरण (डिफ्युजन) प्रक्रियेमुळे त्यातली साखर पाण्यात विरघळलेल्या स्वरूपात उतरवली जाते. त्यानंतरच्या प्रक्रिया आपल्याकडील साखर कारखान्यात उसाच्या रसावर केल्या जाणार्‍या प्रक्रियांप्रमाणेच असतात.
 
 
पोषणमूल्य : पोषणमूल्यांचा विचार केला तर बीट हे सर्व कंदमुळांत श्रेष्ठ असल्याचे आढळून येते. कोणत्याही कंदमुळापेक्षा त्यामध्ये प्रथिनांचे आणि क जीवनसत्त्वाचे (सी व्हिटॅमिन) प्रमाण किती तरी जास्त असते. खनिजांचे भरपूर प्रमाण आणि कमी उष्मांक (कॅलरी) यामुळे तर समतोल आहारात, त्याचप्रमाणे कमी उष्मांक खाद्यपदार्थात त्याचे स्थान फारच उच्च दर्जाचे आहे. बीटमध्ये ‘अँटी-ऑक्सिडंट’ही आहेत.
 
 
औषधी उपयोग : बीटच्या मुळाचे अनेक औषधी उपयोगही आहेत. आयुर्वेदशास्त्रानुसार बीट पोटाच्या विकारांवर अत्यंत गुणकारी आहे. उकडलेले बीट कंद कुपचन व अर्श रोगावरील (अल्सर) उपचारांसाठी उपयुक्त आहे. होमिओपॅथीमध्येही ‘बीटा व्हल्गॅरिस’ या नावानेच हे औषध ओळखले जाते व त्याचा उपयोग नेत्रविकारामध्ये आणि क्षयरोगामध्ये केला जातो. रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्याचा गुणधर्म बीटमध्ये आहे. ‘उकडलेले बीट कुपचन, कबज व अर्श रोगात देतात. स्त्रियांच्या काही रोगांवरही ते गुणकारी आहे.’ (औषधी संग्रह, वा. ग. देसाई)
 
 
 
प्रा. श्री. द. महाजन,
पुणे
020-24332745, 7774056880