अंजीर - किड व रोग व्यवस्थापन

डिजिटल बळीराजा    10-Dec-2017
 
 
 
अंजीर हे कमी खर्चात येणारे आणि भरपूर पैसा मिळवून देणारे पीक असल्यामुळे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर आहे. महाराष्ट्र शासन अंगिकृत रोजगार हमी योजनांतर्गत फळबाग लागवड कार्यक्रमाखाली या पिकाचा समावेश झाल्यापासून या पिकाखालील क्षेत्रात दिवसेंदिवस वाढ होत आहे. अंजीर फळ पिकावर इतर फळझाडांशी तुलना केल्यास कमी प्रमाणात किड रोगाचा प्रादुर्भाव आढळतो. परंतु ज्या काही कीड आणि रोग याचा प्रादुर्भाव होतो त्यामुळे अंजीर उत्पादनात घट येते. अंजीर फळपिकावर येणार्‍या प्रमुख किडी आणि रोग आणि त्याचे व्यवस्थापन याबाबत या लेखात सविस्तर उहापोह केला आहे.
 
 
अंजीरावर आतापर्यंत विविध 50 प्रकारच्या किडींची नोंद झालेली आहे. यापैकी खोडकिडा, पाने गुंंडाळणारी अळी, साल खाणारी अळी, खवले किड, फुलकिडे, खोडाला लहान छिद्र पाडणारे भुंगे व फळमाशी या प्रमुख किडी आहेत. त्याचप्रमाणे तांबेरा, करपा, फळकूज, फळावरील ठिपके व मोझॅक इ. प्रमुख रोग या फळपिकावर आढळून येतात.
 
1) खोडकिड : आंब्यावरील भिरुड किड जी आहे तीच अंजीर पिकाची ही किड आहे. खोड किड्याची भुंगेरा अवस्था तपकिरी रंगाची असून त्याच्या पंखावर लालसर शेंदरी रंगाचे ठिपके असतात. किडा दणकट असतो आणि त्याची लांबी जवळपास 55 मी.मी. असते. त्याच्या मिशा (अँटेना) शरीराच्या लांबीपेक्षा जास्त लांब असतात.
 
खोडकिडीचा जीवनक्रम पावसाळी हंगामापासून सुरू होतो. पाऊस पडल्यानंतर या किडीचे भुंगेरे बाहेर पडतात. नर-मादीचे मिलन झाल्यानंतर मादी भुंगेरे झाडाच्या खोडावर/ फांद्यावर सालीला लहानसर कोष करून त्यात धुरकट पांढरी अंडी घालतात.
पिकावरील नुकसानकारक अवस्था अळी असते. अळी सुरुवातीला अंड्यातून बाहेर पडल्यानंतर साल खाते आणि नंतर खोडाच्या आतील भागात शिरकाव करून खोडात पोखरून उपजीविका करते. खोडाच्या आतील भागात वेडीवाकडी, नागमोडी आकारात पोखरून हा पोखरलेला भाग भुसा आणि विष्ठेने भरून टाकते. जमिनीवर खोडालगत पडलेला लाल-ओलसर भुसा आढळल्यास या किडीच्या प्रादुर्भावाचे अस्तित्व जाणवते. पूर्ण वाढ झालेली आणि दणकट असते. तिचा रंग पांढरट पिवळसर असतो.
 
 
 
या किडीचे भुंंगेरे पावसाळ्यात जून-जुलैमध्ये बाहेर पडून अळी घालते. त्यामुळे यावेळी प्रतिबंधात्मक उपाय करावा. कारण या किडीचा जीवनक्रम पावसाळी हंगामापासून सुरू होतो. भुंगेर्‍याची एक मादी 3 ते 6 महिन्याच्या कालावधीत 100 ते 200 अंडी घालते. अंड्यातून अळी बाहेर पडल्यानंतर अळीची पूर्ण वाढ होण्यास 4 ते 5 महिन्यांचा कालावधी लागतो. नंतर हिवाळ्यात अळी कोषावस्थेत जाण्यापूर्वी सुप्तावस्थेत असते. कोषावस्थेत जाण्यापूर्वी भुंगेर्‍याला बाहेर पडण्यासाठी छिद्र तयार करून ठेवते. आणि नंतर स्वत:भोवती लंबगोलाकृती घर करून त्यात कोषावस्थेत जाते. खोडकिडीचा जीवनक्रम पूर्ण होण्याकरता जवळपास 4 ते 7 महिने लागतात. आणि एका वर्षात एकच पिढी तयार होते.
 
 
अळीने पोखरलेल्या फांद्याची / झाडांची पाने सुरुवातीला कोमेजून पिवळी पडून नंतर वाळतात. पर्यायाने फांद्या किंवा संपूर्ण झाड वाळण्यास मदत होते. या किडीचा प्रादुर्भाव त्यामुळे पावसाळ्यात जास्त दिसतो.
 
 
 
उपाययोजना :
 
1. बाग स्वच्छ आणि तणविरहित असणे आवश्यक आहे.
2. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पावसाळ्यात जून-जुलैमध्ये संपूर्ण झाडावर, खोडावर क्लोरोपायरीफॉस 15 मिली प्रति 10 ली. पाण्यात मिसळून फवारावे.
3. किडग्रस्त फांद्या, खोडे वेळोवेळी काढून नष्ट कराव्यात. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून खोड आणि फांद्यांना मुलामा (पेस्ट) द्यावा. त्याकरिता पेस्ट तयार करण्यासाठी 10 लि. पाण्यात 4 किलो गेरू रात्रभर भिजत घालून दुसर्‍या दिवशी त्यात लिडेन 27 टक्के प्रवाही 25 मिली किंवा क्लोरोपायरीफॉस 20 टक्के प्रवाही 50 मिली अधिक कॉपरऑक्सीक्लोराईड 25 ग्रॅम एकत्रित चांगले मिसळून तयार झालेल्या पेस्टचा मुलामा खोडावर लावावा.
4. खोडकिडीने केलेल्या छिद्रात रॉकेल किंवा पेट्रोल किंवा डायक्लोरोव्हास 10 मिली किंवा फेनव्हेलरेट 5 मि.ली. प्रति 1 ली. पाण्यात मिसळून इंजेक्शनच्या पिचकारीच्या सहाय्याने टाकून छिद्र चिखलाने बंद करावेत.
 
 
  
2) साल खाणारी अळी : झाडाच्या खोड आणि फांद्यावर फुटवे फुटलेल्या जोडाच्या जागी भुस्सा आणि विष्ठायुक्त जाळी निदर्शनास आल्यास साल खाणार्‍या अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे लक्षात येते. या जाळीच्या आत अळी राहून झाडाच्या सालीवर उपजिविका करते. साल खाल्ल्यानंतर फांदी पुढे वाळू लागते. अशा प्रादुर्भावित फांद्या कालांतराने खाली पडतात. अंजिरावर साल खाणार्‍या अळीच्या दोन प्रजाती आढळून येतात. त्यात काळ्या आणि पांढर्‍या रंगाच्या अशा दोन प्रकारच्या अळ्या निदर्शनास येतात.
 
 
उपाययोजना :
 
1) बागेत झाडांची गर्दी होणार नाही अशी काळजी घ्यावी. बाग स्वच्छ तणविरहित असावी.
2) प्रादुर्भावित जागी (स्पॉट अ‍ॅप्लिकेशन) किटकनाशकाची फवारणी करावी. त्याकरिता कार्बारील 50 टक्के पाण्यात मिसळणारी भुकटी 10 टक्के किंवा डायक्लोरव्हॉस 76 टक्के प्रवाही 0.08 टक्के यापैकी एका किटकनाशकाची फवारणी करावी. प्रत्येक फवारणीला किटकनाशक आलटून पालटून घ्यावे.
3) जैविक किडनियंत्रण पद्धतीत या किडीच्या नियंत्रणाकरिता परोपजीवी बुरशी बिव्हेरिया बॅसिआना 10 ग्रॅम प्रति लि. आणि वरीलपैकी एका किटकनाशकाची एकत्र मिसळून फवारणी केल्यास किडीचे प्रभावीपणे नियंत्रण होते.
 
 
3) खोडाला लहान छिद्र पाडणारे भुंगेरे (शॉट होल बोरर) :
 
ही कीड श्रीलंका, दक्षिण भारत, आसाम राज्यात चहा-कॉफी पिकांवर नुकसानकारक असून मागील काही वर्षांत महाराष्ट्रात व कर्नाटकात डाळींबावर मोठ्या प्रमाणावर नुकसान करीत असल्याचे निदर्शनास आले. सद्यस्थितीत पावसाळी हवामानात ही कीड अंजिरावरसुद्धा आढळून आली आहे. खोडावर/ फांद्यावर बारीक छिद्रे आणि त्यातून बाहेर पडणार्‍या बारीक पावडरमुळे किडीचा प्रादुर्भाव सहजपणे ओळखता येतो.
अतिशय लहान तपकिरी रंगाचे भुंगेरे खोड/ फांद्यांना सूक्ष्म छिद्रे (टाचणीच्या टोकाएवढे) पाडून आत पोखरतात. अशा झाडांच्या फांद्यावरील पाने पिवळी पडतात. परिणामी फांद्या/झाड वाळण्यास सुरुवात होते. अळ्या आणि भुंगेरे झाडाच्या आतील भागापर्यंत पोखरत जातात. त्यामुळे त्यांचे नियंत्रण करणे कठीण होते. किडींचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून नियमित प्रतिबंधात्मक उपाय योजना क्रमप्राप्त ठरते.
 
 
उपाययोजना :
 
1) किडग्रस्त फांद्या, खोडे वेळोवेळी काढून नष्ट कराव्यात. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून खोड आणि फांद्यांना मुलामा (पेस्ट) द्यावा. त्याकरिता पेस्ट तयार करण्यासाठी 10 लि. पाण्यात 4 कि. गेरू रात्रभर भिजत घालून दुसर्‍या दिवशी त्यात लिंडेन 27 टक्के प्रवाही 25 मिली किंवा क्लोरोपायरीफॉस 20 टक्के प्रवाही 50 मिली अधिक कॉपरऑक्सीक्लोराईड 25 ग्रॅम एकत्रित चांगले मिसळून तयार झालेल्या पेस्टचा मुलामा खोडावर लावावा.
या किडीचा प्रादुर्भाव झाडाच्या खोडावरसुद्धा होतो. त्याकरिता लिंडेन 20 टक्के प्रवाही 5 मिली प्रति लि. किंवा क्लोरोपायरीफॉस 20 टक्के प्रवाही 5 मिली प्रति. लि. पाण्यात याप्रमाणे झाडाच्या आकारानुसार 5 ते 10 लि. द्रावण खोडालगत आळे करून मुळावर ओतावे.
3. झाडाच्या वरील भागातील फांद्यावर / खोडावर वेळोवेळी लिंडेन 20 टक्के प्रवाही 2.5 मिली प्रति लि. या प्रमाणात घेऊन फवारणी करावी.
 
 
 
4) फळमाशी : अंजीरावर भारतात फळमाशीच्या तीन प्रजाती आढळून येतात. महाराष्ट्र राज्यात अंजीर बाजारात येण्याच्या वेळी आंब्याचाही हंगाम सुरू होतो आणि आंब्यावरसुद्धा फळमाशीचा उपद्रव मोठ्या प्रमाणावर होतो. त्यामुळे फळमाशीला पूरक खाद्य उपलब्ध असल्याने त्यांचा प्रादुर्भाव पिकलेल्या अंजीर फळावर असतो. फळमाशीची मादी पिकलेल्या फळांच्या सालीच्या आतील भागात अंडी घालतात. अंडी उबल्यानंतर त्यातून पांढर्‍या रंगाच्या अळ्या बाहेर पडतात आणि फळांच्या गरावर उपजिवीका करतात. प्रादुर्भावीत फळे नंतर सडतात आणि गळून पडतात. महाराष्ट्रात या किडीचा प्रादुर्भाव मे-जून महिन्यात दिसून येतो.
 
 
उपाययोजना :
 
1. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वेळीच फळांची काढणी करावी, म्हणजेच फळे जास्त पक्व होण्यापूर्वी काढावी.
2. बागेत खाली पडलेली किडग्रस्त फळे गोळा करून त्यांना नाश करावा.
3. फवारणीकरिता फेंथीऑन 0.05 टक्के किंवा डेल्टामेथ्रीन 0.002 टक्के यापैकी किटकनाशक फवारावे.
 
 
 
5) पाने गुंडाळणारी अळी : ही कीड अंजीर पिकावर भारतात तसेच बर्मा, सिलोन आणि श्रीलंकेत आढळते. या किडीची फायकोडस मायनर ही प्रजात अंजीर फळपिकावर नुकसानकारक असल्याचे निदर्शनास येते. या किडीची मादी पतंग अंजीर झाडाच्या कोवळ्या शेंड्यावर अंडी घालतात. अंड्यातून अळी बाहेर पडल्यावर सुरुवातीला पानातील हरितद्रव्य खवून त्यावर उपजिवीका करते. या किडीची अळी तपकिरी काळसर रंगाची असून पानांच्या आतील भागात पानावरील हरितद्रव्याचा पापुद्रा खरबडून खातात. परिणामी, प्रादुर्भाव झालेली पाने आपोआप गळून पडतात. या किडीची कोषावस्था असताना सुप्तावस्थेत असतात. त्यावेळी अळ्या कोषावस्थेत जाण्याकरिता झाडाच्या बेचक्यामध्ये किंवा सालीखाली जेथे लपण्याकरिता जागा असते, अशा सुरक्षित स्थळी कोषावस्थेत जातात. 
महाराष्ट्र राज्यात या किडीचा प्रादुर्भाव सप्टेंबरमध्ये छाटणी झाल्यानंतर येणार्‍या नवीन पानांवर निदर्शनास येतो. मात्र, या किडीचा प्रादुर्भाव आजतागायत फार मोठ्या प्रमाणावर आल्याचे आढळले नाही. सद्य:स्थितीत तरी ही कीड दुय्यम स्वरुपाची आहे.
 
 
उपाय योजना :
 
1. किडग्रस्त पाने काढून अळ्यासह नाश करावा.
2. क्लोरोपायरीफॉस 20 टक्के प्रवाही 2 मिली प्रति लि. पाण्यात मिसळून फवारणी करावी.
 
 
 
6) फुलकिडे : अंजीराची फळधारणा झाल्यानंतर फळाच्या वाढीच्या अवस्थेत फुलकिड्यांचा प्रादुर्भाव सुरू होतो. फळवाढीचा सर्वच अवस्थांमध्ये या किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो. फुलकिड्यांची पिल्लावस्था आणि प्रौढ फुलकिडे फळांवरील साल / पृष्ठभाग खरवडतात आणि त्यातून स्त्रवणारा पेशीरस शोषून घेतात. त्यामुळे फळांवर खरबरीतखपणा येतो आणि प्रत खराब होते. लहान फळांवर प्रादुर्भाव झाला तर फळांचा आकार वेडावाकडा होतो.
 
 
 उपाययोजना : सायपरमेथ्रिन 10 टक्के प्रवाही 0.05 टक्के किंवा इमॅडोक्लोप्रींड 20 टक्के प्रवाही 0.004 यापैकी एका किटकनाशकाची फवारणी करावी.
वरील किडी व्यतिरिक्त अंजीरावर तुडतुडे, कोळी, निजमाशी, पिठ्या, ढेकूण या किडींचाही प्रादुर्भाव कमी अधिक प्रमाणात निदर्शनास येतो.
 
 
अंजीरावरील रोग : अंजीर पिकावर प्रामुख्याने तांबेरा, अ‍ॅन्थ्रकनोज, फळकूज, फळावरील ठिपके व मोझॅक या रोगांचा प्रादुर्भाव आढळून येतो.
 
1. तांबेरा :
 
हा अत्यंत नुकसानकारक रोग असून यांच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनात 50% पेक्षा अधिक घट होऊ शकते. हा रोग सिरोटीलीय फिकी या बुरशीमुळे होतो. ही बुरशी फक्त अंजीराच्या सजीव वनस्पतीवरच वाढते.
 
लक्षणे : या रोगात सुरुवातीला पानाच्या खालच्या बाजूस तापकिरी रंगाचे लहान किंचित लांबट उंचवट असलेल्या पुटकुळ्या सदृश्य असंख्य फोड दिसतात. या फोडांमधूनच पिवळसर, तपकिरी रंगाची बुरशीची भुकटी बाहेर पडते. ही भुकटी म्हणजेच या बुरशीचे बिजाणू होय. ज्यामुळे या रोगाचा कित्येक किलोमीटरपर्यंत हवेमार्फत प्रसार होतो. रोगाचे प्रमाण जास्त राहिल्यास झाडाची पाने पिवळी पडून गळतात. अतिरोगग्रस्त बागेत तर फळे आणि फांद्या शिल्लक राहून पूर्ण पानगळ होते. अशा पानगळ झालेल्या बागेत फळांची योग्य वाढ होत नाही. उघड्या पडलेल्या फळांवर सूर्याच्या उष्णतेमुळे चट्टे पडतात. रोगाचा प्रादुर्भाव फळांवरही आढळून येतो. प्रादुर्भावीत फळांवर लहान काळपट असंख्य डाग पडतात. अशी फळ चांगली पिकत नाहीत. कडक होतात किंवा पिकल्यानंतर ताबडतोब खराब होतात.
या रोगाची वाढ साधारणत: कमी तापमान आणि जास्त आर्द्रतेमध्ये होते. त्यामुळे पावसाळ्यापेक्षा थंडीच्या दिवसात हा रोग मोठ्या प्रमाणावर येतो.
 
 
नियंत्रणाचे उपाय :
1. बागेची छाटणी :
बागेची दरवर्षी बहार धरण्यापूर्वी हलकी छाटणी करणे आवश्यक असते. त्यामुळे रोगग्रस्त फांद्यांची संख्या कमी होते. नवीन फूट जोमाने येते. व त्यावर रोगाचा प्रादुर्भाव अत्यल्प असतो.
2. बागेची स्वच्छता :
जमिनीवर पडलेली रोगट, वाळलेली पाने, फळे तसेच छाटलेल्या रोगट फांद्या गोळा करून ती बागेबाहेर जाळून टाकावीत किंवा खड्ड्यात खोल पुरवीत. त्यामुळे अशा रोगट अवशेषापासून होणारा रोगाचा पुढील प्रसार टाळता येतो.
 
 
फवारणी :
1. बागेची छाटणी झाल्यावर ताबडतोब व संपूर्ण झाडावर, झाडाखाली, जमिनीवर गंधक 300 मेश 20 किलो / हे. याप्रमाणे धुरळणी किंवा गंधक पाण्यात मिसळणारे 20 ग्रॅम / 10 लि. पाणी प्रमाणे फवारणी करावी.
2. अंजीराला कोवळी पाने फुटल्यानंतर साधारणत: छाटणीनंतर 20 दिवसापासून 15 दिवसाच्या अंतराने क्लोरोथॅलोनील 0.2 टक्के (20 ग्रॅम) अधिक कार्बेनडॅझीम (10 ग्रॅम) प्रती 10 लिटर पाणी या प्रमाणात फवारावे.
किंवा कार्बेनडॅझीम (10 ग्रॅम) अधिक मॅन्कोझेब (25 ग्रॅम) किंवा कार्बेनडॅझीम (10 ग्रॅम) अधिक कॅप्टन (20 ग्रॅम) वरील पैकी कोणतीही एक फवारणी आलटून पालटून करावी. अंजीर काढणीच्या एक महिना अगोदर फवारणी बंद करावी.
 
 
2. पानावरील ठिपके : हा रोग सिलिड्रोकडीयम स्कोपॅरियम बुरशीमुळे होतो. पानावर लहान गोलाकार तपकिरी ठिपके एकसारखे आकाराने वाढतात, स्पष्ट काळसर तपकिरी कडेला गडद तपकिरी वलय दिसते. रोगग्रस्त पाने 20-30 दिवस अगोदर गळून पडतात.
 
 
 
3. अ‍ॅन्थ्रॅकनोज : हा रोग स्पेशेलोमा फिकी कॅरीकी, कोलीटोट्रकिम ग्लोयिओस्पोरायडीस या बुरशीमुळे होतो. पानावर लहान गोलाकार तपकिरी ठिपके दिसतात. रोगट फांद्या, पाने, फळे हे अवशेष या रोगाची लागण होण्यास मदत करतात. रोगाचे बीजाणूचे पुनर्जीवन एक ते तीन वर्षे वयाच्या फांद्यावर सर्वाधिक मे ते सप्टेंबर या काळात होते.
 
 
4. फळावरील ठिपके : हा रोग ब्रोट्राटीस सिनेरिया अल्टरनेरिया फिकी फ्युजारियम मोनिलफॉर्म या बुरशीमुळे होतो. वेगवेगळ्या आकाराची गोलाकार, वेडवाकडी तांबूस काळपट रंगाचे ठिपके दिसतात.
 
 
नियंत्रणाचे उपाय : पानावरील ठिपके, अ‍ॅन्थ्रॅकनोज, फळावरील ठिपके नियंत्रणासाठी कॅप्टन 0.2 किंवा झायनेब 0.02 टक्के किंवा क्लोरोथॅलोनील 0.1 टक्के किंवा बेनोमिल 0.1 टक्के यापैकी एका बुरशीनाशकाची 15 दिवसांच्या अंतराने 2-3 फवारण्या कराव्यात.
 
 
 
5. अंजीर मोझॅक (विषाणू) : पिवळसर हिरवे ठिपके पानावर विखुरलेले दिसतात असे ठिपके एकत्र होऊन पानावर वेडेवाकडे मोठमोठे ठिपके दिसतात अशी पाने पांढरट वेडीवाकडी दिसतात. अशी पाने कधीच चांगल्या पानांबरोबर वाढत नाहीत. फळांची संख्या अत्यंत कमी राहते.
 
 
नियंत्रणाचे उपाय :
विषाणूरोगाचा प्रादुर्भाव किटकामार्फत होतो. त्यामुळे किटकांचा योग्य किटकानाशक वापरून बंदोबस्त करावा.
 
सुनिल लोहाटे,
वनस्पती रोगशास्त्रज्ञ, अभासंप्र कोरडवाहू फळपिके,
(अंजीर व सिताफळ) संशोधन केंद्र,
जाधववाडी, ता. पुरंदर, जिल्हा पुणे.